पालकांची भूमिका महत्त्वाची

‘चाइल्ड पोर्नोग्राफीचा भस्मासुर’ हा डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचा लेख (१५ फेब्रुवारी) वाचला. ‘मैदानी खेळ, सहकुटुंबात घालवलेला आनंददायी वेळ, मन गुंतवून ठेवणारे छंद हे उपाय आंतरजालाच्या जाळ्यातून कदाचित बाहेर काढू शकतील.’ हे लेखाच्या शेवटी मांडलेले मत योग्यच आहे. आजची पिढी आणि विशेषत: पौगंडावस्थेतील मुले या इंटरनेटच्या महाजालात एवढी गुरफटून गेली आहे की त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पालकांकडूनच खास प्रयत्न व्हायला पाहिजेत. आई-वडील दोघेही कामावर जात असल्यामुळे आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे तसेही दिवसेंदिवस कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातूनच ही मुले ‘एकलकोंडी’ होत जातात आणि सहज या इंटरनेटच्या व पोर्नोग्राफीच्या जाळ्यात अडकतात. मैदानी खेळ तर सोडाच; परंतु घरातील बैठे खेळ, जसे की कॅरम, बुद्धिबळ, पत्ते आदी तरी या मुलांना माहीत असतील की नाही, अशी आज परिस्थिती आहे. एवढी ही पिढी मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, इंटरनेट, चॅटिंग, फेसबुक, गेमिंगच्या आहारी गेली आहे. त्यातूनच, लेखात दिल्याप्रमाणे, नकळत ही मुले ‘नको त्या’ व्यक्तींच्या नादी लागून, आपले नुकसान करून घेत आहेत. कायदा, पोलीस वगैरे नंतरच्या गोष्टी. सर्वप्रथम घरातूनच जर पालकांनी आपल्या मुलांवर ‘लक्ष’ ठेवल्यास, ते मोबाइलचा वापर कशासाठी करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण आहेत यावर बारीक लक्ष ठेवल्यास, प्रसंगी थोडे कठोर होऊन मुलांच्या मोबाइल व इंटरनेट वापरावर मर्यादा घातल्यास काही प्रमाणात तरी ही मुले या महाजालापासून दूर राहतील आणि अन्य खेळांकडे, छंदाकडे त्यांना वळवता येईल. सरकार, पोलीस, कायदा, स्वयंसेवी संस्था या सर्वापेक्षा पालकांची भूमिका व जबाबदारी या मुलांना या महाजालापासून दूर ठेवण्यात, जास्त महत्त्वाची आहे असे वाटते.

– मिलिंद यशवंत नेरलेकर, डोंबिवली पूर्व

परिस्थितीचे वैषम्य

स्त्रियांवरील अत्याचार आणि बाल लैंगिक शोषण याबाबत भारत आणि भारतात महाराष्ट्र यांचा दुर्दैवाने खूप वरचा नंबर लागतो याचे वैषम्य वाटते. कुणी कुणी ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्नही करत आहेत. पण सुधारणे हेच मिशन एवढे मोठे आहे की माणूसबळ कमी पडतंय. जोपर्यंत शिक्षा अमलात येत नाही तोपर्यंत हे प्रकार वाढतच राहणार, असे खेदाने म्हणावेसे वाटते. कारण कायद्याचा धाकच कुणाला राहिलेला नाही. शिक्षेला विलंब म्हणजे गुन्हेगारांना गुन्हे करण्यास मोकळीक असे समीकरणच झाले आहे.

– अंजली अरविंद भातखंडे, अलिबाग

 सलाम सय्यदभाई!

‘गद्धेपंचविशी’ या सदरातील सय्यदभाई यांचा लेख वाचला. (१५ फेब्रुवारी) लेख वाचून मन हेलावले. खरे म्हणजे त्यांचे आयुष्य बघता ‘गद्धे’ हा शब्द काढणेच योग्य ठरेल. इतक्या हलाखीच्या परिस्थितीत असताना, गरीब परिस्थितीमुळे शिक्षण नसताना, अतिशय लहान वयात कुटुंबाचा भार समर्थपणे पेलणे हे कर्मकठीण काम त्यांनी यशस्वीपणे पार पाडले, हे मोठे कौतुकास्पद आहे. कचरा काढणारा पोऱ्या ते कंपनीचा व्यवस्थापक ही उन्नती त्यांचा प्रामाणिकपणा आणि कष्ट करण्याची तयारी यामुळेच झाली. हा जीवनसंघर्ष चालू

असताना हतबल न होता स्वत:च्या बहिणीबरोबरच तिच्याचसारख्या इतरही तलाकपीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी झटणे ही फार मोठी समाजसेवा आहे, अशी माणसे दुर्मीळच. त्यांच्या सामाजिक कामाची माहिती होती; परंतु त्यांचा जीवनसंघर्ष व सामाजिक कार्याचा तपशील वाचून त्याच्याबद्दलचा आदर द्विगुणित झाला. सय्यदभाई यांना त्रिवार सलाम!

– श्रीकांत भगवते

मुस्लीम समाज बदलत आहे

‘दगडावरच्या पेरणीतून अंकुरले बीज’ हा ‘गद्धेपंचविशी’मधील सय्यदभाई यांचा लेख वाचून लक्षात येते की, सत्तरच्या दशकात एका सामान्य मुस्लीम समाजातील व्यक्ती आपल्या समाजातील स्त्रियांना सामाजिक न्याय मिळावा यासाठी किती प्रयत्न करत होती. मात्र अजूनही काही प्रमाणात तिहेरी तलाक या प्रथेचे समर्थन केले जाते. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींच्या कार्यकाळात शहाबानो प्रकरणातील ही गंभीर चूक आहे असे वाटते. या निर्णयाने केवळ मुस्लीम समाजातील महिलांचे नाही तर हिंदूंच्या मतांची विभागणी होत गेली. त्यामुळे हिंदू समाज तर काँग्रेसपासून दूर झालाच पण मुस्लीम समाजाचे लांगूलचालक म्हणून काँग्रेसवर शिक्का बसला. त्याचा प्रभाव आजच्या काँग्रेसच्या मतांवर झालाय हे लक्षात घेता येईल. पण सय्यदभाई यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मुस्लीम समाजात आहेत म्हणून निदान हा समाज जागृत होत आहे.

– सुनील समडोळीकर, कोल्हापूर</p>

चिंतनशील लेख

डॉ. अंजली जोशी यांचा ‘प्रतिकूलतेचे बळी’ हा मौलिक लेख आजच्या वैफल्यग्रस्त तरुणाईला, सकारात्मक संस्कारांचे धडे देणारा असल्याने महत्त्वपूर्ण आहे. थोडय़ाशा अपयशाने खचून जाणे परिणामी अति नैराश्यवादी विचारांच्या भोवऱ्यात सापडून आत्महत्येचा टोकाचा विचार करणे असे सर्व आसपास घडत असल्याने, संकटाला हसत हसत सामोरे जाण्याचे धैर्यच आता कमी झाले की काय असे वाटू लागले आहे. व या परिस्थितीत डॉ. जोशी यांचा अर्धा पेला भरलेला आहे असा विचार शिकविणारा लेख म्हणजे भरकटलेल्या मनोवृत्तीला उत्तम दिशा दाखविणारा दीपस्तंभ ठरला आहे, नकारात्मकतेवर सकारात्मक विचारसरणीने मात कशी करावयाची याचे विवेचन अत्यंत सोप्या व अचूक शब्दात मांडल्याबद्दल हा लेख वाचनीय व चिंतनशील झाला आहे.

– प्रदीप करमरकर, ठाणे</p>

‘व्हॅनिला’ने भूतकाळ जागवला

८ फेब्रुवारीच्या अंकातील निरुपमा महाजन यांची ‘व्हॅनिला आइस्क्रीम’ ही कथा वाचायला सुरुवात केली आणि डोळे पाझरू लागले. कथा वाचण्यास मला तासाहून अधिक वेळ लागला. कारण ‘गारेगार’, ‘दहा पैसे’ आणि ‘माझ्याही तोंडाला पाणी सुटलं’ इत्यादी शब्द माझ्या नकळत वारंवार वाचत होतो आणि मन सारखं चौसष्ट-पासष्ट वर्षे मागे जात होते. त्या वेळी मी मुंबईतील सेंट्रल रेल्वेच्या माटुंगा स्टेशनच्या परिसरातील एका हायस्कूलमध्ये आठवी इयत्तेत शिकत होतो. मधल्या सुट्टीत बहुतेक मुले जवळच असलेल्या हॉटेलमध्ये दहा पैशाला उसळीसह मिळणारा एक बटाटेवडा खाऊन यायची आणि माझ्यासारखी गरीब मुले त्या वेळेत शाळेच्या लहानशा मैदानात खेळून व पाणी पिऊन वेळ घालवायची. चार-पाच वेळा आईकडून मोठय़ा प्रयासाने दहा पैसे मिळवून तो बटाटेवडा खाल्लाही होता. तेव्हा फारच समाधान वाटायचे. इतर वेळी मात्र दुपारी घरी जाईपर्यंत भुकेने जीव कासावीस व्हायचा आणि उसळीतला बटाटेवडा सारखा डोळ्यासमोर येऊन तोंडाला पाणी सुटायचे. पुढे आमच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अधिकच बिकट झाली आणि मला (भावंडांत थोरला असल्याने) दिवसा नोकरी करून रात्रशाळेत शिकणे भाग पडले. असे करत तेव्हाची अकरावी एसएससी उत्तीर्ण झालो. मुबलकतेमुळे पुढील दोन-तीन महिन्यांत सरकारी खात्यात नोकरीही मिळाली. पहिला पगार झाला आणि त्यानंतर आलेल्या दुसऱ्या शनिवारच्या पहिल्या सुट्टीत सकाळीच हायस्कूलजवळच्या त्याच हॉटेलमध्ये गेलो आणि उसळीतला बटाटेवडा मागवला. पहिलाच घास घेतला आणि आठवीतले ते दिवस आठवून डोळे पाझरायला सुरुवात झाली. एकाने भागेना म्हणून दुसरा मागवला व भरल्या डोळ्यांनी संपवला. मधल्या सुट्टीत वडा खायला आलेले विद्यार्थी माझ्याकडे बघत होते. मला त्याचे भान नव्हते. कारण मी गरिबीवर मात केल्याच्या आनंदात होतो. घरी येण्यासाठी माटुंगा स्टेशनवरील बाकावर बसलो आणि विचारचक्र सुरू झाले. आणि अचानक मला पूज्य साने गुरुजींची ती अजरामर प्रार्थना आठवली. ‘जगी जे हीन अति पतीत, जगी जे दीन पददलित तया जाऊनी उठवावे, जगाला प्रेम अर्पावे.’ उत्तेजित होत गुणगुणू लागलो आणि त्याच क्षणी या प्रार्थनेच्या आशयाप्रमाणे कृती करण्याचा निर्धार केला, जो आज वयाच्या एकोणऐंशीव्या वर्षीही करत आहे.

– गोविंद काजरोळकर, पुणे</p>