हळवे गदिमा दिसले

‘आभाळमाया’ सदरातील आनंद माडगूळकर यांचा ‘आधुनिक वाल्मीकी’, महाकवी गदिमा यांच्या आठवणी जागवणारा लेख अतिशय आवडला. क्षणभर मला या महाकवीचेच गीतरामायणातील शब्द आठवले, ‘पुत्र सांगती चरित्र पित्याचे’. तद्वतच त्यांचे पुत्र आनंद माडगूळकर यांनी आपल्या वडिलांच्या आठवणी एक पुत्र या नात्याने सांगितल्या आहेत. यातून केवळ गदिमाच नव्हे तर एका थोर साहित्यिकाच्या जीवनाचा परिचय वाचकाला होतो. साहित्यिक, लेखक, कलावंत हे दुहेरी जीवन जगत असतात. एक ते स्वतच्या आतमध्ये असलेल्या अलौकिक विश्वात रमलेले असतात, त्याच वेळी त्यांना हे बाहेरील लौकिक विश्वही सांभाळावे लागते. तेव्हा हे दोन्ही करीत असताना निश्चितच काही वेळा त्यांचा त्रागा होणे स्वाभाविक आहे. गदिमांच्या बाबतीतही ते दिसून येते. स्वभावाने एवढे कडक असूनही आनंद यांनी परीक्षा दिली नाही हे सांगूनही ते चिडले नाहीत. यात त्यांचे मुलांविषयीचे प्रेम दिसून येते. वरून कठीण वाटणारे गदिमा आतून किती हळवे, प्रेमळ होते याचे प्रत्यंतर लेख वाचताना होते. नितीन आरेकर यांनी अतिशय सुंदर शब्दांकन केले आहे. यामुळे लेखाने एक वेगळी उंची गाठली आहे. संपूर्ण लेख वाचल्यावर गदिमांच्या आठवणींनी वाचकाच्या डोळ्यांत अश्रू आल्याशिवाय राहत नाही.

– प्रा.किरण दशमुखे, नाशिक

स्मारक व्हावे

महाकवी हा आनंद माडगूळकरांचा गदिमांवरील लेख शब्दरूपात आण्णांचे चित्र उभे करतो. त्यांच्या साहित्यनिर्मितीमागचे दर्शन घडवतो. पंचवटीतील निवास, तेथे येऊन गेलेल्या मान्यवरांची वाचकांना भेट घडवून आणतो. मला वाटते की सरकारने अण्णाच्या जन्मशताब्दी वर्षांचा मुहूर्त साधून ‘पंचवटी’त गदिमांचे स्मारक निर्माण करावे. तेथे गदिमांचे साहित्य,गीते, चित्रपट, छायाचित्रे, इत्यादींच्या कायमस्वरूपी प्रदर्शनाची उभारणी करावी. केशवसुतांच्या मालगुंड येथील स्मारकासारखी देखणी वास्तू रसिकांना आनंद देईल.

– यशवंत वाघमारे, पुणे</p>

लेख आवडला

‘गीत रामायण’रचिते ग. दि. माडगूळकर यांच्यावर त्यांच्या मुलाने लिहिलेला लेख वाचला. मुळातच गदिमांबद्दल महाराष्ट्रात एवढे आदरयुक्त प्रेम आहे. या लेखात पिता-पुत्रांच्या संबंधांवर प्रकाश पडतो. एखादी व्यक्ती खूप महान असली की, जनमानसात त्यांच्या कुटुंबीयांबद्दल उत्सुकता असतेच. त्याचे समाधान या लेखात होते. गदिमांचे वेगळेच पलू प्रकाशित होतात.

– अनुराधा हरचेकर