05 August 2020

News Flash

स्त्री-नेतृत्व : काल आणि आज

वाचक प्रतिसाद

(संग्रहित छायाचित्र)

स्त्री-नेतृत्व : काल आणि आज

‘स्त्री नेतृत्वाच्या बदलत्या दिशा ’ या १९ ऑक्टोबरच्या लेखात डॉ. वैभवी पळसुले यांनी महाराष्ट्रातील अलीकडील स्त्री-नेतृत्वाचा घेतलेला लेखाजोखा वाचला. स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही दीर्घकाळ स्त्रियांचे नेतृत्व निस्वार्थी, सक्षम व आक्रमक होते. त्यांच्या नसानसात परिवर्तनासाठीचा त्वेष असायचा. स्वातंत्र्यलढा असो, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असो, गोवामुक्ती आंदोलन असो की महागाईविरोधी प्रतिबंधक मोर्चा. या प्रत्येक लढय़ात स्त्रियांचा सक्रिय सहभाग असायचा. त्या वेळी देशात व राज्यात काँग्रेसचेच सरकार होते. जेवढी रस्त्यावर तेवढीच विधानसभेच्या सदनातदेखील स्त्रियांची आक्रमकता दिसायची. एकदा तर मंत्रालयाभोवती कडक बंदोबस्त असताना स्त्रिया अतिशय गनिमी काव्याने मंत्रालयाच्या सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील मंत्र्यांच्या दालनात घुसल्या होत्या. शिधापत्रिकेवर मिळणारा सडका, लाल गहू मंत्र्यांच्या तोंडात कोंबण्याचे धारिष्टय़ त्या स्त्रियांनी दाखवले होते. मुंबईतील झोपडपट्टीवासीयांचा प्रचंड मोर्चा महापालिका मुख्यालयावर घेऊन जाण्यात स्त्रियाच अग्रेसर होत्या. या सर्व आंदोलनांचे नेतृत्व प्रामुख्याने मृणाल गोरे, अहिल्या रांगणेकर, प्रमिला दंडवते, तारा रेड्डी, मंजू गांधी, कमल देसाई, सुशीला पटेल, इत्यादी डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या स्त्रियांनीच केले होते. त्यांच्यासोबत एक-दोन वेळा जनसंघाच्या (आताचा भाजप) धाडसी नेत्या जयवंतीबेन मेहताही होत्या. मंत्रालयावर किंवा विधानसभेवर स्त्रियांचा मोर्चा येणार आहे हे जाहीर होताच मंत्र्यांना धडकी भरत असे. इतका त्यांचा वचक होता. त्या लढाऊ स्त्रिया दिवंगत झाल्यानंतर अलीकडे जणू सगळीकडे आलबेल असल्याचं, जनतेचे प्रश्न व समस्या संपले आहेत, असे वातावरण आहे. आधीच्या काळातील स्त्री नेत्यांचा प्रवास समाजकारणाकडून राजकारणाकडे असा होता. आजच्या स्त्री नेत्यांचा प्रवास हा थेट सत्ताकरणाकडे असतो. हा आधीच्या आणि आताच्या स्त्री नेतृत्वातील फरक असला तरी आताच्या स्त्री नेत्यांकडे आक्रमकता मुळीच नाही, असे नाइलाजाने म्हणावे लागत आहे.

– अनंत स. आंगचेकर, भाईंदर

चिंताजनक चित्र

विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर प्रकाशित झालेला डॉ. वैभवी पळसुले यांचा विधानसभा निवडणुकीवरील लेख अतिशय अभ्यासपूर्ण तसेच वाचनीय होता. महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून ते आतापर्यंत स्त्रियांची राजकारणातील भूमिका, स्थान कुठे होते आणि ते आज कुठपर्यंत आले आहे, ही झालेली घसरण हा चिंतेचा विषय असल्याचे लक्षात आले.

– अंजू कांबळे, नवी दिल्ली

प्रेरक आठवणींचा जागर

‘आभाळमाया’ सदरातील रवींद्र पिंगे यांच्यावरील ‘अक्षरआनंदाचा यात्रिक’ हा चित्रा वाघ यांचा लेख वाचला. ‘आभाळमाया’ हे सदर मी कायमच आवडीने वाचत आलेलो आहे. यातून लेखक किंवा कलावंतांच्या जीवनातील रोचक आणि वेगळी माहिती वाचायला मिळते. पिंगे यांची प्रवासवर्णने आणि ललित लेखन मी वाचलं आहे, मात्र प्रत्येकाला लेखक कसा जगतो याची एक उत्सुकता असते. ती उत्सुकता पूर्ण करण्याचे काम गेले वर्षभर ‘लोकसत्ता चतुरंग’ने केले आहे. चित्रा वाघ यांनी आपल्या बाबांविषयी खूप चांगल्या आठवणी सांगितल्यात. या आठवणी प्रेरणादायी आहेत. मुलांना विमानात बसण्याचा अनुभव देणं, प्रवासात मिळणारे हटके अन्नपदार्थ खाऊ घालणं, ही चांगल्या बाबाची लक्षणे म्हणावी लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांना संस्कारित करण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली हे चित्राताईंच्या लिखाणातून जाणवलं. मुलानेही शेवटपर्यंत त्यांचा न कुरकुरता सांभाळ केला. त्यांना चांगलं दीर्घायुष्य लाभलं. लेख वाचून छान वाटलं.

– मच्छिंद्र ऐनापुरे, जत जि. सांगली

खरोखरीच्या राजहंस

१९ ऑक्टोबरच्या अंकामधील सगळेच लेख नेहमीप्रमाणे वाचनीय आहेत. अलकनंदा पाध्ये यांच्या ‘खांद्यावरचा पदर आणि पर्सही’ या लेखातील कचरावेचक माया, आणि ‘मी ची गोष्ट’मधील दीक्षा दिंडे लिखित ‘मी, एक राजहंस’ या दोघींच्या कथा काही अंशी समान पातळीवर असल्याचे जाणवले. एकेकाळी कचरावेचक असलेली माया संधी मिळताच आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर मात करत आनंदी वाटचाल करते आहे. दीक्षाने तर शारीरिक मर्यादांचं आव्हान स्वीकारून आयुष्य समर्थपणे पेललं आहे. खऱ्या अर्थाने ती राजहंस आहे. दोघींच्या आयुष्याकडे बघितल्यावर माझी मलाच लाज वाटली. वैयक्तिक जीवनात किती क्षुल्लक गोष्टींचा आपण बाऊ करून घेतो आणि खचतो. या दोघींचा आदर्श सर्वानीच घेण्यासारखा आहे. असेच प्रेरणादायी व उत्तमोत्तम लेख वाचायला दिल्याबद्दल ‘चतुरंग’ला मन:पूर्वक धन्यवाद.

– सीमा भरमार

..तीच खरी दिवाळी

‘हवी आपलेपणाची दिवाळी’ हा गायत्री पाठक-पटवर्धन यांचा लेख खूप महत्त्वपूर्ण होता. बरेच लोक देखावा म्हणून अनाथ, वंचित, बालकामगार यांच्यासोबत दिवाळी साजरी करतात. ही खूप मोठी शोकांतिका आहे. मीही काही दिवस झाले बालकामगारांसोबत काम करीत आहे. खरंतर इतर कुठल्याही भौतिक बाबींपेक्षा प्रेम, जिव्हाळा यांची या बालकांना गरज असते, याचा मी प्रत्यक्षात अनुभव घेतलेला आहे.

– नंदकुमार बनसोडे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2019 4:13 am

Web Title: chaturang readers response abn 97 2
Next Stories
1 सुत्तडगुत्तड : वर्तमानाचा ऑक्टोपस
2 सरपंच! : सर्वसमावेशक विकासगाथा
3 आभाळमाया : मर्मबंधातली ठेव ही!
Just Now!
X