19 September 2020

News Flash

सायक्रोस्कोप : सुखनिवास

जी कृती किंवा विचार आपल्याला सुरक्षित वाटतो, त्याला घट्ट पकडून बसण्याची मनोधारणा आपल्या सगळ्यांच्यात कमी-अधिक प्रमाणात असते.

‘कम्फर्ट झोन’ हा आपल्याला अगदी परिचित असलेला शब्द. त्याला एक उत्तम मराठी शब्द वापरला जातो-  ‘मनातला सुखनिवास’.

डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

‘कम्फर्ट झोन’ हा आपल्याला अगदी परिचित असलेला शब्द. त्याला एक उत्तम मराठी शब्द वापरला जातो-  ‘मनातला सुखनिवास’. जी कृती किंवा विचार आपल्याला सुरक्षित वाटतो, त्याला घट्ट पकडून बसण्याची मनोधारणा आपल्या सगळ्यांच्यात कमी-अधिक प्रमाणात असते. सुखनिवासामुळे जेव्हा मानसिक त्रास व्हायला लागतो किंवा जीवनातल्या बाकीच्या गोष्टींवर त्याचा परिणाम होऊ लागतो, तेव्हा त्यातून बाहेर पडणं गरजेचं होऊन बसतं. या बाहेर पडण्याचे काही साधे टप्पे पाहू या.

सकाळी लवकर उठून आंघोळ करणं आणि मग कामाला लागणं हा लीलाबाईंचा वर्षांनुवर्षांचा शिरस्ता आहे. त्यात कधी बाधा आली नव्हती. घरातल्या सगळ्यांनाच- म्हणजे मुलगा, सून, नात यांना ऑफिस आणि शाळेमुळे लवकर उठायला लागत होतं; पण ‘करोना’काळात ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू झाल्यापासून ते रात्री उशिरा झोपतात आणि सकाळी उशिरा उठतात. लीलाबाई आंघोळीला जाताना होणारा दिव्याच्या बटणाचा खटका, गिझरचा दिवा, नळातून पाणी पडण्याचा आवाज, बादल्या आणि तांब्याची खुडबुड, यामुळे या तिघांची झोपमोड होते. ते लीलाबाईंना सांगतात, की आम्ही उठलो, की मग तू आंघोळीला जा; पण आंघोळ केल्याशिवाय दुसरं काही काम करण्याची कल्पनाही लीलाबाईंना असह्य़ होते. स्वत:चा शिरस्ता त्यांना मोडवत नाही आणि कितीही बारीक आवाजात कामं करायची ठरवलं तरी आंघोळीला जाताना काही तरी आवाज होतोच. अशा परिस्थितीत लीलाबाईंची आंघोळ हा त्यांच्या घरात हल्ली वादावादीचा विषय झाला आहे.

गेली पाच र्वष एकाच प्रकारचं काम करून सुयशला साचलेपण आलं आहे. त्याला एकदा पदोन्नतीची संधी चालून आली होती; पण त्यासाठी त्याला दक्षिणेतल्या आडगावी जायला लागणार होतं. त्यानं विचार केला, की तिथली संस्कृती फार निराळी आहे, मोठय़ा शहरातल्या सुविधा तिथे नाहीत, शिवाय आपल्याला भात अजिबात आवडत नाही, त्यामुळे तिथे खाण्यापिण्याचे फार हाल होतील, तिथं कुणीही परिचित नाहीत, तिथल्या वातावरणाशी जुळवून घेणं अवघड आहे, वगैरे. या सगळ्या गोष्टींमुळे त्यानं पदोन्नती नाकारली; पण आपले काही सहकारी वरच्या पदावर गेल्याचं कळल्यापासून मात्र आपण अजून इथेच खितपत पडलो आहोत, या विचारानं तो अस्वस्थ झाला आहे.

लीलाबाईंना आंघोळीशिवाय बाकीचं काम करणं किंवा सुयशला आडगावची बदली स्वीकारणं का कठीण जातंय? कारण आंघोळ करूनच काम करण्याच्या सवयीपाशी लीलाबाईंनी आणि विशिष्ट ठिकाणीच काम करण्याच्या सवयीशी सुयशनं स्वत:ला गोठवून घेतलं आहे. ते कुंपण ओलांडण्यात त्यांना अडथळा येतोय तो त्यांनी स्वत:भोवती आखून घेतलेल्या ‘कम्फर्ट झोन’चा! ‘कम्फर्ट झोन’ म्हणजे जी कृती किंवा विचार आपल्याला सुरक्षित वाटतो, त्याला घट्ट पकडून बसण्याची मनोधारणा. त्यात आपल्याला फारसे प्रयास पडत नसल्यामुळे सुखदायक भावना निर्माण होते. म्हणून या अवस्थेला ‘कम्फर्ट झोन’ किंवा ‘मनातला सुखनिवास’ असं म्हटलं जातं.

आपण स्वत:भोवती नकळत असे कितीतरी सुखनिवास तयार केलेले असतात. उदाहरणार्थ- आपल्याला चहा पिताना बसायला नेहमीचीच खुर्ची लागते किंवा नेहमीचाच कप लागतो. खरं तर वेगळ्या खुर्चीत बसलं किंवा वेगळ्या कपातून चहा प्यायलो तरी चहाची चव बदलणार नसते; पण तरीही आपण नेहमीच्या खुर्चीचा किंवा आपल्या रोजच्या कपाचाच आग्रह धरतो. तसंच माणसांच्या बाबतीतही असे सुखनिवास आपण तयार करतो. आपल्याशी जुळणाऱ्या व्यक्तींशी आपण बोलतो, तर न जुळणाऱ्या व्यक्तींना टाळतो. या सुखनिवासांमध्ये आपल्याला सुरक्षित वाटतं. त्याच्या बाहेर पडायचं तर तणावाला तोंड द्यावं लागतं.

सुखनिवासाची मानसिक गरज आपल्यात इतकी तीव्र असते, की त्याचे तोटे दिसले तरी त्याला आपण घट्ट कवटाळून बसतो. जवळचा रस्ता उपलब्ध असला, तरी उगाच चुकायला नको म्हणून जास्त वेळ लागणारा, लांबचा, पण सवयीचा रस्ता घेतो. लीलाबाई आणि सुयश या दोघांनाही सुखनिवास न सोडल्याचे तोटे जाणवत आहेत; पण लीलाबाईंना आंघोळीशिवाय काम करण्याच्या विचारानं इतका तणाव येतो आणि सुयशला आडगावी राहण्याच्या विचारानं इतका तणाव येतो, की त्यापेक्षा ते तोटा सहन करतात, पण सुखनिवासातून बाहेर येऊ शकत नाहीत. जेवढी सवय जुनी आणि जेवढी धारणा पक्की तेवढं सुखनिवासातून बाहेर येणं अवघड असतं. खरं तर ‘करोना’ संकटाशी सामना करताना आपल्या सगळ्यांनाच आपले काही जुने सुखनिवास मोडून काढावे लागले आहेत. वेगळ्या सवयी अंगी बाणवून घ्यायला लागल्या आहेत; पण सुखनिवासाची ओढ इतकी प्रबळ असते, की एका सुखनिवासातून बाहेर आलं, की आपण लगेच दुसरा तयार करतो. आपल्या सगळ्यांनाच कमीअधिक प्रमाणात सुखनिवासात जाण्याची सवय असते. आपले काही सुखनिवास प्रवाही असतात. त्यातून आपण सहजासहजी बाहेर येऊ शकतो; पण काही मात्र ताठर असतात. ते भेदणं अवघड असतं. ज्या व्यक्तींचे सुखनिवास जास्तीत जास्त प्रवाही असतात, त्या व्यक्ती उच्च आत्मविकास करू शकतात.

सुखनिवासात जास्त काळ राहिलं तर मनुष्याचा विकास ठप्प होतो. विचारांची दिशा आणि क्रम एकाच पद्धतीचा आणि ठरावीक राहतो व विचार एकारलेले होतात. आपण जेवढा वेगळा विचार करू, वेगळे अनुभव घेऊ, वेगळी कृती करण्याची जोखीम पत्करू, तेवढा आपल्या विकासाचा आलेख उंचावर जाईल. सुखनिवासात राहिल्यावर वेगळ्या विचारांना प्रवेश देणारे मनाचे दरवाजे बंद होतात. उदाहरणार्थ- लीलाबाई जर एकाच सवयीत अडकल्या, तर त्यांची वेगळ्या वर्तनांशी किवा वेगळ्या सवयींशी ओळखच होत नाही. तशी झाली, तर कदाचित आंघोळ करून काम करण्यापेक्षा सर्व आवरून मग आंघोळ करण्याची सवय त्यांना अधिक उपयुक्त वाटू शकेल. तसंच सुयशलाही वेगळ्या जीवनशैलीच्या माणसांचा स्वीकार करणं शिकता येईल. आपण जेवढय़ा वेगवेगळ्या विचारांच्या, विरुद्ध विचारसरणीच्या, तसंच अवघड माणसांना भेटू, तेवढय़ा आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावतात. म्हणूनच आपल्या क्षमतांचा विस्तार होण्यासाठी सुखनिवासातून बाहेर येऊन तणाव सहन करणं गरजेचं आहे. मानसशास्त्रज्ञ म्हणतात, की सुखनिवासातून बाहेर पडण्याची सवय मुलांना लहानपणापासूनच लावा. त्यांच्यासमोर पदोपदी सुखाच्या पायघडय़ा अंथरू नका. नावडती गोष्ट सहन करण्याची, थोडाफार तणाव सहन करण्याची सवय त्यांना लहानपणापासूनच लावली, तर मानसिकदृष्टय़ा ती कणखर होतील. थोडय़ाशा तणावानं कोसळणार नाहीत.

सुखनिवासातून बाहेर येण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अंगवळणी पडलेल्या सवयीत मुद्दाम बदल करणं. त्याची अनेक तंत्रं व्यावसायिक व व्यवस्थापन क्षेत्रात वापरली जातात. उदाहरणार्थ, गरसोय होईल अशी कामं मुद्दाम करायला देणं, वेगळ्या पठडीतला विचार केल्याशिवाय सुटणार नाहीत अशा समस्या सोडवायला सांगणं, न जुळणाऱ्या व्यक्तींच्या गटात राहून काम करायला लावणं, कामाच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका सतत बदलत्या, प्रवाही ठेवणं. ‘जे तुम्हाला आरामदायक वाटतं, ते तुमचा नाश करतं आणि जे त्रासदायक वाटतं, ते प्रगतीपथावर नेतं,’ हा या तंत्रांचा प्रमुख संदेश असतो. अशा तंत्रांमुळे व्यक्तीला हेतूपुरस्सर खडतर अनुभवांना सामोरं जायला लावून सुखदायक भावनेचं कवच फोडलं जातं. वेगळे विचार करायला भाग पाडलं जातं. त्यामुळे मानसिक विस्ताराला मदत होते.

मानसिक विस्तारासाठी स्वत:ला काय सांगणं आवश्यक आहे, ते लीलाबाई आणि सुयशच्या उदाहरणांतून पाहाता येईल.

सवय बदलण्यात पुढाकार घ्या- लीलाबाईंना वाटतंय, की आता या वयात मी माझ्या सवयी कुठं बदलत बसू? त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की सुखनिवासातून बाहेर येण्याचा आणि वयाचा संबंध नाही. उलट वेगानं होणाऱ्या बदलांशी सामना करण्यासाठी मानसिक लवचीकता उतारवयात फार उपयोगी पडते. सुयशनंही नवीन जागेबाबत वेगळा विचार करण्यास स्वत:ला भाग पाडलं तर जोखीम उचलण्यासाठी, अनिश्चिततेला तोंड देण्यासाठी, कणखर होण्यासाठी ते अनुकूल ठरू शकेल.

कामगिरीचा उच्चतम िबदू शोधा- कदाचित लीलाबाई किंवा सुयश असं विचारतील, की आम्ही किती मर्यादेपर्यंत सहन करत राहायचं? सतत मनाला मुरड घालत राहायची का? रॉबर्ट यर्कीज या मानसशास्त्रज्ञानं याचं उत्तर दिलं आहे. तो म्हणतो, की तुम्ही स्वत:ला जेवढं ताणाल तेवढं विस्ताराल; पण इतकं ताणू नका, की तुम्ही तुटून जाल. आपला जास्तीत जास्त विस्तार होईल तोपर्यंतच ताण दिला पाहिजे. मग आपण ‘उच्चतम कामगिरी’ (‘ऑप्टिमल परफॉर्मन्स’) करू शकतो. आपण किती ताणू शकतो, हे लीलाबाई आणि सुयशनं अजून आजमावलंच नाही. ते आजमावण्यासाठी प्रथम सुखनिवासातून बाहेर येणं आवश्यक आहे. मग उच्चतम कामगिरीचा िबदू ते शोधू शकतील.

फक्त तोटय़ावर लक्ष नको- लीलाबाईंना आणि सुयशला स्वत:च्या सवयी मोडवत नाहीत, कारण त्यामुळे होणाऱ्या त्रासावर- म्हणजेच तोटय़ावर त्यांचं लक्ष केंद्रित होतंय. या तोटय़ाचं भयंकर चित्र ते डोळ्यांसमोर रंगवत आहेत. त्याऐवजी आपण आपला सहनिबदू वाढवत आहोत, म्हणजेच अधिक लवचीक होत आहोत, यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं, तर त्यांचा तणाव कमी होऊ शकेल. लीलाबाईंना कळेल, की बाकीची कामं नीट होण्यासाठी आधी आंघोळ करणं अत्यावश्यक नाही. तसंच सुयशला कळेल, की आडगावी जाणं इतकं भीतीदायक नाही. उलट त्यामुळे त्याची वैफल्य सहन करण्याची क्षमता वाढेल. सुरक्षिततेत राहून त्याचा विकास होणार नाही. विकासासाठी सुरक्षिततेची बंधनं तोडली तरच त्याची व्यावसायिक कारकीर्द उंचावू शकेल.

याचा अर्थ लीलाबाई आणि सुयशप्रमाणे जेव्हा समस्या उभी राहते तेव्हाच सुखनिवासातून बाहेर यायचं का? समस्या नसतानाही मानसिकदृष्टय़ा लवचीक होण्यासाठी आपण त्याच्यातून बाहेर येणं आवश्यक आहे. त्यासाठी अगदी छोटय़ा पायऱ्यांपासून सुरुवात करा. रोजची सवयीची जागा, खुर्ची किंवा कप मुद्दाम बदला. कधीतरी वेगळ्याच रस्त्यानं चाला. वेगळा पदार्थ खाऊन पाहा. कधीच न बोललेल्या माणसांशी गप्पा मारा. अजिबात न आवडणारी एक तरी गोष्ट मुद्दाम करून बघा. तुम्हाला अशी काही सत्यं गवसतील, की सुखनिवासात राहून त्यांच्याकडे तुम्ही पाठ फिरवली असेल. एखादा अनुभव चांगला येणारही नाही; पण तुमच्या अनुभवांच्या शिदोरीत नक्कीच भर पडेल.

‘मी नवीन अनुभव जमा करत आहे आणि प्रत्येक अनुभवाबरोबर मी संपन्न होत आहे,’ असं स्वत:ला सांगितलंत, तर वेगळ्या वाटेवरच्या एखाद्या संधीसाठी तुमचे दरवाजे तुम्ही पूर्णपणे उघडे ठेवाल. तसं केलं नाहीत, तर मात्र मार्टिन ल्यूथर किंग यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘तुमच्या वयाच्या ३८ व्या वर्षी एका मोठय़ा संधीनं तुमचं दार ठोठावलं आणि एखाद्या महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी, कारणासाठी किंवा स्वप्नासाठी तुम्हाला बोलावलं, पण जर केवळ घाबरून तुम्ही तिच्याकडे पाठ फिरवली असेल, तर पुढे ९० वर्षांपर्यंत जगलात तरी ते जगणं मृतप्राय असेल, कारण तुमचा मृत्यू ३८ व्या वर्षीच झाला असेल.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2020 12:27 am

Web Title: comfort zone physcroscope psychroscope ddd70
Next Stories
1 न्यायालयाचे न्याय्य पाऊल
2 मिशन मंगल!
3 जीवन विज्ञान : पाणीच पाणी चहूकडे..
Just Now!
X