08 March 2021

News Flash

सायक्रोस्कोप : बालपणीचे घाव

आपल्यापैकी प्रत्येकाला लहानाचं मोठं होताना काही ना काही अप्रिय अनुभव आलेले असतात. काही जणांच्या बाबतीत तर हे अनुभव मोठेपणीही मन अस्वस्थ करतात.

बालपणीच्या अप्रिय अनुभवांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय आणि कसा परिणाम होतो याबाबत मानसशास्त्रात अनेक मतप्रवाह आहेत.

डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

आपल्यापैकी प्रत्येकाला लहानाचं मोठं होताना काही ना काही अप्रिय अनुभव आलेले असतात. काही जणांच्या बाबतीत तर हे अनुभव मोठेपणीही मन अस्वस्थ करतात. अप्रिय अनुभव येणं न चुकणारं आहे, पण त्याचे दीर्घकाळ टिकणारे मानसिक परिणाम कमी करता येतील का?

‘‘बालपणीचा काळ सुखाचा, असं म्हणतात. पण माझा अनुभव मात्र वेगळा आहे. माझं बालपण सुखापेक्षा वडिलांच्या धाकात आणि त्यांच्या कडक शिस्तीत गेलं. ते शाळेत मुख्याध्यापक होते. तिथे त्यांचा दरारा होताच, पण मुख्याध्यापकांचा मुलगा म्हणून सवलत दिली असं वाटू नये म्हणून माझ्यावर शिस्तीचा बडगा ते जास्तच उगारायचे. त्यांच्यासमोर मान वर करून बघण्याचीही माझी प्राज्ञा नव्हती. त्यांच्या नजरेतच इतकी जरब होती, की त्यांच्या एका तीव्र कटाक्षानंही मला कापरं भरायचं. गेली अनेक र्वष मी शिक्षण आणि नोकरीनिमित्त दुसऱ्या शहरात राहातो. वडीलही वयापरत्वे मवाळ झाले आहेत. पण त्यांच्या वागण्याचा माझ्या मनावर झालेला परिणाम अजूनही कायम आहे. वरिष्ठ समोर आले की मी अडखळत बोलतो. माझा आत्मविश्वासच हरवतो.’’ अतुल सांगतो.

‘‘शाळेतल्या आठवणी रम्य असतात असं म्हणतात. पण मला मात्र त्या नकोशा वाटतात. याचं कारण गणिताच्या शिक्षिका माझ्या मोठय़ा बहिणीशी माझी सतत तुलना करायच्या. तिचा नेहमी पहिला नंबर यायचा. गणितात तिचा विशेष हातखंडा होता. मी अभ्यासात सर्वसाधारण होते.  त्यामुळे त्या मला नेहमी टोमणे मारायच्या. ‘तू तिची बहीण शोभत नाहीस, तिच्याकडून काहीतरी शिक. पाठोपाठच्या बहिणी, पण एक हुशार आणि एक मठ्ठ कशी?’ असं वर्गात सगळ्यांसमोर म्हणायच्या. सर्वजण मला हसायचे. मला आतल्या आत खूप रडू फुटायचं. पण ना मी ते व्यक्त करू शकायचे, ना कुठे बोलून दाखवू शकायचे. आज त्या शिक्षिका हयात नाहीत. पण त्यांनी जे माझं नुकसान केलंय त्याचे परिणाम आज मी दोन मुलींची आई झालेय तरी भोगतेय. मला स्वत:बद्दल सतत नकारात्मक विचार येतात. माझ्या अशा मन:स्थितीचा मुलींवरही परिणाम होईल या विचारानंही अस्वस्थता येते.’’ अमृता म्हणते.

अतुल आणि अमृतासारखेच आपल्यापकी कित्येकांच्या मनातले बालपणीचे घाव अनेक वर्षांनंतरही भरलेले नसतात. काहींना त्यांच्यासारखं आई-वडिलांच्या धाकदपटशाला किंवा शिक्षकांच्या टोमण्यांना तोंड द्यावं लागलेलं असतं, तर काहींना मित्र-मत्रिणींचे, भावंडांचे, नातेवाईकांचे अथवा शेजाऱ्यापाजाऱ्यांचे कटू अनुभव आलेले असतात. बालवयात मन कोवळं आणि संवेदनशील असल्यामुळे या अनुभवांचे ठसे खोलवर उमटतात आणि ते अनुभव प्रौढ वयातही विसरणं अवघड जातं. अशा वेळी अतुल आणि अमृताप्रमाणे आपल्यालाही वाटतं, की या अनुभवांनी आपल्या व्यक्तिमत्त्वावर खोल, कायमस्वरूपी जखमा केल्या आहेत, की ज्या भरून निघणं अशक्य आहे. मग त्यांच्याप्रमाणे आपणही अस्वस्थ होतो.

बालपणीच्या अप्रिय अनुभवांचा आपल्या व्यक्तिमत्त्वावर काय आणि कसा परिणाम होतो याबाबत मानसशास्त्रात अनेक मतप्रवाह आहेत. अलीकडील मानसशास्त्रज्ञ म्हणतात, की बालवयातल्या कटू अनुभवांचा व्यक्तिमत्त्वावर दुष्परिणाम झाला असला तरी तो अपरिवर्तनीय नसतो. आपलं व्यक्तिमत्त्व प्रवाही असतं. नवीन अनुभवांप्रमाणे ते बदलत जातं. बालपणीच्या अनुभवांशी व्यक्तिमत्त्व गोठवून घेणं म्हणजे मनुष्याच्या कर्तृत्वाचं, विकासाचं अवमूल्यन आहे. अतुल आणि अमृताच्या बाबतीतही असं म्हणता येईल, की त्यांच्या सध्याच्या अस्वस्थतेचं मूळ त्यांच्या अशा समजुतीत आहे, की बालपणीच्या अनुभवांमुळे आपल्यावर जो मानसिक दुष्परिणाम झाला आहे तो कायमस्वरूपी आहे. तो आपल्यावर परिस्थितीनं लादला असून आता त्याच्यात बदल होणं शक्य नाही.त्यांना वाटतंय की बालपणी घडलेल्या घटना इतक्या तीव्र होत्या, की जणू काही त्या परिस्थितीत ते जसे वागले तसं वागण्यावाचून त्यांना पर्यायच नव्हता. जर वस्तुनिष्ठपणे विचार केला तर कळेल, की त्या परिस्थितीतही इतर अनेक पर्याय त्यांच्यापुढे उपलब्ध होते. समजा अतुलच्या जागी इतर मुलं असती, तर त्यांनी कदाचित वेगळे पर्याय निवडले असते. एखाद्यानं वडिलांच्या कडक शिस्तीकडे कानाडोळा केला असता, एखाद्यानं वडिलांची मर्जी संपादन करण्याचे दुसरे मार्ग शोधून काढले असते, तर एखाद्यानं वडिलांच्या शिस्तीला आव्हान देऊन बंडखोरी केली असती. यातल्या प्रत्येकाचा आत्मविश्वास अतुलसारखा खच्ची झालाच असता असं नव्हे. अमृताच्या जागीही समजा इतर मुली असत्या, तर त्या कदाचित अमृतापेक्षा वेगळ्या वागल्या असत्या. एखादीनं अमृताप्रमाणे मनात न  ठेवता आई-वडिलांना सांगितलं असतं, एखादीनं पुढे जाऊन मुख्याध्यापकांकडे तक्रार केली असती, एखादीनं जिद्दीला पेटून बहिणीसारखाच वरचा नंबर काढून दाखवला असता, तर एखादीनं दुसऱ्या एखाद्या कौशल्यात नपुण्य मिळवून स्वत:ची वेगळी ओळख प्रस्थापित केली असती. यातल्या प्रत्येकीनं अमृतासारखी स्वत:बाबत नकारात्मक भावना जोपासली असती असं नव्हे. याचा अर्थ अतुल आणि अमृताने जे प्रतिसाद दिले ते अपरिहार्य नव्हते. ते पर्याय परिस्थितीनं त्यांच्यावर लादले नसून ते त्यांनी निवडले होते. या दोघांनीही हे लक्षात घेतलं, तर स्वत:च्या अस्वस्थतेची जबाबदारी ते स्वत: घेतील. आपली अस्वस्थता ही बालपणीच्या प्रसंगामुळे निर्माण झाली नसून ती वाटून घेण्यात स्वत:चा सहभाग आहे हे ते मान्य करतील आणि अस्वस्थता न वाटून घेण्याचा पर्यायही आहे, याची जाणीव त्यांना होईल.

समजा बालवयात त्यांनी स्वत:ला अस्वस्थ करून घेतलं असेल तरी त्यांचा तो प्रतिसाद म्हणजे त्यांचं अटळ विधीलिखित नव्हे, की जीवनातील पुढील प्रत्येक प्रसंगांत त्यांनी स्वत:ला अस्वस्थ करून घेतलंच पाहिजे. बालपणी दिलेले प्रतिसाद आता बदलणं शक्य नसलं तरी सध्याच्या अस्वस्थतेला बालपणीच्या अनुभवांना जबाबदार धरणं ते नाकारू शकतात. बालपणीचे अनुभव हे जर अतुल आणि अमृताच्या अस्वस्थतेला मुख्यत: जबाबदार असते, तर ते अनुभव संपल्यानंतर अस्वस्थता संपायला हवी होती. पण ते अनुभव संपून अनेक र्वष उलटली तरी त्यांची अस्वस्थता कमी झाली नाही. अतुलचे वडील आता मवाळ झाले आहेत. अमृताच्या गणिताच्या शिक्षिका तर हयातही नाहीत. म्हणजेच ते अनुभव देणाऱ्या व्यक्तींतही बदल घडला आहे आणि तरीही अस्वस्थता टिकून आहे. कारण त्यांची सध्याची अस्वस्थता ही बालपणीच्या घडलेल्या प्रसंगांमुळे आपोआप निर्माण झाली नसून ती टिकवून ठेवण्यास त्यांनी हातभार लावला आहे.

ते बालपणीच्या प्रसंगांची सतत उजळणी करत राहातात.त्यामुळे अस्वस्थकारक भावना त्यांच्या मनात सतत जागत्या राहातात. जेव्हा अतुलच्या समोर वरिष्ठ येतात तेव्हा त्याला त्यांच्या जागी वडील दिसतात आणि मनात जाग्या झालेल्या अस्वस्थतेनं त्याचा आत्मविश्वास खच्ची होतो. अमृतालाही स्वत:बद्दल विचार करताना गणिताच्या शिक्षिकेचे शेरे आठवतात आणि नकारात्मक विचार जागृत होतात. याचा अर्थ प्रत्यक्ष अनुभवापेक्षा त्या अनुभवांच्या वारंवार उजळणीमुळे अतुल आणि अमृता स्वत:ची अस्वस्थता टिकवून ठेवतात. ही अस्वस्थता अटळ नसून ती न टिकवून ठेवण्याचा पर्यायही ते स्वीकारू शकतात. तो त्यांनी स्वीकारला तर सध्याच्या अस्वस्थतेतून ते बाहेर येऊ शकतील.   अर्थ बदलण्याचं स्वातंत्र्य- बालपणीच्या घटनांचा आपण त्या वेळी जो अर्थ लावला, तो बदलण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असतं. वडिलांच्या वागण्यामुळे माझा आत्मविश्वास खच्ची झालाय, असा अर्थ न लावता अतुल असाही अर्थ निवडू शकतो, की उलट तो जास्त कणखर झाला आहे आणि अधिकारी व्यक्ती कितीही कडक असली तरी तो या अनुभवातून गेला असल्यामुळे यशस्वीपणे त्यांना तोंड देऊ शकेल. शिक्षिकांच्या वागण्यामुळे मनात नकारात्मक विचार येतात, असा अर्थ न लावता अमृता असा अर्थ निवडू शकते, की शिक्षकांच्या टोमण्यांमुळे मनावर काय परिणाम होतो याबाबत माझी जागरूकता वाढली आहे आणि माझ्या मुलींना जर अशा प्रसंगांना तोंड द्यावं लागलं, तर त्यांना काय वाटतं ते समजत असल्यामुळे त्यांना मी खंबीर आधार देईन आणि त्यांच्यावर नकारात्मक परिणाम होऊ न देण्याची काळजी घेईन.

उजळणीस पूर्णविराम- अतुल आणि अमृता बालपणीच्या घटनांची केवळ उजळणीच करत नाहीत, तर त्यांचा आपल्या मनावर कसा दुष्परिणाम घडला हे स्वत:ला वारंवार सांगतात. त्यामुळे अस्वस्थता कमी होण्याऐवजी अधिक अस्वस्थ वाटण्यास आणि त्यानुसार कृती करण्यास उत्तेजन दिलं जातं. अस्वस्थता कमी करण्यासाठी या दोघांनीही ते वारंवार करत असलेली बालपणीच्या क्लेशकारक घटनांची उजळणी प्रयत्नपूर्वक थांबवली पाहिजे. ती जशी लावून घेतली तशी ती बदलणंही शक्य आहे, हेही त्यांनी स्वत:ला पटवलं पाहिजे.

माणसांच्या कमतरतांचा स्वीकार- अतुलला वडिलांबद्दल आणि अमृताला गणिताच्या शिक्षिकेबद्दल तीव्र नकारात्मक भावना आहेत. त्यामुळे त्यांच्या फक्त कमतरतांवरच या दोघांचं लक्ष केंद्रित होतं. अतुल वडिलाचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व ‘कडक शिस्त’ या पलूवरून तोलतो आणि अमृता शिक्षिकेचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्यांच्या टोमणे मारण्याच्या स्वभाववैशिष्टय़ावरून तोलते. यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या काही चांगल्या विशेषांकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. तेही विशेष लक्षात घेतले तर त्यांना सरसकट वाईट असं दूषण न देता त्यांच्याकडे सम्यकतेनं पाहतील.

अतुल आणि अमृतानं हे लक्षात घेतलं पाहिजे, की वडील आणि शिक्षिका ज्या प्रकारे त्यांच्याशी वागले ते मुद्दाम सूडबुद्धीनं किंवा जाणीवपूर्वक छळ करावा या हेतूनं वागले नव्हते. तर आपल्या वागण्याचा समोरील व्यक्तीवर मानसिक दुष्परिणाम होत आहे, याबाबत ते अनभिज्ञ होते. उलट आपण असं करून मुलांचं भलं करत आहोत, असं त्यांना वाटत असावं. अतुलच्या वडिलांना वाटत असेल, की अतुलला चांगलं वळण लावण्यासाठी मी असं करतोय किंवा अमृताच्या शिाक्षिकांना वाटत असेल की तिला जर तिच्या उणिवा दाखवून दिल्या तर ती पूर्ण इच्छाशक्ती पणाला लावेल आणि जिद्दीनं अभ्यास करेल. आपल्या वागण्याचा असा दुष्परिणाम होत आहे हे त्यांना कळलं असतं, तर कदाचित ते तसे वागले नसते. ते परिणाम न कळणं ही त्यांची कमतरता होती. या कमतरतांसकट त्यांचा स्वीकार केला तर अतुल आणि अमृताच्या त्यांच्याबद्दलच्या नकारात्मक भावना आणि त्यामुळे येणारी अस्वस्थताही कमी होईल.

अल्बर्ट एलिस हे मानसशास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘आयुष्यात असे क्षण साक्षात्काराचे असतात, की जेव्हा तुम्ही निर्णय घेता की माझ्या समस्यांची जबाबदारी मी स्वत: घेणार आहे. त्याबद्दल इतर माणसं किंवा परिस्थिती यांना दोष देणार नाही. कारण आपल्या भावनांचं नियंत्रण स्वत:कडेच आहे. हा साक्षात्कार तुम्हाला झालेला असतो.’’ अतुल आणि अमृतानं हे लक्षात ठेवलं, तर त्यांनाही हे साक्षात्काराचे क्षण गवसू शकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2020 1:54 am

Web Title: childhood bad incidents memories psychroscope dd70
Next Stories
1 फिटेल अंधाराचे जाळे..
2 अपमानाचं जिणं मागे सारताना..
3 अस्वस्थ वेदनेची शांत अखेर
Just Now!
X