१२ मार्च रोजी डॉ. मानसी जावडेकर यांचा आनंद, सुख, समाधानाची परिभाषा नेमकी काय, हे सांगणारा ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ हा लेख वाचताना असं लक्षात आलं की, सुख हे शोधून सापडत नसतं, तर ते मिळवण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करायला हवेत. वर्तमानकाळातील स्त्री-पुरुष दोघंही नोकरी करत असल्यामुळे घर आणि ऑफिस सांभाळताना दोघांना खूप कसरत करावी लागते. दोन्हीकडे आनंद मिळवण्यासाठी वेळेचं नियोजन करणं, वेगवेगळ्या माणसांची ‘सपोर्ट सिस्टिम’ तयार करणं, स्वत:चे छंद जोपासणं, समाजासाठी, नातलगांसाठी वेळ काढणं आणि त्यातून आनंद मिळवणं, हा विचार मनाला खूप भावला.

आनंद, सुख, समाधान मिळवणं ही केवळ मानसिक प्रक्रिया नसून ती एक व्यवस्थापनाची गोष्ट असते, हेही या लेखामधून त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मांडलं आहे. अभ्यासपूर्ण असा हा लेख वाचून खूप आनंद झाला. लेख आवडला. धन्यवाद लोकसत्ता.

– रुपाली किशोर साळुंखे, भांडुप (प.)   

मनोविज्ञानासारखा क्लिष्ट विषय सोपा

डॉ. आशीष देशपांडे यांचा ‘मनाचं ‘जिगसॉ’ कोडं’ (१३ मार्च) हा लेख वाचला आणि मनातलं कागदावर उतरवावंसं वाटलं. ‘मनोविज्ञाना’सारख्या रुक्ष, क्लिष्ट विषयातलं माझं ज्ञान सिगमंड फ्रॉईड या नावापलीकडे कधीच गेलं नव्हतं. कदाचित त्यामुळेच या विषयावरचं सदर पाहून मी पान उलटत असे! पण प्रथमच अगदी धीर धरून हा लेख अथपासून इतिपर्यंत वाचला. लेखाच्या शेवटी त्यांनी लिहिलेलं वाक्य आहे, ‘एरवी थोडा क्लिष्ट असा विषय जितका सोपा करणं माझ्या लेखणीला जमलं, झेपलं तेवढं तुमच्यासमोर आहे’. ते वाक्य दोन-तीनदा वाचलं! कारण? मला एक प्रकारे खात्री करून घ्यायची होती, की डॉक्टरांच्या लेखणीला खरंच क्लिष्ट विषय सोपा करणं जमलं का! उत्तर होकारार्थी आलं आणि ताबडतोब ठरवून टाकलं की आता डॉक्टरांचा प्रत्येक लेख आवर्जून वाचायचा. आता पुढच्या लेखांची वाट बघतो आहे.

– विनोद मुळे, इंदोर (मध्य प्रदेश)

स्त्रियांना समजून घेणारी समाजवृत्ती हवी

‘चतुरंग’चा ६ मार्चचा अंक यंदा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झालेल्या स्त्रियांच्या गुणगौरवानं प्रफु ल्लित झाला होता. १०५ वर्ष वय असलेल्या, पण शेतात राबणाऱ्या आर. पापाम्मल या आजींपासून चवदार पापडांची ‘लज्जत’ देशभर पोहोचवणाऱ्या ९० वर्षांच्या जसवंतीबेन पोपट यांच्यापर्यंतची ही मोठी यादी आहे. या वर्षीच्या ‘पद्म’ पुरस्कारांपैकी २९ पुरस्कारांच्या मानकरी ठरलेल्या स्त्रिया म्हणजे स्त्रियांच्या अलौकिक कर्तृत्वाचा प्रभावकारी ठसा. अजूनही स्त्री ‘चूल आणि मूल’ या विळख्यातून पूर्णपणे बाहेर पडलेली नाही. सल उराशी बाळगून, प्राप्त परिस्थितीशी तिची झुंज सुरू आहे, हे दर्शवणारा अनेक जणींचा जीवनपट पाहिल्यावर त्यांच्या जिद्दीला सलाम करावासा वाटतो.

त्यांना कु णाची सहानुभूती नको, तर फक्त त्यांना समजून घेणारी समाजवृत्ती हवी आहे. स्त्रिया आहेत म्हणून आपण सर्व सुखी आणि समाधानी जीवन जगत आहोत, एवढं जरी कळलं तरी खऱ्या अर्थानं ‘महिला दिन’ साजरा झाल्याचं सार्थक होईल.

 – सूर्यकांत भोसले, मुलुंड (पूर्व), मुंबई</strong>