18 November 2019

News Flash

अनेक बाजू असलेले नाणे

वाचक प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

अनेक बाजू असलेले नाणे

‘नाण्याची दुसरी बाजू’ हा ८ जूनच्या अंकातील मेघना वर्तक यांच्या लेखात वृद्ध आई- वडिलांचा सांभाळ करताना त्यांच्या मुलांमध्ये कशा प्रकारे ताणतणाव निर्माण होतो यासंबधी काही उदाहरणे देऊन विवेचन केलेले आहे. जे आई-वडील वृद्धत्वातदेखील हिंडते-फिरते आहेत अशांच्यादेखील समस्या आहेतच. त्यांना पटकन मृत्यू आला तर गोष्ट वेगळी, पण अखेर काही ना काही कारणाने त्यांनी एक दिवस अंथरूण धरले की प्रश्न उद्भवतोच. समाजात, कुटुंबात आजही वृद्धाश्रमाचा विचार मोकळेपणाने स्वीकारला जात नाही. या लेखातसुद्धा भावंडांमध्ये वृद्धाश्रमाचा विषय चर्चेला आलेला दिसत नाही. वृद्धाश्रम ही संकल्पना आजही खुलेपणाने समाज स्वीकारायला तयार नाही, हे एक कारण आहेच, पण वृद्ध व्यक्तीची शेवटच्या श्वासापर्यंत सर्वतोपरी काळजी घेईल अशा वृद्धाश्रमांची संख्या फार मर्यादित आहे. काळाची पावले ओळखून समाजाने कितीतरी जगण्याच्या नवीन संकल्पना हळू हळू का होईना आजपर्यंत स्वीकारल्या आहेत, त्याचा प्रत्यय आता जागोजागी येऊ  लागला आहे. त्याचप्रमाणे वृद्धांसाठी वृद्धाश्रमच ही कल्पनासुद्धा हळू हळू पक्की होत जाईल. पण त्याला काही काळ जावा लागेल. साकल्याने विचार केल्यास वृद्धांसाठी वृद्धाश्रमच हा पर्याय किती प्रश्नांची सोडवणूक करू शकतो हे सहज लक्षात येऊ  शकेल.

अगदी भरल्या कुटुंबात असली तरी, वृद्ध व्यक्तीला आता आपण एकटेच आहोत याची जाणीव पदोपदी होतच असते. त्यांनी ते गोतावळ्यातील एकटेपण मनोमन स्वीकारलेलेसुद्धा असतेच. वृद्धाश्रमातील एकटेपण त्यांना, त्यांची सर्वार्थाने सोडवणूक वाटण्याचाच संभव अधिक.

एका ग्रामीण मित्राच्या मते वृद्धांचा सांभाळ हा प्रश्न किंवा समस्या, बहुत करून शहरी, त्यातल्या त्यात सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजात जास्त प्रमाणात दिसून येतो. माझ्या मते, ग्रामीण वृद्धांच्यासुद्धा समस्या आहेतच, परंतु त्यांच्या समस्यांचा विचार कुठेच चर्चेसाठी होताना दिसत नाही. त्यामुळे वृद्ध व्यक्तींच्या प्रश्नांच्या नाण्याला दोनच नव्हे अनेक बाजू आहेत. त्या सर्वच बाजूंचा विचार समाजाला एक ना एक दिवस करावा लागणार आहे.

– मोहन गद्रे, कांदिवली.

काळ बदलला आहे

‘आई-वडील, मालमत्ता आणि मुलं’ व ‘नाण्याची दुसरी बाजू’ या लेखातल्या  दोन्ही बाजू वाचल्यानंतर प्रकर्षांने जाणवते म्हणजे काळ बदलतोय. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. वयोमर्यादा त्यामानाने कमीच होती. गरजादेखील कमीच. सांजेच्या वेळी सगळं कुटुंब एकत्र असायचं. एखादी कमावणारी व्यक्ती साथीच्या आजारामुळे मृत्युमुखी पडली किंवा बाळंतपणात आई गेली असली तरी मुलांना सांभाळणारी घरातच माणसं कमी नव्हती. त्यांचा सांभाळ कोणत्याही अपेक्षा न ठेवता व्यवस्थित व्हायचा. कुटुंब विभक्त झाली, छोटी झाली, शिक्षणाची व्यवस्था आली, आर्थिक प्रगती झाली, गरजाही वाढल्या आणि जबाबदाऱ्यादेखील वाढल्या. पण माणसं दूर झाली. म्हणजे दूर दूर राहू लागली. कामात गुंतत राहिली, सांजेला सर्वाची भेट होईलच हे अनिश्चित होऊ  लागलं. शिक्षणात आणखीच प्रगती झाली आणि कुटुंबात परदेशी वातावरण रुजू लागलं. आर्थिक उन्नती आणखीच झाली, पण कुटुंबातल्या प्रत्येकात प्रत्यक्ष अंतर खूप वाढलं. व्हिडीओ कॉलच्या सोयीनं दिसतं सर्वकाही, पण प्रत्यक्ष दुरावा सगळ्या कुटुंबात वाढला आणि समाजही तसाच बदलला.. चुकत नाही कुणाचंही. सगळे बरोबरच आहेत.आई-बाबादेखील आणि मुलंदेखील. अगदी समाजदेखील बरोबरच आहे.. कालाय तस्मै नम: इतकंच.

– डॉ. किरण भिंगार्डे, कोल्हापूर

‘नाण्याची दुसरी बाजू’ आवडली

८ जून रोजी प्रकाशित झालेला मेघना वर्तक यांचा ‘नाण्याची दुसरी बाजू’ हा लेख आवडला. माझी दोन्ही मुले, मुलगा व मुलगी अमेरिकेत राहतात. आम्हा दोघांची वये आता ८० च्या वर आहेत. आम्ही येथे एकटे राहत असल्यामुळे मुलांची होणारी घुसमट आम्हाला समजते. आमच्या तरुण वयात अनेक अडचणींवर मात करीत आम्ही घर बांधले आहे. हे घर आम्हाला सवयीचे व म्हणून सोयीचे वाटते. व्हरांडय़ात बसले तरी आम्हाला करमते. आम्हाला जमेल तसे व जमेल तितके आमच्या आवडीचे काम आम्ही करतो. म्हणून मुले तिकडे बोलवीत असतानादेखील सध्या तरी आम्ही येथेच रहायचे ठरविले आहे, शरीराने साथ द्यायचे नाकारले तर काय करायचे? या विचाराने मन अस्वस्थ होते व असुरक्षित होते कधी कधी. मुलांची काळजी मला समजते, मुले जरी सोबत नसली तरी, जवळची दोन-चार माणसे मी गोळा केली आहे तीच आमची श्रीमंती. शिवाय इंटरनेटच्या सोयीने बटन दाबताच मुलांना बघता येते व बोलताही येते. वेळ पडल्यास मुले ताबडतोब येतील हा विश्वास आहे. हे सर्व छान छान आहे जोवर अवयवांनी असहकार पुकारला नाही व शरीर गलितगात्र झाले नाही तोवर. पण अवयवांनी साथ द्यायचे नाकरल्यास काय होईल या भावनेने फार असुरक्षित वाटते. सहज वाट न बघता मृत्यू आला तर त्यासारखे भाग्य नाही म्हणून इच्छा मरणाचा पर्याय असावा. आयुष्यात अनंत अडचणी येतात, पण शेवटी माणसाने आपले जीवन अनेक अडचणींवर मात करीत सुखी व समृद्ध केले, याला इतिहास साक्षी आहेच.

– जयश्री काकडे

सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करता करता आजवर खूप ‘इंडेक्स’चे वाचन केले आहे, तरीही ‘चतुरंग’मधला योगेश शेजवलकर यांच्या लेखातून ‘हॅपिनेस इंडेक्स’ची एक वेगळी ओळख अनुभवण्यास मिळाली. मुळात आनंद म्हणजे काय असा प्रश्न केला तर आपल्या भारतीय लोकांमध्ये गैरसमज दिसून येईल तो म्हणजे ज्यांच्याकडे पैसे आहेत तो आनंदी असा समज सर्वसामान्य जनतेमध्ये असतो. तो चुकीचा आहे. मुळात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला आणि सकारात्मक दृष्टिकोनाने जगण्यास सुरुवात केली गेली तर भारतालाही एक दिवस १३३ क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर यायला वेळ लागणार नाही.

– राहुल बाडकी

थांबणे चांगलेच

डॉ. ऊर्जिता यांनी ‘नात्याची उकल’ या सदरातील ‘थांबायला हवेच’ (१जून) हा लेख लिहून नाती आणि गणित यातील साधम्र्य पटवून दिले त्याकरिता त्यांचे अभिनंदन. मी एका ‘नात्यात’ आहे. दोघांचंही एकमेकांवर प्रेम आहे, परंतु तिने मला स्पष्ट शब्दांत सांगितले की आता ‘थांबायला’ हवे. माझी कोणतीही चूक नाही, असे तीच कबूल करते, परंतु ते माझ्या मनाला पटत नाही त्यामुळे तुम्ही लेखात म्हटले तसे मी मलाच दोष देत आहे. जसे, आपलेच सतत काहीतरी चुकत आहे, आपण कमी पडलोय किंवा या नात्याला जे हवे ते आपण देऊ शकत नाही या व अशा विचाराने माझ्या मनात अपराधीपणाची भावना वाढीस लागली आहे.

तुम्ही लेखात ‘थांबणे’ याचा अर्थ आपण समोरच्या व्यक्तीचे शांतपणे ऐकून घेणे असा सांगितला आहे (कोणतीही टिप्पणी व सल्ला न देता) मी पण प्रथमत: हेच केले, परंतु नंतर एक टिप्पणी द्यायची घाई केली व एक गरज नसलेला सल्ला दिला याचा मला खूप त्रास होत आहे. हा लेख थोडा अगोदर प्रकाशित झाला असता किंवा मी थोडी घाई केली नसती तर बरे झाले असते. मला माहीत नाही की मी सुधारेन की नाही, पण माझ्यासारख्यांना सावरायला आपल्या लेखामुळे मदत होईल हे निश्चित.

डॉ. विरा अर्धवटराव, औरंगाबाद

भावुक करणाऱ्या कविता

‘फादर्स डे’निमित्तच्या कविता (१५ जून) वाचून मन भावुक झाले. श्रीरामपूर जिल्हा नगर येथील आमचे वडील मोतीराम जठार वकिलीबरोबरच वृत्तपत्र संग्रहाचा छंद जोपासत. मोठा संग्रह जतन करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण प्रतिसाद नसल्याने काही भाग रद्दीत गेला. कौटुंबिक विश्वात आम्ही चार बहिणी एक भाऊ , पण लग्नानंतर एक वर्षांतच भावाचे अपघाती निधन झाले. बाबांनी सुनेचा पुनर्विवाह करून दिला. वृत्तपत्र संग्रह जतन होऊ  शकला नाही ही खंत असूनही ते पुन्हा उमेद घेऊन सामाजिक कार्यात सहभाग घेतात. कौटुंबिक भावना सद्भावना जोपासना करण्याची त्यांची शिकवण आम्हाला प्रेरक ठरते. हा जरी कौटुंबिक अनुभव असला तरी वडील घेत असलेले कष्ट आपल्या व्यथा व्यक्त न करता ताणतणाव लपवून कुटुंब आनंदी असावे यासाठीची त्यांची धडपड मात्र सर्वत्रच दिसते. ‘फादर्स डे’ला वडिलांना फोनवर शुभेच्छा देताना ‘चतुरंग’मधील कविता आठवून डोळे पाणावले.

– अर्चना काळे

ज्ञानसूर्य कुरुंदकर

श्यामल पत्की यांनी आपल्या वडिलांबद्दल, नरहर कुरुंदकर यांच्यावर लिहिलेला लेख हा एका ज्ञानसागरच्या तीरावरील मौल्यवान शिंपलेच आहे. बुद्धिवादाचा प्रकाश प्रखर असतो तो जितके जवळ जाऊ  तितका अधिक त्रासदायक होतो. पण सरांनी त्या आपल्या तेजावर एक शीतल असं विवेकाचं आणि समजूतदारपणाचे आवरण घातले आणि हा ज्ञानसूर्य सर्वासाठीच पौर्णिमेचा चंद्र झाला. कुरुंदकर सरांबद्दल मुलगी म्हणून लिहिता लिहिता श्यामल पत्की विद्यार्थी म्हणून त्यांच्याकडे कधी पाहायला लागल्या हे त्यांनाही कळले नसेल. कारण सोपे आहे, आयुष्यात त्यांनी व्यासंग करताना विद्यार्थी होऊन केला. आणि आपले संचित वाटताना ज्यांच्या पात्रात ते टाकले त्यांना आधी तावूनसुलाखून विद्यार्थी म्हणून घडवले आणि मग त्याला ते बहाल केले.

– केशव साठय़े

First Published on June 29, 2019 1:12 am

Web Title: chaturang readers response abn 97
Just Now!
X