‘‘मला विज्ञानकथा कशी सुचते? विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पनेपेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट!, सूर्य कधीकाळी फुगत जाऊन पृथ्वीला गिळून टाकेल.. अशा गोष्टी जणू काय विज्ञानकथेत जायची तयारी दर्शवतात. अशांपकी एखादी घटना मनात चकरा मारत असते. अखेर वाटू लागते की, लिहायची वेळ आली..’’ ‘कृष्णविवर’, ‘उजव्या सोंडेचा गणपती’, ‘पुत्रवती भव’, ‘अंतराळातील स्फोट’, ‘आकाशाशी जडले नाते’,  ‘वामन परत न आला’ अशा अनेक विज्ञानकथा, कादंबऱ्या आणि ललित विज्ञान लेखन लिहिणारे प्रसिद्ध वैज्ञानिक जयंत नारळीकर सांगताहेत त्यांच्या विज्ञान लेखनाविषयी.
माझे पाहिलेवहिले, सामान्य वाचकांसाठीचे विज्ञान लेखन १९६३-६४ च्या हिवाळय़ात ‘डिस्कव्हरी’ मासिकासाठी झाले. त्यात नुकत्याच घडलेल्या क्वेसार्सच्या संदर्भात गुरुत्वीय अवपाताचे वर्णन होते. क्वेसार दिसायला ताऱ्यासारखे; पण ताऱ्यापेक्षा अब्जावधी पटींनी प्रकाशमान. आपली ऊर्जा इतक्या कमी घनफळात कशी निर्माण करतात?  हे सर्व शास्त्र वाचकांपुढे सोप्या भाषेत विशद करून सांगण्याचे काम मला त्या लेखात करायचे होते. मी असे लेखन पूर्वी केले नव्हते. ते माझ्याकडून करवून घ्यायला डिस्कव्हरीच्या संपादकाला कोणी सांगितले देव जाणे! काही असो माझा हा पहिलावहिला लेखनप्रयोग यशस्वी झाला असे संपादकांकडून आणि वाचकांकडून कळले.
 त्यानंतर इंग्लंडमधील ‘न्यू सायंटिस्ट’मध्ये माझे लेख प्रसिद्ध होत गेले. नंतर भारतातील ‘सायन्स टुडे’ नेपण मला असे लेखन करण्यास प्रोत्साहन दिले. या नियतकालिकाचा संपादक सुरेंद्र झा माझ्या मागे लागून ‘अमुक विषयावर लिहा’, ‘तमुक विषयावर भाष्य करा’ अशी आवाहनं करून माझ्याकडून लेखन करून घ्यायचा. हे लेखन करत असताना वाचकांकडून येणाऱ्या प्रतिसादावरून मला हळूहळू जाणवत गेले की, प्रकाशनाचे नफ्या-तोटय़ाचे प्रश्न काहीही असोत पण सामान्य वाचकाला विज्ञान-तंत्रज्ञान यांच्याबद्दल जिज्ञासा आहे तशी भीतीपण आहे. भीती याकरिता की, हे विषय आपल्याला समजणार नाहीत, असा त्याचा समज दृढ आहे. म्हणून ज्याला सोप्या भाषेत आणि तांत्रिक शब्दांचे अवडंबर न ठेवता लेखन करता येते त्याला या क्षेत्रात पुष्कळ वाव आहे. एखादी वैज्ञानिक कल्पना साध्या गोष्टी, उदाहरणे सांगून विशद करता येते. अर्थात ही तारेवरची कसरत असते. कारण लेखकाला मूळ वैज्ञानिक गाभ्याशी फारकत घेऊन लिहिता येत नाही व या दृष्टीने सोपे लिहिताना विज्ञानावरही अन्याय करून चालत नाही.  
आणखी एक गोष्ट बहुभाषिक भारतात महत्त्वाची आहे ती म्हणजे विविध भाषांतून विज्ञानप्रसाराची असणारी नितांत गरज. जरी विज्ञानासाठी इंग्रजी ही जागतिक भाषा मानली जाते तरी सामान्य माणूस विज्ञानाची प्राथमिक माहिती मातृभाषेतून ग्रहण करणे पसंत करतो. अनेक उत्साही अशासकीय सेवाभावी संस्था देशी भाषांच्या माध्यमातून विज्ञानप्रसार करतात आणि जनसामान्यांपर्यंत पोचू शकतात. मराठीत मराठी विज्ञान पारिषद ही कामगिरी निदान चार दशके तरी बजावता आली आहे.  
विज्ञानप्रसार डोळय़ांपुढे ठेवून मी माझ्या लेखनात माझ्या मार्गदर्शक फ्रेड हॉएलचा कित्ता गिरवायचा प्रयत्न करत आलोय. विज्ञानप्रसारात्मक लेखन मी तीन भाषांतून करत आलो आहे- इंग्रजी मराठी आणि िहदी.  लेखांपासून पुस्तकांपर्यंत माझी उचल १९७७ मध्ये पोचली. जवाहरलाल नेहरू फेलोशिपसाठी निवडलेल्या प्रकल्पातून माझे The Structure of the Universe हे पुस्तक ऑक्स्फर्ड युनिव्हर्सटिी प्रेसने त्या वर्षी प्रसिद्ध केले. त्याला जागतिक स्तरावर उत्तम प्रतिसाद मिळाल्याने मी आणखी पुस्तके लिहिली. त्यांचे प्रकाशन ऑक्सफर्ड, केंब्रिज (युनिव्हर्सटिी प्रेस) फ्रीमन, वर्ल्ड सायंटिफिक आदी दर्जेदार विज्ञान-प्रकाशकांनी केले.  
फ्रेडचे आणखी एका बाबतीत अनुकरण करावेसे वाटत होते, ती म्हणजे विज्ञानकथालेखनात. माझ्या मनात काही कल्पना घोळत होत्या ज्यांच्यावर विज्ञानकथा लिहिता येतील. पण लेखन करायचा धीर होत नव्हता. १९७४ मध्ये मराठी विज्ञान परिषदेने आयोजित केलेली विज्ञान लघुकथांच्या स्पध्रेची जाहिरात मला दिसली. २००० शब्दांच्या मर्यादेत एक गोष्ट बसवायची होती. आपण प्रयत्न करावा असे मला वाटले. पण पेन हातात घेऊन लिहायला सुरुवात कशी आणि केव्हा करायची?  

त्या वर्षी एका परिसंवादासाठी मी अहमदाबादला गेलो होतो. तेथील पहिलेच व्याख्यान इतके कंटाळवाणे होते की माझे त्यावरचे लक्ष उडाले. परिसंवादाच्या नोट्स काढण्यासाठी पॅड समोर होते. पेन खिशात होते. मला एकदम स्फूर्ती आली आणि मनात घोळत असलेली गोष्ट शब्दांकित करून लिहायला सुरुवात केली. नाव दिले ‘कृष्णविवर’. कृष्णविवर (ब्लॅक होल) आसपासचे सर्व पदार्थ शोषून घेतो. त्याच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणामुळे त्याच्या आसमंतातील घडय़ाळे फार हळू चालतात या परिणामावर आधारित ही गोष्ट होती. मी लिहायला सुरुवात केली आणि शब्द आपोआप सुचत गेले. निम्मी गोष्ट व्याख्यान संपायच्या आत लिहूनसुद्धा झाली. ती पूर्ण करायला पुढचे दोन दिवस पुरले.  
पण गोष्ट मराठी विज्ञान परिषदेकडे पाठवायची कशी? माझे नाव परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना व त्यांनी नेमलेल्या परीक्षकांना परिचित असणार. त्याचा मला कसलाही गरफायदा मिळू नये, मिळणार नसला तरी तसे बोलले जाऊ नये याकरिता मी ती वेगळय़ा नावाखाली पाठवायचे ठरवले. नाव निवडले ‘नारायण विनायक  जगताप’, त्याची आद्याक्षरे माझ्या नावाच्या आद्याक्षरांच्या उलटक्रमाने होती. माझे हस्ताक्षर मराठी विज्ञान परिषदेच्या लोकांना परिचयाचे असेल म्हणून ती गोष्ट माझ्या पत्नीच्या हस्ताक्षरात वेगळा पत्ता लिहून मी पाठवली.  
काही दिवसांनी जगताप नावे परिषदेचे कार्ड आले. पहिला क्रमांक मिळाल्याबद्दलचे अभिनंदन त्यात होते आणि पारिषदेच्या वार्षकि अधिवेशनात पुरस्कार घेण्यासाठी येण्याचे आमंत्रणही होते. मला आनंद झाला अर्थातच या कथेचा खरा लेखक कोण हे मला तेव्हा उघड करावे लागले!
पण हा किस्सा इथेच संपत नाही! माझी ही लघुकथा दुर्गाबाई भागवतांच्या नजरेस पडली. त्या मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित अध्यक्षा होत्या. त्यांनी संमेलनात आपल्या अध्यक्षीय भाषणात या कथेचे कौतुक केले आणि विज्ञानकथेच्या माध्यमाने मी मराठी साहित्यात नवे दालन उघडले, असे गौरवोद्गार काढले. एक चिकित्सक समीक्षक आणि विदुषी म्हणून विख्यात असलेल्या दुर्गाबाईंकडून झालेले कौतुक ऐकून मला अर्थातच अस्मान ठेंगणे झाले आणि आपण आणखीही लिहावे असे वाटू लागले. माझा लेखनाचा हुरूप वाढला.   
त्यानंतर लवकरच मुकुंदराव किलरेस्करांनी त्यांच्या ‘किलरेस्कर’ मासिकात मी विज्ञानकथा लिहाव्यात, असे आग्रहाचे आमंत्रण दिले. हे एक दर्जेदार नियतकालिक म्हणून ओळखले जायचे आणि लेखनक्षेत्रात त्याने अनेक नवे पायंडे पाडले होते. आता त्यांत विज्ञानकथांची भर पडणार होती. ‘किलरेस्कर’साठी मी ‘गणिताच्या गमती जमती’ हे सदर लिहीत असे. आता मधून मधून माझ्या विज्ञानकथा त्या मासिकात येऊ लागल्या. त्यांतील पहिली होती ‘उजव्या सोंडेचा गणपती.’ हळूहळू किलरेस्करचे अनुकरण करता ‘महाराष्ट्र टाइम्स’सारख्या इतर दिवाळी अंकांत माझ्या विज्ञानकथा येऊ लागल्या. ‘यशांची देणगी’ हा माझा पाहिला विज्ञानकथा संग्रह ‘मौज’ने प्रसिद्ध केला तोही माझ्या या तऱ्हेच्या लेखनाचा महत्त्वाचा टप्पा होता. त्यानंतर माझे तीन कथासंग्रह ‘श्रीविद्या प्रकाशना’तर्फे प्रसिद्ध झाले आणि चार कादंबऱ्या ‘मौज’तर्फे. शिवाय साहित्य अकादमीने लहानांसाठी लिहिलेल्या माझ्या ‘अंतराळातील स्फोट’ कादंबरीचे प्रकाशन मराठीतच नव्हे तर इतर काही भारतीय भाषांतून केले.  
विज्ञान लेखक म्हणून माझा प्रवास सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे १९६३ मध्ये सुरू झाला. पण ती सुरुवात होती इंग्रजीतून. भारतात परतल्यावर मराठी भाषेत लेखन करायची संधी मिळाली. मी १९७२ साली मुंबईत स्थायिक झालो. त्यानंतर वर्षांभराने मराठी विज्ञान परिषदेच्या वार्षकि अधिवेशनात अध्यक्ष म्हणून मला बोलायचे होतो. ‘अणू आणि विश्व’ शीर्षकाखाली ते भाषण म.वि.प.ला लेखीपण छापायचे होते. प्रत्यक्ष विषय डोक्यात ठळकपणे घोळत असला तरी तो मराठीत लिहायचा कसा? अर्थात लिहिल्यावर त्याचा प्रत्यक्ष भाषणासाठी उपयोग होणार हे माहीत होते. तेव्हा प्रथम संपूर्ण भाषण इंग्रजीत लिहून काढले. मग त्याचे मराठीत भाषांतर केले. व पुढे म.वि.प. येथील एक-दोन अनुभवी तज्ज्ञांकडून तपासून घेतले. अर्थात या सर्व पायऱ्या चढताना दमछाक झाली!  
पण पुढे इंग्रजीमाग्रे न जाता सरळ मराठीचा रस्ता पकडता येऊ लागला. वैज्ञानिक परिभाषिक शब्द (योग्य तो) आपोआप सुचू लागले. तरी पण काही वेळा शासकीय इंग्रजी तो मराठी वैज्ञानिक शब्दकोष वापरला. मात्र असे प्रसंग आले जेव्हा मराठीकरणाऐवजी मूळ इंग्रजी शब्दच बरा वाटला-उदाहरणार्थ रेडिओ, टेलीफोन, हायड्रोजन, ऑक्सिजन इ. इ.
विज्ञानात जे जे काही नवीन शोध लागत आहेत त्यांच्याबद्दल मनोवेधक माहिती सामान्य माणसाला सांगावी हा या लेखनाच्या खाटाटोपामागचा उद्देश. याच उद्देशाने मी विज्ञान कथांचा मार्गपण वापरला. पण इथे माझा दृष्टिकोन विज्ञान आणि समाज यांच्यात सामंजस्य साधणे हा असतो. विज्ञानातील शोध ज्या वेगाने लागत आहेत तो समाजाच्या पचनशक्तीबाहेर आहे. त्यामुळे विज्ञानाबद्दल भीती अनाकलनीय म्हणून त्याचा वापर कसा करावा हा पेच तसेच पूर्ण चित्र स्पष्ट नसल्याने वैज्ञानिक शोधांचा गरवापर अशी काही लक्षणे दिसतात. विज्ञान कसे वापरावे याबद्दल समाजाला जागृत करणे गरजेचे आहे. अशा पाश्र्वभूमीवर लिहिलेल्या कथा खाऱ्या विज्ञानकथा, असे मी समजतो.  
अर्थात हे चित्र ‘स्टार ट्रेक’, ‘स्टार वॉर्स’सारख्या चित्रपटांपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे असे ‘लोकप्रिय’ वाङ्मय माझ्या कथांसाठी मी वापरत नाही. खुद्द माझे पीएचडीचे मार्गदर्शक फ्रेड हॉएलदेखील अशाच विचारसरणीतून विज्ञानकथालेखन करीत. त्यांचा संस्कार माझ्यावर झाला, असे मी मान्य करतो. अद्भुत कथा, परीकथा आदींच्या श्रेणीतून उचलून विज्ञानकथांना त्यांची स्वतंत्र जागा देणे आवश्यक आहे. पण प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे?  
अनेक मान्यता लाभूनही मला वाटत नाही मराठी साहित्यात (आणि साहित्यिकांत) विज्ञानकथा वाङ्मयाला अपेक्षित अशी प्रतिष्ठा आज लाभली आहे. विज्ञान म्हटले की समजायला अवघड विषय अशीच भावना सर्वसामान्यांत असते. त्यामुळे विज्ञानकथादेखील समजायला अवघड अशा दृष्टिकोनातून पाहिल्यांदा वाचल्या जातात. शिवाय साहित्यिक मूल्यांकनात पुष्कळसे मराठी विज्ञानकथा वाङ्मय कमी पडते. कारण वैज्ञानिक गाभा उत्तम असला तरी त्याभोवती साहित्यगुणांचे उत्कृष्ट सर्जनात्मक मंदिर उभारणे सोपे नसते. केंब्रिजमध्ये असताना ई.एम. फॉर्स्टर (मॉर्गन)ची विज्ञानकथा ‘द मशिन स्टॉप्स’ मी वाचली होती. शिक्षणात विज्ञानाशी संबंध आला नसला तरी एखादा उत्कृष्ट साहित्यिक उत्कृष्ट विज्ञानकथा मात्र लिहू शकतो याचे हे एक उदाहरण. एका ग्रहावर जमिनीखाली एक प्रगत संस्कृती राहत असते आणि तिची सर्व कामे चालतात ती एका यंत्राच्या जोरावर. हे यंत्र जमिनीवर असून जमिनीखालच्या वसाहतीला ऊर्जा पुरवते. असे हे यंत्र एकाएकी बंद पडले तर..? वाचकांनी प्रत्यक्ष गोष्टच वाचावी! मला वाटते उत्तम मराठी साहित्यकृती लिहिणाऱ्यांनी मनावर घेतले तर त्यांच्याकडूनही उत्तम विज्ञानकथांची निर्मिती होऊ शकेल.   
माझे काही साहित्यिकांशी एका विषयावर वाद झाले आहेत. अमुक एका उद्देशाने लिहिलेले वाङ्मय दुय्यम दर्जाचे असे ते मानतात. उदाहरणार्थ अंधश्रद्धा निर्मूलन, अंतराळातल्या घडामोडींचा पृथ्वीवरील जीवनावर होणार दुष्परिणाम, पर्यावरणामध्ये केलेली ढवळाढवळ, थोडक्यात अनेक वैज्ञानिक तथ्यांचे समाजावरील पारिणाम हे डोळय़ापुढे ठेवून लिहिलेली कथा चांगली कथा म्हणता येता नाही, असे त्यांचे म्हणणे. मला स्वत:ला हे मान्य नाही! केवळ लेखकाने कथेतून काही तरी बोधवाक्य काढले म्हणून कथेला बाद केले तर साहित्यात अनेक कथा बाद होतील. या कथा विज्ञानकथा नसून ‘शुद्ध’ साहित्यातल्या असतात हेपण लक्षात घ्यावे. उलट समाजाशी संबंध जोडल्यावर कथेला एक भारदस्तपणा येतो. म्हणून माझ्या लेखी विज्ञानकथेचा समाजाशी संबंध असणे योग्य आहे.  
मला विज्ञानकथा कशी सुचते? विज्ञानाची विविधरंगी रूपे एक विज्ञानाचा विद्यार्थी म्हणून मी पाहिली आहेत. खगोलविज्ञानात तर अशा पुष्कळ गोष्टी आहेत ज्यांना ‘वास्तव कल्पनेपेक्षाही अद्भुत असते’ हे वाक्य लागू पडेल. मी सूर्य पाश्चिमेस उगवताना पाहिला. सूर्य प्रकाशत असून बाकीचे आकाश काळेकुट्ट!, सूर्य कधीकाळी फुगत जाऊन पृथ्वीला गिळून टाकेल .. अशा गोष्टी जणू काय विज्ञानकथेत जायची तयारी दर्शवतात  गरज असते कल्पक कथाकाराची. अशांपकी एखादी घटना मनात चकरा मारत असते. केव्हा तरी तिच्यावर आधारित गोष्टीचा सांगाडा तयार होतो. अखेर वाटू लागते की, लिहायची वेळ आली. म्हणजे कथेचा सांगाडा ढोबळ मानाने मनात आहे. अशा वेळी लिहीत असताना शब्द आपोआप अवतारतात. चार-पाच बठकांत गोष्ट लिहून होते तर २५-३० बठकांत लहान कादंबरी. बहुतेक लेखन ‘एकटाकी’ असते. पण पुष्कळदा माझी पत्नी मंगला ‘पहिले वाचन’ करून सुधारणा सुचवते.  
‘कृष्णविवर’ ही माझी पहिली लघुकथा सहजगत्या लिहिली गेली. ‘पुत्रवती भव’ ही गोष्ट ‘मुलगाच हवा’ या प्रवृत्तीवर लिहिताना पुष्कळ वाचन करावे लागले. पण त्यातील संभाव्य परिणाम आज वास्तवात दिसतात. इतके की, पुढे असे वाटले की, त्या गोष्टीला एक पुढचा भाग जोडावा. ‘मुलगी झाली हो’ (मौज, दिवाळी अंक, २०१३) हा तो भाग. त्यात रंगवलेले चित्र भडक वाटले तरी वास्तवाशी इमान ठेवून आहे.  
कथा आणि कादंबरी यांत लेखनाच्या दृष्टीने फरक जाणवतो. कथेत मर्यादित जागेत सर्व सांगून झाले पाहिजे. कादंबरीत ‘आराम से’ कथानक पुढे नेता येते-आणि पात्रांचे विविध स्वभाव रंगवता येतात. ‘स्फोट’, म्हणजे ताऱ्याचा स्फोट हा मूळ गाभा धरून मी गोष्ट आणि कादंबरी दोन्ही लिहिल्या तेव्हा हा फरक प्रकर्षांने जाणवला. अर्थात विज्ञानकथाकाराला कधी कधी तारेवरची कसरत करावी लागते.  विज्ञान एक क्लिष्ट विषय आहे हा एक (गर)समज वाचकांमध्ये असतो. कथेच्या मुळाशी असलेले विज्ञान वाचकाला समजले पाहिजे म्हणून पुष्कळ समजावून सांगायला जावे तर नको ही लेक्चरबाजी म्हणून पुस्तक बाजूला ठेवणारा वाचक डोळय़ासमोर येतो. तेव्हा या दोन टोकांमध्ये सुवर्णमध्य कुठे लपलाय तो शोधून काढणे महाकठीण!  
शेवटी विज्ञानकथांचे टीकाकार! माझ्या अनुभवाप्रमाणे विज्ञानकथेची नाडी पाहून टीका करणारे थोडे थोडकेच. काही टीकाकार ‘नारळीकरांना अमुक अमुक बाबतीत असे म्हणायचे आहे’ येवढेच सांगतात. त्यावर स्वत:चे मत व्यक्त करत नाहीत. काही तर सरळ वाङ्मयचौर्याकडे अंगुलिनिर्देश करतात. अशा एका टीकाकारांनी मी हॉएलच्या अमुक कादंबरीतली मूळ कल्पना चोरली, असे म्हटल्यावर मी त्या कादंबरीचे नीट वाचन केले आणि कल्पनाचौर्याचा आरोप असलेली माझी कथा ‘धूमकेतू’पण पुन्हा वाचली. दोन्हींत मला एकच साम्य दिसले. धूमकेतूची दिशा बदलण्यासाठी सोडलेले अंताराळयान एक ऑक्टोबरला रवाना झाले. तर हॉएलच्या कादंबरीचे नाव होते ‘आक्टोबर द फर्स्ट इज टू लेट’! मी त्या टीकाकारांना विचारले की, तुम्हाला वाङ्मयचौर्य म्हणण्याजोगे कोणते साम्य दोन्ही कथानकांत दिसले? तेव्हा त्यांनी मान्य केले की त्यांनी हॉएलची कादंबरी अद्याप पाहिली नव्हती आणि केवळ शीर्षक वाचून ही टीका केली होती. आजवर मी केलेल्या ललित विज्ञानातील पुस्तकांपकी ‘आकाशाशी जडले नाते’ हे सर्वात यशस्वी मानतो तर विज्ञानकथा वाङ्मयात ‘वामन परत न आला’ ही कादंबरी. अर्थात ही दोन्ही पुस्तके लिहिताना पुष्कळ मेहनत घ्यावी लागली पण वाचकांचा प्रतिसाद भरपूर समाधान देणारा होता.    
विज्ञान प्रसारकाच्या चष्म्यातून आजची पारिस्थिती पाहता अशी एक प्रतिक्रिया व्यक्त करावीशी वाटते. एकीकडे विज्ञान तंत्रज्ञानाची घोडदौड वाढत्या वेगाने चालू आहे. त्यांचा मानवी जीवनावर वाढता प्रभाव पाहता समाज आणि विज्ञान यांच्यातली दरी कमी करायची गरज दिसते. म्हणून विविध माध्यमांतून विज्ञान समाजाभिमुख करणे आवश्यक आहे. पत्रकार, लेखक, शिक्षक, सिने-दिग्दर्शक आदींबरोबर वैज्ञानिकांनीपण यासाठी पुढे सरसावले पाहिजे. ‘आम्ही विज्ञान निर्मिती करू .. विज्ञानप्रसार इतरांनी करावा,’ असे म्हणत हात झटकून बाजूला व्हायची ही वेळ नव्हे.  कारण ज्या जनता जनार्दनाने भरलेल्या करातून वैज्ञानिकांना संशोधनासाठी पाठबळ मिळते त्याचे ते देणे लागत नाहीत काय?                        

Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप
scholarship
स्कॉलरशीप फेलोशीप: उच्च शिक्षणातील संशोधनात्मक पद्धती
Robert Dennard
चिप-चरित्र : ‘मेमरी चिप’ क्षेत्राची पायाभरणी
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान