02 March 2021

News Flash

आहारवेद – कॉफी

कॉफी हे पेय अरबस्थानमधून भारतात आले असे मानले जाते. कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्यापासून कॉफी बनवतात.

| February 21, 2015 03:09 am

कॉफी हे पेय अरबस्थानमधून भारतात आले असे मानले जाते. कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्यापासून कॉफी बनवतात. भारतामध्ये कॉफीचे उत्पादन विशेषत: दक्षिणेकडील-बंगळुरू, उटी, म्हैसूर, केरळ या राज्यांमध्ये होते. डोंगरउतारावर रांगेत कॉफीच्या वृक्षांची लागवड केली जाते.
कॅफिया अरेबिका या वृक्षाच्या बिया भाजून त्याची पावडर करतात व कॉफी हे पेय तयार करतात. या बिया भाजल्यानंतर त्यामध्ये विशिष्ट प्रकारचा सुगंध निर्माण होतो. कॉफी या पेयात कॅफिन (१.२ टक्के), टॅनिक अ‍ॅसिड (५.८ टक्के), कलॉल या नावाचे उडनशील तलद्रव्य असते. या तलद्रव्यामुळे कॉफीला उत्तम सुगंध येतो. अनेक वेळा चिकोरी नावाचे द्रव्य कॉफीमध्ये मिसळतात. त्यामुळे कॉफीला वेगळा स्वाद निर्माण होतो. बरेच लोक अशी मिश्र स्वरूपाची कॉफी पिणे पसंत करतात. कॉफीच्या अनेक प्रकारच्या जाती आहेत, त्या सर्वामध्ये नेसकॉफी ही सर्वात उत्तम आहे, असे समजतात. ही कॉफी बनविताना कुंबाडिया, चिंचोके व कासुंदराच्या बियांचे चूर्ण मिसळतात. काही लोक अभिमानाने सांगतात की, आम्ही चहा पीत नाही, फक्तकॉफी पितो. परंतु चहा आणि कॉफीचे दुष्परिणाम जवळजवळ सारखेच आहेत. चहा व कॉफीमध्ये स्वत:चे अशी पोषणमूल्ये जवळजवळ नाहीत. त्यामुळे अति कॉफी घेऊ नये.
गुणधर्म –
हिवाळा ऋतूमध्ये खूप थंडी पडल्यास किंवा बर्फाच्छादित प्रदेशातून जर कधी प्रवास करण्याची वेळ आली, तर थंडीपासून शरीराचे संरक्षण करण्यासाठी क्वचित कधी तरी अर्धा कप कॉफी पिणे ठीक आहे. कॉफी प्यायल्याने शरीरात उष्णता निर्माण होऊन स्फूर्ती येते. सुस्ती व आळस कमी होऊन मेंदूला चालना मिळते, मज्जासंस्थेला उत्तेजना मिळते.
 दुष्परिणाम –
ch03अति कॉफीमुळे शरीराला उष्णता प्राप्त होत असली तरी त्यामधील चिवटपणा व कडूपणा याच्या दुष्परिणामामुळे मलावष्टंभ निर्माण होतो, उष्णतेचे विकार जडतात. हातापायांची, डोळ्यांची आग होणे, निद्रानाश, छातीत धडधडणे, पित्ताचे विकार वाढणे, ज्ञानतंतू कमकुवत होणे, वंध्यत्व निर्माण होणे,  शुक्रजंतूंची संख्या कमी होणे असे अनेक विकार जडतात.  म्हणून उष्ण प्रदेशातील लोकांनी कॉफीचे सेवन अजिबात करू नये. तसेच इतरांनीही रोजच कॉफी सेवन करू नये. कॉफी पेय तयार करताना त्यात साखर मिसळतात. त्यामुळे कॉफी शरीरास अजूनच घातक ठरते. कॉफी व साखरेच्या दुष्परिणामामुळे लठ्ठपणा, हृदरोग, अति रक्तदाब, कॅल्शिअम कमतरता असे अनेक विकार जडतात. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे मांसपेशींवर व मज्जातंतूंवर वाईट परिणाम होतात. कॅफिनमुळे आहार कमी प्रमाणात घेतला जातो. कारण त्यामुळे भूक मंदावते. जास्त प्रमाणात, वारंवार कॉफी घेतल्यामुळे लोह आणि कॅल्शिअमचे शरीरामध्ये शोषण होत नाही किंवा ते मूत्रावाटे बाहेर टाकले जाते. त्यामुळे अ‍ॅनिमिया व हाडांचा ठिसूळपणा हे आजार वाढीस लागतात. कॉफी हे पेय जास्त प्रमाणात उकळले तर त्यातील रसायने ही पेयामध्ये जास्त उतरतात व यामुळे रक्तवाहिन्यांचा संकोच होऊन रक्तामधील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. अशी रसायने काढून टाकलेली इन्स्टंट कॉफी काही कंपन्यांनी बनवली आहे. परंतु ही कॅफिन काढून टाकलेली कॉफी जास्तच हानीकारक ठरते. कारण कॅफिन काढण्यासाठी जी रासायनिक विद्राव्ये वापरली जातात ती आरोग्यास अधिक अपायकारक ठरतात. त्यामुळे कुठल्याही जाहिरातींना बळी पडू नये. क्वचित प्रसंगी थंडीपासून रक्षण करण्यासाठी एक बदल म्हणून अर्धा कप कॉफी प्यावी, त्यामुळे नक्कीच उत्साह वाढून ताजेपणा वाटेल; पण कॉफीचे रोजच वारंवार जास्त प्रमाणात सेवन केल्यास अस्वस्थपणा वाढून मानसिक ताण वाढतो. कारण कॅफिन हे एक प्रकारचे विषच आहे, त्यामुळे कॉफीचे दररोज सेवन टाळावे.
पर्यायी पदार्थ –
काही लोक चहापेक्षा कॉफी पिणे प्रतिष्ठेचे मानतात. मात्र हा केवळ एक समज आहे. चहा व कॉफी ही दोन्ही पेये टाळून उत्साह निर्माण होण्यासाठी नसíगक आरोग्यपूर्ण पेय प्यावे.
कृती- ७-८ तुळशीची पाने, ४-५ पुदिना पाने, अर्धा इंच आले, अर्धा चमचा आवळा पावडर, २ चमचे लाल गूळ व दीड कप पाणी हे सर्व मिश्रण एक कप पाणी होईपर्यंत उकळावे व नंतर हे पेय गाळून प्यावे. ही सर्व घटकद्रव्ये नसíगक असल्यामुळे त्यांच्यामधील पोषण मूल्यद्रव्य (अँटीऑक्सिडंट) भरपूर प्रमाणात शरीरास मिळतात व त्यामुळे नक्कीच आरोग्य सुधारते. त्याचबरोबर हळद, ओवा, शतावरी कल्प टाकून दूध पिणे हेही आरोग्यास उत्तम आहे.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2015 3:09 am

Web Title: coffee
टॅग : Chaturang,Coffee
Next Stories
1 कुंडीतील बाग – प्रस्तावना
2 रंग डाली मेरी आत्मा तक!
3 ‘ती’ ची‘वसुली’
Just Now!
X