28 February 2021

News Flash

गद्धेपंचविशी : शहाणिवेची पंचविशी!

माझी पंचविशी उलटून नुकतीच पंचवीस र्वष पूर्ण केली मी. त्यामुळे ‘गद्धेपंचविशी, द्वितीय’ असा लेख लिहायला हवाय मी खरं तर.

‘चमत्कार’ या कन्नड चित्रपटात. (यूटय़ूबवरून साभार)

चिन्मयी सुमित – chaturang@expressindia.com

अभिनयात ‘करिअर’ करण्याचं अजिबात स्वप्न नसताना मी अभिनयाच्या क्षेत्रात आले, कामातून काम मिळत, सहज उमलावं तसं उमलत गेलं आणि बरंच काही ‘उमगत’ गेलं. अनेक माणसांकडून शिकत गेले. अभिनय म्हणजे काय?.. त्यात आपण कोण आहोत?.. अशा अनेक प्रश्नांचा विचार मी वयाच्या एकविशीपासून पंचविशीपर्यंतच्या प्रवासात करत होते. या कालखंडानं मला जसं न मागता मिळालेलं ‘सो कॉल्ड’ यश दाखवलं, तसंच आपल्याला आयुष्यात नेमकं  काय हवंय, याचं उत्तरही याच काळानं शोधायला लावलं..

माझी पंचविशी उलटून नुकतीच पंचवीस र्वष पूर्ण केली मी. त्यामुळे ‘गद्धेपंचविशी, द्वितीय’ असा लेख लिहायला हवाय मी खरं तर. मी कुणी विचारवंत नव्हे, स्वत:च्या कीर्तीचा झेंडा अटकेपार पोहोचवणारी कुणी ख्यातनाम कलाकारही नव्हे. या सदरात वाचकांनी आजवर अनेक यशवंत, कीर्तिवंत लोकांचे लेख वाचले असतील, भविष्यातही वाचतीलच, त्यात एक मी..

मला आता इतक्या वर्षांनंतर माझं पंचविसावं वर्ष असं गाळून, वेचून, वेगळं करून समोर ठेवता येणार नाही. तेव्हा थोडी आधीपासून सुरुवात करते. माझं सारं शालेय शिक्षण मराठवाडय़ात झालं. वडील रवींद्र सुर्वे सनदी अधिकारी (आय.ए.एस.) होते. आई

प्रा. डॉ. सुशील सुर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मानसशास्त्र विभागप्रमुख आणि समाजसेविका होती. वडील अधिकारी कमी आणि कवी, कार्यकर्ते अधिक होते. आई नामांतराच्या चळवळीत होती. आंदोलनात ज्या नामांतरवादी कार्यकर्त्यांना अटक झाली त्यात तीही होती. वडिलांचं अधिकारी असणं कधी तिच्या चळवळींच्या आड आलं नाही. तिच्या कामाची दादांना (वडिलांना) मदतच झाली. कुटुंबनियोजनाच्या शासकीय कामात आईनं वस्त्यावस्त्यांमध्ये जाऊन काम केलं. औरंगाबाद, जालना, लातूर अशा निरनिराळ्या ठिकाणच्या वडिलांच्या निवासस्थानी कवी बा. भ. बोरकर, केशव मेश्राम, विंदा करंदीकर, नारायण सुर्वे, वसंत बापट, मंगेश पाडगावकर या सगळ्यांचं; अरुण दाते, रंजना जोगळेकर यांसारख्या प्रसिद्ध गायकांचं आतिथ्य घडायचं. एकुणात काय, तर चांगलं ऐकणाऱ्या, वाचणाऱ्या, पाहाणाऱ्या आणि स्वत:च्या कुटुंबापलीकडे आपल्या मगदुरानुसार, प्रसंगी नेहमीचा रस्ता सोडून अधिक सायास घेऊन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या घरात, कुटुंबात माझं बालपण गेलं.

मला शाळा फार आवडायची नाही. मी घरात रमायचे. घरी कामाला असणारे मदतनीस, स्टाफ क्वार्टरमधली मुलं, पुस्तकं यात रममाण असायचे. मोठी बहीण प्रिया- शिवप्रिया सुर्वे कवयित्री. सुंदर लिहायची. अनेक साहित्य संमेलनं तिनं गाजवली. बालकुमार साहित्य संमेलनाची ती चौदाव्या वर्षी अध्यक्ष होती. घरी येणाऱ्या कवींशी ती ‘चर्चाबिर्चा’ करायची. मी सगळ्यात लुडबुड करायचे, पण आगाऊ नव्हते. ‘चुणचुणीत’ होते. माझा चुणचुणीतपणा काही लोकांच्या नजरेत भरला. त्यात होत्या केशर मेश्राम- औरंगाबाद आकाशवाणीच्या संचालिका. प्रा. डॉ. सुशीला मूल जाधव यांच्या ‘जातक’ कथांवर आधारलेल्या नभोनाटिका सादर करायला मला बोलावलं गेलं आणि माझ्या आयुष्यात नाटय़प्रवेश झाला.

शालेय शिक्षण पूर्ण मराठवाडाभर फिरत फिरत झालं. त्यामुळे निदान महाविद्यालयीन शिक्षण तरी एका ठिकाणी व्हावं म्हणून मी पुण्याला ‘सर परशुराम भाऊ महाविद्यालया’त प्रवेश घेतला. साहित्याची गोडी होती म्हणून वाङ्मय मंडळात प्रवेश घेतला. तिथूनच ‘फिदोरिया करंडक’ विविध गुणदर्शन एकांकिका स्पर्धेसाठी निवडले गेले. या एकांकिकेत मला दरबार नर्तिकेची भूमिका करायची होती. मी उंच होते, शेलाटी होते, त्यामुळे निवड झाली असावी. आम्ही सारेच चळवळे होतो. बैठकीची लावणी करायची तर ती ‘ऑथेंटिक’च. त्यामुळे ‘आर्यभूषण थिएटर’ला जाऊन शकुंतलाबाईंकडे (लावणीनर्तिका शकु ंतलाबाई भूमकर) मी लावणी शिकले. त्यांनी जीव लावून शिकवलं, मी जीव ओतून शिकले. त्यांना इतका लळा लागला आम्हा विद्यार्थ्यांचा, की त्यांनी मला स्वत:चा ठेवणीतला शालू, दागिने एकांकिकेच्या दिवशी घालायला दिले. स्वत:च्या हाताने माझा मेकअप केला. शकुबाईंना किंवा कुणालाच ‘मालकांशिवाय’ बाहेर जायची मुभा नव्हती; पण राजेश देशमुख आणि माधव अभ्यंकर या दोघांनी ती मिळवली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ही गोष्ट साधणं सोपं नव्हतं. शकुताई आल्या. माझ्या ‘एंट्री’ला झालेला टाळ्याशिट्टय़ांचा गजर त्यांनी अनुभवला. गोष्ट छोटीशी आहे, पण चाकोरीबाहेरचं काही करू शकलो हा आनंद मोठा होता. त्या दिवशी दिसले तितकी सुंदर मी नंतर कधीच दिसले नाही!

दुसऱ्या वर्षी प्रा. विजय कारेकर लिखित ‘उंदिरराव आणि नटी’ या पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतल्या एकांकिकेसाठी ‘नटी’ या भूमिकेत मी निवडली गेले. त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक मला मिळालं. अंतिम फेरीला परीक्षक म्हणून नाटककार राजीव नाईक आणि  समीक्षक पुष्पा भावे होते. माझ्यापरोक्ष त्यांनी माझं खूप कौतुक केलं. पुण्यातच नाही, तर मुंबईच्या नाटय़वर्तुळातही ते पोहोचलं. पुण्याच्या चोखंदळ रसिकांनी, सहरंगकर्मीनी कौतुक केलं, अपार प्रेम दिलं. आपण आपल्याला आवडतंय म्हणून, चैतन्यपूर्ण वाटतंय म्हणून जे करतोय ते लोकांनाही आवडलं आहे, जाणकारांनी वाखाणलं आहे, हे बघून आपण या क्षेत्रात करिअर करायला हरकत नाही, असा अस्पष्टसा विचार मनात येऊन गेला, पहिल्यांदाच.

सारं फारच छान चाललं होतं आणि अचानक एक दिवस मला तीव्र तापानं ग्रासलं. १०३- १०४ पर्यंत ताप, अंगभर पुरळ, उलटय़ा. मी वसतिगृहात राहात होते. माझी मामेबहीण माधवी घैसास माझी स्थानिक पालक. तीही हवालदिल झाली. दरम्यानच्या काळात दादांची बदली मुंबईला झाली होती. ते मला त्यांच्याकडे घेऊन गेले. आई रजा घेऊन आली. डॉक्टरांनी निदान केलं- ‘गोवर’. २० पूर्ण झाली होती. तेव्हा चक्क ‘गोवर’. हा आजार जितका उशिरा होतो तितका त्याचा जोर जास्त असतो म्हणतात. पोटात पाणी ठरत नव्हतं, प्रचंड अशक्तपणा. उभी राहताना इंग्रजी सातच्या आकडय़ासारखी उभी राहायचे, तेही आधारानं. गोवर ‘गो-वर’च म्हणतोय की काय असं वाटू लागलं होतं. सहामाही परीक्षा बुडालीच होती. त्या वर्षी ‘ड्रॉप’च घ्यायचा असं ठरवलं. खूप हताश झाले होते. त्याच वेळी चंद्रकांत कुलकर्णीचा फोन आला आईला. ‘‘चिनू कुठे आहे? मी

‘चंद्रलेखा’चं नवीन नाटक करतोय. चिन्मयीला करायला आवडेल का?’’ आईनं त्याला माझी परिस्थिती सांगितली. तो आणि (The) मोहन वाघ घरी भेटायला आले. ‘‘तब्येतीची काळजी घे. आपल्याला नाटक करायचं आहे,’’ असं म्हणाले. म्हणजे मी ‘पास’ झाले होते. जरा हुशारी, तरतरी वाटली आणि काही काळानं तालमीत रुजू  झाले. जिचं अजून अभिनेत्री म्हणून कारकीर्द घडवायचं स्वप्नही पुरेसं स्पष्ट नाही अशा मुलीला साक्षात ‘चंद्रलेखा’चं नाटक मिळणं, तेही चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित, अभिनेत्यांत प्रभाकर पणशीकरांसारखे दिग्गज, सुमीत राघवनसारखा उमदा ‘स्टार’ नायक, म्हणून ही पर्वणी होती.

मी अक्षरश: हरखले होते, पण तशीच धास्तावलेही होते. कॉलेजच्या एकांकिकेत चमकदार काम करणं निराळं आणि इथे सातत्यपूर्ण तेजानिशी उभं राहाणं वेगळं. आपल्यावर थोरामोठय़ांनी टाकलेल्या विश्वासाला सार्थ करणं हे आपल्याच हाती आहे हे जाणवलं आणि कामाला लागले. पडत-धडपडत, बोलणी खात, रडत शिकत राहिले. ‘ज्वालामुखी’चा पहिला प्रयोग झाला. साऱ्यांनी खूप कौतुक केलं. समीक्षकांनीही हात आखडता न घेता वारेमाप कौतुक केलं. सहकलाकारांनी, प्रशिक्षकांनी, ज्येष्ठ कलाकारांनी आपलं म्हटलं. भरून पावले.

याच दरम्यान एक ज्येष्ठ कलाकार मला भेटले, म्हणाले, ‘‘आपल्या लोकांनी तुझा सत्कार करायचा ठरवला आहे. तू फार गुणी नटी आहेस.’’ हा माझा पहिला सत्कार असणार होता. मी आनंदले, पण नंतर त्यांच्या लक्षात आलं, माझं आडनाव जे त्यांना ‘त्यांच्यातलं’ वाटत होतं, तसं नव्हतं. त्यामुळे तो सत्कार बारगळला. यानिमित्तानं कलाप्रांतातही ‘आपले-तुपले’, ‘अमुक ज्ञाती-तमुक समाज’ हे वर्गीकरण आहे, हे कळलं आणि सखेद आश्चर्य वाटलं. कालांतरानं या वर्गीकरणात न पडणारा, स्वत:चं फक्त कलावंत आणि माणूसपण जपणारा एकेक स्नेही भेटत गेला. आज हा वर्गच अधिक मोठा आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. मी ठरवून या क्षेत्रात न आल्यामुळे एकदाही ‘फोटो सेशन’ करणं, लोकांना फोटो पाठवणं, कामासाठी ‘सोशलाइज’ करणं, ओळखी वाढवणं, असं काहीच के लं नाही. कामातून काम मिळत, सहज उमलावं तसं उमलतही गेलं आणि ‘उमगत’ही गेलं. विजय केंकरे, विजय जोशी, चंद्रकांत कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर यांसारखे उत्तम दिग्दर्शक, तर मोहन वाघ, सुधीर भट, गोपाल अलगेरी, लता नार्वेकर आणि प्रभाकर पणशीकरांसारखे मातब्बर निर्मातेही लाभले.

२१ व्या वर्षी अपघातानंच रंगभूमीवर आलेली मी २३ व्या वर्षांपर्यंत स्थिरावले होते. तीन व्यावसायिक नाटकं, एक मालिका, दोन मराठी चित्रपट, एक कन्नड चित्रपट एवढं केलं गेलं होतं; पण हा प्रवास म्हणजे नदीच्या प्रवाहात पडलेल्या पानागत होता. त्यात माझं काहीच नव्हतं. तशात एक दिवस वामन केंद्रे यांचा फोन आला. ‘‘‘एन.सी.पी.ए.’कडून (नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिग आर्ट्स) ‘काळा वजीर, पांढरा राजा’ नाटक करतोय. काम करणार का?’’ ‘करणार का?’.. हा माझ्यासाठी प्रश्नच नव्हता. मी मूच्र्छा येऊन पडायचे बाकी होते. तालमीला गेले तर समोर अमोल पालेकर. मूच्र्छा क्रमांक २. किशोर कदमसारखा कसलेला नट, राहुल सोलापूरकरचं भारदस्त व्यक्तिमत्त्व. नंतर रजनी वेलणकर ही ज्येष्ठ कलाकार आई म्हणून आली आणि आईच झाली. या नाटकानं मला माझ्या छोटय़ा परिघातून बाहेर काढलं. नुसत्या स्वत:च्या थोडय़ा आकर्षक असलेल्या व्यक्तिमत्त्वावर जे काम मी तोलून धरत होते, ते इथे करता येणारं नव्हतं. लख्ख आरसा धरला माझ्यासमोर या नाटकानं. स्वत:तलं न्यून, साऱ्या कमतरता दिसल्या अचानक. घाबरलेच खरं तर, पण वामन भैया, अमोल पालेकर आणि सगळ्यात महत्त्वाचे अशोक रानडे, यांनी त्या कमतरता ओळखून मात करायला शिकवली.

तालमीदरम्यान मी किशोरचं ‘सायकलवाला’ नाटक पाहिलं आणि स्तिमित झाले. स्वत:चं व्यक्तिमत्त्व तोडूनमोडून काय उभं करतात ही माणसं.. हा अभिनय आहे.. आपण कोण आहोत?.. काय आहोत यांच्यासमोर?.. ‘प्रायोगिक रंगभूमी’ची पायरी आयुष्यात मुकली होती; पण ‘काळा वजीर’नं मला माझी बलस्थानंही ओळखायला शिकवलं, खरी दृष्टी दिली.

दरम्यान एकदा राहुल रानडेनं, रवींद्र मंकणी एक जाहिरात करताहेत, त्यांना साडीतले फोटो पाठव, असं सांगितलं. माझ्याकडे ते नव्हतेच. मग पुण्यातच ‘फेमस’  मोहन रानडेकडे फोटोशूट करायचं ठरलं. आईच्या एकूण एक साडय़ा खादी किंवा हातमागाच्या. ‘सिल्क’सुद्धा खादीच, त्यामुळे त्या निरुपयोगी. मग आईची मानसकन्या नीता ओहरी धावली मदतीला आणि झुळझुळीत साडय़ांची जुळवाजुळव झाली एकदाची. भरपूर मेकअप करून, भरपूर साडय़ा बदलून मी भरपूर फोटो काढले आणि दमून गेले. इतकी दमले की अ‍ॅड एजन्सीला फोटो दिलेच नाहीत! तर हा माझा उत्साह.

चोविसाव्या वर्षी प्रभाकर पणशीकरांनी (बाबांनी) ‘फक्त एकच कारण’ या नाटकासाठी विचारलं. लेखक वसंत कानेटकर, ‘नाटय़संपदे’चं नाटक. लगेच हो म्हणाले. नायकाच्या भूमिकेत सुमीत होता. तीन वर्षांच्या अज्ञातवासातून निघून तो पुनरागमन करत होता. आकर्षक आधीही होताच, आता प्रगल्भही झाला होता. आधीच्या नाटकात फक्त ओळख झाली होती, आता मात्र घट्ट मैत्री झाली. ती आजतागायत जपली आहे. मी सुमीतला बघून अचंबित झाले होते. इतका देखणा, उमदा नट, कळत्या वयापासून ‘अभिनेता’ होण्याचं स्वप्न उरी बाळगलेला, त्यासाठी आवश्यक ते सारं प्रशिक्षण परिश्रमानं आणि आस्थेनं पूर्ण केलेला; पण संधी मिळाली म्हणून हिंदी चित्रपट करायला गेला, तो रखडला आणि चालणारं नाटक सोडलं म्हणून निर्मातेही नाराज. कुणीच विचारत नव्हतं. हे किती हताश करणारं होतं. फक्त आई, वडील, भाऊ यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे तो तरून गेला. एखादा निराशेच्या खोल गर्तेत अडकला असता. हे पाहिलं आणि जाणवलं, अभिनेत्यासाठी हे क्षेत्र बेभरवशाचं आहे. मी न ठरवता इथे आले आणि हे ‘सो कॉल्ड’ यश मिळवलं आणि ध्यास घेतलेला माणूस संधीची आसुसून वाट पाहात राहिला. थोडंसं अपराधीच वाटलं मला. याच काळात मी पंचविशी गाठली होती अन् सुमीतच्या प्रेमात पडले होते.

एक ‘फोटोशूट’ करावं का, म्हणून गौतम राजाध्यक्षांनाच जाऊन भेटले चक्क. त्यांनी खूप गप्पा मारल्या. आवडतं शास्त्रीय संगीत, गायक, साहित्य, पदार्थ, किती तरी गप्पा. गप्पांच्या शेवटी म्हणाले, ‘‘मस्त करू आपण फोटोशूट. तुझ्या व्यक्तिमत्त्वात थोडा संकोच आहे. वाकडे दात लपवत बोलतेस. ते किती सुंदर आहेत ते दाखवायचं आहे मला, तुला. तुझी किती इच्छा आहे ते मला माहीत नाही, पण माझ्यासाठी तू हे शूट कर.’’ तेव्हा त्यांची फी जबरदस्त होती. मी विचारली, तर म्हणाले, ‘‘तुला द्यायचे तितके दे.’’ मी संकोचले. इतकी, की पुन्हा गेलेच नाही! आता वाईट वाटतं. पुढे अनेक वर्षांनी त्यांना मी हे सारं सांगितलं तेव्हा हलकं वाटलं, पण मी माझा वाकडा दात लपवणं तेव्हापासून सोडून दिलं.

याच वाकडय़ातिकडय़ा दातांमुळे आणि सावळेपणामुळे राजदत्तांनी मला ‘झंझावात’ या चित्रपटासाठी विचारलं. शं. ना. नवऱ्यांनी माझं नाव सुचवलं होतं. दत्ताकाकांकडे मोठी यादी होती, पण या ‘गुणां’मुळे मी बाजी मारली. इतका मोठा दिग्दर्शक, पण तितकाच साधा माणूस, आडनावाप्रमाणे ‘मायाळू’. ‘अ‍ॅक्शन’ म्हणण्याऐवजी ‘चला’ म्हणायचे, तेही मृदू. त्यांनी चित्रपटाची सगळी अंगं दाखवली. अगदी ‘आर्ट डिपार्टमेंट’पासून ते कपडेपटापर्यंतचं काम दाखवलं, शिकवलं, करायलाही लावलं. फार शिकवलं मला त्यांनी.

आता मी स्वत:ला प्रश्न विचारू लागले होते, मला नेमकं काय हवंय?.. अमुक एक भूमिका करायचीच आहे.. हिंदी चित्रपट करायचाच आहे.. जाहिरातीत झळकायचंय.. बाजारात जाऊन चाहत्यांचा घेराव घालून घ्यायचाय.. कलाप्रांतात काही तरी भव्यदिव्य करायचं आहे.. लोकांच्या सतत नजरेत आणि स्मरणात राहायचं आहे.. यातलं काहीच मला नको होतं. मिळालेलं काम पूर्ण निष्ठेनं, आस्थेनं, प्रामाणिकपणे आणि अतीव प्रेमानं करत होते, पण ते मिळवण्यासाठी करावी लागणारी उरस्फोड मला साधण्यासारखी नव्हती. याच काळात दादांची बदली पुण्याला झाली. त्यांच्या मानसपुत्राची, डॉ. नितीन करीरची मुंबईत. त्यानं वडिलांची शासकीय सदनिकाच स्वत:साठी कायम राखली. मी, तो, त्यांचे ज्येष्ठ अधिकारी स्नेही शिवाजीराव देशमुख आणि आमचा पत्रकार मित्र शाजी विक्रमन् असे आम्ही चौघे एकत्र राहू लागलो. घराची व्यवस्था मी बघत असे. त्यामुळे ‘आटे दाल का भाव’ कळू लागला होता. संसाराचे वेध लागले होते. हे तिन्ही ‘रुमीज्’ विविध विषयांवर चर्चा करत. तिघेही शिक्षण, राजकारण, समाजकारण, अर्थव्यवस्था याचे जाणकार. कलाप्रांत सोडून जगाचा कानोसा मला घेता येऊ लागला होता.

त्याचवेळी मी हिंदी मालिका करत होते, पण त्यात कसलाच कस लागत नव्हता. कालांतरानं आपल्याला आपल्याच कामांच्या ‘कॉपीज्’ काढत बसावं लागणार असं वाटू लागलं. साचेबद्ध काम ‘सर्वथा नावडू’ लागलं. आपण योगायोगानं किंवा ओघाओघानं इथे आलो, रुळलो, स्थिरावलो. मनात अपार कृतज्ञता होती, पण ‘बेमन से’ हा सुंदर प्रवास ढकलायचा नव्हता. म्हणून मग पंचविसाव्या वर्षी लग्न करायचा निर्णय घेतला आणि सव्विसाव्या वर्षी लग्न केलं. एकविसाव्या वर्षी सुरू केलेल्या, खरं तर सुरू झालेल्या प्रवासाचं मला पंचविसाव्याच वर्षी सिंहावलोकन करावंसं वाटलं. त्या पंचविसाव्या वर्षांला गद्धेपंचविशी न म्हणता ‘शहाणिवेची पंचविशी’ म्हणावंसं वाटतंय आता.

कुणाचंही प्रेमप्रकरण आढळलं की लग्न करून ‘मोकळे व्हा’, असा एक सल्ला दिला जातो. तो फार गंमतशीर आहे. ‘मोकळं’ न होता ही एक निराळी गुंतवणूक असते. नवी नाती, नवा संसार यांत. जेव्हा लग्न झालं तेव्हा मी गुजराती नाटकात काम करत होते. महिन्याला ३० प्रयोग, चांगली ‘नाइट’. ‘चार दिवस प्रेमाचे’चं गुजराती रूपडं. सासूबाईंनी त्यांना गुजराती लिहितावाचता येत असल्यानं अख्खं स्क्रिप्ट देवनागरीत लिहून दिलं मला. पूर्ण कुटुंबाचा नुसता पाठिंबा नाही, तर सहभागही माझ्या कामात होता आणि तोही सहर्ष. पण लग्नानंतर पाचव्याच महिन्यात दिवस गेले आणि मी काही काळ रजा घेतली. सुमीत येईल ते काम करत होता. त्यामुळे मला मुलाला वाढताना बघण्याची ‘चैन’ अनुभवता आली.

नाटकं बघत, वाचत राहिले. इतरांच्या पहिल्या प्रयोगाला जाऊन त्यात काम करणाऱ्या मैत्रिणीच्या साडीला पिन जरी लावली तरी मला त्यात काम केल्यासारखं वाटे! इतरांचं खूप काम बघितलं. कौतुक करायला याच दिवसांत शिकले. नीरद तीन वर्षांचा असताना ‘एकदा पहावं करून’ हे नाटक मी दुसऱ्यांदा केलं. लग्नाआधी वयाच्या २२ व्या वर्षी केलेलं नाटक आई झाल्यावर दुसऱ्यांदा केलं. एक वेगळा आत्मविश्वास जाणवला, निराळा विचार करता आला. मग दीया हे दुसरं अपत्य घरात आलं. पुन्हा विराम घेतला. आता नीरदच्या शाळेचं माध्यम ठरवणं, त्याचं शिक्षण याची जबाबदारी होती. त्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं. या शाळांत नीरद-दीयाबरोबरच इतर मुलांचाही लोभ जडला. मराठी शाळांसाठी काही करणं, मुलं आणि त्यांचे सवंगडी यांच्यासमवेत वेळ घालवण्यात रमले. मुलाची मुंज करायची नाही, त्याला मराठी माध्यमात घालायचं हे निर्णय आप्तांना थोडे क्रांतिकारी वाटत होते. पण भांडूनतंटून नाही पण स्वत:च्या विवेकावर ठाम राहून, बोलून, चर्चा करून ते सामोपचारानं समजावले. त्यातही साऱ्यांनी मन:पूर्वक साथ दिली. विचार, उक्ती आणि कृती यात मेळ असला पाहिजे हे मुलं वाढवतानाचं सूत्र जे २५ ते ३० र्वष या वयात उमगलं ते जीवनाचं सारसूत्र झालं.

अजूनही मी तशीच आहे. आलेलं काम पूर्ण निष्ठा, अभिनयाच्या क्षेत्रात जे थोडंफार योगदान देऊ शकले तसंच समाजहितासाठी हातून घडावं यासाठी प्रयत्नशील आहे. पुढेमागे कुणी पुन्हा आढावा घ्यायला सांगितला गत आयुष्याचा, तर नमूद करण्यासारखं काही तरी चांगलं, विधायक हातून घडावं, हीच एक इच्छा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2021 1:06 am

Web Title: chinmayee sumeet gaddhepanchvishi dd70
Next Stories
1 पडसाद : ज्येष्ठांचे लिव्ह इन- प्रमाण वाढावे
2 दशकथा २०१०-२०२० : दशकाचा सामाजिक लेखाजोखा
3 ज्येष्ठांचे लिव्ह इन : उत्तरायणाचे गहिरे रंग
Just Now!
X