30 May 2020

News Flash

मर्मावर बोट

वाचक प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

मर्मावर बोट

‘एक्झिट की एंट्री’ हा ७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेला योगेश शेजवलकर यांचा लेख वाचला. आणि एकदम ‘कनेक्ट’ झालो. आजघडीला स्वत:ला स्थिरस्थावर समजणाऱ्या तरुणांच्या मर्मावर या लेखानं बोट ठेवलं. असेच विचार माझ्याही मनात खूप दिवसांपासून रुंजी घालत आहेत.. फक्त अमलात आणण्याची हिंमत होत नाही. ‘नोकरी नसल्यावर काय? अनावश्यक ते उपभोगायची सवय लागली आहे त्याचे काय? आपले पाय अंथरूण ओलांडून कधीच उघडे पडले आहेत त्याचे काय?’ असे एक ना अनेक प्रश्न आ वासून उभे राहतात आणि विचारांना खीळ बसते. पसा कमावण्याच्या नादात वाचन, भटकंती, ट्रेकिंग, खेळ सगळे खूप मागे पडलेत. आपण आपल्या सुखाचे परिमाण फक्त पसा हेच करून ठेवले आहे. म्हणूनच हा गोंधळ.

– नितीन राणे

हा तर माझाच अनुभव

योगेश शेजवलकर यांचा लेख वाचून आनंद झाला. सोबतच निर्णय घेण्याचा आत्मविश्वाससुद्धा आला. लेखातल्या सर्व गोष्टी नवीन पिढीला लागू होतात. मी सध्या एका मोठय़ा कंपनीत हाच अनुभव घेतो आहे.

– श्रीकांत अ. पाटील

आभासी जगातून बाहेर पडा

योगेश शेजवलकर यांचा ‘एक्झिट की एंट्री’ हा लेख खूप आवडला. मीदेखील काही काळापूर्वी याच अवस्थेतून जात होतो. नोकरी सोडल्यावर खरे जग कळले. मी माझ्या निर्णयावर खूप समाधानी आहे. तंत्रज्ञानाच्या आभासी जगातून बाहेर निघणे खरंच खूप महत्त्वाचे आहे.

– अभिषेक बोरगमवार, यवतमाळ

वेळ काढावाच लागेल

योगेश शेजवलकर यांचा विदारक वास्तव नेमकेपणाने पुढे आणणारा लेख खूप आवडला. ‘आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते. नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं.’ हे सत्यवचन! किमान प्रत्येकाने क्षणभर थांबून विचार करण्याची गरज आहे. ‘वेळ नाही’ या समस्येवर ‘वेळ काढून’च इलाज करता येणार आहे.

– नरेंद्र गोळे

कशासाठी जगायचं ते समजलं

‘एक्झिट की एंट्री’ हा वास्तवदर्शी लेख भावला. ‘नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं.’ हे त्रिवार सत्य. आयुष्य सकारात्मक आणि अर्थपूर्ण जगण्यासाठी काही तरी अर्थार्जन, नोकरीच्या अथवा व्यवसायाच्या माध्यमातून गरजेचं आहेच; पण ते करताना कशासाठी करायचं याचं भान असायलाच हवंय. कारण केवळ अर्थार्जनाने प्रश्न सुटत नाहीत. त्या लोभापाठी एक (गैर)समज मात्र नक्की होतो, की ‘अर्था’त सर्व काही जमवता येतं. ते करता-करता अमूल्य वेळ कसा निसटून जातो हे उमगत नाही आणि त्या जाणिवेने मन:शांती मात्र हिरावून घेतली जाते. आपलं, आपल्या कुटुंबाचं, समाजाचं, शारीरिक, मानसिक आरोग्य संतुलित ठेवायचं असेल, तर कुठं थांबायचं हे समजलं पाहिजेच. जगायचं कशासाठी, दुसऱ्यांना आपला भपकेबाजपणा दाखवायला, की समाधानी राहून आनंद मिळवायला, हे ठरवता यावं.

– डॉ. किरण भिंगार्डे, कोल्हापूर

मुखवटे फाडणारे लिखाण

योगेश शेजवलकर यांचा लेख फारच आवडला. आजच्या स्पर्धात्मक जीवनाचे यात फार सुंदर विवेचन आले आहे. कोठे थांबयचे हे समजणे फार महत्त्वपूर्ण आहे. बंगला, गाडी, प्रतिष्ठा सांभाळताना होणारा त्रास लपवत आज अनेक लोक जबरदस्तीचे हसू हसतात. असे मुखवटे या लेखात प्रभावीपणे फाडले आहेत.

– सुरेश उपाध्ये

‘पैसा सर्वस्व नाही’ हेच खरे

‘एक्झिट की एंट्री?’ हा लेख आजच्या जमान्यातल्या प्रत्येक पालकाला खडबडून जागा करणारा आहे. खरोखरच आज आपण जगण्यासाठी नोकरी करत नसून नोकरीसाठीच जगत आहोत. सुखासीन जगण्यासाठी उधारीवर महागडय़ा, अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तू खरेदी करतो आणि त्यांचे हप्ते भरण्यासाठी नोकरी करत राहतो. विभक्त कुटुंबामुळे मुलांना पाळणाघर किंवा नोकरांहाती सोपवतो. मुलांसाठी आवश्यक वेळ न देता मोबाइलला चिकटून राहतो. परिणामी त्यांच्यावर संस्कार करू शकत नाही. आज तरुण पिढी बिघडण्यास पालकच जबाबदार आहेत. ‘पसा सर्वस्व नाही.’ हे विसरून चालणार नाही.

– रमेश नारायण वेदक, मुंबई

धोक्यांचाही विचार व्हावा

‘एक्झिट की एंट्री?’ हा लेख वाचला. व्यवसाय उघडणे सोपे, पण तो बंद करणे कठीण आहे. तसेच उच्चपदावरच्या नोकरीत एंट्री घेतल्यानंतर एक्झिट घेणे महाकठीण होऊन बसते. आपल्या जीवनाची सिस्टीम ‘हँग’ होत असेल तर ‘पॉज’ घेणे गरजेचे. अर्थात, यात बरेच धोकेही आहेत. माझ्या मित्रांच्या मुलाने अतिताणामुळे नोकरी सोडली खरी, पण त्याच्यापुढे गहन प्रश्न उभे राहिले. नोकरी सोडल्यावर पुढे काय? पुढील आयुष्य कंटाळवाणं तर नाही ना होणार? अशी भीती मनात होती आणि तसेच झाले. वेळच वेळ मिळाला. काही दिवस आराम, मजा करायला बरे वाटले. मात्र तोच रिकामा वेळ खायला उठला. म्हणून लेखातील एक वाक्य महत्त्वाचे वाटले, ‘त्याने एक्झिट घेताना वर्षभरापासून अगोदर नियोजन केले होते.’ हुशारी, शिक्षणाचा उपयोग ‘आवडीने’ व ‘सवडीने’ करायचे ठरवले तर नोकरीतून ‘एक्झिट’ घेणं आयुष्याला मानवते.

– श्रीनिवास स. डोंगरे, मुंबई.

तोल सांभाळणं महत्त्वाचं

‘एक्झिट की एन्ट्री’ या लेखाचं वेगळेपण मनावर ठसलं. आयटी क्षेत्रातला सततचा ताण, टारगेट पूर्ण करणे, वेळेचं बंधन नसणे यात मनसोक्त जगायचं असतं, हेच लक्षात राहत नाही. तसं पाहिलं तर आठवडय़ातले दोन दिवस या लोकांना पूर्ण सुट्टीचे असतात. त्याचा उपयोग ते कसा करतात हेही महत्त्वाचं. मोबाइलमध्ये गेम्स खेळणे, ऑनलाइन शॉपिंग किंवा मॉलमध्ये भटकणे असाच बहुतेकांचा दिवस जातो. त्यातील दोन तास तरी आपला छंद जोपासण्यासाठी काढायला हवेत; नातेवाईकांच्या, मित्रांच्या भेटीगाठी घ्यायला हव्यात. नोकरी सोडून जीवन जगायला निघणं हा तसा धाडसाचा निर्णय आहे. मात्र अमाप पसा मिळवणं आणि अमाप खर्च करणं यातच सगळे गुंग आहेत. नोकरी, घर आणि स्वत: यांचा तोल सांभाळणं महत्त्वाचं.

– अनिता नामजोशी

वास्तवाची अप्रतिम मांडणी

आजच्या जगात शक्तीपेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे; पण या बुद्धीच्या जोरावर बऱ्याचदा सुशिक्षित युवावर्ग जे कमावत असतात त्याहीपेक्षा जे गमावतात त्याचं यथोचित उदाहरण म्हणजे आयटीच्या जगात नोकरी करणारे तरुण. अगदी उमेदीच्या वयात ही मुलं-मुली दिवसाचे चौदा-पंधरा तास सहजपणे एखाद्या प्रोजेक्टला समर्पित करतात. अशा हुशार मुलामुलींची लग्नं उशिरा होणे, कमी वयात त्यांना रक्तदाब-मधुमेहाने घेरणे हे सर्रास ऐकायला मिळते. म्हणून या लेखाचे महत्त्व खूप अधिक आहे. योगेश शेजवलकर आणि ‘चतुरंग’चे खूप आभार. या कळीच्या विषयावर भाष्य करून त्यांनी खूप तरुण मुलामुलींना मोलाचं मार्गदर्शन केलं.

– संदीप खेतले, ठाणे

आनंदाचं गुपित उमजलं

‘चतुरंग’च्या ७ सप्टेंबरच्या अंकामधील योगेश शेजवलकर लिखित ‘एक्झिट की एंट्री’ व डॉ. ऊर्जतिा कुलकर्णी लिखित ‘आनंदाची बकेट लिस्ट’ हे दोन्ही लेख एकमेकांना पूरक होते. ‘एम्प्लॉयी नंबर ४३७’ची कथा आज प्रत्येक आयटी कंपनीत घडत आहे. तीस ते चाळीस वयोगटांतील तरुण अभियंते कामाचा ताण सहन न झाल्यामुळे सुंदर आयुष्याला मुकत आहेत. दिवसाचे २४ तास लॅपटॉपमध्ये गुंतून राहणे हेच या तरुणांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होऊन राहिले आहे. परिणामी घरातील छोटय़ांकडे दुर्लक्ष होते. त्यांना खेळायला, दंगामस्ती करायला हवे असतात त्यांचे आई-बाबा; पण पॅकेजच्या मागे धावणाऱ्या तरुण पिढीला त्यांच्या अवतीभवती रेंगाळणारे आनंदी क्षण कधी टिपता येतील काय?

‘आनंदाची बकेट लिस्ट’ या ताणतणावावर रामबाण उपाय ठरेल हे या लेखांमधून कळालं. घरी आल्यावर लॅपटॉपची बॅग एखाद्या कोपऱ्यात ठेवून तुमची चातकाप्रमाणे वाट पाहत असलेल्या बच्चेकंपनीबरोबर मनसोक्त खेळा. त्यांच्याशी व घरातील इतरांशी संवाद साधा. व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज शेअर करण्याऐवजी जोडीदाराशी कार्यालय किंवा प्रवासात घडलेला गमतीदार प्रसंग शेअर करा. आनंद हा असा सुगंध आहे, की जो दुसऱ्यावर शिंपीत असताना स्वत:वरही शिंपला जातो.

– सूर्यकांत भोसले, मुंबई

कुठे थांबायचे ते समजावे

योगेश शेजवलकर यांचा ‘एक्झिट की एंट्री’ लेख वाचला. ‘जे आहे त्यात समाधान मानावे’ या विचारापासून ‘सगळ्या भौतिक सुविधा म्हणजेच सुख.’ इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो त्याला आता काळ लोटला. त्याचे दुष्परिणाम आता आपल्या कुटुंबव्यवस्थेवर जाणवू लागले आहेत. ज्या घरात मुले सांभाळली जातात तिथे ठीक; पण नवरा-बायको दोघेही नोकरी करताना पाळणाघरात राहणाऱ्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे असे लक्षात येते. पैशांसाठी आपण नसून आपल्यासाठी पैसा आहे हे जाणवले पाहिजे. मुलांच्या संगोपनासाठी दोघांपैकी एकाने नोकरी सोडण्याकडे कल वाढतो आहे. आपले करिअर करताना मुलांच्या भवितव्यावर त्याचे दुष्परिणाम होणे हे कोणत्याही सुजाण पालकांना आवडणार नाही. तेव्हा या लेखातील तरुणाने घेतलेला निर्णय योग्यच वाटतो. सुदृढ समाज घडण्यासाठी या विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे. कामाचे वाढते तास, धावपळीची जीवनशैली, सतत मानसिक ताण, यामुळे जगण्यातला आनंद नष्ट होत चालला आहे. भौतिक सुखामागे धावताना कुठे थांबायचे हे समजले पाहिजे.

– बागेश्री झांबरे, नाशिक

स्वत:साठी जगलास तर मेलास!

‘नात्यांची उकल’ या सदरातील ‘आनंदाची बकेट-लिस्ट’ हा डॉ. ऊर्जतिा कुलकर्णी यांचा ७ सप्टेंबरचा लेख वाचला. प्रत्येक माणूस हा स्वकेंद्री असतो. स्वत:च्या आनंदासाठी दुसऱ्याला ओरबाडण्यात त्याला काही गैर वाटते असे नाही. सध्याच्या चंगळवादी वातावरणात ‘स्वत:साठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास,’ हे  सुपरिचित वचन केव्हाच खुंटीला टांगले गेले आहे. मग आनंद मिळणार कुठून? आनंद ही माणसाची एक तात्पुरती मानसिक अवस्था आहे. दुसऱ्याला आनंद दिला तरच आपल्याला आनंद मिळू शकतो. दुसऱ्यासाठी काहीतरी करण्यासारखा आनंद दुसरा कुठलाच नाही. त्यामुळे तो आनंदी होतो आणि आपणही आनंदी होतो. विस्मरणात गेलेले मित्र शोधून मत्री पुढे चालू ठेवणे अशा प्रकारच्या कितीतरी गोष्टी आनंद देऊन जातात. सुरुवात आपणच करायची असते.

– यशवंत भागवत, पुणे.

‘रिव्हर्स बकेट लिस्ट’ हवी

‘आनंदाची बकेट लिस्ट’ हा लेख मनापासून आवडला. ‘बकेट लिस्ट’ची पाश्चात्त्य देशांतून आयात केलेली संकल्पना, तेथे फोफावलेल्या व्यक्तिकेंद्रित आणि आत्ममग्न समाजधारणेला साजेशीच आहे. परंतु लेखात म्हटल्याप्रमाणे या इच्छा, आकांक्षा आणि स्वप्नांची पूर्तता करताना ‘स्वान्त सुखाय’ मध्येच धन्य मानणारी व्यक्ती जेव्हा इतरांवर होणाऱ्या परिणामाची तमा बाळगत नाही, तेव्हा जगण्याचा आनंद ती व्यक्ती आणि इतर, दोघांच्याही हातून निसटून जातो. ‘बकेट लिस्ट’नुसार प्रत्येक गोष्ट करण्याची धडपड आणि नकळत इतरांचा त्या धडपडीत गृहीत धरलेला सहभाग यामुळे निर्माण होणारा ताण सुसह्य़ करण्यासाठी आता ‘बकेट लिस्ट’ला पूरक अशी ‘रिव्हर्स बकेट लिस्ट’ची संकल्पना पाश्चात्य जगात सध्या लोकप्रिय झाली आहे. ‘आजवरच्या माझ्या जीवनप्रवासात यश, समाधान, कृतज्ञतेची अनुभूती देणाऱ्या माझ्या सत्कर्माची यादी म्हणजे रिव्हर्स बकेट लिस्ट.’

या दोन्ही संकल्पनांचा एकत्रित विचार केला तर ध्यानात येते की आयुष्यात आतापर्यंत न साकार झालेल्या स्वप्नांची, ध्येयांची पूर्तता करण्यासाठी झटताना मागे वळून आपण साध्य केलेल्या, यशस्वी केलेल्या गोष्टींचे सिंहावलोकन केले तर एक उत्साहवर्धक, प्रेरणादायी आणि त्याच वेळी आंतरिक शांतीची भावना निर्माण करणारी ऊर्जा निर्माण होते. जिच्या बळावर मग सारे जगणेच ‘आनंदाचे डोही आनंदे तरंग’ची अनुभूती देणारे जीवनगाणे होऊन जाते.

– चित्रा वैद्य

ते समाधान महत्त्वाचे

डॉ. ऊर्जतिा कुलकर्णी यांचा ‘आनंदाची बकेट लिस्ट’ हा लेख वाचनात आला. किती सहज, साध्या, सोप्या भाषेत जगण्यातला आनंद समजावून सांगितला आहे. काल परवा ज्या गोष्टी आपण अगदी मनापासून, सहजतेने करत होतो त्याच गोष्टी आज आपल्याला जुन्या, कंटाळवाण्या वाटायला लागल्या आहेत. कदाचित आपण जगण्यातला आनंद कुठेतरी हरवून चाललो आहोत. कधीतरी न ठरवता कॉफी शॉपमध्ये जा. तुमची आवडत्या कॉफीचा आस्वाद घ्या आणि बघा मन अन् शरीर दोन्ही कसे खूश होतात ते. आपण आनंदी असाल तर सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला आनंदाचे, सकात्मकतेचे क्षण गवसतील. आपण कुठेतरी बाहेर जात असताना अचानक आपल्याला एक जुना मित्र भेटतो. मग मस्त कॉफीसोबत गप्पा होतात, एकमेकांची ख्यालीखुशाली विचारतो. बरं वाटतं ना. कारण ही गोष्ट आपण अगदी सहजतेने केली. कुठेही ठरवून किंवा संपर्क करून नाही केली. एखाद्या व्यक्तीची आठवण आली की करायचा त्याला कॉल. खूप दिवसात तुम्ही भेटलेही नसता किंवा तुमचे त्यांच्याशी बोलणेही झालेले नसते. आता ही गोष्ट ठरवून केली कारण पूर्वीसारखा नात्यातील मोकळेपणा, वेळ देणे, प्रेम, आपुलकी या गोष्टी दृष्टीस पडत नाहीत आता. जेव्हा आपण कुणाला भेटतो तेव्हा चेहऱ्यावर स्मित हास्याने काय रे, ‘कसा आहेस तू’? सगळं ठीक आहे ना! असे विचारतो ना तेव्हा समोरच्या माणसाच्या डोळ्यात जी आपलेपणाची, प्रेमाची भावना दिसते ना ते समाधान शोधून कुठेही सापडणार नाही.

-अक्षयकुमार बा. शिंदे, सांगली.

ब्रेक आवश्यकच

योगेश शेजवलकर यांचा लेख वाचला. ‘आयुष्य जगण्यासाठी नोकरी असते, नोकरी करण्यासाठी आयुष्य नसतं.’ हे वाक्य एकदम हृदयातल्या आतल्या कप्प्यात जाऊन बसलं. मानसशास्त्रात ‘कन्फॉर्मिटी’,अनुरूपता नावाचा एक प्रकार असतो. सगळे करतात तेच योग्य असा आपला मेंदू आपल्याला वाटायला लावतो हाच या संकल्पनेचा थोडक्यात अर्थ. मी नोकरी सोडल्यानंतर माझे ओळखीचे दोन मित्र सोडले तर इतर कोणी फार ठामपणे पाठीशी उभे राहिले नाही. या दोन मित्रांमुळे मी ‘कन्फॉर्मिटी’वर मात करू शकलो. एक वर्षांआधी निर्णय घेतलेला असतानासुद्धा नोकरी सोडताना भीती होतीच. आता मात्र मी माझा दिवस जगतो. न्यूटन जसा सफरचंद खाली पडलं तेव्हा झाडाखाली निवांत बसला होता तसा अनेकदा निवांत बसतो. महागडय़ा मोटरसायकलींची चर्चा मी करत नाही. गप्पांमध्ये रमतो, दुपारची मस्त झोप काढतो. कधी तरी असे ब्रेक घ्यायला हवेत.

– योगेश

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2019 12:24 am

Web Title: chaturang reader response abn 97 4
Next Stories
1 सूक्ष्म अन्नघटक : जीवनसत्त्वांचा अतिरेक घातकच
2 विचित्र निर्मिती : दोस्तीचा धर्म
3 मनातलं कागदावर : सेल्फी
Just Now!
X