‘पुत्र सांगतो चरित पित्याचे’

‘चतुरंग’मधील ‘आभाळमाया’ हे सदर वाचनीय असते. मराठीतल्या अनेक थोर व्यक्तिमत्त्वांची प्रदीर्घ ओळख या सदराद्वारे करून दिली जाते. याच सदरातील शनिवार, ४ मे चा आनंद माडगूळकर यांचा प्रा. नितीन आरेकर यांनी शब्दांकन केलेला ‘महाकवी’ मनाला भावला. ग. दि. माडगूळकर हे सिद्धहस्त होते. लेखनाचे वरदान घेऊनच गदिमा जन्माला आले होते. काव्य, कविता, चित्रपट गीते, चित्रपटकथा, पटकथा, संवाद, कथासंग्रह, कादंबरी, व्यक्तिचित्रणात्मक लेख अशा सर्वच क्षेत्रांमधे गदिमांनी रसाळ आणि विपुल लेखन केले. मराठी सारस्वतांवर गदिमांच्या अस्सल मराठी साहित्याचे अनंत उपकार आहेत. गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षांत त्यांचे सुपुत्र आनंद माडगूळकर यांनी लिहिलेला लेख म्हणजे ‘पुत्र सांगतो चरित पित्याचे’, असेच म्हणावेसे वाटते.

– सुरेश पटवर्धन, कल्याण.

गदिमांची दृष्टी

‘महाकवी’ हा लेख आवडला. या पार्श्वभूमीवर ग. दि. माडगूळकर यांची एक आठवण आवर्जून सांगावीशी वाटते. माझे वडील व संत-साहित्याचे एक ज्येष्ठ अभ्यासक डॉ. हेमंत इनामदार, एस.एन.डी.टी. महाविद्यालय, पुणे येथे प्राचार्य असताना ग. दि. माडगूळकर यांनी या महाविद्यालयाला भेट दिली होती. भेटीदरम्यान महाविद्यालयाचा परिसर ते न्याहाळत होते. कुंपणाच्या टोकावर एक बाभळीचे झाड उगवलेले होते. ते पाहून प्राचार्य डॉ. इनामदार यांनी माळ्याला बोलावून बाभळीच्या झाडाच्या फांद्या छाटण्याच्या सूचना दिल्या, का तर महाविद्यालयातील मुलींना बाभळीचे काटे टोचायला नकोत. तेव्हा ग. दि.माडगूळकर उद्गारले, ‘‘हेमंतराव, बाभळीचे झाड म्हणजे फक्त काटे आणि ते कुरूप दिसते असे आपणास वाटणे साहजिक आहे. परंतु याच बाभळीच्या झाडाला तुम्ही आभाळाच्या ‘कॅनव्हास’वर पाहा. ते तुम्हाला नितांतसुंदर व रमणीय दिसेल.’’ गदिमांचे ते शब्द ऐकून डॉ. इनामदार अवाक् झाले. आपण एखाद्या गोष्टीकडे कोणत्या पार्श्वभूमीवर व कोणत्या दृष्टिकोनातून बघतो तो दृष्टिकोन महत्त्वाचा. हा त्या वाक्याचा गर्भित अर्थ होता. गदिमांची महत्ता अशा छोटय़ा प्रसंगातूनही विदित होते.

– डॉ. विकास हेमंत इनामदार