स्त्रियांसाठीच ‘धोक्याची घंटा’

‘धोक्याची घंटा’ हा उषा पुरोहित यांचा (२५ मे) लेख वाचला. लेखात स्त्रीवर पुरुषाकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचारांबाबत भाष्य केले आहे. ‘पुरुषांच्या कोणत्या वचनांना किती भुलायचे आणि नैतिकतेच्या कल्पनांना कुठपर्यंत मोकळीक द्यायची याचा निर्णय प्रेमात पडलेल्या स्त्रियांनीच घ्यायला हवा.’ लेखाचा हा निष्कर्ष अतिशय चपखल आहे. स्त्रियांचे गोड शब्दांत कान टोचले आहेत. बलात्कार नेमके कशाला म्हणावे, हेच कळेनासे झाले आहे. कायदा, वकील आणि न्यायालये देखील त्यात गुरफटून गेली आहेत. नेमका अर्थ लावणे त्यासंबंधीचे साक्षी, पुरावे तयार करणे कटकटीचे ठरते आहे. बलात्कारासंबंधित तक्रारींमध्ये विशेषत: एखाद्या पुरुषाने, लग्नाचे तोंडी वचन कुठे कानाकोपऱ्यात दिले म्हणून त्या पुरुषाला आपले बहुमोल शरीर खुशाल अर्पण करायचे, मौजमजा करायची, आपणही शरीरसुखासह अनेक बाबी उपभोगायच्या आणि मग कालांतराने गर्भधारणा झाल्यावर लग्नाबाबत तगादा लावायचा आणि पुरुषाने नकार दिल्यावर मग बलात्काराची तक्रार करायची ही कृतीच अनाकलनीय आहे. आपले शरीर ही आपली संपत्ती आहे. ती तात्कालिक शरीरसुखाच्या ओढीने किंवा मौजमजेसाठी परपुरुषाच्या हातात सोपवणे हा सरळ मूर्खपणा आहे. शील, चारित्र्य या खूप नंतरच्या बाबी आहेत असे मला वाटते.

–  डॉ. हिरालाल खैरनार, खारघर.

‘कन्यादान’ हे गुंगीचे उदाहरण

नीरजा, तुम्ही ‘तळ ढवळताना’ सदरातील ‘कन्यादान..’ (२५ मे) हा लेख लिहून सावित्रीबाई फुले यांच्या कन्या आहात हे सिद्ध केलेत त्याकरिता तुमचे अभिनंदन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘मनुस्मृती’ का जाळली हे समजेल.

रूढी या साचलेल्या डबक्यातील पाण्याप्रमाणे आहेत हे अजून आम्हा हिंदू राष्ट्र करणाऱ्यांना समजत नाही. जगातील प्रत्येक संस्कृतीत परंपरा निर्माण झाल्या व नव्या मानवी जगात देखील डिजिटल नव्या परंपरा निर्माण होत आहेत. परंपरा नेहमीच वाहत्या पाण्याप्रमाणे उत्क्रांत होत असतात. त्यामुळे त्या सुंदर व नितळ असतात. पण जेव्हा हे पाणी एक ठिकाणी साचते तेव्हा त्याला उग्र घाण वास येऊ  लागतो. आपल्या देशाची हीच गोंधळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्हींतला फरक न समजता गुंगी आल्याप्रमाणे आपण वागत राहतो. ‘कन्यादान’ हे त्याच गुंगीचे उदाहरण आहे. आपण हा लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद.

– रंजन र. इं. जोशी, ठाणे.