News Flash

व्वाऽऽ हेल्पलाइन : पिंकशाही

चौफेर टोले मारत ‘स्वर्गारोहण’ सुरू असताना एकदम त्या ज्येष्ठ विचारवंतांना देशावरच्या त्या साथीच्या आजाराविरुद्धच्या काही प्रयत्नांचं स्मरण झालं.

वेळ, सकाळची शाळा सुटण्याची. दृश्य शाळेच्या फाटकाबाहरेचं. पोरीचा आविर्भाव जन्मठेपेतून नुकतंच सुटल्याचा.

मंगला गोडबोले – mangalagodbole@gmail.com

चौफेर टोले मारत ‘स्वर्गारोहण’ सुरू असताना एकदम त्या ज्येष्ठ विचारवंतांना देशावरच्या त्या साथीच्या आजाराविरुद्धच्या काही प्रयत्नांचं स्मरण झालं. (तोवर ही समस्या उग्र झालेली नव्हती.) आणि त्यांनी धमकीवजा मत दिलं, ‘‘मी म्हणतो करा, साथीवर जरूर उपाय करा, पण ते संकटाहून भीषण नकोत ना? आधी घराघरात मच्छरदाण्या पुरवा, लागल्यास हवेत फिरवून जंतू मारण्याच्या विजेच्या बॅटी पुरवा, वॉर्डा-वॉर्डात कापूर जाळा, एकदम जनजीवन ठप्प करायचं नाही यावर मी ठाम आहे.’’..  मग मात्र चौबे भाभींना न हसता सभेत बसणं जमेचना. हे असं मत, ते मांडण्याची हिंम्मत, त्यातून ओढवणारी शहामत हाच केवढा भयंकर विषाणू आहे आपल्याकडे घुसलेला?..

रोजच्याप्रमाणे हाताने घरकाम करत, टेलिव्हिजनकडे पाठ करून वावरत चौबे भाभी टीव्हीवरचा कार्यक्रम ‘बघत’ होत्या. पण मध्येच त्यातून ओळखीचा आवाज आल्यासारखा वाटला म्हणून त्यांची नजर तिकडे वळली. बघतात तो त्यांच्या गल्लीत सदैव धुमाकूळ घालणारी एक शाळकरी पोरगी छोटय़ा पडद्यावर पकडलेली.  वेळ, सकाळची शाळा सुटण्याची. दृश्य शाळेच्या फाटकाबाहरेचं. पोरीचा आविर्भाव जन्मठेपेतून नुकतंच सुटल्याचा. केस, बुटांचे पट्टे, युनिफॉर्मचा टाय, दप्तराचे बंद, एक वस्तू जागेवर असेल तर शपथ!

‘‘बेबी?.. हे दप्तराचं ओझं फार आहे असं नाही वाटत?’’

खांद्यावरच्या वॉटरबॅगला झोका देत,

‘‘वाटतं.’’

‘‘अशा भारानं तुझे पाय, पाठ भरून येत असेल ना? पाय.. पाठ.. बिच्चारी.’’

पोरीच्या चेहऱ्यावर बिचारेपणाचा मागमूस नव्हता. मुलाखत्या इसमच जास्त बिचारा वाटत होता. त्यानं चिकाटीनं विचारलं, ‘‘आणखी काय-काय दुखतं बाळा तुझं?’’

‘‘लास्ट सण्डेला मामाच्या लग्नात मी ट्वेण्टी वन पेढे खाल्लेले ना, तेव्हा पोटपण..’’ इथे त्या अश्राप वॉटर बॉटलच्या पोटात ठोसे मारणं सुरू. आज तिचे ग्रह बरे नसावेत. (तिचे म्हणजे वॉटरबॉटलचे, या पोरीचे ग्रह बिघडतील, काय बिशाद?)

अशा प्रकारे ‘दुखणं’, ‘पेन’, ‘हर्टिग’ वगैरे नाना पर्यायी शब्द वापरून मुलाखत्याने त्या बाटलीतल्या राक्षसाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण काहीही करून पोरीला आवरणं अशक्य आहे, हे कळल्यावर मात्र मुलाखतच आवरती घेतली.

‘‘बघितलं मंडळी? ही जी दप्तरं आहेत, यांचं जे ओझं आहे, जे बर्डन आहे, त्याने ही जी मुलं आहेत ती किती नाराज आहेत? ‘जड झाले ओझे’ या कार्यक्रमात टीव्ही अमुकतमुकवर मी अमुकतमुक. शिक्षणखाते हे गांभीर्यानं घेईल काय?’’

शिक्षणखात्याचं सोडा, चौबे भाभींनाही हे काही गांभीर्यानं घेववेना. ही पोरगी मुलाखत्याला ‘दयनीय’ वाटत असली तरी गल्लीकरांसाठी ती फक्त ‘भयनीय’ होती. हिला एवढी काही सेकंद एका जागी उभं राहाणंच सर्वांत जड गेलं असणार इतकी कडमडी. हिला दप्तर जड पडण्याचं काहीही पडलेलं नसणार. प्रश्न समोर पडायच्या आत उत्तरांनी टोलवायची घाई. दप्तर हलकं वाटतं का?, असं विचारलं असतं तर त्यालाही ‘हो’ म्हटलं असतंन् बयेनं. मुलाखतींचा धडाका लावणारे हे वास्तव गांभीर्यानं घेतील काय? असा प्रश्न मनोमन विचारत चौबे भाभी तिथून दूर झाल्या आणि त्यांनी सकाळी आलेलं वर्तमानपत्र चाळायला घेतलं..

त्या दिवशी त्याचं शेवटचं अर्ध-पाऊण पान एका उभरत्या तारकेच्या मुलाखतीनं भरलं होतं. सध्याच्या एका गाजत्या भडक वेबसीरिजमधली दुय्यम नायिका होती ती. आळीपाळीनं दोन्ही हातांनी केस सावरतानाचे तीन-चार फोटो आणि त्यांना टेकण देण्याइतपत मुलाखत. टँक टॉप कोणत्या फिगरला शोभतो, समर मेकअप विंटर मेकअपपेक्षा कसा वेगळा असावा, या वैश्विक महत्त्वाच्या प्रश्नांवर सुरुवातीला मत दिल्यावर ताई एकदम सेन्सॉरवरच घसरल्या. वास्तविक या नवोढा ताईंचा काहीही दाखवण्याकडचा ओढा हेच त्यांच्या लोकप्रियतेचं गमक होतं. आणि वेबसीरिज तर ओढाओढीत माहीर होती. तरीही ‘जाताजाता’ सेन्सॉरशिपचा सगळा प्रश्नच त्यांनी सोडवायला घेतला.

‘‘काय आहे, आज जगभरात कुठेकुठे स्पीलबर्ग होतात, रिडली स्कॉट होतात, पण आपल्याकडे होत नाहीत. का? कारण त्यांनी लोकांना काय दाखवावं हे एखादं बाबू लोकांचं डिपार्टमेंट ठरवत नाही. उद्या लोकांनी काय खावं हे पण डिपार्टमेंटच ठरवणार का? मग.. व्हॉट यू से.. हं.. ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय लोणचं घालायचं?.. एकदाची आपल्याकडची सेन्सॉरशिप काढा. अख्खी इंडस्ट्री फ्लरिश होईल. आम्ही आणखी-आणखी बोल्ड वेबसीरिज आणणार आहोतच. आमच्या पुढच्या सीजनमध्ये. फक्त आमच्यावर सेन्सॉर लादायचा नतद्रष्टपणा करू नका. उभरतं वेबविश्व आणखी बहरणं हिताचंच आहे, असं माझं मत आहे.’’

चौबे भाबी वाचता वाचता दचकल्या. हाताने केस सारावे तशी एका मतानं सेन्सॉरशिपची सगळी नाजूक केस काय लीलया सारली होती ताईंनी. है शाब्बाश! वर्षांनुवर्ष सेन्सॉरशिपवर काथ्याकूट करणाऱ्या सर्व माध्यमतज्ज्ञांना, मानसशास्त्रज्ञांना, शासनातल्या अधिकाऱ्यांना यांच्या पायाशी कसं बसवता येईल, या विचारानं तिथून उठल्या.

त्याच वर्तमानपत्रात संध्याकाळच्या एका जाहीर कार्यक्रमाचं निवेदन होतं. एका ज्येष्ठ विचारवंत पत्रकाराचा गौरव समारंभ!  त्यांच्या मुलाखतीच्या भरगच्च कार्यक्रमासह.  गेली पुष्कळ वर्षें कधी पक्ष, कधी (वर्तमान) पत्र बदलताना धडाकेबंद विधानं करण्याबद्दल त्यांची ख्याती होती. त्यामुळे कोणताही कार्यक्रम गर्दीचा आणि रंजक होण्याची (प्रायोजकांना) खात्री असे. आज ते आपल्या विचारांचा ऑर्केस्ट्रा ऐकवणार, पक्षबदलाचा तमाशा दाखवणार, की निष्ठांच्या कोलांटय़ा उडय़ांनी करमणूक करणार हे बघायला भाभी तिथे निघाल्या.

तर सोसायटीच्या फाटकाजवळ ‘सुसंवादी सहजीवन सुधार समिती’च्या एका स्वघोषित कार्यकर्त्यांंनी त्यांना अडवलं. ही समिती

(‘४ एस’ या इंग्रजी नावासकट) सध्या फार अ‍ॅक्टिव्ह होती. म्हणजे सतत कशाला तरी विरोध करायची. या कार्यकर्त्यां निवृत्त शिक्षिका होत्या आणि आपल्या शिकवणीची आम जनतेला कायम गरज आहे, या विश्वासावर चालणाऱ्या होत्या.

‘‘या सोसायटीत रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत वाहनं आणण्याला बंदी घालावी यावर तुमचं काय मत आहे?’’ त्यांनी दरडावून विचारलं.

‘‘होतो आवाजाचा त्रास. भलभलते रिव्हर्स हॉर्न अंगाई थोडीच ना म्हणणारेत? पण एकदम बंदी?.. माणसं देशपरदेश कुठून-कुठून रात्री अपरात्री येणार..’’

‘‘तो त्यांचा प्रश्न आहे. फाटकाच्या आत गाडीचं इंजिन सुरू असता कामा नये. नो म्हणजे नो. बाहेर काहीही करा.’’

‘‘पण मग फाटकापासून बिल्डिंगपर्यंत किंवा उलट कसं जावं बंद इंजिनांच्या गाडय़ांनी?’’   ‘‘ढकलाव्यात.. दोरीनं ओढाव्यात.. तो त्यांचा प्रश्नआहे.’’

‘‘तसं काय, रोज चार पहिलवान नाइट डय़ुटीवर ठेवून सरळ उचलूनही आणता येतील. पण हे चौघं कुठे कसे मिळणार?’’

‘‘तो त्यांचा प्रश्न आहे. समिती मतावर ठाम राहील. ‘रात्र चढली.. गाडी अडली.’  या उप्पर एखादी गाडी जुलमानं आत आणलीच तर ती माझ्या अंगावरून जाईल.. मतासाठी एवढी किंमत मोजायलाच हवी..’’ त्या बाईंनी गर्जना केली. वास्तविक त्यांच्या अंगावरून मुलांच्या खेळण्यातली तीनचाकी गेली असती तरी पुरलं असतं एवढी बुलंद काया त्यांची. पण मताची नशा प्रचंड! काल्पनिक स्वातंत्र्य समरात देहाची आहुती टाकायला त्यांना मोकळं सोडून चौबे भाभी सभास्थानाकडे कूच करायला निघाल्या.

तिकडे तर काय, मतांची उबळ थेट डांग्या खोकल्यापर्यंत गेलेली. आपल्या ‘ट्रेडमार्क उद्धट नम्रतेनं’ काय तो किरकोळ गौरव वगैरे स्वीकारून ते ज्येष्ठ विचारवंत, पत्रकार शेरेबाजीच्या आवडत्या जंगलात शिरले. आपल्या खिशातली एकेक खास ‘विश्वसनीय सूत्रं’ काढून त्यांच्यावरून स्वर्ग गाठायला लागले.

‘‘ब्रेग्झिट वॉज द बिगेस्ट ब्लण्डर.’’

‘‘मी मुख्यमंत्र्यांना तेव्हाच वॉर्न केलं होतं.’’

‘‘ट्रम्प तात्यांच्या अ‍ॅप्रोचमधली खोट माझ्या कधीच लक्षात आली होती. पण म्हटलं, त्यांनी होऊन विचारेपर्यंत आपण गप्प राहू.’’ असे चौफेर टोले मारत ‘स्वर्गारोहण’ सुरू असताना एकदम त्यांना देशावरच्या एका साथीच्या आजाराविरुद्धच्या काही प्रयत्नांचं स्मरण झालं. (तोवर ही समस्या उग्र झालेली नव्हती.) आणि त्यांनी धमकीवजा मत दिलं, ‘‘मी म्हणतो करा, साथीवर जरूर उपाय करा, पण ते संकटाहून भीषण नकोत ना? आधी घराघरात मच्छरदाण्या पुरवा, लागल्यास हवेत फिरवून जंतू मारण्याच्या विजेच्या बॅटी पुरवा, वॉर्डावॉर्डात कापूर जाळा, एकदम जनजीवन ठप्प करायचं नाही यावर मी ठाम आहे..’’

ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांंमध्ये थापा किंवा माशा मारण्याशिवाय दुसरं चिलटही मारलेलं नाही ते विजेच्या बॅटनं ़विषाणू मारणार, की बायकोबरोबर विषाणूचा ‘कॅच-कॅच’ खेळणार? चौबे भाभींना न हसता सभेत बसणं जमेचना. हे असं मत, ते मांडण्याची हिंमत, त्यातून ओढवणारी शहामत हाच केवढा भयंकर विषाणू आहे आपल्याकडे घुसलेला? याला हटवण्यासाठी काय उपाय करता येतील बरं?

वत्सलावहिनींचा सल्ला घ्यावा?.. निदान त्यांच्यापुढे आपली खदखद तरी मांडावी? मतामतांच्या एवढय़ा गलबल्यात आपलं मत नोंदवायला तरी काय हरकत आहे? चौबे भाबींनी सरळ ‘व्वा हेल्पलाइन’चा नंबर लावला. आतापर्यंत तो सर्वांना पाठच झाला होता जवळजवळ.

‘‘वत्सला वहिनी.. आताशा प्रत्येकाला प्रत्येक विषयावर मत कसं असतं हो?’’

‘‘आता मिशा लवकर येतात ना.. म्हणून मतंही येतात.’’

‘‘मिशा-बिशा सोडा. जन्मल्यापासूनच मतं असतात एकेकाला. ती प्रसिद्ध करणारे, छापणारे, वापरणारे, वाजवणारे दबाच धरून बसलेले असतात हो. काय साधतं यातून?’’

‘‘करमणूक. टाइमपास. माणसं म्हटल्यावर मतं असायचीच.’’

‘‘ही अशी? वाचन, विचार, अभ्यास वगैरे तर सोडाच. साधं आपलं वय काय, आपली औकात काय, आपण दमात कोणाला घेतोय याचंही भान उरत नसावं?

‘‘आता भाषणस्वातंत्र्य म्हटल्यावर असं होणारच बरं का.’’

‘‘हे भीषणस्वातंत्र्यही म्हणता येईल की नाही? अशानं कोणीही कोणत्याही व्यवस्थेला पंक्चर करायला तयारच राहणार. मग घडय़ा बसवायच्या तरी कशा आणि कोणी?’’

‘‘तुम्ही जास्त त्रागा करताय असं माझं..’’

‘‘थांबा. मतावर येऊ नका एकदम. साधं बघा, ढ मुलांना पास करायचं की नापास हे त्यांच्या मताने ठरवायचं. नोकरदारांचे डय़ुटी अवर्स त्यांच्या कलाकलानं घ्यायचे. चोरीच्या शिक्षा या चोरांची मतं विचारात घेऊन ठरवायच्या.. हे.. हे स्वातंत्र्य?

‘‘हे बघा मॅडम, आपण लोकशाही पत्करलीये ना एकदा?’’

‘‘आहे ना.. पण पुष्कळांना ती ‘पिंकशाही’ वाटत्येत त्याचं काय करणार? जाता-येता कुठेही, कशावरही आपल्या मताची पिंक टाकत बसायचं.. घटकाभर राळ उडाली; वाहवा.. धूळ बसली; वाहवा..’’

‘‘मग तुमचं म्हणणं काय आहे? लोकांना मतंच नसावीत? सगळ्या माणसांचे मख्ख पुतळे व्हावेत?’’

‘‘तेवढं नको अगदी.. पण मतं देणाऱ्यांनी तारतम्य बाळगावं, माध्यमांनी प्रसिद्धी तरी देऊ नये अशा उथळ शेरेबाजीला.’’

‘‘मग त्यांची दुकानं कशी चालणार? त्यांना म्हणजे कसा, पंच हवा, पंचलाइन हवी, मधूनमधून पंचनामा हवा, उगाच पंचारती हव्यात, ..  झालंच तर..’’

‘‘याने सगळ्याचं गांभीर्य पंक्चर होतं हो. माझं सोडा, थेट गीतेतसुद्धा म्हटलंय..’’

‘‘कुठे?’’

‘‘श्रीमद्भगवद्गीतेत. न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानाम् कर्मसांगिनाम्॥ जोषयेत्सर्वकर्माणि विद्वान् युक्त: समाचरन्।।.. मुद्दा काय,  खऱ्या ज्ञानी लोकांनी कर्मासक्त अज्ञानींचा बुद्धिभेद करू नये..’’

‘‘अहो, असली कुठली तरी जुनीपानी सेइंग्ज सांगून इंप्रेशन मारणं पहिले बंद करायला हवं, असं माझं मत आहे बरं का.. कुठला पीरियड.. कुठली लँग्वेज.. आज कशाला हे? अं.. पहिले याच्याबाहेर पडायला पायजेले, असं माझं स्पष्ट मत आणि अ‍ॅडव्हाईसही..’’

समोरून अजून एका उडलपगडय़ा मताची पिंक टाकली गेली. चौबे भाभी फोन खाली ठेवून तस्त शोधायला निघाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2020 1:09 am

Web Title: chaube bhabhi and media wwa helpline dd70
Next Stories
1 अपयशाला भिडताना : नेहमीचे यशस्वी
2 निरामय घरटं : निंदा निभावताना..
3 पडसाद: शिक्षकांप्रति कृतज्ञता
Just Now!
X