अर्चना जगदीश

पर्यावरण क्षेत्रात आता संशोधन आणि स्वान्तसुखाय शोधनिबंध लिहिण्याचे दिवस संपले आहेत. आता फक्त सर्वसमावेशक कृती कार्यक्रमाची गरज आहे. म्हणजे वाघाच्या जनुकशास्त्रावर संशोधन करण्यापेक्षा वाघाचा अधिवास वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे, स्थानिक लोकांना, प्राणी आणि माणूस यांच्यातला सहजीवनाचा संबंध पुन्हा तयार होण्यासाठी, तो नव्याने समजून घेण्यासाठी, तयार करणं आत्यंतिक गरजेचं आहे. प्रत्येकाने केलेल्या यासाठीच्या छोटय़ामोठय़ा प्रयत्नांचे ठसे उमटतच राहणार आहेत..

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
Husband Appreciation Day
Husband Appreciation Day : महिलांनो, नवऱ्याला गृहीत धरता का? त्यांच्या पाठीवर कधी देणार कौतुकाची थाप?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
Reading of Dabholkar book
सांगली : ब्रेल लिपीतील दाभोळकरांच्या पुस्तकाचे अंध मुलांकडून वाचन

लेस्ली सिल्को ही अमेरिकी इंडियन लोकांच्या आदिवासी साहित्याची मेरुमणी समजली जाते. आदिवासी समाजांच्या निसर्गाबरोबरच्या साहचर्याविषयी तिने खूप गोष्टी वेल्हाळपणे लिहिल्या आहेत. ‘स्टोरीटेलर’ या १९८१ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात तिने ‘स्टोरी फ्रॉम बेयर कन्ट्री’ या कवितेत निसर्गाच्या सान्निध्यात हरवून जाणं आणि त्यासाठी आयुष्य ओवाळून टाकणं म्हणजे काय आणि ते कसं होतं, हे लिहिलं आहे. ती लिहिते,

‘तुम्हाला समजेल, जेव्हा तुम्ही

अस्वलाच्या प्रदेशातून चालता,

जुनिपरच्या वृक्षांमधून हळूच वाहणारी शांतता

किंवा पुरातन खडकांवरचा सोनेरी रंग,

तुमच्या भवतालचं सगळं काही

तुम्हाला समजेल..

तुम्हाला युकाच्या मुळांपासून निघालेल्या

ओल्या, कुजणाऱ्या मातीचा वास जाणवेल,

तुमच्या डोक्यावरच असलेल्या पण,

गूढ अशा गुहांमधून हळुवार

तसेच कर्कश आवाज

आणि खुसपुसदेखील ऐकू येईल,

समजेल तुम्हाला सर्व काही..

ते तुम्हाला कशी साद घालतात,

हे सांगणं अवघड आहे, फार अवघड

पण जे या अनाहत नादामागे गेले,

त्यांनी आपली माणसं,

आजोळ, मुलंबाळं आणि चांगलं

आयुष्यदेखील सोडून दिलं,

ते मात्र समजणार नाही कदाचित

त्या वाटेवरून गेल्याशिवाय..

आणि एकदा अशी पाठ फिरवली,

की परत येणं अवघड, महाकर्मकठीण.

हिवाळातल्या उबदार सूर्याच्या शुभ्र

आठवणीसारखं ते तुमच्या आठवणीत

रुतून बसेल,

वितळणाऱ्या बर्फावरच्या अदृश्य

सावल्यांसारखं ते सगळं

तुमच्या मनात जाऊन बसेल

खोलवर कायमचं..’

लेस्लीची कविता दीर्घ आहे, पण स्वैर अनुवाद करताना जाणवलं, की मी गेले वर्षभर ज्यांच्याबद्दल लिहिलं, ज्या भवताल बदलण्यासाठी मनापासून काम करत होत्या-आहेत त्या सगळ्या स्त्रियांचीच तर ही वाट आहे, अनुभव आहे. गेल्या वर्षभरात चोवीस लेख लिहून झाले आणि त्यानिमित्ताने वाचन, चर्चा, विचार, सगळंच सहज होत गेलं. मी पर्यावरण संरक्षणाबद्दल आणि झोकून देऊन काम केलेल्या मागच्या काळातल्या, तसेच आजही कार्यरत असणाऱ्या ज्या-ज्या स्त्रियांबद्दल लिहिलं, ते माझ्या कामाचा एक भाग असल्यामुळे कदाचित ठरवलं तसं जमत गेलं.

एखादा पर्यावरणाचा प्रश्न, त्यामागचा विचार आणि त्यावर भारतातल्या तसेच देशोदेशीच्या स्त्रियांनी केलेल्या कामाबद्दल माहितीच्या पलीकडे जाऊन लिहिणं, हा या सदराचा उद्देश होता आणि एकदा सुरुवात झाल्यावर या सगळ्या स्त्रिया मला सहज भेटत गेल्या. कुणी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून, तर कधी त्यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांबद्दलच्या माहितीतून, तर कुणी ‘फेसबुक’च्या नव्या माध्यमवाटेवर भेटल्या. जास्त प्रसिद्ध, लोकप्रिय असलेल्या संशोधक आणि कृतिशील स्त्रियांबद्दल माहिती नेहमीच उपलब्ध असते, पण अनेक प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या, पण पर्यावरण संवर्धनासाठी संशोधन आणि प्रत्यक्ष काम केलेल्या अनेक स्त्रिया मात्र फारशा माहीत नसतात. आजकाल माहिती महाजालावर खूप माहिती उपलब्ध असते; पण नव्या गोष्टी शोधणं तितकंसं सोपं नसतं. माहिती मिळते, पण तिचं पृथक्करण अधिकच अवघड! या सदरातून मी निवडलेल्या, वेगळ्या मार्गावर चालणाऱ्या अनेक स्त्रियांचं काम आणि त्यामागचा विचार वाचकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला. शिवाय, आढावा घ्यायचा होता आपल्यामागच्या काळात योगदान देणाऱ्या स्त्रियांच्या कामाबद्दल आणि आजही नव्या वाटांवरून जात छोटंसं असलं तरी प्रामाणिक आणि वेगळं काम करत झटणाऱ्या नव्या पिढीतल्या बायका-मुलींबद्दल.

जानकी अम्मल, मेरिअन नॉर्थ, अन लबास्टील, आजारेटी, या अशा आधीच्या पिढीतल्या. जानकी अम्मल आणि मेरिअन नॉर्थ यांच्याबद्दल मला जास्त आत्मीयता आहे; कारण त्या वनस्पतिविश्वात काम करणाऱ्या आणि संशोधन करता-करता आपलं काम जनमानसापर्यंत पोहोचविण्यासाठी धडपडणाऱ्या, विज्ञानाचा उपयोग माणसाच्या भल्यासाठी करायला आसुलेल्या. जानकी अम्मल ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागा’च्या पहिल्या आणि आतापर्यंतच्या एकमेव स्त्री संचालक, पण त्यांच्याबद्दल फारसं कुठे लिहिलेलं नाही म्हणून त्यांच्याबद्दल लिहिलं. कारण मी स्वत: काही काळ ‘भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागा’त काम करत होते, तेव्हापासून त्यांच्याबद्दल अपार कुतूहल होतं.

मेरिअन नॉर्थच्या चित्रांबद्दल आणि वनस्पतीचा वेध घेण्यासाठी एकटीने केलेल्या घनदाट अरण्यांमधल्या प्रवासांबद्दलच्या हकिगती माझ्या आवडीच्या. मला पर्यावरण क्षेत्रात सगळ्यात जास्त ओढ आहे, ती जंगलं आणि वृक्ष, परिसंस्था यांबद्दल. म्हणून मग दुर्गाबाई भागवतांसारख्या विदुषीने वृक्ष समजून घेण्यासाठी केलेलं संशोधन, सखोल विचार आणि अभ्यास यावर लिहिलं. वृक्ष आणि आपली संस्कृती यांचा बंध किती प्राचीन, हे मला उमगलं. शिवाय दुर्गाबाईंच्या लिखाणातला निसर्गाबद्दलचा अलवार भावही मला त्याबद्दल लिहायला प्रवृत्त करणारा. या तीनही लेखांवर भरपूर प्रतिक्रिया आल्या आणि नव्या ओळखी-नव्या वाटांचा शोध त्यातून लागला. मुंबईतील संस्कृतच्या प्राध्यापक नीला कोर्डे यांनी लेखातील उल्लेखामुळे आवर्जून संवाद साधला आणि लेखन केल्याचे श्रम कारणी लागले. अरुणा ढेरे आणि वीणाताई गवाणकर यांच्यासारख्या मोठय़ा लेखिकांकडून प्रतिक्रिया आणि कौतुक तर फारच मोलाचं.

पर्यावरण हा विषय सहज कळणारा आहे असं वाटलं, तरी ते सोपं काम नाही. पर्यावरण संरक्षणासाठी फक्त वृक्षारोपण, सरकारचे कायदेशीर संरक्षण, एवढंच पुरेसं नसतं. सर्व संबंधितांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी दररोज नव्या कल्पनांवर काम करावं लागतं, नवनव्या अडचणींना तोंड द्यावं लागतं. शिवाय सातत्य आणि चिकाटी याला तर कोणताही पर्याय नाही, हेच या सगळ्या स्त्रियांच्या कामातून जाणवतं. फक्त पुस्तकांतून किंवा इतर ठिकाणी भेटणारा पाश्चिमात्य संशोधकच नाही, तर एखादा प्रश्न घेऊन त्यावर आपल्या पातळीवर मनापासून काम करणाऱ्या दीपा मोरे किंवा अश्विनी भट तर मत्रिणीच, म्हणून त्यांच्याबद्दल लिहिताना ऊर भरून आला होता.

या सदराला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. एक म्हणजे, या लेखांमध्ये मांडलेली समस्या आणि विचार आवडल्यामुळे आणि दुसरं म्हणजे त्यातल्या प्रेरणादायी स्त्रियांच्या ओळखीमुळे, यांच्या कामाच्या परिचयामुळे. लेख आल्यानंतर दोन-तीन दिवस प्रतिक्रिया येत असत आणि मी नकळत अशा एक-दोन ओळींच्या पत्रांची किंवा मी काय करावं, अशी विचारणा करणाऱ्या ईमेल्सची वाट बघत असे. अर्थातच, असं मार्गदर्शन खूप अवघड असतं. ईमेल्सवरून एक नक्की जाणवलं, की माहितीच्या पलीकडे नेणारं हे लिखाण लोकांपर्यंत पोहोचतं आहे. त्यावर अनेक जण विचारही करत आहेत. काही लोकांना या लेखांमध्ये उल्लेख केलेल्या अनेक निसर्ग आणि पर्यावरणविषयक पुस्तकांच्या संदर्भामुळे हे सदर आवडायचं. यातली बरीचशी पुस्तकं माझ्या संग्रही आहेत म्हणून मला पुस्तकांची ही प्रशंसा जास्त भावली. सदराला शब्दमर्यादा असते, हे भान ठेवणं अनेकदा अवघड जायचं; पण ‘चतुरंग’च्या टीमने अशा अडचणींवर मात करत या सदराचा ताल कायम ठेवायला मदत केली. मला सदर लिहायला म्हणूनच फार मजा आली.

भवताल वेगाने बदलतं, बिघडतं आहे आणि त्याची परिमाणं वेगवेगळी, शेकडो हजारो. त्यावर ते बदलण्यासाठी, दीर्घकालीन उपाय करायचे म्हणून कुणी सुरुवातीला संशोधन आणि नंतर प्रत्यक्ष प्रजाती वाचवण्यासाठीचं काम यात झोकून दिलं तर पॉली हिगीन्स आणि अनोंन द वेव्हर किंवा ग्रेटा थनबर्ग यांनी धोरणकर्त्यांविरुद्ध आवाज उठविण्याचा मार्ग निवडला. आपल्यामागे येणाऱ्यांचा काफिला तयार केला, तर काही जणींनी आपल्या कामाचा स्थानिक पातळीवर ठसा उमटवलाच, पण जागतिक पातळीवरही त्यासाठी वाहवा मिळवली.

बायारजर्गाल आगावांतसरीनने हिमबिबटय़ांच्या संशोधनापलीकडे जाऊन त्यांच्यासाठी हजारो चौरस किमीचा परिसर सुरक्षित केला, तर बानू हारालूने मूळच्या शिकारी असलेल्या लोथा नागांच्या मनावर ‘आमूर ससाण्यांची शिकार चुकीची आहे’ हे बिंबवलं आणि अशक्य ते शक्य करून दाखवलं. लोथा नागा आता या आणि इतरही अनेक पक्ष्यांच्या संरक्षणाचे आणि त्यावर आधारित पर्यटनाचं काम करतात. मला हे सगळं फार महत्त्वाचं आणि प्रेरणादायी वाटतं. आपल्या अभ्यास किंवा आवडीच्या विषयाचा ध्यास घेणं, अवघडातल्या अवघड समस्येवर मार्ग काढणं, हे या सगळ्यांनी केलं आणि त्यातून खूप बदल घडविले. त्यावर उत्तम साहित्य लिहिलं.

डायन फॉसी, नलिनी नाडकर्णी यांची पुस्तकं मुळात वाचली पाहिजेत अशी. या लिखाणाच्या निमित्ताने मी ती वाचली, काही पहिल्यांदा, तर काही पुन्हा नव्या जाणिवेने.

भारतात आणि जगातही जंगल, पर्यावरण यांच्या संवर्धनाचे शेकडो, हजारो प्रयत्न आजही सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी या सगळ्या कामांचं नेतृत्व स्त्रिया समर्थपणे करताना दिसतात. एखाद्या प्रजातीवर संशोधनापासून सुरुवात करून यातल्या अनेक स्त्रिया पुढे त्या प्रजातीच्या संरक्षणाकडे वळल्या. त्यातल्या कुणाचंही आयुष्य सोपं नव्हतंच; पण तरीही नेटाने त्या काम करत राहिल्या. म्हणूनच यापासून प्रेरणा मिळते. भारतातही अनेक तरुण मुली पर्यावरण या विषयाकडे आता सजगपणे बघू लागल्या आहेत; पण संशोधनापलीकडे जाऊन काम करण्यातल्या आव्हानांमुळे त्या फक्त संशोधनातच रमलेल्या दिसतात. आणखी एक गोष्ट म्हणजे, पर्यावरण क्षेत्रात आता संशोधन आणि स्वान्तसुखाय शोधनिबंध लिहिण्याचे दिवस संपले आहेत. आता फक्त सर्वसामाईक कृती कार्यक्रमाची गरज आहे. म्हणजे वाघाच्या जनुकशास्त्रावर संशोधन करण्यापेक्षा वाघाचा अधिवास वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे, स्थानिक लोकांना, प्राणी आणि माणूस यांच्यातला सहजीवनाचा संबंध पुन्हा तयार होण्यासाठी, तो नव्याने समजून घेण्यासाठी, तयार करणं आत्यंतिक गरजेचं आहे.

पर्यावरण संरक्षणाच्या दीर्घकालीन कामासाठी सातत्य आणि आर्थिकमदतही तितकीच गरजेची असते, हे सत्य आहे. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा कामांना आर्थिक साहाय्य उभे करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व तयार करण्यासाठी जुलिया मार्टनि, पॅट्रिशिया झूरिटा अशा अनेक स्त्रिया अथक प्रयत्न करतात, त्यांच्याबद्दल लिहायचं राहून गेलं. फुलपाखरांचा मागोवा घेणारी मार्गारेट फॉनतेन, ओरिसामध्ये स्वयंप्रेरणेने जंगलं वाचविणाऱ्या आदिवासी स्त्रिया आणि सामन माशांबद्दल कळकळीने लिहिणारी, काम करणारी एलिझाबेथ वूडीसुद्धा राहून गेली मनातच..

जंगलांचं महत्त्व आणि ते वाचविण्यासाठी आंदोलन करणाऱ्या अस्सल भारतीय गौरादेवीला आपण विसरलो आहोत. शे-दीडशे वर्षांपूर्वी निसर्ग आणि माणूस यांच्यातला अद्वैतभाव, विकासकामांसाठी जमीन मागायला आलेल्या अमेरिकी सरकारला आपल्या पत्रातून कळवणाऱ्या सिएटल चीफलाही आपण विसरलो आहोत. विकासाच्या वेगामुळे आपण निसर्गापासून दूर आलो आहोत, खूप दूर. आता तर वैश्विक वातावरण बदल, तापमानवाढ आणि त्याचे परिणाम आपल्या दारात-घरात पोहोचले आहेत.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही प्रेरणा देणाऱ्या या स्त्रियांचं काम फार मोलाचं आहे, बिघडलेल्या जगात जगण्याची वेदना विसरून मार्ग काढण्यासाठी महत्त्वाचं आहे. फक्त स्त्रियाच नाही तर अनेक पुरुषही पर्यावरण संरक्षणासाठी जगभरात अथक परिश्रम करतात. आपला पेला अर्ध्याहून अधिक रिकामा आहे, पण थोडासा भरलेलाही आहे. म्हणूनच जेन गुडाल म्हणते, तो छोटासा झरोका आणि त्यातून पाझरणारा प्रकाश पकडायला हवा, फार उशीर होण्यापूर्वी.

जंगल वाचविण्याच्या कामात आयुष्य मागे सोडून आल्यावर, आपल्या अणुमात्र प्रयत्नांनी काही फरक पडणार आहे का, कारण बिघडण्याचा वेग फार प्रचंड आहे, आपल्या प्रयत्नांना एखादा यशाचा कवडसा तरी ऊब देणार आहे का, अशी निराशा अनेकदा माझाही पाठलाग करते. मग अशा कातरवेळी पुन्हा लेस्ली आठवते. तिच्या ‘स्टोरी फ्रॉम बेयर कन्ट्री’मधल्या दीर्घ कवितेच्या शेवटी ती लिहिते,

‘पुढे जाताना मागेही वळून पाहा

तुम्हाला वाळूत तुमच्या पायांचे ठसे

उमटलेले दिसतील..’

(सदर समाप्त)

godboleaj@gmail.com

chaturang@expressindia.com