05 August 2020

News Flash

नात्यांची उकल : शारीर नात्याचा सहवास

कुठल्याही जोडप्यामध्ये, सहज सुंदर फुलत जाणारं आणि नात्यात जसजसा काळ जाईल तसतसं हवंसं वाटणारं शारीर नातं

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

कुठल्याही जोडप्यामध्ये, सहज सुंदर फुलत जाणारं आणि नात्यात जसजसा काळ जाईल तसतसं हवंसं वाटणारं शारीर नातं. त्यातून एकमेकांशी अधिक बांधले गेल्याची भावना आणि मग त्यातून फुलत जाणारा केवळ दोघांचा म्हणून असणारा सहवास. ‘शारीर-नातं’ संपलं किंवा एका वळणावर येऊन थांबलं तरीही, सहवास मात्र पुढे चालूच राहतो. इतक्या उत्कट नात्यात आजकाल मात्र, बऱ्याच अडचणी किंवा समस्या जाणवतात.

‘‘आमचं दोघांचं म्हणावं तसं पटत नाही. होतं काय, की तसे भांडणाला विषय काही नसतात, परंतु तरीही, सतत एकमेकांवर धुसफुस, अबोला.. याचं एक कारण हेही असेल का डॉक्टर, की तीन वर्ष झाली तरीही, शारीरिक जवळीक नाहीच!’’

तिशीतील एका जोडप्याचा हा अनुभव. या लग्नाची पार्श्वभूमी म्हणजे ते ठरवून सर्वाच्या संमतीने झालेलं. आता दुसरं उदाहरण – सध्या अगदी सहज दिसणाऱ्यांपैकी, त्यांचा प्रेम-विवाह झालेला. पण या दोघांतदेखील एक समस्या आहेच. ती अशी, की सुरुवातीचा काळ बरा गेल्यानंतर, यातील बायकोच्या लक्षात आलं, की नवऱ्याला शारीरिक एकरूपतेमध्ये काडीमात्र स्वारस्य नाही. होईल सारं काही व्यवस्थित, म्हणून काही काळ दोघेही छान राहिले. परंतु हळूहळू तिला समजलं, नवरा जाणिवपूर्वक अंतर राखतोय. आता हा प्रेमविवाह, अंतरजातीय, कुटुंबाशी भांडून दोघांनी एकमेकांच्या संमतीने केला असल्याने, ‘आपलेच दात आणि आपलेच ओठ’ अशी परिस्थिती.

नात्यांविषयी बोलताना त्यातील अविभाज्य भाग असलेल्या सुखद, शारीर नात्याविषयीही बोलायला हवंच, सहज सुंदर फुलत जाणारं आणि नात्यात जसजसा काळ जाईल तसतसं हवंसं वाटणारं हे नातं. त्यातून एकमेकांशी अधिक बांधले गेल्याची भावना आणि मग त्यातून फुलत जाणारा केवळ दोघांचा म्हणून असणारा सहवास. हा सहवास आयुष्याच्या शेवटापर्यंत पुरतो, साथ देतो. नंतर हे ‘शारीर-नातं’ संपलं किंवा एका वळणावर येऊन थांबलं तरीही, सहवास मात्र पुढे चालूच राहतो. इतक्या उत्कट नात्यात आजकाल मात्र, बऱ्याच अडचणी किंवा समस्या जाणवतात. असं का? तेही जवळपास पाच जोडप्यांपैकी एका जोडप्यात इतक्या अधिक प्रमाणात.

यात स्त्री-पुरुष म्हणून असणाऱ्या, शारीरिक संरचना आणि त्यांच्या काही विशिष्ट समस्या ही कारणं तर आहेतच, पण त्याही पुढे जाऊन, याची कारणमीमांसा केल्यास असं लक्षात येतं की, याची सखोल कारणं, आपल्या मानसिकतेमध्ये, या नात्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि महत्त्वाचं म्हणजे जोडीदाराविषयी वाटणारी आस्था यात आहेत. हे नातं फुलण्यासाठी, त्याच्याही बऱ्याच आधी जोडीदारासोबत, मानसिक एकतानता आवश्यक असते. तसंच या नात्यातून तयार होणाऱ्या बंधात तर ती अधिक गरजेची असते पण सुरुवात तर साध्या-सहज बाबीतूनच होते.

स्त्री-पुरुष म्हणून असणारं, स्वाभाविक आकर्षण किंवा तसंच स्वाभाविक, काही व्यक्तीत असणारं समिलगी किंवा उभयिलगी आकर्षण, यातून कोणी एक व्यक्ती आवडू लागते, हवीहवीशी वाटू लागते. त्याच एका व्यक्तीचा सहवास हवाहवासा वाटू लागतो. म्हणूनच इथे जेव्हा शारीर-बंध तयार होतात तेव्हा ते तितकेच सहज मुळात एकमेकांवर न लादलेले असतात. त्यातून केवळ सुखद आनंद हा दोन्ही व्यक्तींसाठी तितकाच सारखा, सामाधानाचा, परिपूर्णतेचा. पण यात जात्याच आकर्षण नसेल किंवा ते कमी झालं तर किंवा सुरुवातीचा काही काळ ते आहे परंतु नंतर ते विझत गेलं तर? तर मात्र, येणारा दुरावा अटळ. या आकर्षणाची म्हटलं तशी, नात्यात खूपशी आधीपासूनच सुरुवात होत असली, तरीही काही व्यक्ती इथे गोंधळलेल्या किंवा अत्यंत व्यावहारिक विचाराने पुढे जाताना दिसतात. उदा. जे पहिलं उदाहरण आपण पाहिलं, त्यात, नवऱ्याशी बोलताना लक्षात आलं, की त्याला पत्नीबद्दल आकर्षण नाही. त्याच्या मनात असलेली जोडीदाराची संकल्पना आणि वास्तवात असणारी पत्नी यांचा कुठेच मेळ नाही. त्यामुळे ज्या ज्या वेळेस, अशी जवळीक साधावी असं पत्नीला वाटतं, तिथे याला पूर्ण उदासीन वाटतं. त्यातून त्याला यात येऊ शकणाऱ्या गुप्तांगाबाबतच्या इतरही समस्यांना सुरुवात झाली. इथे मात्र तो गडबडला, गोंधळला.

ज्या वेळेस आपण ठरवून एखादं नातं स्वीकारतो, विशेषत: लग्नासारखं, त्यात काही बाबी स्पष्ट असणं, दोहोंसाठीही फारच महत्त्वाचं. इथे लग्नाशिवाय एकत्र राहणारी जोडपी बसत नाहीत, त्यांच्या समस्यांचा विचार वेगळ्या पद्धतीने करायला हवा. त्याचं कारण त्यात स्वत: निवड करून, नातं फुलवत दोन व्यक्ती या टप्प्यापर्यंत आलेल्या असतात.

तर अशा वेळेस मनाशी काय-काय पक्कं ठरवावं?

* ठरवून लग्न करत असाल, तर त्यात तडजोड किती आणि स्वेच्छा किती हा भाग फार महत्त्वाचा. तडजोडच अधिक झाली, तर पुढे तो सल सतत मनात राहतो आणि तयार होऊ घातलेल्या नात्यात किंवा नातं तयार झाल्यानंतरही अनेकदा मोठय़ा भिंतीसारखा तो मध्ये येऊन उभा राहतो.

* आपल्या प्रणयाराधनाच्या किंवा त्यासाठीच्या जोडीदाराबाबतच्या काही विशिष्ट संकल्पना असणं यात काहीच गर नाही. परंतु स्वप्निल काळातून बाहेर पडत वास्तवात येऊन त्या वेळोवेळी पडताळून पाहणंच उत्तम. नाही तर स्वत:पेक्षाही जोडीदाराचा भ्रमनिरास आणि त्याच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आपल्या स्वत:च्या मानसिक, शारीरिक वाढत्या वयानुसार, यात वेळोवेळी बदल होतो, बऱ्याचदा तो घडवून आणायला हवा हेसुद्धा आपण विसरू नये. उदा. पंचविशीत असणाऱ्या एका मुलीने, तिच्या घरच्यांसमोर एक अजब अट ठेवली, ती म्हणजे, तिचा होणारा जोडीदार हा अमुक-तमुक, हिरोसारखा आणि त्याच्या अमुक-तमुक चित्रपटात दाखवलेल्या परिस्थितीत जगणारा हवा. तो कसा सतत त्या विशिष्ट तारकेभोवती रुंजी घालतो तसंच काहीसं या मुलीला अपेक्षित. वाचताना हास्यास्पद वाटेल, पण आपल्या प्रत्येकाच्याच कल्पना, इथपर्यंत एकदा तरी पोहोचून आलेल्याच असतात. स्वप्निल किंवा भ्रामक संकल्पनेपासून कोणाचीही सुटका नसते. परंतु त्यात आणि वास्तवात फरक आहे हे मात्र जाणणं गरजेचं.

* आपल्याला जोडीदाराकडून काही विशिष्ट बाबी अपेक्षित असतील तर त्याचा स्पष्ट उच्चार करावा. कारण बऱ्याचदा या बाबी आपल्या ‘मागण्या’ असू शकतात. त्या नाजूक संबंधात अडथळा म्हणून येऊ शकतात. जसं जोडीदाराचं वजन, उंची, दिसणं, केस, त्याचं स्वावलंबी असणं किंवा कमावणं इत्यादी. नाक वाकडं आहे किंवा टक्कल आहे; आधी लक्षात आलं नाही; म्हणून कित्येक झालेली लग्नं मोडण्याच्या मार्गावर आलेली दिसतात. यात आता बऱ्याच बाबी केवळ बाह्य़स्वरूपाच्या. त्यामुळे ठरवून घडणाऱ्या लग्नात बऱ्याचदा इतर नातेवाईकांचा किंवा पालकांचा सूर असा दिसतो, की, ‘हे काय? यात बदल होईल.’ किंवा ‘इतक्या छोटय़ा गोष्टीवरून, चांगलं ‘स्थळ’ नाकारू नकोस.’ पण आपल्याला मात्र तेच सतत जाणवत असेल तर पुढे जाऊच नये.

* जशा आपल्या अपेक्षा, तशाच जोडीदाराच्याही असणारच हे मात्र विसरू नये. त्याने वा तिने ते स्पष्टपणे मांडलं, त्यावर कोणत्याही किंतु- परंतु शिवाय विचार करावा. त्यातही जर असं लक्षात आलं, की काही भेटीत जोडीदार केवळ नाराजीचा सूर व्यक्त करत आहे किंवा त्याच-त्याच गोष्टी ‘अप्रिय’ म्हणून अधोरेखित करत आहे तर तिथे सावध व्हायला हवं. उदा. ‘तुझं सगळं छान आहे, पण तू हसलीस की तुझ्या सगळ्या हिरडय़ा दिसतात, मला ते तितकंसं आवडत नाही.’ किंवा ‘तुला नाही वाटत का, या वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे तू काका दिसतोस? लग्नातले फोटोसुद्धा चांगले यायचे नाहीत आपले,’ किंवा ‘तुला जराशी चारेक इंच उंची अधिक मिळाली असती, तर तू माझ्या कल्पनेत अगदीच फिट!’ वगैरे.

* काही वेळा बरंच वय होऊनही लग्न जमत नाही. अशा वेळेस एखाद्या स्थळाचा होकार येतो, तिथे ‘काहीही करून आता हे हातचं जाऊ द्यायचंच नाही.’ अशी त्या होऊ घातलेल्या वधू-वरांपेक्षाही, बाकीच्या कुटुंबीयांचीच इच्छा अधिक असते. तिथे मग ओढूनताणून, निसर्गदत्त असणाऱ्या किंवा सवयीने प्राप्त झालेल्या काही शारीरिक बाबींमध्ये बदल करण्याचा अट्टहास दिसतो. उदा. काहीही करून असलेला डोळ्यांचा नंबर कमी करणं, घालवण्याचे प्रयत्न; किंवा मुरूम, पुटकुळ्या असलेल्या चेहऱ्याला नितळ बनवण्याचे हरतऱ्हेचे उपचार, ते अगदी काही शरीरातील भागांवर शस्त्रक्रिया, त्यात अनावश्यक चरबी काढून टाकण्यापासून, ते काही भागांचा आकार विशिष्ट पद्धतीने वाढवण्यापर्यंत सर्व काही.. उद्देश एकच, आता गंगेत घोडं न्हालं पाहिजे.

* घरचे म्हणतायत, म्हणून जोडीदाराची निवड नसावी. कारण लग्न झाल्यानंतर, प्रत्यक्षात जोडीदारासोबतच आयुष्यातला अधिक काळ घालवायचा आहे हे लक्षात घ्यावं.

* आपलं शिक्षण आणि त्यानुसार आपल्या असणाऱ्या आयुष्यातल्या योजना, यावर नक्कीच चर्चा व्हायला हवी. त्यात होऊ घातलेल्या जोडीदाराच्या काही भिन्न अपेक्षा असतील किंवा आपल्या सद्य:स्थितीतल्या व्यावसायिक आयुष्याबाबत त्याला काही खटकत असेल, तर ते स्पष्टपणे बोलणं चांगलं. कित्येकदा लग्नाआधी सर्वच बाबतीत स्थिर-स्थावर असणाऱ्यांची लग्नानंतर अचानक येणाऱ्या आडकाठीमुळे गळचेपी होते. काही व्यवसाय किंवा नोकरी याबाबत आपलं कामाचं स्वरूप, तिथे असणारी आपली गुंतवणूक ही स्पष्ट करावी. उदा. वैद्यकीय व्यवसाय, वकिली, पत्रकारिता इत्यादी. काही वेळेस आपलं शिक्षण उत्तम असलं तरीही लग्नानंतर त्याबाबत कुटुंबीय निर्णय घ्यायला सुरुवात करतात, तिथे ते प्रत्येकालाच तितकंसं आवडेल असं नाही. उदा. ‘आता तुला अमुक तमुक विषयांत उच्च पदवी आहे तर तू कंपनीत नोकरी करण्यापेक्षा प्राध्यापक हो. त्यातून कोणा एकाचं तरी घराकडे लक्ष राहील.’ किंवा ‘पुढचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्यापेक्षा इथंच काही होतंय का बघा.’ किंवा ‘परदेशातली नोकरी कशाला?’ इत्यादी.

* आपलं वय वाढेल तसतसे, आपले काही विचार, संकल्पना या अधिकाधिक दृढ होण्याची शक्यता असते, त्यात बदल होणं थोडंसं अवघड होऊन बसतं अशा वेळेस त्या विषयी लग्नापूर्वीच दोघांनाही माहिती असणं गरजेचं. अर्थात वय वाढेल तसं, जोडीदाराच्या बाबत सहज तडजोड करता येईल असं वाटत असलं तरी प्रत्यक्षात मात्र याच्या उलट चित्र असतं.

(लेखाचा उर्वरित भाग १६ नोव्हेंबरच्या अंकात)

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2019 1:30 am

Web Title: cohabitation of relations dr urjita kulkarni abn 97
Next Stories
1 पळा पळा दिवाळी आली..
2 अवघे पाऊणशे वयमान : ..देठालाही कळू नये
3 आरोग्यम् धनसंपदा : दिवाळीत नजर ठेवा वजनकाटय़ाकडे
Just Now!
X