13 December 2019

News Flash

वाचक प्रतिसाद : विचारप्रवृत्त करणारी ‘आभाळमाया’

‘आभाळमाया’ या सदरातील वीणा देव यांचा लेख वाचला. वाचताना अनेकदा माझे डोळे भरून आले.

‘आभाळमाया’ या सदरातील वीणा देव यांचा लेख वाचला. वाचताना अनेकदा माझे डोळे भरून आले. सुदैवी आहात,हे तर खरेच. गोनीदांसारखा महान पिता आपणास लाभला. हा लेख केवळ एका स्त्रीचा लेख नाही. तो एका संवेदनशील व्यक्तीचा लेख आहे. त्याचा (लेखाचा) नायक तर एक अत्यंत संवेदनशील बाप आणि भेदाभेदाच्या पलिकडे जाऊन माणसाचा विचार करणारा प्रतिभावतार आहे. यादृष्टीने मला तो खूप महत्वाचा वाटतो. आजकालच्या बाप्यांनी तो मन लावून वाचावा.

अनेक पालक अजूनही मुलांवर संस्कार करण्याच्या वाटा शोधत, चोखाळत असतात. पण काळ थोडासा याबाबतीत गोंधळाचा आणि विचित्र आहे, हे मान्य करावेच लागेल. तरीही, काही गोष्टी लहानपणापासून रुजवण्याचे संस्कार पालकांवरच करण्याची ही वेळ आणणारा आणि तशी संधीही देणारा आहे. गोनीदांनी तर त्यांच्या लिखाणातून आमच्यावरही संस्कार केले. (माझी शिक्षिका आई आणि शिक्षक वडील यांनी वाचनसंस्कारांचा फार मोठा ठेवा आम्हा भावंडांना दिला, त्यातून गोनीदांची ओळख हाही खजिना मिळाला.)हा लेख त्यामुळे मला एक वेगळा वारसा चालवणारा वाटला. किती नकळत गोनीदांनी मुलांवर संस्कार केले, त्याच हळुवारपणे त्यांच्यातल्या पित्याची वीणाताईंनी ओळख करून दिली आणि चांगला बाप होण्यासाठी काय नेमके संस्कार करावे लागतील, हे सांगितले. ‘हे स्पध्रेचं  युग आहे’ असं  म्हणत पोरांवर नकळत अघोरी संस्कार करणारे आईबाप मी बघत आलोय. त्या पाश्र्वभूमीवर ‘स्पर्धा करू नये- विनाकारण’ हे सांगून आपण या संस्काराची आठवण करून दिलीत. आपले खूप आभार. ‘लोकसत्ता’ व ‘चतुरंग’चेही आभार.

– प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, लातूर

 

भरभरून देणारा ‘चतुरंग’

पुष्पा जोशी यांचा ‘काळजातलं कुसळ’ हा लेख खूप आवडला. नात्यातला गुंता खूप कौशल्याने उलगडला आहे. रेणू ताईंचा ‘विमुक्त बंदिशी’चा अनुभव मनाला बोलपूरला केव्हा घेऊन गेला ते कळलेच नाही. ‘आभाळमाये’च्या गारुडातून बाहेर आलो तर देशाला उद्धरणारी ‘ती’ खरंच सुखी आहे का हा सुमती कुलकर्णी यांचा प्रश्न मनाला बोच देऊन गेला.

– दीपक जोशी, अकोला

First Published on August 10, 2019 12:03 am

Web Title: chaturang reader response mpg 94 3
Just Now!
X