01 March 2021

News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : स्पेस म्हणजे काय रे भाऊ

शेवटी त्यांनी ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ अर्थात ‘व्वाऽऽ’ नावाच्या हेल्पलाइनची मदत घ्यायचं ठरवलं..

(संग्रहित छायाचित्र)

मंगला गोडबोले

mangalagodbole@gmail.com

आई-बापांनी प्रत्येक बाबतीत चुकीच्या पद्धतीनं वाढवलं असूनही दोन्ही मुलगे चांगले वाढले होते. सगळं जिथल्या-तिथे होतं. एक मात्र होतं, कॉलेजचं शिक्षण संपवत आलेला धाकटा आणि थोरला हे अधूनमधून ‘आम्हाला स्पेस द्या’, ‘रिस्पेक्ट आर स्पेस’, ‘डोण्ट एन्क्रोच आर स्पेस’ असं म्हणत. आणि आई-बाप बिचारे गोंधळून जात. गोळ्या-चॉकलेटांपासून स्कूटर-मोटरसायकलपर्यंत बऱ्याच गोष्टी ते मुलांना वेळोवेळी देत आले होते. पण ही ‘स्पेस’ कशी द्यायची, मुळात कुठून आणायची, कशी जपायची-पुरवायची, हेच त्यांना धड समजायचं नाही. शेवटी त्यांनी ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ अर्थात ‘व्वाऽऽ’ नावाच्या हेल्पलाइनची मदत घ्यायचं ठरवलं..

अलीकडेच ‘व्वाऽऽ’ नावाची एक नवीन हेल्पलाइन सुरू झाली आहे, ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ या पूर्ण नावाची. ‘व्ही.व्ही.ए.ए.’ असा हा शॉर्टफॉर्म आहे. या हेल्पलाइनवर वत्सला वहिनी नित्याच्या घरगुती समस्यांवर सल्ला देतात, ‘प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायला हेल्प’ करतात, फोन केल्यास पहिल्या तीन मिनिटांचा संवाद फुकट आणि नंतर माफक दरात कितीही बोललं तरी चालतं, खासगीपण कसोशीनं जपलं जातं, वगैरे बऱ्याच गोष्टी त्या दोघांच्या कानांवर इकडून-तिकडून आल्या होत्या. पण प्रॉब्लेम असा होता, की त्यांना काही मोठ्ठा दैनंदिन प्रॉब्लेमच आतापर्यंत आला नव्हता.

नवरा-बायकोच्या भांडणाचे सगळे दमदार विषय कधीच संपले होते. नवे शोधावेत तर ते टी.आर.पी.त मार खात होते. मागच्या पिढीने समंजसपणे योग्य वेळी एक्झिट घेतली होती. पुढची पिढी वेळेपूर्वीच या दोघांना वेडय़ात काढायला लागली होती. त्यांच्या मते, आई-बापांनी प्रत्येक बाबतीत चुकीच्या पद्धतीनं वाढवलं असूनही दोन्ही मुलगे चांगले (घोडय़ासारखे?) वाढले होते. असं सगळं जिथल्या-तिथे होतं. एक मात्र होतं, कॉलेजचं शिक्षण संपवत आलेला धाकटा आणि थोरला हे अधूनमधून ‘आम्हाला स्पेस द्या’, ‘रिस्पेक्ट आर स्पेस’, ‘डोण्ट एन्क्रोच आर स्पेस’ असं म्हणत असत. आणि आई-बाप बिचारे गोंधळून जात. गोळ्या-चॉकलेटांपासून स्कूटर-मोटरसायकलपर्यंत बऱ्याच गोष्टी ते मुलांना वेळोवेळी देत आले होते. पण ही ‘स्पेस’ कशी द्यायची, मुळात कुठून आणायची, कशी जपायची-पुरवायची, हेच त्यांना धड समजायचं नाही. बरं ती बया फार नाजूक असावी. सारखी आपली धक्का लावून घ्यायची किंवा फट् न म्हणताही उगाचच ‘स्पेसहत्या’ घडून जायची. आई-बाबा आपले बिचकत-बिचकत आपापसातच खल करायचे,

‘‘एऽ ही ‘स्पेस’ म्हणजे नक्की काय असते रे?’’

‘‘एखादं नवं प्रॉडक्ट आलं असेल. आपल्या वेळी कुठे होती स्पेसबीसची भानगड?’’

‘‘होती की..! ते नाही काऽ कसले भारीभारी फॅन्सी ड्रेस घालून एकेक जण तरंगत तरंगत चंद्रावर, मंगळावर वगैरे जायचे. तिथले खड्डे-पाणीबिणी बघायचे, मग खालचा आपल्या म्युनिसिपालटीचाच कारभार परवडला, असे संदेश पाठवायचे, की खालती आपण नाचायचो.’’

‘‘ती जुनीऽ स्पेसमधली स्पेस गं.. ती अंतराळातली. ही अंतर आणणारी. नात्यांमधली. माझी मला, तुझी तुला, गोपाळकाला नुसता!’’

‘‘पैशासारखं असेल का काही?.. कितीही द्या, पुरत म्हणून नाही..’’

‘‘किती द्यायची, कशी मोजायची, हे तरी कुठे कळतंय? इंचा-फुटांत मोजून दिली, वावरा-एकरात पसरून टाकली म्हणजे तरी कार्टी खूश होतील असा भरंवसा आहे? स्पेसबद्दल स्पेसिफिक सांगून टाकावं ना एकदाचं.’’

‘‘ती म्हणतात, तुमचं तुम्हाला समजत कसं नाही?’’

‘‘मी म्हणतो, त्यांनीच आपल्यासारखे मंद पालक निवडल्येत तर आपली बौद्धिक मर्यादा लक्षात घेऊन संदर्भासह स्पष्टीकरण द्यावं ना एकदा.’’

दोघं वेळोवेळी मंथन करायचे. कोडं सुटायचं नाही ते नाहीच.

त्यांच्यासारखे आई-बाप लाभूनही दोन मुलं कर्तबगार निपजली होती. दहावी-बारावीपासून मैत्रिणींचा दांडगा व्यासंग करत आली होती. पण त्यातले बरेचसे ‘शॉर्ट टर्म कोर्सेस’ ठरले होते. काही तास, काही दिवस, काही महिने एवढेच टिकलेले आणि ‘मैत्रीण वर्दीनेस’ ऊर्फ ‘मैत्रिणी करण्याची क्षमता’ असल्याचं जुजबी सर्टिफिकेट देऊन गेलेले होते ते.

अलीकडे मात्र थोरला मुलगा एका मैत्रिणीसोबत पदवीपर्यंत जाईल अशी धूसर शक्यता दिसायला लागली होती. त्याच्या ऑफिसच्या खालच्या मजल्यावर तिचं ऑफिस होतं, खूपदा ती त्याच्या ‘सॅन्ट्रो’मधून संध्याकाळी घरी येताना लिफ्ट घेत होती. खालती ‘निरोपसमारंभ’ बराच वेळ चालत होते. आई चुकून ऊर्फ मुद्दाम गॅलरीत उभं राहून ते बघत होती. आणि मनोमन, ‘अगोऽऽ बाईऽऽ हीच  का शेवटी?’ ‘ही तर ही.. पटत्येय ना?’, ‘हिच्यापेक्षा ती मागची काय वाईट होती?’, वगैरे स्वगतं म्हणत होती.

चिरंजीवांसमोर घडघडीत चौकशी करण्याची मात्र तिचीही टाप नव्हती आणि बाबाचीही. सारखं आपलं, ‘‘तू विचार’’, ‘‘मी नको.. तूच’’, ‘‘आता टाक एकदा विचारून..’’ असं सुरू असायचं. बाबाचा तर जास्तच ‘नॉनस्टिक’ पवित्रा असे.

‘‘दिसतंय ते बघायचं. बस! उगाच त्याच्या स्पेसमध्ये आपण घुसतोय.. वगैरे ऐकून घ्यायचं नाहीये मला.’’

गेली कित्येक वर्ष आई-बाबा कसे, मुलांच्या नजरेच्या धाकात होते. काय.. कुठे.. कसं बोलावं, नेहमी मुलांच्या डोळ्यांकडे पाहून कसं बोलावं, खरं तर मुलांसमोर शक्यतो काही बोलूच नये, फक्त मागणीनुसार; खळखळ न करता; पैसे पुरवत राहावेत, असं रीतसर कठोर वळणच लावलं होतं त्यांना मुलांनी. मुलांचं सज्ञानपण स्वीकारायला आपल्या कायद्याला एवढी अठरा-अठरा वर्ष लागावीत, यावरून कायद्याची प्रक्रिया किती संथ-रटाळ असते एवढंच कळलं होतं त्यांना. बाकी इयत्ता चौथी-पाचवीपासून मुलं सज्ञानच झाल्यासारखी होती. (ही इयत्ता मुलांचीच, बाबाची नव्हे!)

एकेकदा तर कोण कोणाचा पालक आहे, हेसुद्धा कळू नये असा दरारा असे त्यांचा. त्यात आता हे ‘स्पेस’ नावाचं नवं हत्यार भात्यात शिरलेलं. बाबा रीतसर चार हात दूर राहिला. आई मात्र खास आईपणाला साजेलशा कोडगेपणाने मध्ये-मध्ये खडे टाकत राहिली, ‘‘ही मैत्रीण जरा जास्तच दिसत्ये नाही का रे हल्ली?’’, ‘‘आताचा मामला सीरियस आहे वाटतं जरासा?’’, ‘‘हिची ओळख करून दे की एकदा.’’

मुलगा बाबाहून ‘निर्लेप’ राहायचा. आईने टाकलेले खडे जास्त झाले, की खडे बोल सुनवायचा, ‘‘गिव्ह अस अवर स्पेस आई..’’ की आईच्या पोटात आणखीच गोळा. की बै, लग्नाआधी फार जास्त स्पेस देणं बरोबर ठरेल का?

थोडा वेळ तिनं धाकटय़ाची घोरपड करून गड सर करण्याचा प्रयत्न करून पाहिला. ‘‘दादाचं काय चाललंय रे हल्ली?’’ वगैरे प्रश्न टाकून पाहिले. तर धाकटा स्पेसच्याही पुढे गेला. ‘‘असेल गं, तू कशाला आमची आयुष्यं मायक्रोमॅनेज करत्येस?’’ हे आणखी नवंच लचांड निघालं. ‘मायक्रोमॅनेज’? आता-आतापर्यंत ज्या पोरांच्या चड्डय़ांची बकलं किंवा नाकांची गळती मॅनेज केल्यासारखी वाटत्येय त्यांच्या ज्ञानाची, भाषेची ही झेप? आईला काहीच ‘मॅनेज’ होईना. थोरल्याच्या ‘मॅरेज’चा विषय डोक्यातून जाईना.

कामाच्या ओटय़ावर मसाल्याच्या डब्याशेजारी इंग्रजी-मराठी शब्दकोश ठेवायची वेळ आली तसं तिनं बाबांवर शब्दांचा भडिमार करून त्याला कसाबसा मुलासमोर शब्द टाकायला तयार केला. त्यानेही छातीचा कोट करून, तेहतीस कोटी देवांचं स्मरण करून, एकदाचं मुलाला विचारलं, की बुवा, ‘आर यू, म्हणजे सीरियस अबाऊट धिस मुलगी?’ नाजूक प्रश्न इंग्रजीत विचारणं त्याला सोयीचं पडलं असावं, पण इथे मुलानं एकदम पवित्राच बदलला. खेकसून म्हणाला, ‘‘तुम्हाला अजून शंकाच आहे? तुम्हा लोकांना आता आमच्यात काही इंटरेस्टच राहिला नाही. तुझ्याजागी दुसरी एखादी आई असती ना आई, तर केव्हाच..’’

त्याक्षणी त्या आईने ठरवून टाकलं, घ्यायची, आता ‘व्वाऽऽ’ हेल्पलाइनची मदत घ्यायची. कधी म्हणणार, स्पेस देत नाही. कधी म्हणणार, इंटरेस्टच उरला नाही. या मुलांशी वागायचं तरी कसं? काही ‘पालक संरक्षण धोरण’ उरलंय की नाही या देशात?

बाबा इथेही ‘नॉनस्टिक’ राहायला बघतच होता. ‘‘कुठली हेल्पलाइन?’’, ‘‘कसला सल्ला?’’ वगैरे उडवाउडवी करत होता, पण आईने समजावलं, ‘‘वत्सलावहिनींचा सल्ला रे. घ्यायला काय हरकत आहे?’’

‘‘या कोण वहिनी? काय सल्ला देणार?’’

‘‘पूर्वी माणसं रिकामटेकडी असायची. सारखी पुस्तकं, मासिकं वाचायची. त्यांच्यात नसायचा का ‘वत्सलावहिनींचा सल्ला?’ आता तसलं वाचनबिचन गेलं. म्हणून हा असा फोनवर सल्ला घ्यायचा. ‘व्वाऽऽ’ नावच किती छान आहे.. नाही तर आताचा जमाना फक्त व्वा! ‘वाहवा’चाच आहे. करून तर बघू.’’

आईने फोन करून ‘वत्सला वहिनींचा आधुनिक अ‍ॅडव्हाइस’ घेण्याचा प्रयत्न केला. पहिल्याच ‘हॅलो’ला रडक्या आवाजात विचारलं,

‘‘मी फार अडचणीत आहे हो.. माझ्या मुलांना स्पेस द्यायची म्हणजे काय, कसं हे मला समजतच नाहीये..’’

‘‘मुलं मागताहेत ना? गिव्ह इट. देऊन टाका. मुलांच्या लाइफमध्ये काही कमी पडायला नको.’’

‘‘असं आहे मॅडम, आतापर्यंतचं माझं सगळं लाइफच मी त्यांना दिल्यासारखं वाटतंय मला.. त्याहून वेगळी स्पेस काय असते?’’

‘‘अगोदर बेसिक डिटेल्स द्या बरं तुमच्या. नाव, एज, एज्युकेशन, बर्थप्लेस, हाइट, वेट..’’

‘‘माझा पासपोर्ट नाही काढायचाय हो. मुलांच्या परीक्षेत मला पास व्हायचंय फक्त.’’

‘‘लेट मी फीड डेटा फर्स्ट.’’ पलीकडून बऱ्याच बटणांची खाडखूड ऐकू आली. हाइट-वेटने इतकी स्पेस खाल्ली, की यातून आपण नात्यांच्या ‘खोली’पर्यंत कसे पोहोचणार हेच आईला समजेना. तिकडून वत्सलावहिनींच्या चौकशा सुरूच होत्या.

‘‘तुमच्या प्रीव्हिअस जनरेशननं काय केलं? अबाऊट यू आय मीन.’’

‘‘आमच्या आई-वडिलांनी नाऽ आम्हाला जन्म दिला, नेहमी अन्न-वस्त्र-निवारा आणि जरूर तेव्हा ठोक दिला..’’

‘‘फूड, क्लोदिंग, शेल्टर, अं..? पण स्पेस? स्पेसचा इम्पॉर्टन्स त्यांनी अंडरस्टॅण्ड केला का?’’

‘‘हो तर.. आम्हा चारी भावंडांच्या अंगांवर पिरगळण्याची स्पेस कुठली, फटके मारण्याची स्पेस कुठली हे अचूक ओळखलं त्यांनी.’’

‘‘देअर दे वेण्ट राँग! चुकले ते.’’

‘‘अहोऽ एकदा मुलांना जन्माला घालून चुकलं, की पुढे पावला-पावलाला चुकणारच की आई-बाप.’’

‘‘डोण्ट बी निगेटिव्ह मॅम. बी पॉझिटिव्ह. स्पेस मागताहेत? द्या.’’

‘‘स्पेसचं काय घेऊन बसलात? आख्खा सेपरेट ब्लॉकसुद्धा घेऊन ठेवतोय आम्ही मोठय़ासाठी.’’

‘‘ओह्, मेंटल ब्लॉक!’’

‘‘मेंटल नाही हो, अ‍ॅक्चुअल आहे. दरखेपेला ईएमआय भरताना कशी धडकी भरते, आमचं आम्हाला माहिती. वर तोंड करून हेच म्हणणार..’’ इथे आईला भरून आलं.

‘‘व्हाट डझ ही से?’’

‘‘तो म्हणतो, ‘तुझ्या जागी दुसरी एखादी आई असती तर..’’ इथवर भरून येता येता ती वात्सल्यसिंधूच झाली पण वत्सला वहिनींपर्यंत त्यातला बिंदूही पोहोचला नसावा. त्या त्वेषाने म्हणाल्या,

‘‘लुक अ‍ॅट दॅट.!’’ आई दचकली. तिला कुठे पाहावं कळेना. पुन्हा खुलासा आला.

‘‘त्याला खडसावा, तुझ्या जागी दुसरा, समथिंग.. एखादा कोणी वेगळाच मुलगा असता तर..’’

‘‘नाही हो, असं कसं होईल?’’

‘‘दॅट्स द पॉइंट.. टेल हिम यू वोण्ट हॅव अनदर मॉम इन माय प्लेस. आणि सेम फॉर यू. प्रत्येक आई, मुलं, ज्यांच्या जागी तीच असतात, असणार.’’

‘‘यात काय विशेष?’’

‘‘आम्ही विशेष सांगायचा क्लेम करतच नाहीये हो.. जस्ट बेसिक्स. फारच ऐकवायला लागली तुमची ऑफस्प्रिंग्ज तर म्हणावं, स्पेसच ना? आता तुम्ही आम्हाला द्या. एवढी वर्ष, तुमचे मूड्स, फिजिकल-मेन्टल हेल्थ, ई. टी. सी.. सांभाळत बसलो. नाऊ वी नीड स्पेस. विचारावंसं वाटेल तेव्हा तुम्हाला आस्क करू. नाही तर नाही आस्क करणार. वुड यू लाइक टू कंटिन्यू?’’

‘‘कंटिन्यू?.. आणखी पुढे..?’’

‘‘तुमची फ्री थ्री मिनिट्स आर ओव्हर, म्हणून..’’

‘‘नको,’’ वत्सलावहिनींच्या माऱ्यातून स्वत:ला वाचवत आई म्हणाली.

समोरून जोरात ‘व्वा.. गुडबाय’ आलं. आईनंही ‘व्वाऽऽ’ ला ‘व्वा’ मिळवलं. ते भलेही यांत्रिक असेल पण अंगावर कोसळलेला सल्ला मनातही थोडाफार झिरपला असावा. अजूनही मुलाचे ‘निरोपसमारंभ’ रंगत असतात.. मुली खूपदा बदललेल्या असतात. आई मात्र आता ‘पदवीदान’ समारंभाची वाट बघत नाही. ती बदलण्याच्या प्रयत्नात असते.

लेखिका मंगला गोडबोले यांच्या गेली चार दशके अव्याहतपणे सुरू असलेल्या लेखन कामगिरीमध्ये त्यांना महाराष्ट्र शासनाच्या आठ वाङ्मय पुरस्कारांसह अनेक महत्त्वाचे साहित्यिक पुरस्कार लाभले आहेत. २००६ मध्ये त्यांच्या ‘पर्स हरवलेली  बाई’ या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा विनोदी वाङ्मयासाठीचा ‘दत्तू बांदेकर पुरस्कार’ तर ‘ऋतु हिरवट’ या पुस्तकाला २०१४ चा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर  पुरस्कार’ मिळाला आहे. त्यांची आतापर्यंत पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली असून त्यातून निवडलेल्या ३५ लेख, कथा आणि एका प्रहसनाचा समावेश असलेल्या  ‘निवडक मंगला गोडबोले’ या डॉ. वंदना बोकील कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती नुकतीच प्रकाशित झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2020 4:06 am

Web Title: chaturang vvaa helpline mangala godbole abn 97
Next Stories
1 यत्र तत्र सर्वत्र : माणूस कधी होणार माणूस?
2 गद्धे पंचविशी : भोग नव्हे त्याग
3 संधिकाली या अशा..
Just Now!
X