28 January 2020

News Flash

मनातलं कागदावर : नावात काय काय असतं ना?

ज्यांनी हे नाव प्रथमच ऐकलेलं असे त्यांची लिखाणात हमखास चूक होई. ते चितकला, चित्तकला, चित्रकला असं काहीही लिहीत..

(संग्रहित छायाचित्र)

चित्कला कुलकर्णी

मी कधी कुणाला नाव सांगितलं, की बऱ्याचदा ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटे आणि पुन्हा तो नाव विचारत असे. साधारण दोन-तीन वेळा माझं सांगून झालं, की ती व्यक्ती माझ्याकडे डोळे मोठे करून पाही आणि नंतर लिहिण्याचा प्रयत्न करत असे. ज्यांनी हे नाव प्रथमच ऐकलेलं असे त्यांची लिखाणात हमखास चूक होई. ते चितकला, चित्तकला, चित्रकला असं काहीही लिहीत..

एकदा मी ड्रायिव्हग लायसन्स काढण्यासाठी आर. टी. ओ. कार्यालयात गेले होते. अधिकाऱ्याच्या हातात कागदपत्रे दिली. कागदपत्रे चाळत चाळतच एकेक प्रश्न विचारण्यास त्यांनी सुरुवात केली. ‘‘नाव काय तुमचं?’’

‘‘चित्कला..’’ मी थोडं घाबरतच उत्तर दिलं. कारण नाव सांगण्याचा माझा अनुभव काही बरा नव्हता.

‘‘काय म्हणालात?’’ त्यांनी पुन्हा विचारलं. मी पुन्हा माझं नाव सांगितलं. दोनदोनदा सांगूनसुद्धा माझं नाव त्यांच्या लक्षात येईना.

शेवटी ते वैतागून माझ्यावर ओरडून म्हणाले, ‘‘असलं कसलं अवघड नाव ठेवून घेतलंत?’’

मी म्हटलं, ‘‘अहो, मी कशी ठेवून घेणार? मला काय कळत होतं तेव्हा?’’

‘‘मग? कुणी ठेवलं? कळत नव्हतं?’’ त्यांनी आणखीनच वैतागून विचारलं.

मी म्हटलं, ‘‘माझ्या पणजोबांनी ठेवलं. माझं बारसं झालं तेव्हा मी फक्त बारा दिवसांची होते. कसं कळेल मला? आणि आता त्यांना विचारायचं म्हणजे मला स्वर्गात जायला हवं.’’

‘‘मग, लग्न ठरल्यावर तर कळत होतं ना? नाव बदलायला नवऱ्याला तरी सांगायचं होतं..’’

मीही वैतागून म्हणाले, ‘‘सरळ सांगा की, माझं नाव तुम्हाला लिहिता येत नाही म्हणून.. आणा तो कागद, लिहून देते माझं नाव.’’ तो थोडा वरमून म्हणाला, ‘‘बरं बरं .. ठीक आहे, स्पेलिंग सांगा.’’

मी म्हटलं, ‘‘स्पेलिंग कशाला? इंग्रजीत ‘त’ नाही, ‘ट’ आहे फक्त.

‘‘म्हणजे? चिटकला? असलं नाव?’’ आता तो मिष्किल हसत म्हणाला. मी मात्र जाम वैतागले होते. शेवटी त्यांना लिहून दिलं.

असंच एकदा एका विमा एजंटनं तर मला चीत केलं. घडलं असं, फॉर्म भरताना त्यानं लिहिलं चित्रकला. नेहमीप्रमाणं वाद झाले. सांगितल्यावर त्यांनी त्या शब्दातला ‘आर’ खोडला. चीतकला केलं. मी म्हटलं, ‘‘महाशय, सी एच आय टी ए नसून सी एच आय टि के एल ए असं लिहा. नाहीतर मी सांगते तसं मराठीत लिहा.’’ यावर ते म्हणतात कसे, ‘‘ए असलं तर तुम्हाला काय फरक पडतो? असू दे आता चीतकला.’’ खरोखरच त्याच्या बोलण्याने मी चीत झाले.

आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की मी कधी कुणाला नाव सांगितलं, की बऱ्याचदा ऐकणाऱ्याच्या चेहऱ्यावर प्रश्न उमटे आणि पुन्हा तो नाव विचारत असे. साधारण दोन-तीन वेळा माझं सांगून झालं, की ती व्यक्ती माझ्याकडे डोळे मोठे करून पाही आणि नंतर लिहिण्याचा प्रयत्न करत असे. ज्यांनी हे नाव प्रथमच ऐकलेलं असे त्यांची लिखाणात हमखास चूक होई. ते चितकला, चित्तकला, चित्रकला असं काहीही लिहीत. एकदा तर मज्जाच झाली. मला एके ठिकाणी प्रमुख वक्त्या म्हणून बोलावले होते. श्रोत्यांसमोर उभी राहून एक व्यक्ती माझी ओळख करून देऊ लागली. ‘‘आज आपल्याला चित्तकलाबाई प्रमुख पाहुण्या म्हणून लाभल्या आहेत.’’

मी घाईघाईने म्हटलं, ‘‘सर, ‘चित्तकला’ नव्हे; चित्कला.’’

ते म्हणाले, ‘‘तेच ते. मी पण तेच म्हणतोय. मंडळी, या चित्तकलाबाई आज आपल्यापुढे आपल्या चित्तातल्या कला दाखवणार आहेत. मी अधिक वेळ न घेता त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या चित्तातल्या कला सादर कराव्यात.’’ या त्यांच्या वाक्यावर लोकांच्या जोरदार टाळ्या पडल्या. मला क्षणभर असं वाटलं मी एखाद्या सर्कसमध्ये काम करणारी कुणी आहे. मी श्रोत्यांपुढे उभी राहिले अन् म्हणाले, ‘‘माझ्या चित्तात कला वगैरे काही नाही. मी तुमच्यातलीच एक आहे.’’ त्यानंतर माझं नाव आणि त्याचा अर्थ सांगितला. मगच माझ्या भाषणाच्या विषयाकडे वळले.

लहानपणापासून ते आजतागायत या नावाने मला विविध अनुभव दिले. ज्यांना या शब्दाचा अर्थ माहीत असे, त्यांना ते आवडे. नाव वेगळं आणि छान आहे म्हणून कौतुकसुद्धा होई. कुणी कुणी तर ‘‘त्या हो त्या.. अवघड नावाच्या बाई..’’ अशीही माझी ओळख ठेवत. एकदा माझ्या ‘चित्कला’ या नावावरून एक व्यक्ती मला म्हणाली होती, ‘‘अहो, पणजोबांनी तुमचं नाव ठेवलं आहे असं सांगताय, त्यांना माहीत नसेल खरा शब्द. जुनी माणसं ती. त्यांना काय माहीत असणार? मी सांगतो, मूळ शब्द चित्रकलाच आहे. तुम्ही तुमचं नाव बदलून घ्याच.’’ आता अशा माणसापुढे मी पामर काय बोलणार? या सगळ्याच प्रकारामुळे मला खूप हसू येई. खरंतर, नाव कुणा व्यक्तीचं, वस्तूचं, पदार्थाचं वा कशाचंही असो, ती एक त्याला ओळखण्याची साधी खूण आहे. विचार केला तर, यापलीकडे काही नाही. माणूस ओळखला जातो तो त्याच्या कर्तृत्वामुळे. नाव तुकडोजी असलं तरी ग्रामोद्योगांनी खेडे जोडण्याचं आणि स्वयंपूर्ण करण्याचं महान कार्य तुकडोजी महाराजांनी केलं. एखाद्या दगडूचा दगडूशेठ होऊन बुद्धिदात्याची प्राणप्रतिष्ठाही करतो आणि ते लोकांचं श्रद्धास्थान होतं. नाहीतर, नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा असंही घडत असतं म्हणा.

आपण सकाळी उठल्याबरोबर परमेश्वराचं, वंदनीय विभूतींचं नाम जपत असतो. त्यांचं स्मरण करतो. का? तर त्यांनी दाखवलेला मार्ग लाभावा, त्यांच्यात आणि आपल्यात अद्वैत निर्माण व्हावं म्हणूनच ना? अंघोळ करताना नद्यांची नाव घेतो. का? तर, शरीराबरोबरच मनही पवित्र व्हावं म्हणूनच ना? त्या नावांना विशेष महत्त्व आहे, त्यामागे त्यांचं कार्य आहे. म्हणजे, कार्य महत्त्वाचं, नाव नंतर. ती एक गौण बाब आहे. पण, आपल्याला नावाचाच जास्त अभिमान. नुसताच अभिमान नाही तर काही वेळा दुराभिमानही. हो नं? काही वेळा, ‘‘माझं नाव घ्यायचं नाही हा, सांगून ठेवतो..’’ अशी धमकी दिली जाते तर काही वेळा ‘‘अमुक गोष्ट केली नाही तर नाव सांगणार नाही /लावणार नाही..’’ अशीही आत्मप्रौढी मिरवली जाते. पण आत्मभान? ते कुठं असतं? आपल्या आईवडिलांनी काही सदिच्छा मनाशी बाळगून, थाटामाटात बारसं करून आपल्या बाळाचं नाव ठेवलेलं असतं. जेव्हा समज येते तेव्हा तरी त्या नावाचा विचार मनाशी व्हायला हवा आणि त्या नावांमुळे आत्मभान यायला हवं. आपण डोळस व्हायला हवं.

अलीकडे, एक किंवा दोनच मुलं. त्यामुळं आपल्या बाळासाठी खास नावं शोधून काढून ठेवली जातात. काही आईवडील आपल्या नावाची आद्याक्षरं घेऊन नवं नाव तयार करतात आणि बाळाला त्या नावानं बोलावतात. प्रेमविवाह केलेल्या एका जोडीनं आपल्या प्रेमाची साक्षीदार म्हणून आपल्या मुलीचं नाव ‘लव्हप्रीत’ ठेवल्याचं सांगितलं. पूर्वी पारधी समाजातील लोकांना तर जे काही मोठं, विशेष वाटेल ते नाव आपल्या मुलांना देऊन मोकळे व्हायचे. इंजिन्या, जवान्या, डागदऱ्या, कलेक्टऱ्या, बंदुक्या अशी कित्येक भन्नाट नावं त्यांनी आपल्या मुलांची ठेवली. पूर्वी मूल जगत नसलं की दगडय़ा, धोंडय़ा, कचऱ्या, उकिरडय़ा, सुपडू अशीही नवसाची नावं ठेवत. बरेचजण आपल्या गाडय़ांवर अगदी ट्रक, ट्रॅक्टरवरसुद्धा मोठय़ा कौतुकानं आपल्या मुलांची, प्रिय व्यक्तीची नावं मोठय़ा हौसेने लिहितात. अर्थात, हे चुकीचं आहे असं मुळीच नाही. त्यामुळं आपण आपल्या माणसांच्या सहवासात असल्याचा भास होत असेल नं? शेवटी ज्याची-त्याची इच्छा.

मी खेडय़ातली. तेही मराठवाडय़ातल्या. एकत्र कुटुंब. घरात बरीच मुलं. वडीलधारी माणसं कुठून नवनवीन नावं शोधणार? माझे पणजोबा ज्ञानेश्वरी वाचायचे. त्यांना पौराणिक, जुनी नावं आवडायची. ज्ञानेश्वरीतील चौथ्या आणि अकराव्या अध्यायातील ओवीत ‘मैत्रेयचि चित्कळा’ आणि ‘अर्जुनालागी चित्कळिका’ असे शब्द आढळले. सचेत तत्त्व, ज्ञानशक्ती, चित्शक्ती, प्राणशक्ती अशा अर्थानी युक्त असलेले हे शब्द त्यांना अतिशय भावले. शिवाय, मुक्ताबाईचे नाव ही चित्कला. त्यांनी अतिशय कौतुकानं माझं नाव ठेवलं चित्कला.

लहानपणी मला माझ्या नावाचा हा अर्थ फारसा कळला नव्हता. आपल्या भावंडांपेक्षा आपलं नाव थोडं वेगळं आहे एवढंच लक्षात आलं होतं. पोरवयात माझ्या नावाच्या अर्थाचा फारसा विचार केला नव्हता. पण आत कुठंतरी नावाच्या अर्थापर्यंत पोचावं असं मात्र सतत वाटे. अकरावीत असताना शरद देशपांडे नावाचे शिक्षक वर्गात आले होते. आमची ओळखपरेड सुरू झाली. मी जेव्हा माझं नाव सांगितलं, तेव्हा थोडा वेळ ते न बोलता तसेच थांबले. नंतर त्यांनी मला नावाचा अर्थ विचारला. मला जेवढं माहीत होतं तेवढं मी एका दमात सांगून टाकलं. सर हसले. म्हणाले, ‘‘एवढय़ा अवघड भाषेत कशाला सांगतेस? मी तुला सोप्या शब्दात सांगतो. हे बघ, हा संधीयुक्त शब्द आहे. चित् आणि कला. चित् म्हणजे चतन्य आणि कला म्हणजे अंश. आपण म्हणतो ना, चंद्र कलेकलेने वाढतो. म्हणजे अंशाअंशाने वाढतो. तो अंश. अगं, सारी सृष्टीच चतन्याचा अंश आहे. सारेच चित्कला!’’ डोक्यात झर्रकन वीज चमकून गेली. डोळ्यासमोर ती व्यापक आणि विशाल सृष्टी, सारं चराचर उभं राहिलं. आपण सारेच त्या एकाच विश्वनिर्मात्याची लेकरं असल्याची जाणीव झाली. भव्य आणि व्यापक विचार करणारे माझे पणजोबा मला आकाशासारखे मोठे वाटले. या देहाला ‘चित्कला’ हे नाव मिळालं याचं विलक्षण समाधान वाटलं.

chitkala.kulkarni20@gmail.com

chaturang@expressindia.com

First Published on November 23, 2019 12:45 am

Web Title: chitkala kulkarni manatale kagdavar article abn 97
Next Stories
1 सुत्तडगुत्तड : स्पर्धापरीक्षेची लष्करअळी
2 सरपंच! : कर्तृत्वाची मोहोर
3 आभाळमाया : वारसा
Just Now!
X