23 April 2019

News Flash

‘हंडा हटाव’ राष्ट्रीय घोषवाक्य व्हायला हवे!

वाचक प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

‘सुत्तडगुत्तड’ – ‘पाणी – ओळख जगण्या-मरण्याची’ (१९ जाने.) या लेखातील आशय  विदारक आहे. कोणत्याही चित्रात ‘घट डोईवर घट कमरेवर’ असलेली स्त्री मोठी आकर्षक भासते; पण प्रत्यक्षात उन्हापावसात चालत जाऊन नदी किंवा विहिरीवरून पाणी आणणे किती कष्टप्रद असते हे त्या एका माऊलीलाच माहीत. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे झाली, स्त्रीच्या डोक्यावरचा हंडा अजूनही जायला तयार नाही. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण भारत सर्वत्र स्त्रीचा बहुमूल्य वेळ पाणी या मूलभूत गरजेसाठी वाया जातो. जे डोके बुद्धीचा वापर करायला हवे ते ओझे वाहायला वापरले जाते. प्रगत देशातील चित्र वेगळे असते. जिथे नळ असतो तिथे हमखास पाणी असते. सर्व भारतभर प्रत्येक घरात नळ येईल की नाही कुणास ठाऊक, पण प्रत्येक गावात ‘घराजवळ नळ आणि हंडा हटाव’ हे ‘गरिबी हटाव’सारखे राष्ट्रीय घोषवाक्य व्हायला हवे.

– यशवंत भागवत, पुणे

हृदयद्रावक स्वानुभव

विद्या नाडगौडा यांचा ‘भरजरी गं पितांबर दिला फाडून’ यावर आधारित निर्व्याज प्रेमाचा कथन केलेला स्वानुभव हृदयद्रावक आहे. श्रीकृष्ण आणि द्रौपदी यांचा स्नेहभाव व्यक्त करणारा तो प्रसंग आहे. आपला हा अनुभवसुद्धा श्रीकृष्ण आणि पेंद्या यांच्यातील मित्रप्रेमाची अनुभूती दर्शवणारा आहे. दोन्ही श्रीकृष्णांशी निगडित. खरी मैत्री जात, धर्म, गरीब, श्रीमंत या भिंती तोडून टाकते. याची प्रचीती आपणास आली. जाती- धर्माच्या नावाखाली सतत भांडणाऱ्या आणि भांडणे लावणाऱ्या प्रवृत्तींनी यापासून बोध घेण्याची गरज आहे. या अवाढव्य समाजात असे काही स्त्री-पुरुष आहेत. त्यामुळेच समाज टिकून आहे. दु:खद आणि सुखदप्रसंगी कपडे देण्या-घेण्याची आपली परंपरा आहे.

मात्र खिसा भरलेला असतानाही दु:खदप्रसंगी कपडे देताना, असे कपडे कुणी फारसे वापरत नाहीत अशी कल्पना आहे  म्हणून कमी किमतीचे हलके कपडे देण्याकडे कल असतो. मात्र आपण ती ‘प्रेमाची साडी’ नेसून फाडली आणि प्रेम जपलं आणि नकळत समाजापुढे आदर्श ठेवला आहे.

– डॉ. हिरालाल खैरनार, खारघर

First Published on February 2, 2019 1:18 am

Web Title: chaturang loksatta reader response 3