महत्त्वाचा लेख

‘आत्महत्त्या कशासाठी?’ हा डॉक्टर उर्जिता कुलकर्णी यांचा २१ सप्टेंबरचा लेख वाचला. आयुष्य जगत असताना समस्या येणारच. त्यावर स्वत:ला संपवणे हा उपाय नक्कीच नाही, हे लेखातील म्हणणे योग्यच आहे. लेखात लेखिकेने आत्महत्येमागील कौटुंबिक, सामाजिक, वैयक्तिक कारणे तसेच आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचा स्वत:बद्दल असलेला अभिमान, दुराग्रह, आपणच श्रेष्ठ असल्याची भावना, नैराश्य, आयुष्यात आपल्याला हवे ते करता न आल्याची भावना, जीवनाविषयी नकारात्मक दृष्टिकोन आदींवर मार्मिक भाष्य केले आहे. कुठलीही आत्महत्या ही वाईटच शिवाय तो गुन्हाही आहे. निसर्गाने दिलेले हे ‘एकच आयुष्य’, स्वत:तील नकारात्मक विचाराने वा अविचाराने संपवणे, म्हणजे स्वत:ला ‘माणूस’ म्हणवून घेण्यास आपण लायक नाही असेच म्हणावे लागेल. आत्महत्या ही क्षणाची मनाची नकारात्मक अवस्था असली तरी त्यामुळे आपलेच नाही तर घरच्यांचेही जीवन उद्ध्वस्त होऊ  शकते. त्यामुळे स्वत:च्या विचारातला जीवनाकडे बघण्याचा ‘सकारात्मक दृष्टिकोनच’ एखाद्याला आत्महत्या करण्यापासून रोखू शकेल असे मला वाटते.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली

नवज्येष्ठांकरता वैचारिक लेख

२१ सप्टेंबरच्या अंकातील डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख ‘मधल्यांचा अवघड तिढा’ वाचला. हा लेख ‘मध्यमवयीन लोकांकरिता, नवज्येष्ठांकरता लिहिलेला उत्तम वैचारिक लेख आहे. मुलांनी आज्ञाधारक असावे, मातापित्यांची काळजी घ्यावी, सेवा करावी, असे विचार प्रचलित होते त्या काळातील लोकांची आम्ही मुले आहोत. मात्र आज हयात असलेल्या त्या काळातील ज्येष्ठांचे विचार त्या काळातच राहिलेले नाहीत. त्यांना उपभोगाचे नवे आयाम कळून आल्याने त्यांच्या आशाआकांक्षांत अपार वृद्धी झाली आहे. त्यांच्या क्षमतांचा कितीही ऱ्हास झाला तरी आयुर्मर्यादा वाढतच चाललेली आहे. दुसऱ्या बाजूस लहानपणापासूनच अजिबातच वेळ नसलेल्या पिढीचे आम्ही मातापिता आहोत. त्यांच्याकरता आमच्याकडे सदैव वेळ, पैसा आणि कष्ट करण्याची इच्छा प्रकर्षांने राहात आलेली आहे. दुर्दैवाने त्यांना मात्र स्वत:कडे, स्वत:च्या जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्यायला कधीच वेळ मिळालेला नाही, मिळत नाही आणि मिळणारही नाही अशी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. या दोघांचीही जबाबदारी आमचीच असल्याचा आमचा समज ठाम आहे. त्यांचे जीवन आरोग्यमय, सुखी आणि संपन्न  व्हावे याकरिता आम्ही कष्ट केलेच पाहिजेत यावरही आम्ही ठाम आहोत. अशा स्थितीत ५० ते ६० वर्षे वा त्या आसपासच्या वयाची आमची पिढी स्वत:करता वेळ, पैसा आणि विचार वेगळा काढण्याचीही गरज आहे असे मानतच नाही. तिने तसा विचार करावा याकरता त्यांना विचारप्रवृत्त करणारा हा लेख आहे. त्यामुळे आवडला. आमच्या उर्वरित ३० ते ४० वर्षांच्या आयुष्यात जग अपरंपार बदलणार आहे. ज्येष्ठ पिढी यथावकाश अस्तंगत होणार आहे. मुले समर्थ होणार आहेत. आम्हीही त्या वेळी नवतंत्रज्ञानांची कास घट्ट धरून, आपापले आरोग्य दृढतेने सांभाळण्याची गरज आहे. परस्परांना सांभाळून घेण्याकरता समानशील मित्र जोडण्याची आवश्यकता आहे. याची जाणीव आपण या लेखाद्वारे करून दिलीत त्याखातर मन:पूर्वक धन्यवाद!

– नरेंद्र गोळे

संवाद गरजेचा

डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा ‘मधल्यांचा अवघड तिढा’ हा लेख शहरातील व्यक्ती नजरेसमोर ठेवून लिहिला आहे. ग्रामीण भागात वृद्धांचा प्रश्न एवढा गंभीर झालेला नाही. ऐसपैस जागा, जिव्हाळा ही त्यामागची कारणे आहेत. शहरामध्ये जागेअभावी, नवीन पिढीची मानसिकता, जुळवून न घेण्याची वृद्धांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे मधल्यांची ससेहोलपट होते. वृद्धांनी स्वत:ला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ा सक्षम ठेवल्यास आणि थोडेफार कमावते असल्यास हेच वृद्ध कुटुंबाचा आधार होतात. ‘तडजोड’ नावाचे औषध लहानांपासून ज्येष्ठापर्यंत सर्वानी घेतल्यास मधल्यांचा तिढा कमी होईल. अतिवृद्धांना मात्र शक्य नसल्यास, आधारगृहात, वृद्धाश्रमात ठेवल्याशिवाय मार्ग नाही. सर्वच अर्थार्जनासाठी बाहेर पडल्यास त्यांना कोण पाहणार? वृद्धांनी देखील हे समजून घेतले पाहिजे. तथापि कुटुंबाचे आपल्यावर प्रेम आहे ही वृद्धांची भावना कमी होता कामा नये. त्यासाठी संवाद व आपुलकी आवश्यक.

– शिवलिंग राजमाने, पुणे</p>

तणावाचे वास्तव

‘मधल्यांचा अवघड तिढा’ वाचला. या लेखाने आजची मध्यमवयीन मुले व त्यांचे वृद्धत्वातले आई-वडील यांच्या प्रश्नांचा वेगळा पैलू व त्यातून निर्माण होणाऱ्या तणावाचे वास्तव मांडले आहे. आजची आमची मध्यमवयीन पिढी या तणावातून जाते आहे. एका बाजूला ‘आमच्या म्हातारपणात मुलेच आम्हाला सांभाळणार’ हे आमच्या आई-वडिलांचे गृहीतक आम्हाला पक्के माहिती आहे आणि मान्यही आहे. तर दुसऱ्या बाजूला आमचे स्वत:चे मूल, एकटेच असल्यामुळे किंवा दूर परदेशी असल्यामुळे, आमच्या वृद्धापकाळी आमची काळजी कोण वाहणार, हा प्रश्न आहे. या पुढे जाऊन असेही म्हणावे लागेल की, आजकालच्या सार्वत्रिक पद्धतीप्रमाणे आमची मुले एकटी दुकटीच असल्याने त्यांच्या वृद्धापकाळात त्यांचे प्रश्न तर आणखीनच तीव्र असणार आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर निवृत्तीकरिता शास्त्रशुद्ध आर्थिक नियोजन आणि सुसंचालित वृद्धाश्रमांची व्यवस्था समाजाकरिता किती गरजेची आहे तेच अधोरेखित होते.

– विनोद सामंत, दहिसर