प्रगल्भ ‘आभाळमाया’

एखाद्या सदराची रंगत सतत वाढती राहावी ही अपेक्षा वाचक कळत-नकळत मनाशी बाळगत राहतात. ती पूर्ण करणे वाटते तेवढे सोपे नसते. वाचकांच्या वाढत्या अपेक्षा ३१ ऑगस्टला ‘आभाळमाया’ सदरात प्रसिद्ध झालेल्या उदय दंडवते यांच्या ‘आई गेली पण संवाद चालूच आहे’ या लेखाने पूर्ण केल्या आणि अर्थातच वाढवल्यादेखील. आतापर्यंतच्या लेखांपेक्षा या लेखाचे वेगळेपण म्हणजे दंडवते दांपत्याला ध्येयवाद आणि कौटुंबिक जबाबदारी या दोन जवळजवळ परस्परविरोधी असलेल्या गोष्टींचा मेळ घालण्यात मिळालेल्या यशाचे घडणारे दर्शन. हे सगळे अन्यत्र केवळ दुर्मीळ आहे. पतिपत्नी एकाच ध्येयाने प्रेरित आणि भारलेले, ‘व्यवहारात त्याच्याशी तडजोड करावी लागते’ अशी सबब न सांगता निग्रहाने वाटचाल करणारे, पुन्हा त्यातून निर्माण होणारे ताणतणाव व कटुता यांचा जराही स्पर्श आपल्याला किंवा कुटुंबीयांना होऊ न देता आई-वडील म्हणूनही कुठेही कणभरही उणे न पडणे, हे सर्व असामान्य यश आहे याची प्रचीती उदय यांच्या लेखातून येते. स्त्रीपुरुष समानता हा शब्द अलीकडे चलनी नाण्यासारखा वापरला जातो, पण या लेखात तो नकळत समूर्त झालेला आहे. वडील आणि आईच्या जुळलेल्या सुरांचे संथ, सातत्यपूर्ण संगीत हे त्याचे कारण आहे.

– गजानन गुर्जरपाध्ये

पपांचे उत्तुंग दर्शन

१० ऑगस्टच्या ‘आभाळमाया’ सदरातला ‘पपा एक महाकाव्य’ हा मीना देशपांडे यांचा वडील आचार्य अत्रे यांच्यावरील विस्तृत लेख मनाला भावला. साहित्य, नाटक, चित्रपटसृष्टी, पत्रकारिता, राजकारण या सर्व क्षेत्रातले आचार्य अत्रे यांचे कार्य प्रचंड अफाट होते. त्यांच्या निधनाला ५० वर्ष झाली तरी त्यांच्या साहित्याची गोडी आणि कार्याची महती कमी झालेली नाही. सुप्रसिद्ध साहित्यिक विजय तेंडुलकर यांनी अत्रे यांच्यावरील लेखात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वर्णन ‘प्रचंड आणि उत्तुंग’ असे केले आहे. गदिमांनी अत्र्यांवरील श्रद्धांजली लेखाचे शीर्षक ‘कऱ्हेचे पाणी आटले’ असे समपर्क लिहिले होते. स्वत: मीना देशपांडे यांनी अलीकडे ‘कऱ्हेचे पाणी’ या आचार्य अत्रे यांच्या आत्मवृत्ताचे सहा, सात व आठ असे पुढील तीन खंड प्रकाशित करून मोठे कार्य केले आहे. मराठी साहित्यात आचार्य अत्रे यांचे नाव अजरामर राहणार आहे.

– सुरेश पटवर्धन, कल्याण</p>