27 May 2020

News Flash

दंगल, फुलं आन् हायकू 

कवामवा आपनबी तिला यखांदी हायकू ऐकवली पायजेल. तं आज त्यो दिवस उगवला..

(संग्रहित छायाचित्र)

बब्रुवान रुद्रकंठावार

आपल्या मान्सासाठी दुधावरली साय आल्लग काडून ठिवावी आन् बाकीच्यापास्नं लपवून हळूचकन त्याला द्यावी तसं आमच्या भावजयीचं काम हाये. माझ्यासाठी ती आशा व्हरायटी हायकू काडून ठिवीत आस्ती. ह्य़ा टायमाला म्याबी ठरवलं, घडीघडी तिच्याकडनंच आपन एक्स्पेक्ट करूने. वन वे बरं नस्तं नात्यात. कवामवा आपनबी तिला यखांदी हायकू ऐकवली पायजेल. तं आज त्यो दिवस उगवला..

म्या घरी गेलो तं दोस्त भायेर गेल्ता. वैनी रिसेंट भायेरून आल्या व्हत्या. म्या सभागती म्हन्लं,

‘‘भावाकडं गेल्त्या का काय वैनी?’’

‘‘भावाकडंच गेल्ते; पन भेटली भावजय. तिनं दिला फुळूक चहा आन् वेफर्सचे चार तुकडे.’’

‘‘बस्स यवडंच?’’

‘‘न्हाय. नंतरच्याला हायकू व्हत्या की बक्कळ.’’

‘‘तायबाईचा त्यो नाद आजूक बरकरार हाये?’’

‘‘तं तं! त्यो काय सुटत आस्तो काय?’’

‘‘मजा हे वैनी तुमची.’’

‘‘यका लाइनीला यक वेफरबी न्हाय पडला बब्रूभावजी.’’

‘‘हायकू जबरा आस्तीन त्यांच्या.’’

‘‘म्हंजे काय? हायेतच. आमच्या बंधुराजाची मिसेस हाये ती. त्यो कायम इन्स्पायर करीत आस्तो तिला. कामून चांगल्या नस्तीन मंग तिच्या हायकू.’’

‘‘तेतं हायेच. तसंच तं आस्तं.’’

‘‘तुमाला सांगते बब्रूभावजी, आज म्याबी ल गंमत केली. भावजयीनं तोंडात बोटच घातलं. म्या परत निघेपत्तोर ते तसंच ऱ्हायलं. आमचे बंधुराज आता कुठं घरी आले आस्तीन आन् त्यांनी ते भायेर काडलं आसनार. तिलाबी कळालं पायजेल ना, आपली वन्स वस्ताद हाये म्हनून.’’

‘‘काय म्हन्ता वैनी? आसं काय केलं तुमी?’’

वैनीनी मंग स्टोरी स्टार्ट केली.

तुमाला सांगते बब्रूभावजी, बंधुराजाचं काय चाल्लं, काय न्हाई बगावं, म्हनून आज सकाळच्यालाच गेल्ते त्याच्याकडं. मामाकडं जायचं म्हन्ल्यावर बारक्याबी संगं येतो म्हन्ला. आमी गेलो तं बंधुराज नव्हते घरामंदी. दळणाफिळणाला गेला आसनार. बाईसायेब बस्ल्या व्हत्या बठकीमंदी पेपर वाचीत. व्हेंटिलेटरमंदून कवळ्या उनाचा तुकडा बाईसायेबाच्या केसाला हालक्यानं टच करून पेपरावर कुदून तिथनं खाली फ्लोअरवर मस्त पसरला व्हता. बरं हे तुकडे यकटय़ानं आतमंदी येत न्हाईत. वाटेवर जे कोनी भेटंन त्यांना घेऊन पुडं धकत ऱ्हातेत. तं भायेरल्या झाडाची सावली घेऊन ते आले व्हते. आशा टायमाला भायेर झाड डुलू लागलं, की बठकीमंदी उनसावल्याचा डान्स बहरात येतो. ते सावलीला चांगलंच नाचवत ऱ्हातं. झाडाचं यकेक सिंगल पान आपापला फेर धरतं. वारं जर जादाच सुटलं तं बगायलाच नगो. तं ह्य़ो सारा खेळ आधनंमधनं आंगावर घेत भावजय पेपरात गढून गेली व्हती.

आमाला बगताच तिनं पेपर बाजूला सारला. उठली. हास्ली. माझ्या पायाला फ्लाइंग टच केला. बारक्याच्या डोक्यावरनं हात फिरवला. त्याला मूठभर काजूबदाम आन् मला पानी आणूून दिलं. मंग म्हन्ली, चहा टाकते. म्या म्हन्लं, ‘‘बस जराशीक. लगीच कशाला चहा लागतो.’’ तीबी लागलीच बसली. म्या म्हन्लं, ‘‘कुठं गेले आमचे बंधुराज?’’ ती म्हन्ली, ‘‘यवडय़ात येतीनच.’’

भावजयीचा कलर आधीच उजळ. दिसायला शंभर नंबरी दागिना. त्यात कवळ्या उनानं तिला लालेलाल केलं व्हतं. तिची नजर काडावी आसा इचार ऑन दी स्पॉट माझ्या मनामंदी आला; पन मनात म्हन्लं, ती भावजय हाये. भावनेच्या भरामंदी वाहूने. तिचा फोटू काड, आसं बारक्याला सांगावं वाटलं; पन म्हन्लं, ते बरं दिसलं नस्तं. वरनं बारक्याबी खवळला आस्ता. बरं, बये आज ल सुंदर दिसायलीस, आसं तिला म्हनायला जावं आन् ती इतरायला लागली तं? म्हंजे चांगल्याला बिगडवन्याचंच काम. कायतरी सुरुवात कराव म्हनून म्या म्हन्लं, ‘‘उन्हाचा तुकडा ल मस्त येतो घरामंदी. ल्हान्या लेकरावानी फरशीवर खेळत ऱ्हातो. मस्त वाटतं.’’

तसं ती म्हन्ली, ‘‘हावना वन्सं. म्या कंदीच मीस करीत न्हाई ह्य़ो सीन. त्यांचा ह्य़ो खेळ आंगाखांद्यावर घेतल्याबगर माझा दिवस पुडं धकत न्हाई. परवाच्याला म्या त्याच्यावर यक हायकू केलीहे वन्सं.’’

मलाबी म्हनावं लागलं, ‘‘काय म्हन्ती? ऐकव की मंग.’’

बारक्याची मामी मंग डाळिंबाच्या फुलावानी खुलली. पदर सावरून बसत तिनं हायकू आमच्या म्होरं सोडली.

‘खिडकीतून तिरीप येते

झाडांची पानं डुलू लागतात

घरात उन नाचू लागतं’

‘वा?’ म्हनत म्या लागलीच रिस्पॉन्स दिला. त्याच टायमाला बारक्याला ठसका लागला. माझ्या ‘वा’ मंदी त्याचा ठसका मर्ज व्हवून गेला.

म्या म्हन्लं, ‘‘तुझ्या इवल्या इवल्या शब्दानं निसर्गाला किती लाइव्ह पकडलंहे. धरणीचा पसारा तोलून धरन्याची ताकदै तुझ्या शब्दामंदी. कीप इट अप पोरी.’’ बारक्याची मामी मंग जुईच्या वेलावानी बहरूनच आली. यखांद्या बाईनं आपले घनदाट केस बिनधास्त मोकळे सोडावं तशा तिनं आपल्या हायकू मोकळ्या सोडल्या. म्याबी हवा दिली. भावजयीला माझ्याबगर कोन इनकरेज करनार? म्हन्लं बये, बिनधास्त एक्स्प्रेस हो. मंग काय इचारता, तिच्या हायकूचा सडा आंगणभर पसरला. आता ह्य़ा टायमाला बारक्याचा मामा भायेरून आला आस्ता तं त्याच्या पायाखाली यकदोन तुडवल्या गेल्या आस्त्या. त्यो आपसेट झाला आस्ता. कारन, आमच्या भावाला बायकूबगर आन् भावजयीला हायकूबगर कायबी सुधरत न्हाय.

तं काय की, माझ्या कॉम्प्लिमेंटचा तिच्यावर यवडा जबरा इफेक्ट व्हतो हे हे मला पल्यांदाच उमजलं. न्हाय म्हन्लं तरी माझ्या आंगावर मूठभर मास चडलं. बारक्यानं बसल्याजागी जराशी धुसफुस केली. त्याला न्हाय समजत आशा गोष्टी. त्याच्या बापावानीच त्योबी ठार हाये.’’

‘‘तुमाला सांगते बब्रूभावजी, ह्य़ो काय पलाच टाइम नव्हता. म्या जवाकवा बंधुराजाकडं जाते आन् त्यो पठ्ठय़ा घरी नस्तो तवातवा ही गोष्ट ठरलेलीच ऱ्हाती. आपल्या मान्सासाठी दुधावरली साय आल्लग काडून ठिवावी आन् बाकीच्यापास्नं लपवून हळूचकन त्याला द्यावी तसं आमच्या भावजयीचं काम हाये. माझ्यासाठी ती आशा व्हरायटी हायकू काडून ठिवीत आस्ती. ह्य़ा टायमाला म्याबी ठरवलं, घडीघडी तिच्याकडनंच आपन एक्स्पेक्ट करूने. वन वे बरं नस्तं नात्यात. कवामवा आपनबी तिला यखांदी हायकू ऐकवली पायजेल. तं आज त्यो दिवस उगवला.’’

म्या मंग तिला म्हन्लं, ‘‘बारक्याचे मामी, तुझ्या हायकू ऐकून ऐकून मलाबी यक सुचलीहे. सांगू काय?’’

‘‘काय म्हन्ता वन्सं? सांगा की मंग.’’

भावजय एक्साईट झाली.

मंग म्या म्हन्लं, ‘‘पन यक प्रॉब्लेम बारक्याचे मामी. माझ्या हायकूला यक स्टोरी लगडलेली हाये. त्याच्याबगर ती पुरी करता येत न्हाई.’’

‘‘ह्य़ो तं कॉम्बोपॅकच झाला की वन्सं. स्टोरीबी आन् हायकूबी. जबराच.’’ ती म्हन्ली.

मंग म्या स्टोरी स्टार्ट केली, ‘‘बयामान्सापोरांनी भरलंपुरलं यक घर व्हतं. घरातल्यांना पानाफुलांची ल आवड व्हती. त्यांच्या कंपाऊडमंदी तऱ्हेतऱ्हेचे झाडंझुडपं व्हते. त्यान्ला व्हरायटी कलरचे टपोरे फुलं येत व्हते. येनाऱ्या जानाऱ्या मान्सांच्या नजरा ते आपल्याकडं वळवून घेत व्हते. फ्यामिली ल प्राऊड फील करीत व्हती.

यकदा गावामंदी कायतरी भानगड झाली आन् गाव यकदम टाईट झालं. आता दंगा व्हनार हे फिक्स व्हतं. गावात फुल्लं टेन्शन. सारे रस्ते सुनसान झाले व्हते, लोकं घराघरामंदी गुडूप झाले व्हते. ह्य़ा फ्यामिलीमंदली जी कर्ती बाई व्हती, ती ल अ‍ॅक्टिव्ह व्हती. आशा टेन्समंदीबी तिचा सेन्स जागा व्हता. तिनं पल्यांदा काय केलं आसंन तं दारामंदली खाट, सायकल घरामंदी आणून ठिवली. भायेर जे काय कपडे-धान्य वाळायला टाकलं व्हतं ते फटाफट घरात आनून ठिवलं. साऱ्या खिडक्या लावून घितल्या. दार आतून बंद केलं, त्याला आडणी लावली. आता कवाबी, कितीबी दंगा झाला आस्ता तं फिकीर नव्हती.

..तं सारी सिक्युरिटी झाल्यानं आता कायबी नुकसान व्हन्याचा चान्स नव्हता. फ्यामिली मेंबर रिलॅक्स झाले व्हते. आता यकदा दंगल व्हवून गेली आन् रूटीन सुरू झालं की बस्स! सारे वेटिंगमंदी व्हते. पोरंसोरं पत्ते कुटत बस्ले व्हते. मोठे मान्सं पेपर वाचत व्हते. बुजुर्ग बयामान्सं टीव्हीमंदी इन्व्हॉल्व झाले व्हते. ती जी कर्ती बाई व्हती ती मात्र आजूक सेटल नव्हती. खरं तं तिनं सारी प्रिकॉशन घेतली व्हती; पन तरीबी, कायतरी महत्त्वाचं ऱ्हाऊन गेल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर व्हते. तिच्या येरझाऱ्यातून तिची घालमेल दिसत व्हती. ती आचानकच उठून खिडकीपत्तोर जाऊन भायेर डोकवायची, परत घरात यायची. पुना जायची. भायेरनं सायरनचा आवाज आला, की परत यायची. यक टाइम आसा आला की, तिनं दरवाजा उगडला आन् तडक भायेर गेली.

खरं तं दंगलीचा टाइम उलटून गेला व्हता. इतक्या वेळात तं ती आर्धी संपून जायला पायजेल व्हती. पत्र्यावर, खिडक्यांवर दगडं आदळायला पायजेल व्हते. खंब्यावरले लाईट फुटायला पायजेल व्हते. पन तसं झालं नव्हतं. भायेर पोलिसांच्या गाडय़ा फिरत व्हत्या. त्याच्यावर कायबाय सांगितलं जात व्हतं. दंगल व्हवो ना व्हवो, पन दंगलीच्या नेपथ्यात काईबी खोट नव्हती. कुठल्याबी समजदार मान्साला ते वळखू आलं आस्तं. त्यानं यखांदा तरी दगूड तबियतनं उचलला आस्ता.

बाई भायेर गेली, नेमका त्याच टायमाला लांबवरनं यक दगूड आला आन् पत्र्याच्या शेडवर पडून त्यानं दांगोडा घातला. बाई नेमकी भायेर गेली आन् दगडफेक सुरू झाली म्हनून फ्यामिलीमंदले मेंबर घाबरले, त्यांनी खिडकीत माना घातल्या.. नेमकं दंगल स्टार्ट व्हायच्या टायमालाच बाईला भायेर जायची कामून खुमखुमी आली म्हनून त्यांनी आपापसात खुसफुसबी केली.

खरं तं टाइम देऊन स्टार्ट व्हायला दंगल म्हंजे पिच्चर आस्तो काय? तिच्या हिशेबानंच ती स्टार्ट व्हत आस्ती, तिच्याच हिशेबानं धगधगत ऱ्हाती आन् तिच्याच हिशेबानं ती थंड पडत आस्ती. दंगलीचा फिक्स टाइम देवालाबी म्हाईती नस्तो. दोनी पाटर्य़ाचे देव आल्लग आल्लग आस्तेत. दंगल आटपून गेल्यावर दोनीबी मिळून एकच देव आसल्याची भाषा व्हत आस्ती.

तुमाला सांगते बब्रूभावजी, माझी स्टोरी चालू आस्तानाच बारक्याची चुळबुळ वाडू लागली.

त्यो म्हनू लागला, ‘‘मायो, कवाधरनं निस्ती स्टोरी सांगून ऱ्हायलीस. हायकू कुठं हाये?’’

म्या म्हन्लं, ‘‘बारक्या, बाळा स्टोरीबगर तुझ्या मामीला हायकू कळंन कशी? बॅग्राऊंड तं सांगावं लागंन का न्हाई? जरा दम धर लेकरा, क्लायमॅक्स नजीक आलाहे.’’

त्यो ऐकंचना. सांगन्याची घाईच करू लागला. त्याला वाटत व्हतं की, आपल्या आयेला मामी मनामंदून हासत आसनार. हासंना का. पल्या टायमाला आसं व्हतंच. पन त्यो टरटरच करू लागला तसं म्या म्हन्लं, ‘‘ठिकै, सोडून देऊ काय मंग आरध्यात?’’

बारक्याची मामी कळवळून म्हन्ली, ‘‘वन्सं आसं नगा करू. स्टोरी मधातच नगा थांबवू. तुमी सांगत ऱ्हावा. हायकू कवा का येईना.’’

नंतर बारक्याकडं बगून म्हन्ली, ‘‘बारकेश बेटा, आसं करूने कंदी. दंगलीच्या मोसमात यखांद्या कत्र्या बाईला घराभायेर सोडून पळून जात नस्तेत. ती आपल्या भरोशावर आस्ती. तिला घरात येवूंदे. मंग वन्सं हायकू सांगतीन.’’

मामीच्या शब्दांवर बारक्या इमिजिएट गप झाला. तिनं स्टोरीतली दंगल करण्टमंदी कशी आन्ली ह्य़ो प्रश्नबी कडूबेण्यानं तिला इचारला न्हाई.

मंग म्या म्हन्लं, ‘‘बारक्याचे मामी, खरं तं स्टोरी इथंच खतम झालेलीहे. पुडं सांगन्यासारखं आता काईच ऱ्हायलेलं न्हाईहे. फकस्त यवडं सांगते की, ती बाई सेफ हाये. यकबी दगूड तिला लागलेला न्हाई. विदीन मिनिट ती घरामंदी परत आली. तिची फ्यामिली आनंदून गेली.’’

‘‘पन ती भायेर गेलीच कशाला व्हती?’’ बारक्या.

‘‘ती भायेर गेली नस्ती तं तिनं हायकू ल्हेली नस्ती.’’

‘‘दंगलीचा आन् हायकूचा काय संबंध?’’ बारक्या.

‘‘तिची हायकू दंगलीवरच व्हती.’’

‘‘मंग त्याला स्टोरी कशाला पायजेल?’’ बारक्या.

‘‘हायकू आशी फुकाफुकी व्हत नस्ती. पन्नास पानाचा रियाज व्हतो तवा कुठं यकदोन ओळी सुचत आस्तेत.’’

आमा मायलेकाचा ह्य़ो संवाद ऐकून बारक्याची मामी बावचळून गेली. तिला माझ्याशी बोलताबी येईना आन् बारक्याला गप बसवताबी येईना. हायकूबद्दलची क्युरॅसिटी मात्र तिच्या आंगांगावर उगवून आली व्हती.

म्या मंग जादा ताणलं न्हाई. सांगून टाकलं.

‘दंगलीची चाहुल लागताच

झाडांची फुलंही तोडून

आत आणून ठेवली लगोलग’

हायकू ऐकून बारक्याच्या मामीनं तोंड आवळून घेतलं. ती कायच बोलंना. म्या आन् बारक्या गिल्टून गेलो. न्हाय त्या भानगडीत कशाला पडली म्हनून त्यो माझ्याकडं बगू लागला. म्या सोताला कोसत ऱ्हायले. आमच्या बंधुराजाला कळालं तं त्यो काय म्हन्नार हे आल्लगच टेन्शन व्हतं.

तुमाला सांगते बब्रूभावजी, तिथं यकदम फुल्ल टेन्स व्हता. आमाला उठताबी येईना आन् बारक्याची मामी तोंडातनं शब्दबी काडंना. लच ऑकवर्ड पोजीशन व्हती. तेवडय़ात हुंदक्यावानी बारका आवाज आला. आमी डचकून बगितलं तं बारक्याची मामी फुंदुफुंदु रडत व्हती. हुंदका तिचाच व्हता. का? ज्यांचं लाइफ यक दिवसाच्या वर नस्तं आशा फुलांसाठी यखांदी बाई थेट दंगलीत उतरती, तहसनहस व्हन्यापास्नं फुलांना वाचवती हे ऐकून ती गहिवरून गेली व्हती. त्या बाईनं घेतलेल्या रिस्कनं तिच्या डोळ्यात पानी आनलं व्हतं.

आमी मंग परत निगालो तवा बारक्याच्या मामीनं डोळे पुसले. तिला आजूकबी हुंदके येत व्हते; पन कुनी जाताना आमच्याकडं डोळ्यात पानी आनत नस्तेत. तिला कंट्रोल व्हत नव्हतं. मंग तिनं आपले एक्स्प्रेशनच बदलून टाकले. हुंदक्याच्या जागेवर, तोंडात बोटं गेल्याचे भाव पेस्ट केले.

फुलं, बया आन् कविता ह्य़ांच्या इमोशनमंदी यखांदी सेन्सिटिव्ह बाई आटकली की, ती गुमसुम व्हऊन जात आस्ती बब्रूभावजी. तिला कायबी सुचत नस्तं. बोलवत नस्तं. बारक्याच्या मामीचं तसंच झालं व्हतं. त्यामुळं, माझी हायकू बरी व्हती का न्हाई हे मात्र तिला इचारायचं ऱ्हावून गेलं आन् तिबी सांगायचं इसरून गेली.

तं सांगन्याचं कारन आसं की, कोन्त्याबी वेलाचा सडा दोन ठिकाणी पडत आस्तो. यक तं त्यो वेलाच्या जाळीमंदी आडकत आस्तो आन् त्याच्यातून जो सुटतो त्यो आंगणात पडत आस्तो.’’

( ता. क. – दोस्त म्हन्ला, ‘‘बबऱ्या, कंदी कंदी वाटतं, आपल्याकडं मॉर्निग वॉकची सुरवात ही फुलं तोडायच्या निमित्तानंच झालेली आसनार. खिशामंदी बारकाल्या क्यारिबॅग ठिऊन, देवाच्या नावानं भल्या पाहाटी आंधारात हे भाद्दर आशे निंगतेत की, झाडाझुडपांच्या आंगावरबी काटा हुभा ऱ्हातो. ह्य़ांच्या हाताला कात्र्यावानी धार आस्ती, की ह्य़ांचे बोटं आणकुचीदार आस्तेत, की ह्य़ांच्या पायाला इनबिल्ट शिडय़ा आस्तेत, की ह्य़ांचे डोळे वटवाघळीचे आस्तेत? कळत न्हाई. कितीकबी वरल्या फांदीवर फूल आसो, कितीकबी पानाआड सांदीकोपऱ्यात ते लपलेलं आसो, त्याचं देठ कितीकबी मजबूत आसो ह्य़ांच्या धाडीतून ते सुटत न्हाई. कम्पाऊंडभायेरले फुलझाडं तं ह्य़ांच्या द्रष्टीनं पब्लिक प्रॉपर्टी आस्तीच; पन आतल्या फुलझाडाची यखांदी फांदी भायेर आली आसंन तं तिचं बोट धरून ते आतल्या साऱ्याच फुलझाडांचा यकेक करून समाचार घेतेत. यखांदं फूल हाटवादी आसंन, चिवट आसंन तं फांदीसगट त्याला खेचून काडायला हे मागंपुडं बगत न्हाईत. फुलांचा पिसारा काडून दिमाखात हुभारलेल्या झाडाला तं ते आसं ओरबाडून काडतेत की, त्यानं पुना आशी गुस्ताखी करूने. सणावाराच्या काळात तं ह्य़ांचं यवडं पेव फुटतं, की गत्रे झुडपं त्यांच्या धस्क्यानं गर्भगळित व्हतेत आन् आध्रेअधिक फुलं गाळून टाकतेत. बरं ह्य़ांचा टायिमग आसा परफेक्ट आस्तो, की कितीबी वॉच ठिवा ते जाळ्यात पकडले जात न्हाईत. आत्ता आत्ता आपल्या डोळ्याम्होरं आसलेलं, वाऱ्याच्या झोतासंग खुदुखुदु डुलनारं लालजांभळं फूल म्हन्ता म्हन्ता गायब व्हतं. निस्त्याच, भोंडय़ा फांदीकडं आपन कवाधरनं बगत आसल्याचं नंतर आपल्या ध्यानात येतं. आशी कशी भुरळ पडती ते देवालाच म्हाईती!)

c.dhanu66@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 1:52 am

Web Title: chaturnag babruvan rudrakanthavar article abn 97
Next Stories
1 सूक्ष्म अन्नघटक : स्निग्ध पदार्थ
2 विचित्र निर्मिती : भावनेची ‘आस’ म्हणजे ‘पार्श्वसंगीत’
3 ‘मी’ची गोष्ट : स्वशोध निरंतर
Just Now!
X