स्त्रीमध्ये प्रचंड आत्मबळ असतं. एकाच वेळी ती अनेक पातळ्यांवर सारख्याच ऊर्जेने उत्तम कामगिरी करू शकते. अभियांत्रिकी आणि शास्त्रीय गायन या दोन्ही गोष्टी तितक्याच समरसून शिकणाऱ्या आणि संसार सांभाळून मुलांनाही घडविणाऱ्या डॉ. मीनल माटेगावकर यांचे हे अनुभवाचे बोल..

स्त्रियांसाठी संसार आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळणं तशी तारेवरची कसरतच. या दोन्ही गोष्टी करताना बऱ्याचदा तिच्या आशा-आकांक्षा, छंद, कधी मित्रमंडळ यांना दूर सारावं लागतं. कधी मुलांना पुरेसा वेळ न दिल्याची खंत आयुष्यभर राहते. असं असताना दोन तुल्यबळ गोष्टींमध्ये तितक्याच ताकदीनं करिअर करणं आणि तेही संसार, मुलं ही व्यवधानं सांभाळून? डॉ. मीनल माटेगावकर यांनी ते केलंय अगदी समर्थपणे आणि विधायक पद्धतीनं!
डॉ. मीनल माटेगावकर! स्थापत्य अभियांत्रिकी विभातील पदवी, त्यानंतर एम.टेक. आणि पीएच.डी. हे करतानाच शास्त्रीय संगीताचं पारंपरिक पद्धतीनं शिक्षण, त्यातील परीक्षा आणि आजही आशा खाडिलकरांसारख्या गुरूंकडे संगीत शिक्षण. जुळ्या मुलांसह संसार, नोकरी आणि स्वतचं संशोधन..असं एकाच वेळी अनेक पातळींवर त्यांनी काम केलंय, करीत आहेत. मात्र त्यासाठी गरज आहे ती जिद्द आणि नियोजनाची, असं त्यांना वाटतं.
मीनलताई मूळच्या नागपूरच्या. लहानपणीच त्यांचा गाता गळा घरच्यांना आणि शिक्षकांच्या लक्षात आला. त्यात गाण्यातील त्यांची आवड लक्षात घेत त्यांच्या आईने त्यांना नागपूरच्या ‘कुटी संगीत विद्यालयात’ शास्त्रीय संगीत शिकण्यास पाठवलं. तिथे त्यांचे शिक्षण सुरू असतानाच जोडीला त्यांचा शालेय अभ्यासही तितक्याच आवडीने सुरू होता. मीनलताई सांगतात, आम्ही पाच बहिणी. आई संस्कृत शिक्षिका तर बाबा गणित शिकवायचे. त्यामुळे घरात संपूर्ण अभ्यासाचं वातावरण. रियाज आणि अभ्यास समान पातळीवर करत होते. त्यामुळेच दहावीचा शालान्त परीक्षेत गुणवत्ता यादीत येण्याचा आणि शाळेत प्रथम येण्याचा मान मिळाला. इकडे गायनातील प्रगती पाहून संगीत विद्यालयाच्या प्राचार्यानी त्यांना अप्पासाहेब इंदुरकरांकडे शिकण्यासाठी पाठवले. त्यांच्याकडे मीनलताई १३ वर्षे शिकल्या. गांधर्व महाविद्यालयाची ‘संगीत अलंकार’ ही पदवी प्रथम श्रेणीत मिळवली. आठवी, नववीत असल्यापासूनच त्यांनी गायनाचे कार्यक्रम करायला सुरुवात केली होती. वेगवेगळ्या स्पर्धामध्ये भाग घेऊन बक्षिसेही मिळवली होती.
बारावीत विज्ञान शाखेत त्यांना उत्तम गुण मिळाले. वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असणारे गुण त्यांना मिळाले होते. मात्र एका गुणांनी त्यांचा नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेश हुकला. मिळाला तो यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात. तिथे प्रवेश घ्यावा तर गाणं सोडावं लागलं असतं. मीनलताईंना ते कदापि मान्य नव्हतं. अखेर त्यांनी नागपूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकी विभागात प्रवेश घेतला आणि गाणं सुरूच ठेवलं. दोन्हीकडे एकाग्रता, वेळ आणि बुद्धिमत्तेचा कस लागत होता.
त्यांच्या लहानपणी त्यांच्या आजोबांनी सांगितलं होतं की, ‘गाणं आणि शिक्षण तुझ्या जीवनाची दोन चाकं आहेत, त्यांना नेहमी बरोबर ठेव.’ आजोबांचा सल्ला त्यांनी मानला होता. आज गाणं आणि शिक्षण त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेत, असं त्या सांगतात. ‘‘अभ्यास आणि रियाज यांचा मेळ घालण्याचं तंत्र मी शाळेत असल्यापासूनच अवगत केलं होतं. रियाजासाठी वेळ देण्यासाठी मी माझं मित्रमंडळ फार विस्तारलं नाही. त्यामुळे १९९३ मध्ये आकाशवाणीची स्पर्धा असो की गानवर्धन स्पर्धा, मला त्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळू शकले. शिष्यवृत्ती मिळू शकली. कोणत्या वेळी कुठल्या गोष्टींना अधिक महत्त्व द्यायचं हे समजलं की तुम्हाला एकाचवेळी अनेक गोष्टी शिकण्याचा, करण्याचा आनंद घेता येतो,’’ असा सल्ला त्या देतात. शिक्षण पूर्ण झालं. दरम्यान त्यांचा विवाह झाला. पतीच्या घरीही संगीतासाठी पोषक वातावरण असल्यानं त्यांचं गाणं तिथेही अखंडित सुरू राहिलं. पतीच्या पाठिंब्यामुळे शिक्षण, नोकरी, घर आणि संगीत अशा जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडता आल्या. नॅशनल एनव्हार्यन्मेंटल इंजिनीअरिंग रिसर्च इन्स्टिटय़ूट येथे त्यांनी संशोधनाचा अनुभव घेतला.
ch07त्यांचं पदव्युत्तर शिक्षण सुरू असतानाच मूल होण्याची चाहूल लागली आणि मीनलताईंचं गरोदरपण गुंतागुंतीचं असल्याचंही समजलं. त्यामुळे त्यांना पूर्णपणे विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यांना नोकरीप्रमाणे गाणंही थांबवावं लागलं. त्यांना जुळी मुलं झाली. त्यांच्या संगोपनात मीनलताई पूर्णपणे गुंतल्या. मनात संगीत सुटल्याचा सल जाचतच होता, पण त्याबरोबरच मुलांचं संगोपन महत्त्वाचंही होतं याची जाणीव होती. यात एक विश्वास होता, तो म्हणजे काही दिवसांनी मी पुन्हा रियाज करणार आहे, गाणं सुरू करणार आहे.
मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांनी रियाज सुरू केला, पण त्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा आवाजच लागत नव्हता. त्यात मुलं लहान असल्यानं त्या तंबोरा घेऊन बसल्या की, दोघांपैकी कोणी मांडीवरच येऊन बसे तर कुणाला तंबोरा हवा असे, कोणी रडायला लागे. मग रियाज तिथेच थांबे. ‘‘शिक्षण, संगीतापासून आधीच दुरावले होते, त्यात आवाजच लागत नाही म्हटल्यावर फारच खचल्यासारखं झालं. मात्र पतीच्या पाठिंब्यामुळे त्यातूनही बाहेर येता आलं.’’ मीनलताई सांगत होत्या.
मधल्या काळात त्या पतीच्या नोकरीनिमित्त हैदराबाद येथे राहत होत्या. त्या दरम्यान त्यांनी संगीत शिक्षणासाठी हैदराबाद ते पुणे असा दर आठवडय़ाला प्रवास करून शिक्षण सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, त्यांच्या पतीची बदली मुंबईला झाली. मुलांचीही पूर्ण वेळ शाळा सुरू झाली आणि मग मीनलताईंनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मात्र मधल्या सात वर्षांच्या कालावधीत शिक्षण पद्धतीतही मोठा बदल झाला होता. तिथे काही करायचं असल्यास पुन्हा अभ्यास करणं गरजेचं होतं. मुंबईला आल्यावर नोकरीचा विचार मागे ठेवून त्यांनी मुंबईत आयआयटी येथे रिसर्च स्कॉलर म्हणून प्रवेश घेतला. ‘‘शिकवायला लागल्यावर पुन्हा शिकायचं म्हणजे त्रास होतो. अभ्यास करण्याची सवय मोडलेली असते. मात्र पुन्हा जिद्द आणि आवड यांच्यामुळे तसंच माझे पीएच.डीचे शिक्षक यांच्यामुळे सगळं साध्य करता आलं. सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत माझं आयआयटीमध्ये संशोधनाचं काम सुरू असे. त्यानंतर मुलांचा अभ्यास, रियाझ असं सुरू झालं.’’ त्या त्यावेळचा त्यांचा दिनक्रम सांगत होत्या. मुंबईत आल्यानंतर मीनलताईंनी आशा खाडिलकर यांच्याकडे पुन्हा संगीत शिकायला जाण्यास सुरुवात केली. आशाताईंनी त्यांना खूपच प्रोत्साहन दिले.
याचवेळी त्यांच्या आवडीच्या संशोधनाच्या विषयातही त्याचं लक्ष होतंच. याच काळात त्यांनी पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्या संशोधनास त्या वर्षीचं ‘बेस्ट थिसिस अवॉर्ड’ मिळालं. आयआयटीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्यानं त्या वर्षी पदवीदान समारंभासाठी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आले होते. त्यांच्या हस्ते मीनलताईंना डॉक्टरेट मिळाली. भूजल पातळीत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पाणी प्रदूषण होत असतं. ते पाणी पिण्यास योग्य आहे की नाही हे ठरवण्यासाठी तसंच हे प्रदूषण मोजण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन पद्धत (मेशफ्री मेथड) त्यांनी शोधून काढली. त्यांचं संशोधन त्यांच्यानंतरही अनेकांनी अभ्यासलं. त्यांनी अनेक संशोधन पेपर लिहिले. ते देशातील त्याचप्रमाणे परदेशांतील विज्ञान नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. गेल्याच वर्षी त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ सोशल जर्नलचा पुरस्कार मिळाला आहे.

‘‘स्त्रीमध्ये प्रचंड आत्मबळ असतं. एकाच वेळी ती अनेक पातळ्यांवर सारख्याच ऊर्जेने उत्तम कामगिरी करू शकते. परंतु तिला सगळ्यांना बरोबर घेऊन चालावं लागतं. घरच्यांचा पाठिंबा असेल तर ती मानसिकरीत्या अधिक सक्षमतेने काम करू शकते. त्यामुळे तिची शारीरिक क्षमता आपोआपच वाढते,’’ मीनलताई अनुभवाचे बोल सांगत होत्या. ‘‘तुमच्या आवडीची गोष्ट करण्यासाठी वेळ हा तुम्हालाच काढायचा असतो. हातातील वेळेचं नियोजन उत्तमरीत्या केलं की एकाच वेळी अनेक गोष्टी तितक्याच उत्तमरीत्या करता येऊन समाधान मिळतं.’’
आज मीनलताई, ‘मुकेश पटेल स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट अ‍ॅन्ड इंजिनीअरिंग’ येथे प्राध्यापक आहेत. त्याबरोबर संगीताचे कार्यक्रम त्या नियमितपणे करतात. आकाशवाणीच्या त्या ‘अ’ श्रेणीच्या कलावंत आहेत. तिथेही त्यांचे कार्यक्रम सुरू असतात. अनेक पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांनाही त्या मार्गदर्शन करत असतात. त्यांचेही संशोधन सुरू आहे. गाण्याचा रियाझही नियमित सुरू आहे. या सर्व गोष्टी सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडून त्या करतात.
मीनलताई म्हणतात, आयुष्यात कुणाशी तुलना करण्यासाठी काहीच करू नये. नेहमी स्वतशी तुलना करावी आणि कालच्यापेक्षा आज आपण किती उंची गाठली आहे हे तपासावं. सकारात्मक दृष्टिकोन, सतत काम करण्याची वृत्ती, चिकाटी आणि सातत्य हे गुण कायम अंगी बाणून आपला मार्ग निवडला तर काहीच अशक्य नाही.
रेश्मा भुजबळ -pradnya.talegaonkar@expressindia.com