News Flash

आनंदाची निवृत्ती: कोलाज चित्रांचा छंद

युनियन बँकेमध्ये ३७ वर्षे नोकरी करून ३० जून २००६ ला मी सेवानिवृत्त झालो. आज वयाची ६७ वर्षे पूर्ण केली असून कामात व्यग्र असल्यामुळे समाधानी आहे.

| August 29, 2014 12:01 pm

युनियन बँकेमध्ये ३७ वर्षे नोकरी करून ३० जून २००६ ला मी सेवानिवृत्त झालो. आज वयाची ६७ वर्षे पूर्ण केली असून कामात व्यग्र असल्यामुळे समाधानी आहे. रोजच्या कामकाजातून वेळ काढून एखादा वेगळा छंद जोपासावा असे नेहमी वाटत असे. बँकेच्या रूक्ष आणि बिझी शेडय़ूलमुळे शक्य होत नव्हते. सतत त्याच त्याच कामातून विरंगुळा मिळावा म्हणून त्यासाठी एक पर्याय शोधत होतो. १९९० साली देवगडला (सिंधुदुर्ग) बदली झाली. त्या ठिकाणी नारायण हजेरी या शिक्षकाची भेट झाली. हजेरी यांनी त्या वेळी विविध कागद चिकटवून ज्ञानेश्वरांचे एक चित्र बनविले होते. ते पाहून त्याच प्रकारे चित्र बनविण्याचा प्रयत्न केला आणि तेथून कोलाज चित्रे करण्याचा प्रारंभ झाला. त्यानंतर वेळ मिळेल तेव्हा वेगवेगळी चित्रे बनविण्यास सुरुवात केली.
मात्र परत मुंबईला बदली झाल्यावर सतर्कता विभागात मुख्य प्रबंधक म्हणून नेमणूक झाली. कामासाठी देशभर भटकंती, ताणही होते. कोलाज चित्रे तयार करण्याचा छंद टेन्शन कमी करण्यास खूप उपयोगी ठरला. पण हवा तेवढा वेळ त्यासाठी देणे जमत नव्हते.
 निवृत्तीनंतर मात्र हा छंद चांगलाच बहरला आहे. कोलाज चित्रे तयार करताना खूप संयम, एकाग्रता लागते. या चित्रांसाठी कोणत्याही प्रकारचा रंग न वापरता केवळ जुन्या रद्दीत टाकलेल्या मासिकातील रंगीत तुकडे जोडून चांगल्या कलाकृती तयार करता येतात. मात्र कोलाजमध्ये रंगाच्या ज्ञानाबरोबर विविध मासिकांतील रंगीत कागदांचा यथायोग्य वापर कसा करावा याचे कौशल्यही असावे लागते.
१९९० पासून जोपासलेल्या छंदातून जवळ-जवळ १२५ कलाकृती तयार केल्या आहेत. कोलाजचे पहिले प्रदर्शन जन्मगावी म्हणजे बेळगावात २०११ ला भरवले. लोकांनी आतापर्यंत तेलरंगातील, जलरंगातील चित्रे पाहिली होती. कोलाज हा प्रकार त्यांना नवीनच होता, त्यामुळे बेळगाववासीयांना मनापासून भावले. सावंतवाडीच्या राजमाता आपल्या कुटुंबासहित मुद्दाम प्रदर्शन पाहण्यास आल्या. बऱ्याच मान्यवरांनीही खूप कौतुक केले. त्यानंतर थिबा पॅलेस, रत्नागिरी येथे प्रदर्शन झाले, तर नंतर खास लोकाग्रहास्तव बेळगावात आणखी दोन प्रदर्शने झाली. या आगळय़ावेगळय़ा छंदाचे खूपच कौतुक झाले. सध्या शाळा-कॉलेजमध्ये प्रदर्शने भरवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा उपक्रम राबवीत आहे.
सेवानिवृत्तीनंतर स्वत:ला कामात व्यग्र ठेवून थोडं विधायक कार्य आपल्या हातून घडावे या हेतूने काही साहित्यिक/सामाजिक संस्थांमध्ये सध्या कार्यरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 12:01 pm

Web Title: collage drawings hobby
टॅग : Chaturang
Next Stories
1 स्त्रियांच्या राजकारणाचे नवे रंग – उगवतीचे!
2 प्रशासनाचा मानवी चेहरा
3 क्रोधातून साधनेकडे
Just Now!
X