मोहन अळवणी ही कोणी श्रीमंत असामी नाही. ते आहेत तुमच्या-आमच्यासारखे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांनी पै पै साठवून जमवलेले २० लाख रुपये लोकार्पण केले. एवढंच नव्हे तर विविध सेवाभावी संस्थांसाठी दारोदार फिरून दीड कोटी रुपयांहून जास्त रक्कम एकटय़ाने गोळा केली. त्यांच्या सत्पात्री दानाविषयी..
देखणी ती पाऊले जी
आपुल्याच हाताने घडवू
भवितव्याचे शिल्प नवे
देशासाठी कर्तृत्वाचे
सर्वस्वाचे दान हवे
या संघगीतानुसार ज्यांनी आयुष्यभर आचरण केलं अशा देशभक्तांतील एक नाव म्हणजे मोहन रामचंद्र अळवणी. ‘ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावी’, असं म्हटलं जातं, पण मोहनजी त्या मोजक्या लोकांमधले आहेत, ज्यांनी आपल्या गरजा भागतील एवढंच धन स्वत:पाशी ठेवून बाकी सर्व गरजवंतांना वाटून टाकलं. एवढंच नव्हे तर भारतमातेच्या या सुपुत्राने विविध सेवाभावी संस्थांसाठी दारोदार फिरून दीड कोटी रुपयांहून जास्त रक्कम एकटय़ाने गोळा केली.
मोहन अळवणी ही कोणी श्रीमंत असामी नाही. ते आहेत तुमच्या-आमच्यासारखे एक मध्यमवर्गीय गृहस्थ. त्यांनी पै पै साठवून पैसे जमा केले आणि आपण समाजाचं देणं लागतो या भावनेतून ते लोकार्पण केले. म्हणूनच त्यांनी दान केलेल्या २० लाख रुपयांचं मोल डोंगराएवढं. आपल्या ताटातील एखादा तरी घास भुकेल्याच्या मुखी घालायचा हा संस्कार मोहनजींना त्यांचे वडील रामचंद्र अळवणी यांच्याकडून मिळाला. वडिलांना जेव्हा ५० रुपये पगार होता (१९३५/३६) तेव्हाही ते आपलं कुटुंब सांभाळून गरीब विद्यार्थ्यांना मदत करीत. पुढे बी.ई. सिव्हिल ही पदवी घेऊन पुण्यात बांधकाम व्यवसाय करताना वडिलांकडून मिळालेला हा वसा त्यांच्या आचरणातून दिसू लागला. त्यातूनच कामगारांची दारू सोडवणं, कुणाला रिक्षा घेण्यासाठी तर कुणाला शिक्षणासाठी मदत करणं सुरू झालं.
पैसा मिळवणं हा मोहनजींच्या आयुष्याचा हेतू कधीच नव्हता. त्यामुळे पत्नीला- सुलभाताईना पुणे आकाशवाणीत नोकरी मिळत असतानाही त्यांनी तिला पैशासाठी नोकरी करण्यापेक्षा विद्यार्थी साहाय्यक समितीत काम करून समाधान मिळव, असं सांगितलं. सुलभाताई खरोखरच्या सहधर्मचारिणी. त्यांनी हे व नंतर चंद्रभागा महिला पतसंस्थेचं काम पुढची १०/१२ र्वष अत्यंत आस्थेने विनामोबदला केलं.
१९८१ साली मोहनजींच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न झालं आणि ते जबाबदारीतून मुक्त झाले. त्यानंतर ४/५ वर्षांत कर्वेनगरला स्वत:चं घर बांधलं आणि वयाच्या ५३ व्या वर्षी चांगला चाललेला स्वत:चा व्यवसाय बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. कशासाठी.. तर संघाच्या कामात पूर्ण वेळ झोकून देण्यासाठी.
त्यानंतर सुरू झाला एक सेवायज्ञ. सकाळी साडेसहाला घराबाहेर पडायचं ते एकदम दुपारी दोन-अडीचला परतायचं. थोडी विश्रांती घेऊन पुन्हा चक्र सुरू. ज्ञानदा प्रतिष्ठान शिक्षण संस्थेचं काम त्यांच्याकडे प्रथम सोपवण्यात आलं. त्या वेळी या संस्थेची स्थिती म्हणजे जेमतेम चार खोल्यांची जागा आणि चौदा लाख रुपयांचं कर्ज अशी होती. मोहनजींनी या आव्हानाच्या पूर्ततेसाठी अक्षरश: जिवाचं रान केलं. कर्ज फेडण्यासाठी देणग्या गोळा करायला सुरुवात केली. रोज कमीत कमी १५/१६ घरी जायचंच असा नेम केला. हळूहळू सगळं कर्ज फिटलं. आज या संस्थेची स्वत:ची चार मजली इमारत आहे आणि १ कोटी रुपयांची पुंजी बँकेत जमा आहे.
आर्थिक घडी बसवण्याबरोबर ज्ञानदा प्रतिष्ठानतर्फे अनेक संस्कारक्षम उपक्रम सुरू करण्याला त्यांनी चालना दिली. यातील एक म्हणजे २००० साली जेव्हा ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रगीताला १२५ वर्षे पूर्ण झाली तेव्हा या गीताची महती सर्वाना कळावी म्हणून पुण्याच्या १०० शाळांमधून जागरण हा कार्यक्रम राबवण्यात आला. त्यासाठी या शाळांतील मुला-मुलींकडून समग्र वंदे मातरम् हे गीत बसवून घेण्यात आलं आणि १५ डिसेंबर २००० या दिवशी पुण्याच्या नेहरू स्टेडियममध्ये अकरा हजारांहून जास्त विद्यार्थ्यांनी एका सुरात ‘वंदे मातरम्’ गात भारतमातेला सलामी दिली. आजही या शाळांमधून हे गीत दररोज म्हटलं जातं.
ज्ञानदा प्रतिष्ठानची गाडी रुळावर आल्यावर ‘विद्याभारती’ या अखिल भारतीय स्तरावर काम करणाऱ्या शैक्षणिक संस्थेची जबाबदारी त्यांच्याकडे आली. महाराष्ट्र प्रांताचा अध्यक्ष या नात्याने सर्वत्र फिरणं क्रमप्राप्त झालं. अर्थात हा प्रवास कायम एस.टी.ने नाही तर रेल्वेच्या दुसऱ्या वर्गानेच असे. त्याचेही पैसे कधी घेतले नाहीत. या संस्थेसाठीही देणग्या गोळा केल्या. भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती असो वा संस्था उभारणी, मोहनजींनी सामान्य माणसापासून मोठय़ा उद्योजकांपर्यंत घरोघरी जाऊन दीड कोटी रुपयांहून जास्त निधी उभारून दिला. त्याबरोबर नि:स्पृह वर्तनाने लोकांचा एवढा विश्वास मिळवला की आता लोक स्वत:हून विचारतात, ‘मोहनराव, देणगी द्यायचीय, कुणाला देऊ?’
 त्यांच्या प्रेरणेने ‘विद्याभारती’तर्फे मुलांना आपला देश, संस्कृती, विज्ञान, तंत्रज्ञान यांची माहिती व्हावी म्हणून पुस्तकं लिहून घेण्यात आली. या अभ्यासक्रमानुसार चौथी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातील १०० शाळांत परीक्षा घेतल्या जातात, ज्याला हजारो मुलं बसतात. ही सर्व कामं ऐन भरात असताना, २००३ मध्ये वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. मृत्यूच्या दाढेतूनच वाचले म्हणा ना. त्यानंतर सगळे म्हणत होते, आता दगदग पुरे. विश्रांती घ्या. पण यांच्या मनाने घेतलं की, आपण एवढय़ा मोठय़ा संकटातून वाचलो म्हणजे हातून काही तरी चांगलं घडायचं आहे आणि ते दुप्पट जोमाने कामाला लागले.
७५ व्या वर्षी त्यांनी दरवर्षी ५ लाख रुपये स्वत:च्या खिशातून दान करायचं ठरवलं. खरं तर व्यवसाय बंद केला तेव्हा घरखर्चाला दरमहा दोन हजार रुपये मिळतील एवढीच तरतूद केलेली होती. पण नंतर गुंतवणुकीचा अभ्यास करून त्यांनी आपलं उत्पन्न वाढवलं. गरजा मात्र कमीत कमी ठेवल्या आणि सत्पात्री दानासाठी संस्थांचा अभ्यास सुरू केला.
 २००९ मध्ये जनकल्याण समिती- पूर्वाचल, प्रगती प्रतिष्ठान- जव्हार, समतोल फाऊंडेशन- मुंबई, जनभारती न्यास- कोल्हापूर, पुनरुत्थान समरसता गुरुकुल- चिंचवड या संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपये देऊन सुखान्त झाला. आणि अलीकडेच म्हणजे २७ मार्च २०१५ ला सेवावर्धिनी- पुणे या संस्थेला ५ लाख रुपये देऊन त्यांनी मनातला २० लाखांचा संकल्प पूर्ण केला.     
तोरणा राजगड समाजोन्नती न्यासला त्यांनी दिलेल्या ५ लाख रुपयांमुळे वेव्हे (ता. भोर) गावातील आदिवासी मुलांच्या वसतिगृहाचा विस्तार झाला, तर सेवावर्धिनीला दिलेली देणगी मांढरादेवीजवळील डोंगरावरील गडदे गावातील पाणी साठवण्याच्या कृत्रिम तलावाच्या दुरुस्तीसाठी कामी आली.
आजही मोहन अळवणी हे ८१ वर्षांचे तरुण सायकलवर फिरून काही ना काही करत असतात. मध्यंतरी निवडणुका झाल्या तेव्हा याद्यांचा घोळ होता. तेव्हा घरोघर फिरून त्यांनी ज्यांची नावे  याद्यात नव्हती अशांकडून फॉर्म भरून घेतले.
 मी मोहनजींना भेटायला त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांची मुलगी नीलिमा बोरवणकर (लेखिका) यादेखील तिथे होत्या. त्या म्हणाल्या, ‘आमचं घर म्हणजे प्रचंड काटकसर. चुकूनही रिक्षा करायची नाही. मोसमी फळं-भाज्याच खायच्या. कारण त्या स्वस्त असतात. टी.व्ही., फ्रिज, पडदे पंचवीस वर्षांपासून तेच. गेल्या ३० वर्षांत फार तर एक किंवा दोन सिनेमे बघितले असतील..
आम्ही बोलत असतानाच मोहनजी कशासाठी तरी उठले. त्यांच्या बाक आलेल्या पायांकडे बघत नीलिमाताई म्हणाल्या, ‘बघितलंत, कसे चालतायत ते? गुडघ्याचं ऑपरेशन करायला हवंय. पण स्वत:साठी अडीच तीन लाख रुपये कोण खर्च करणार?’ मी त्याचं ऐकत होते, पण कानात मात्र वेगळेच शब्द घुमत होते..
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखती॥    
संपर्क- मोहन अळवणी, दूरध्वनी- ०२०-२५४४०००८    मोबा. ९८२२९८४४०९
संपदा वागळे -waglesampada@gmail.com

vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !