सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
ज्या वेळी मुलांचा अभ्यास चालू असतो त्या वेळेस रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे चालू असतो. अशा वेळी पालक किंवा शिक्षक मुलांना रागावले, ओरडले तर मुलांचा रक्तपुरवठा खाली घसरून भावनिक मेंदूकडे होतो. कारण मोठय़ांच्या मनात रागाची भावना असते, तर मुलांच्या मनात भीतीची. अशा वेळी मुलांना प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार नाही. यात बौद्धिक मेंदूचं नुकसान होतं. यासाठीच मुलांनी सकारात्मक भावना असताना- आनंद, उत्साह असताना अभ्यासाला बसावं.
हिला प्रश्न : दुसऱ्यावर प्रेम करण्यासाठी नक्की कशाची गरज असते?
दुसरा प्रश्न : संकटाच्या वेळी आपण स्वत:चं अस्तित्व वाचवायचा कसोशीने प्रयत्न का करतो?
तिसरा प्रश्न : मुलं अभ्यास करत असताना त्यांना शिक्षा का करू नये? आनंददायी शिक्षण म्हणजे नक्की काय?
अशा तीन वेगवेगळ्या वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला एकाच सिद्धांतात सापडतात. आपण आयुष्यभर करत असलेली कामं, आपल्या मेंदूत निर्माण होणाऱ्या भावना आणि आपल्याकडे असणाऱ्या बौद्धिक क्षमता – यांचा संबंध.
माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे, हे खरं. पण भावनांचं नेमकं स्थान काय? जगातलं पहिलं प्रेम कधी आणि कोणामध्ये निर्माण झालं, या प्रश्नाचं उत्तर माणसाच्या बाजूनं नाही. जगात प्रेमाची भावना निर्माण झाल्यानंतर हजारो वर्षांनंतर माणूस जन्माला आला. माणसाच्या मनात प्रेमाची भावना असते. पण त्याची उत्पत्ती मात्र मनात झालेली नाही.
मूळ  मेंदूची मुख्य कामं
आपल्या मनात ज्या विविध भावना असतात, त्या भावनांचं मूळ शोधायचं असेल तर थेट सृष्टिविज्ञानाच्या मुळाशी जावं लागतं. पृथ्वीवर पहिला एकपेशीय जीव निर्माण झाला. सरपटणारे प्राणी जन्माला आले. त्या काळातही जीवांना मेंदू होता. हा मेंदू अगदी छोटा होता. मेंदूची कामंही थोडीच होती. त्यातलं मुख्य काम म्हणजे आपला जीव वाचवायचा. तग धरून राहायचं. आपल्यापेक्षा जे मोठे जीव आहेत, ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे, त्यांचापासून लांब राहायचं. समजा, स्वत:ला वाचवताना दुसऱ्यावर हल्ला करावा लागला तर तो करायचा. पण स्वत:ला सांभाळून. हे झालं मेंदूचं पहिलं काम- स्वसंरक्षण.
दुसरं काम म्हणजे प्रजोत्पादन. स्वत:चा वंश वाढवायचा. या सरपटणाऱ्या जीवांनी ही कामं इमानेइतबारे केली. अजूनही हे जीव हीच कामं करताहेत.
आई- बाळाचं प्रेम- पहिलं प्रेम
यातल्याच काही जीवांच्या शरीररचनेमध्ये काळाच्या ओघात बदल झाला. प्राणी उत्क्रांत होत होते. त्यातून सस्तन प्राण्यांची निर्मिती झाली. इथे जगातलं पहिलं प्रेम अस्तित्वात आलं. आई आणि तिचं बाळ- यांच्यामधलं प्रेम. आई पिल्लांना दूध पाजते. तेव्हा ती त्यांना चाटते. मूल आईच्या कुशीत शिरू बघतं. त्याला तिथे सुरक्षितता वाटते. आई पिल्लांचं रक्षण करते. शिकार शोधायला पिल्लांना सोडून गेली तरी पुन्हा थेट पिल्लांकडे येते. एवढंच नाही तर आपलं पिल्लू सक्षम होतंय ना याकडे लक्ष पुरवते. त्यांना विविध गोष्टी शिकवते. पिल्लू मोठं होईपर्यंत काळजी घेते. बाकीचे सरपटणारे जीव आपल्या जीवांना सुरक्षित ठिकाणी जन्माला घालतात. पण पिल्लू जन्माला आल्यावर त्यांची त्यापुढील काही काळ अशी काळजी घेत नाहीत. त्यांची पिल्लं जन्माला आल्यापासूनच स्वतंत्र जगतात.
विचार करणारा तो माणूस
सस्तन प्राण्याचीच एक शाखा म्हणजे एप्स माकडं. या माकडांपासून तयार झालाय मानववंश. एप्सच्या काही टोळ्यांच्या आहारात विशेष प्रथिनयुक्त पदार्थ आले. त्या प्रथिनांमुळे त्या टोळीतल्या माकडांमध्ये बदल झाले आणि एप्सचा माणूस झाला. त्याच्या शरीरात बदल झाला. मेंदूतही खास बदल झाले. दृश्यबदल म्हणजे मेंदूचा आकार मोठा झाला. मेंदूची कामं कितीतरी पटीने वाढली. सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे भाषा विकसित करण्याचं सामथ्र्य निर्माण झालं. विचार प्रगत झाले. विचारांमुळेच माणूस प्रगती करू शकला. विविध शोध त्याने लावले. यातून माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळाच झाला. यापुढची त्याची झेप आपल्याला माहीत आहेच.
डॉ. पॉल मॅक्लिन- टय़ून थेअरी
या मुख्य तीन टप्प्यांवरच्या प्राण्यांच्या फक्त मेंदूचा विचार केला, तर डॉ. पॉल मॅक्लिन नावाच्या शास्त्रज्ञाला असं आढळून आलं की, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मेंदूवर काही स्तर निर्माण झाले. त्यातून सस्तन प्राण्यांचा भावनिक मेंदू तयार झाला.
– तसंच भावनिक मेंदूवर स्तर निर्माण होऊन माणसाचा बौद्धिक मेंदू तयार झाला आहे.
त्यामुळे आपण सरपटणाऱ्या मेंदूची मूळ कामं म्हणजे स्वसंरक्षण आणि प्रजोत्पादन आजही करतो. जगातले सर्व प्राणी ही कामं करतातच. त्यामुळेच एखादं जोरदार, जिवावर बेतू पाहणारं संकट आलं तर त्यातून स्वत:चा जीव कसा वाचवायचा हे प्रथम बघतो. बिरबलाची माकडिणीची गोष्ट प्रसिद्धच आहे. बर्फाळ प्रदेशात सत्तर दिवस कसे काढले, याची सत्यघटनाही आपल्याला माहिती आहे. चेंगराचेंगरी होते, आग लागते तेव्हा इतरांना ढकलून स्वत:ला प्रथम बाहेर काढले जाते. तसंच काही कारणाने स्वत:ला मूल होत नसेल तर वास्तविकता न स्वीकारता सर्व उपलब्ध मार्ग तपासले जातात; ते एवढय़ासाठीच. कारण प्रजोत्पादन हे मूळ कामांपकी एक आहे.
सस्तन प्राण्यांमध्ये काही प्रमाणात भावना दिसतात. या भावना माणसाच्या मेंदूत अधिक विकसित स्वरूपात दिसतात. तसंच भावना व्यक्त करण्याचे विविध मार्ग त्याने शोधून काढले आहेत. अशा पद्धतीने माणसाचा मेंदू हा सर्वात सुसज्ज आहे. तो आजही स्वत:त नवेनवे बदल करतो आहे.
जिथे गरज तिथे रक्ताचा पुरवठा
माणसाच्या मेंदूत अशी त्रिस्तरीय रचना असते, ज्या वेळेस शरीराला स्वसंरक्षणाची गरज असते, तेव्हा एकदम शक्ती वाढते. हातापायात बळ येतं. चपळता येते. मेंदू अशा वेळी दुसरा-तिसरा कसलाही विचार करत नाही. अशा वेळी शरीर बचावासाठी आवश्यक अशा अवयवांकडे वेगाने रक्तपुरवठा करतं.
त्याचप्रमाणे ज्या वेळी आपण आनंदात असतो, उत्साहात असतो किंवा आपल्याला राग आलेला असतो किंवा आपण अतिशय दु:खी, निराश असतो, तेव्हा रक्तपुरवठा हा भावनिक मेंदूकडे होत असतो.
जेव्हा आपण बौद्धिक काम करत असतो- लेखन, वाचन, चित्र काढणे, संगीत ऐकणं, कोणाशी गप्पा मारणं या सर्व क्रिया बौद्धिक मेंदूत चालतात. (जगातला इतर कोणताही प्राणी यात रस घेत नाही. कारण त्यांच्या मेंदूत हे फीड केलेलं नाही.) अशा वेळी रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे होत असतो. शरीराला जशी गरज असेल तिथे रक्तपुरवठा होत असतो.
एखादी महत्त्वाची मीटिंग चालू असताना मध्येच कोणी रागावून बोलायला लागलं तर सगळेच डिस्टर्ब होतात. याचं खरं कारण म्हणजे तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांच्या बौद्धिक मेंदूला रक्तपुरवठा चालू असतो. अचानक भावनांच्या पातळीवर चर्चा उतरते. त्यामुळे रक्तपुरवठादेखील भावनिक मेंदूकडे उतरतो. यालाच डाऊन शििफ्टग म्हणतात.
आपण असाही अनुभव घेतला असेल की सगळी मोठी माणसं बोलत असताना मध्येच एखादं छोटं बाळ आलं, तर सगळ्यांनाच छान वाटतं. मन हलकं होतं. याचंही हेच कारण आहे. फरक इतकाच की, इथे सकारात्मक भावना निर्माण होतात.
डाऊन शिफ्टिंग होऊ नये!
इथेच महत्त्वाच्या आणि तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. आनंददायी अभ्यास म्हणजे नक्की काय? मुलं अभ्यास करत असताना त्यांना का रागावू नये?
ज्या वेळेस अभ्यास चालू असतो त्या वेळेस रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे चालू असतो. अशा वेळी पालक किंवा शिक्षक मुलांना रागावले, ओरडले तर मुलांचा रक्तपुरवठा खाली घसरून भावनिक मेंदूकडे होतो. कारण मोठय़ांच्या मनात रागाची भावना असते, तर मुलांच्या मनात भीतीची. अशा वेळी मुलांना प्रश्नाचं योग्य उत्तर देता येणार नाही, कारण रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडे नाही.
पालक किंवा शिक्षक नुसतं रागावण्यावर थांबले नाहीत, त्यांनी मुलाला मारायला सुरुवात केली तर दोघांचाही रक्तपुरवठा अजून खालच्या दिशेला म्हणजे सरपट मेंदूकडे सुरू होतो.  
पालक-शिक्षक यांसारखे मोठे जीव दुसऱ्या छोटय़ा जीवावर हल्ला चढवत असतात, तर मूल स्वसंरक्षणाच्या पवित्र्यात असतं.
अशा डाऊन शििफ्टगनंतर काहीच सुचत नसतं. कारण रक्तपुरवठा. त्याचा प्रवाह बौद्धिक मेंदूकडे नसतो. अशा वेळी मेंदू दुसऱ्याला मारण्याच्या- स्वत:ला वाचवण्याच्या स्थितीत असतो. यात बौद्धिक मेंदूचं नुकसान होतं. यासाठीच ही वेळ येऊच नये. मुलांनी सकारात्मक भावना असताना- आनंद ,उत्साह असताना अभ्यासाला बसावं. पालक-शिक्षकांनी मुलांचा रक्तपुरवठा बौद्धिक मेंदूकडेच राहील याची पूर्णत: काळजी घ्यावी. चुकून कधी अशी वेळ आलीच तर पारंपरिक पद्धत जे सांगते तसं, मनात एक, दोन, तीन म्हणावं. काही वेळात रक्तपुरवठा सरपट मेंदूकडून भावनिक मेंदूकडे आणि तिथून बौद्धिक मेंदूकडे जाईल. तरच अभ्यासाचं काही सुचेल. अन्यथा नाहीच.
प्रेमात गुंफलेले अनुभव
इथे आनंददायी शिक्षणाचं महत्त्व आहे. केवळ शिक्षणातच नाही. माणसाला प्रत्येक कृतीतच आनंद हवा असतो. दिवसभर कामाच्या, कधी नको त्या माणसांच्या रगाडय़ात, कधी रागावलेला- कातावलेला असतो तेव्हा त्याला आनंद हवा असतो. लहान मुलं तर सदैव आनंदात असतात. स्वत:ला रमवत असतात, स्वत:शी हसत असतात, गाणी गुणगुणतात. मोकळेपणाने नाचतात. स्वत:ला खूश ठेवण्याचा प्रयत्न करतात असतात. कोणी रागावलं, मारलं तर मनात नकारात्मक भावना निर्माण होतात. त्या निर्माण होतच असतात. मात्र त्या दीर्घकाळ रेंगाळू नयेत.
अखेर आपला मेंदू म्हणजे अनेक तऱ्हेचं वायिरग आहे. नकारात्मक भावनांशी जास्त वायिरग जुळलं, म्हणजे मेंदूच्या त्या भागात जास्त न्यूरॉन जुळले तर त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणारच नाही.
त्यापेक्षा न्यूरॉन आनंदाशी जुळावेत. आनंद ही सर्वात श्रेष्ठ अशी सकारात्मक भावना आहे. प्रेम, सुरक्षितता, आत्मीयता, आस्था या सगळ्या त्याच्याच छटा. ही भावना सर्वाधिक गरजेची असते. न्यूरॉन्सचं सर्वात जास्त वायिरग इथे हवं. आनंदी मन आणि स्थिर बुद्धी याचं साहचर्य हे असं आहे; जुनं आदिम काळातलं!

How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Stubborn children
मुलांच्या हट्टीपणाला पालकच जबाबदार? पालकत्व सुसह्य होण्यासाठी ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच!
Marriage Astrology
‘या’ राशींच्या लोकांचे नाते फार काळ टिकत नाही? वैवाहिक आयुष्यात येतात अडचणी