घरकामाचेही व्यवस्थापन हवेच 

बदल होईल पण त्याकरता संयम आणि योग्य व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असते आणि ते कसे करावे या विषयावर (२९ जून) प्रकाशित झालेला प्रा. डॉ. अपर्णा महाजन यांचा ‘व्यवस्थापन कामाचं’ हा लेख आवडला. मी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम करत आहे. तेथे  कायझेन तत्त्व आम्ही उपयोगात आणतो. पण ही संकल्पना फक्त कंपनीपुरती मर्यादित न ठेवता, तिचा उपयोग सर्व ठिकाणी कसा करता येईल हे त्यांनी अगदी उत्तमरीत्या समजावून सांगितले आहे. नवीन वर्षांची सुरुवात होताना, आपण सर्वजण काही ना काही संकल्प करत असतो. पण त्यामधील पूर्णत्वास गेलेले संकल्प हे खूप कमी असतात. असे का होते किंवा यामागे काय कारणे असतात, या प्रश्नांची उत्तरे मला वाटते या लेखात नक्कीच आहेत. कारण कोणतीही गोष्ट पूर्णत्वास नेताना, तिची सुरुवात छोटय़ा छोटय़ा गोष्टीपासून करणे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करणे हे खूप गरजेचे आहे. यामध्ये कायझेन तत्त्वांनी सुधारणा केली तर कामे पूर्ण होण्यास काहीच अडचण नाही. कायझेनसोबत ‘सिक्स सिग्मा’ आणि ‘फाइव्ह एस’ यांचा देखील यात समाविष्ट करण्यात आला आहे. या तत्त्वांचा विचारपूर्वक अभ्यास केल्यास आपल्याला घरातील किंवा समाजातील कार्येही व्यवस्थित पार पाडता येतील.

Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Aamir Khan announcement that Pani Foundation will implement group farming experiment in the state pune news
पाणी फाउंडेशन राज्यात गटशेतीचा प्रयोग राबवविणार; आमिर खान यांची घोषणा
Maharera salokha manch
विकासक आणि ग्राहकांमधील सलोखा वाढीस, महारेराच्या सलोखा मंचाच्या माध्यमातून १४७० तक्रारी निकाली

– हेमंत पाटील, घणसोली.

स्वत:च्या अस्तित्वाचे इच्छामरण?

२२ जूनच्या ‘तळ ढवळताना’ या सदरात लेखिका नीरजा यांनी ‘चूल आणि मूल’ वर्गातच राहिलेल्या, त्यापलीकडे आपल्या अस्तित्वाचा विचार न करणाऱ्या ‘स्त्रियांसाठी स्थानगीत’ लिहून त्यांना छान कानपिचक्या दिल्या आहेत. आज स्त्रिया सर्वच क्षेत्रांत आघाडीवर असताना या स्त्रियांमधील एक शिक्षित वर्ग स्त्रीच्या संरक्षणासाठी तिच्या हक्कासाठी, अस्तित्वासाठी जनजागृती करतो आहे आणि दुसरीकडे आपल्याच समाजात स्त्रियांचा एक वर्ग असाही आहे जो आपल्या स्वत:च्या अस्तित्वासाठी फारसा जागरूक नाही किंबहुना त्यांनी स्वत:च्या ‘अस्तित्वा’चे इच्छामरण स्वत: मागून घेतलेले आहे आणि त्यातच त्या आनंदी आहेत (?) असे म्हटले तरी त्यात काही वावगे ठरणार नाही. प्रकृतीने स्त्रीला मुळात सहनशीलता हा गुणधर्म भरभरून दिला असल्याने आणि स्त्रियांच्या या आनंदाने स्वीकारलेल्या स्वत:च्या अस्तित्वाच्या इच्छामरणामुळे एकंदर समाजच स्त्रियांकडे दिवसेंदिवस जास्तीत जास्त अपेक्षेने पाहात असतो. स्त्री ही मनात आलं की काहीही करून दाखवू शकते एवढी ताकद निसर्गाने तिच्याकडे उपजत दिली आहे पण त्याचा गैरवापर करून घेणे वाईट, नाही का?

स्त्रियांचा हा एक फार मोठा वर्ग आहे जो चार भिंतींमध्ये आनंदाने राहतो. वाचन, लिखाण किंवा बौद्धिक गोष्टींकडे या वर्गाचा फारसा कल नसतो. दूरचित्रवाणी मालिकांपलीकडे आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे याच्याशी देणंघेणच नसतं. किंबहुना हा पुरुषप्रधान समाजही तिला जाणीवपूर्वक या चाकोरीत ठेवत असतो. तिला तिच्या जबाबदारीची सतत जाणीव करून देत असतो. ‘स्त्री’ ही स्वतंत्र व्यक्ती आहे, तिलाही मन आहे, विचार आहेत, इच्छा आहेत याचा विचार या समाजात आजही फार कमी होताना दिसतो आहे.

– भक्ती शेजवलकर, मीरा रोड

तर ग्रामीण समाजाचे पुनरुत्थान

‘माझा वर्ग माझी ओळख’ हा ‘सुत्तड गुत्तड’ सदरातला राजन गवस यांचा लेख विचार करायला लावणारा आहे. शिक्षण व्यवस्थेत शहरी आणि ग्रामीण हा भेद आहेच. ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्था आणि शिक्षकांची अवस्था भयप्रद म्हणावी अशी आहे हे या लेखाने सोदाहरण स्पष्ट केले आहे. शहरात, शाळेत प्रवेश मिळण्यासाठी वणवण करावी लागत असण्याच्या परिस्थितीतील पालकांना गावखेडय़ातील शिक्षकांना विद्यार्थी मिळवण्यासाठी वणवण भटकावे लागत असेल, त्यातून त्यांची होणारी कुतरओढ याची कल्पनाही येणे शक्य नाही. राजन गवस यांनी कटू असले तरी वास्तव समोर ठेवले आहे हे पटते. गावागावातील शिक्षणसम्राटांच्या फौजांना मुलांच्या शिक्षणाशी नाही तर त्यांच्याकडून मिळणाऱ्या शुल्काशी मतलब असतो. पैसे घेऊनच नोकरीस ठेवलेल्या शिक्षकावर मुले मिळवण्याची जबाबदारी टाकून शाळा चालू राहण्याची व्यवस्था ही तर एकदमच सोपी सोय. आकर्षक गणवेश आणि पोपटपंचीसारखे इंग्रजी शब्द बोलता येण्यामागचे आकर्षण या कारणामुळे ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची चलती आहे. मात्र या खाजगी शाळांमध्ये सर्वसामान्यांना शिक्षण घेणे परवडण्यासारखे नाही. रोजच्या जगण्यासाठी धडपडणाऱ्या कुटुंबप्रमुखाला खाजगी शाळेचा प्रवेश अशक्यप्राय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांबद्दल नकारात्मक प्रचार अशा कठीण प्रसंगात भुदरगडसारख्या भागात गटशिक्षणाधिकाऱ्याच्या कल्पकतेने जिल्हा परिषद शाळा कात टाकून ‘माझी ओळख माझा वर्ग’ ही अभिनव संकल्पना राबवत आहे हे खरेच कौतुकास्पद आहे. नव्या दमाचे आणि व्यवस्थेला शरण न जाणारे असे उत्साही अधिकारी थोडय़ा प्रमाणात का होईना उदयास आले तर ग्रामीण भागातील समाजाचे पुनरुत्थान होऊ  शकेल ही आशा वाटते.

– राजेश बुदगे, ठाणे</p>

चित्र कधी बदलणार?

‘भूमिकन्यांची होरपळ!’ हा सुवर्णा दामले यांचा लेख (२९ जून) म्हणजे ग्रामीण परिसर आणि कृषिक्षेत्राचे कठोर वास्तव! भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे वाक्य शाळेतील मराठी विषयातील निबंधात पूर्वी आणि आजही वाचण्यास मिळते. पण शेतकरी ग्रामीण परिसर यांचा विकास यासंदर्भात मिळालेली आश्वासने पूर्ण केव्हा होणार? शेतीसाठी अर्थसाहाय्य गावात सोयीसुविधा सुसज्ज आरोग्य केंद्र, चांगले रस्ते या गोष्टी अजूनही किती ठिकाणी आहेत? पाणीटंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरताना अनेक समस्या तीव्र झाल्या आहेत. शहरी विकासाकडे नेहमीच अधिक लक्ष दिले जाते पण ग्रामीण परिसर भकास होत आहे याकडे दुर्लक्षच होताना दिसते. वेगवेगळ्या आकडेवारीनुसार सारे काही खूप चांगले आणि विकासाकडे वाटचाल असे चित्र दिसते पण प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच आहे. हे चित्र कधी बदलणार? उलट हा प्रश्न अनुत्तरित राहण्याची शक्यताच आपल्या देशात अधिक आहे.

– प्र.मु.काळे, नाशिक

नुसती मलमपट्टी होते

‘भूमिकन्यांची होरपळ’ (२९ जून ) सुरूच आहे, परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर काही कायमस्वरूपी उपाय कोणतेही सरकार शोधायला तयार नाही. यासाठी आर्थिक स्वरूपाचेच नव्हे तर मानसिक इलाजही जरुरीचे आहेत. राज्यात इतक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात त्या सर्व देशावरील, मराठवाडा, विदर्भ या विभागातच का होतात? याचा अर्थ मराठवाडय़ातील शेतकऱ्यांची राहणी, सवयी बदलणेही जरुरीचे वाटते. शेतकऱ्यांची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्यांच्या शेतमालाला किमान भाव मिळत नाही. मधले दलाल जे बरेचसे राजकीय पक्षांशी मिलीभगत करणारे आहेत. त्यामुळे सरकार त्यांच्यावर कोणतीही कारवाई करीत नाही. लेखात जी छायाचित्रे दिलीत त्यातील वनमालाबाईंचे चिरंजीव १७/१८ वर्षांचे असावेत असे वाटते. अशी मुले छोटे उद्योग-व्यवसाय करून कुटुंबाचा थोडा तरी आर्थिक भार उचलतात. तसे हे चिरंजीव काही करतात का? सरकारने मदत करायला पाहिजे हे मान्य. परंतु आपण कुटुंबासाठी हातपाय हलवायला हवेत, असेही वाटते.

– सुधीर देशपांडे , विलेपार्ले

निराधार कुटुंबाला आधार हवा

‘भूमिकन्यांची होरपळ’ या सुवर्णा दामले यांच्या लेखात महाराष्ट्रातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाची शोचनीय अवस्था, त्यातला त्यात त्याच्या पत्नीला संसाराचा गाडा ओढताना काय दिव्य पार पाडावे लागत आहे याचे आणि या परिस्थितीत अशा कुटुंबाला आधार देण्यासाठी कशा प्रकारे सरकारी मदत करता येईल याचे विवेचन केले आहे.

गेल्या काही वर्षांत, शेतकरी आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाच्या समस्यांना सर्व माध्यमातून वेळोवेळी प्राधान्य देण्यात आले आहे. त्या सोडविण्यासाठी किती तरी उपाय आणि कार्यक्रम सरकार आणि स्वयंसेवी संस्थांनी सुरू केलेले आहेत. त्याचा लाभ घेऊन किंवा अन्य प्रकारे, जिद्दीने पुन्हा उभ्या राहिलेल्या स्त्रियांच्या कथा ‘चतुरंग’मध्येच वाचलेल्या आठवतात. पण एकंदरीतच ग्रामीण भागातील असो की शहरी भागातील असो, ज्या घरातील एकमेव मिळवती व्यक्ती मग ती पुरुष असो किंवा स्त्री असो, अचानक कुठल्याही कारणाने मृत्यू पावते आणि तिच्या मागे कुटुंबातील वृद्ध आणि लहान मुले उरतात. अशा कुटुंबाचे पुढे काय हाल होत असतील, ते कुटुंबच जाणे. कौटुंबिक हेव्यादाव्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत, शासन फार काही करू शकेल असे वाटत नाही. अशा सर्वच ग्रामीण किंवा शहरी, कुटुंबासाठी, त्या कुटुंबातील मागे राहिलेल्या पैकी कोणी कमवता होण्याच्या वयापर्यंत, शासनातर्फे कशी आणि कुठल्या प्रकारे मदत देता येईल यसाठी काही योजना आखता येतील का? याचा विचार व्हायला हवा. पण सरकारी मदत म्हटली की नियम आणि अटी अनिवार्य असतातच, जाच वाटला तरी त्या अनिवार्य आहेत हे वास्तव स्वीकारणे भाग आहे, सरकारी मदत योग्य व्यक्तीलाच मिळावी म्हणून नियम आणि अटी असतात, पण म्हणूनच त्या काही वेळा भ्रष्टाचाराला वाव देतात. त्यामुळे हे काम, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फत झाले तर अधिक बरे. सध्याची, सर्व स्तरातील आत्मकेंद्री कौटुंबिक आणि सामाजिक मानसिकता पाहता निराधार कुटुंबाला अशा आधार व्यवस्थांची नितांत आवश्यकता आहे?

– मोहन गद्रे, कांदिवली

थांबायला हवेच!

डॉ. ऊर्जिता यांनी ‘नात्याची उकल’ सदरातील ‘थांबायला हवेच’ (१ जून) हा लेख लिहून नाती आणि गणित यातील साधर्म्य पटवून दिलेत त्याकरिता त्यांचे अभिनंदन. मी एका रिलेशनशिपमध्ये आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे परंतु ‘तिने’ मला स्पष्ट शब्दांत सांगितलं की ‘आता थांबायला हवं.’ माझी कोणतीही चूक नाही असं तीच कबूल करते, परंतु ते माझ्या मनाला पटत नाही, त्यामुळे तुम्ही लेखात म्हटलं तसं मी मलाच दोष देत आहे. जसं, आपलंच सतत काही तरी चुकत आहे, आपण कमी पडलोय किंवा या नात्याला जे हवं ते आपण देऊ शकत नाही या व अशा विचाराने माझ्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली आहे. या लेखात ‘थांबणे’ याचा अर्थ आपण समोरच्या व्यक्तीचं शांतपणे ऐकून घेणं, असा सांगितला आहे (कोणतीही टिप्पणी व सल्ला न देता.) मी पण प्रथमत: हेच केलं, परंतु नंतर एक टिप्पणी द्यायची घाई केली व एक गरज नसलेला सल्ला दिला याचा मला खूप त्रास होत आहे. हा लेख थोडा आगोदर प्रकाशित झाला असता किंवा मी थोडी घाई केली नसती तर बरे झाले असते. मला माहिती नाही ‘मी’ सुधारेन की नाही पण माझ्यासारख्यांना सावरायला अशा लेखांमुळे मदत होईल हे निश्चित.

– डॉ. वीरा अर्धवटराव, औरंगाबाद</p>

लक्षवेधी आणि संग्राह्य़ लेख

‘आभाळमाया’ सदरातील ‘मी देणं लागते तुला!’ हे काव्यात्म आणि बोलीभाषेतील शीर्षक असलेला, दया पवार यांच्या पारिवारिक, वैचारिक, स्नेहल आठवणी जागवणारा हा लेख अनेक पातळ्यांवर एकाच वेळी सुखावून हळवा करणारा आणि संयतपणे वैचारिक ठिणग्या चेतवणारा आहे. प्रक्षोभाची गाज पचवून स्थिर चैतन्य फैलावणाऱ्या सागरासारख्या दया पवार या कविमनाच्या जागल्याच्या गुणगानाची ही रसाळ ओवी आहे. या आठवणी म्हणजे प्रज्ञाताईंची आपल्या बापाला, वैचारिक गुरूला आणि समाज सुधारकाला घातलेली साद आहे. त्यांचं विशेष अभिनंदन. त्यांची परिपक्वता, बांधिलकी आणि सच्चेपणा पदोपदी व्यक्त होत वाचकांना हेलावून सोडतो. ‘आभाळमाया’ सदराच्या मालिकेतील हा लक्षवेधी आणि संग्राह्य़ लेख आहे.

– कमलाकर सोनटक्के, मुंबई</p>