मंजुला नायर – responsiblenetism@gmail.com

इंटरनेट वापराच्या मुलांमधील वाढत्या सवयीवर र्निबध आणायचे असतील तर  मुलांसाठीच्या नियमांकडे नव्यानं पाहावं लागेल, काही प्रयोग करून बघावे लागतील आणि परिस्थितीनुसार त्यात बदल करावे लागतील. काही पालक धाकदपटशा दाखवून मुलांचा ‘स्क्रीन-टाइम’ किती असावा, यासाठीचे नियम बनवत असतात. मात्र पालकांनी वापरण्याचं सर्वात उत्तम साधन म्हणजे संवाद. अनेकदा मुलांशी योग्य प्रकारे संवाद न साधल्यामुळे किंवा संवादाच्या संपूर्ण अभावामुळे गोष्टी गुंतागुंतीच्या होऊन बसतात. मोठय़ा वयाच्या मुलांमध्ये बदल घडवून आणणं कठीण असतं. त्यामुळं अगदी लहान वयापासूनच मूल्य आणि विश्वास यांचं संवर्धन करायला लागतं –  ‘ऑनलाइन गेम्सचं जग’  लेखाचा हा भाग दुसरा.

पालकांना तंत्रज्ञानाबाबत सहसा फारशी माहिती नसते. त्याचा वापर न केल्यामुळे आणि डिजिटल जगताचा अनुभव नसल्यामुळे त्यांच्या मनात तंत्रज्ञानाबद्दल प्रचंम्ड धास्ती असणं साहजिकच आहे. त्यात भर म्हणून वेगवेगळ्या ऑनलाइन मंचांबाबत सगळीकडे उगाचच मोठय़ा प्रमाणात नकारात्मक गोष्टी सांगितल्या जातात, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. मात्र या बाबींचा परिणाम किती व्हावा, ते व्यक्तीवर आणि वापरावर अवलंबून असतं. कुठलंही तंत्रज्ञान, गेम, ऑनलाइन मंच, अ‍ॅप मुळात वाईट नसतं, त्याचा कसा वापर करायचा हे सर्वस्वी वापरकर्त्यांवर अवलंबून असतं. दुर्दैवानं त्याबाबतचं स्वनियंत्रण, व्यवस्थापन आणि संयम यांचा सार्वत्रिकरीत्या अभावच आढळतो. आणि ते शिकवण्यात आपण कुठेतरी कमी पडतो. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात पालक आणि मुलं सगळेच घरी असल्याचा फायदा घेऊन पालकांनी काही गोष्टी शिकून मुलांशी संवाद साधणं गरजेचं आहे.

हल्लीच्या काळात मुलांवर आपल्या मित्रमैत्रिणींचा मोठय़ा प्रमाणावर दबाव असतो, असं सांगण्यात येतं. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यात अर्थातच त्यांना कुठल्या तरी गटाचा भाग असण्याची मानसिक गरज वाटू लागते. आपला या गटानं स्वीकार करावा, आपली दखल घेतली जावी, ही भावना अत्यंत तीव्र असते. माझ्या मते, कुठलंच घर किंवा पालक मुद्दाम मुलांना वाईट सवयी लावत नसतात. आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे, हे बघून मुलांच्या वागण्यात बदल होत असतो. आजूबाजूची सत्तास्पर्धाही त्यांना बऱ्यापैकी समजत असते आणि तीत निभाव लागण्याठी ती स्वत:ची भूमिका निवडत असतात. मात्र आपल्या मित्रमैत्रिणींच्या गटात त्यांना सामोरं जावं लागणारा दबाव मोठा असतो. या मित्रमैत्रिणींच्या गटातल्या स्थानाच्या रस्सीखेचीमध्ये मुलांना आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच झगडावं लागतं. त्यामुळंच आजच्या काळात पालकत्व अधिक आव्हानात्मक बनलेलं आहे. मुलांना सक्षम आणि सुरक्षित वाटावं याकरिता त्यांच्याशी शांतपणे बोलत राहणं जरुरीचं आहे. घरातून मिळणारं निरपेक्ष प्रेम आणि दृढ  विश्वास यांच्या बळावरच ही मुलं बाहेरच्या जगाचा धैर्यानं मुकाबला करू शकतील. गेमिंगच्या व्यसनातून बाहेर पडलेल्या मुलांच्या यशोगाथा अनेक कुटुंबांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. विशेष म्हणजे, या साऱ्यांचं एका गोष्टीवर अगदी एकमत आहे, ‘मोठय़ा वयाच्या मुलांमध्ये बदल घडवून आणणं कठीण असतं. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच मूल्य आणि विश्वास यांचं संवर्धन करायला लागतं. शिवाय मुलं आपलं अनुकरण करत असल्यामुळे आपण त्यांच्यासमोर योग्य ‘रोल मॉडेल’ ठेवतो आहोत का, हा प्रश्नदेखील स्वत:ला विचारला पाहिजे. तसं असेल तर आपल्याला आधी स्वत:वरच काम करायला हवं.’ अशा काही यशस्वी मुलांच्या आणि पालकांच्या कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे.

सनय (नाव बदललं आहे), यानं वयाच्या १४ व्या वर्षीच स्वत:चं ‘यू टय़ूब’ चॅनेल सुरू केलं. वेगवेगळ्या गेम्सचा परिचय करून देणाऱ्या या चॅनेलचे मोठय़ा प्रमाणावर फॅन आहेत. जवळजवळ ५०,००० फॉलोअर्स या चॅनेलला आहेत. त्याची ही लोकप्रियता पाहून ‘यू टय़ूब’नं त्याला आशयनिर्मिती कशी करावी याचं प्रशिक्षण दिलं. आज वयाच्या १५ व्या वर्षी गेम्सचा परिचय करून देणाऱ्या या चॅनेलद्वारे तो दर महिन्याला ३ लाख रुपये मिळवतो. रिशिमा ही मुलगी ब्लॉगिंग करते. वयाच्या १३ व्या वर्षीच तिनं आपल्या कलाकृतींचे व्हिडीओ ‘यू टय़ूब’वर टाकले आहेत आणि ती आता इंटरनेट स्टार बनलेली आहे. अंगद दरी या मुलानं वयाच्या १७ व्या वर्षीच शालेय शिक्षण सोडून दिलं आणि स्वत:चा ३-डी प्रिंटर बनवला. आता तो तंत्रज्ञान या विषयावर ‘टेड टॉक्स’ देत असतो.

आपल्या सगळ्यांनाच ग्रेटा थनबर्ग ही १६ वर्षांची तरुणी ठाऊक असेलच. इंटरनेटचा वापर करून तिनं पर्यावरणविषयक चळवळ मोठय़ा प्रमाणात उभी केली आहे. अनेक मुलं ऑनलाइन जगताचा वापर सबलीकरणाचं एक साधन म्हणून यशस्वीरीत्या करत आहेत. रोहन आणि स्मृत ही दोघं अनुक्रमे ७ आणि ११ वर्षांची मुलं. लहानपणापासूनच त्यांच्या घरी टीव्ही नाही. त्यांच्या पालकांनी सांगितलं, ‘‘आमची दोन्हीही मुलं मोठय़ा प्रमाणावर वाचन करतात, मैदानी खेळ भरपूर खेळतात आणि एक कुटुंब म्हणून त्यांना एकत्र असायला, बोलायला मोठय़ा प्रमाणावर वेळ मिळतो.’’ या साऱ्यांनीच संपूर्ण कुटुंबातल्या सदस्यांसाठी ‘स्क्रीन-टाइम’ किती असावा, याचं वेळापत्रक बनवलेलं आहे. दोन्ही मुलं त्यांच्या वयाला योग्य असणाऱ्या निर्धारित वेळामध्ये ऑनलाइन गेम्स खेळतात. जो आधी ठरलेला स्क्रीन-टाइमचा नियम मोडेल, त्याला बोलणी बसतात. अर्थात असे नियम काही काळच उपयुक्त असतात. मुलं जसजशी मोठी होत जातील तसतसे ते बदलावे लागतात. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, ‘कुठलाच नियम दीर्घकाळ चालत नाही.’ मुलांसाठीच्या नियमांकडे नव्यानं पाहावं लागतं, काही प्रयोग करून बघावे लागतात आणि परिस्थितीनुसार त्यात बदल करावा लागतो. काही पालक धाकदपटशा दाखवून असे स्क्रीन-टाइमसाठीचे नियम बनवत असतात. मात्र आमच्या मते, पालकांनी वापरण्याचं सर्वात उत्तम साधन म्हणजे  संवाद. अनेकदा योग्य प्रकारे संवाद न साधल्यामुळे किंवा संवादाच्या संपूर्ण अभावामुळे गोष्टी गुंतागुंतीच्या होऊन बसतात.

आमच्या काही सत्रांना मिसो हा १२ वर्षांचा मुलगा हजर राहिला होता. त्यात माहिती घेतल्यानंतर त्यानं आपल्या घरी भावाला आणि आपल्या ५ इतर मित्रांना ‘पबजी’ हा खेळ १६ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या लोकांनीच खेळायचा असतो, हे  समजावून सांगितलं. अपरिचित व्यक्तींबरोबर आलेल्या संपर्कातून मुलांना कशा प्रकारे धमक्या मिळू शकतात, याची माहितीही त्यानं या साऱ्यांना दिली. (अशा धमक्यांबाबत आपण ‘ऑनलाइन गेम्सचं जग’च्या पहिल्या लेखात (प्रसिद्धी २१ मार्च) पाहिलंच आहे.) मिसोला मनातून या धोक्यांबाबत इतकी खात्री होती, की त्यानं आपण स्वत: आणि आपले मित्र वयाच्या

१६ व्या वर्षांपर्यंत पबजी खेळणार नाही याची खात्री करून घेतली. आमचं मत विचाराल, तर आपण मुलांना असणाऱ्या धोक्यांबाबत त्यांच्याशी नीटसा संवाद साधत नाही किंवा त्यांना ते व्यवस्थितपणे पटवून देत नाही. त्यामुळं मुलं या धोक्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून आपला ऑनलाइन गोष्टींचा वापर आहे तसाच ठेवतात. आमच्या या सत्रांनंतर शाळेत अनेक लहान मुलांनी आपल्या वयानुरूप ऑनलाइन गेम्स खेळण्याचं आणि आपला स्क्रीन-टाइम कमी करण्याचं वचन आम्हाला दिलं.

पालकांनी एक गोष्ट माहीत करून घेतली पाहिजे, ती म्हणजे प्रत्येक ऑनलाइन गेमला तो कोणत्या वयात खेळणं योग्य आहे, याचं मानांकन (रेटिंग) दिलेलं असतं. अनेकदा पालक त्या मानांकनाकडं दुर्लक्ष करतात किंवा त्यांना याबाबतची माहितीच नसते. सर्व ऑनलाइन गेम्सना किंवा आशयाला ‘इंटरनेट कन्टेन्ट रेटिंग असोसिएशन’ या संस्थेनं वयानुसार आणि आशयानुसार मानांकन दिलेलं असतं. म्हणजेच प्रत्येक ऑनलाइन गेम कुठल्या वयाला योग्य आहे, त्यामध्ये हिंसाचार, नग्नता आणि लैंगिक आशय किती आहे, त्यात कशा प्रकारची भाषा वापरलेली आहे यानुसार त्याचं रेटिंग ठरवलं जातं. मुलांना एखादा ऑनलाइन गेम खेळू देण्याआधी अशा महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना त्यांना वाचायला देणं महत्त्वाचं आहे. त्यामुळं इंटरनेटवरील योग्य आशय निवडायला त्यांना मदत होईल.

अमेरिका आणि इंग्लंड  येथील अनुक्रमे esrb.org आणि pegi.org मानांकन देणाऱ्या संस्था मुलांना योग्य असणाऱ्या आशयानुसार तसं रेटिंग देत असतात. मुलं पूर्वप्राथमिक वर्गात असतानाच अशा प्रकारची जागरूकता किंवा शिक्षण पालकांसाठी सक्तीचं केलं गेलं पाहिजे. यामुळं त्यांना आपल्या पाल्याचं वर्तन लहानपणापासूनच योग्य मार्गावर असेल याची खबरदारी घेता येईल.

आशिका नावाच्या एका ११ वर्षांच्या मुलीनं आम्हाला एका गोष्टीचं वचन दिलं आहे, ते म्हणजे आपण आपले पालक, सगळी चुलत, मावस भावंडं आणि मित्रमैत्रिणी यांना सुरक्षितरीत्या व जबाबदारीनं ऑनलाइन गेमिंग कसं करावं याबद्दल जागृत करू. अनोळखी व्यक्तींसोबत चॅटिंग करण्यात असणारे धोके, मुलं ऑनलाइन जगतात कशी सहज बळी पडू शकतात आणि सुरक्षित राहण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत या सगळ्याची माहिती तिनं या लोकांना दिली. आशिकानं आपल्या ८ मित्रमैत्रिणींना सुरक्षिततेबाबतच्या मार्गदर्शक सूचना नीट समजावून सांगितल्या. स्वत:चं आणि आपल्या मित्रमैत्रिणींचं ऑनलाइन जगतातील धोक्यांपासून संरक्षण करण्यासाठी मिळालेल्या या नव्याच जबाबदारीमुळं ती अगदी आनंदून गेलेली आहे. तिला जागरूक करण्यात आमच्याबरोबर तिच्या शाळेनंही मदत केलेली आहे.

आणखी एक उदाहरण- एका शाळेतल्या पालक शिक्षक सभेत आम्हीदेखील सहभागी झालो होतो. तिथल्या पालकांनी व मुख्याध्यापकांनी आम्हाला मुद्दाम आमंत्रित केलं गेलं होतं. हे सत्र आयोजित केल्याबद्दल  ठाकूर दाम्पत्यांनं मुख्याध्यापकांचे आभार मानले. आमचे विशेष आभार मानण्याचं कारण म्हणजे त्या शाळेत आम्ही आधी सत्र घेतल्यानंतर  ठाकूर यांच्या १४ वर्षांच्या मुलानं, महिषनं आपल्या गेमिंगवर स्वत:च नियंत्रण आणलं होतं. महिषमध्ये झालेला हा आमूलाग्र बदल बघून दोघेही पालक चकित झाले होते.

प्रत्येकच मुलाला कुठली ना कुठली दैवी देणगी असते. त्यातच तंत्रज्ञानाचं युग आता नव्या शिखरावर पोहोचलं आहे. या काळात जन्माला येणं हे आणखीनच सुदैव. आपण मुलांना सायबर जगतातील नवनव्या गोष्टींचा शोध घेणं, नव्या गोष्टी करणं याची परवानगी दिली पाहिजे. मात्र हे करत असताना आपलं ऑनलाइन वर्तन नियंत्रित करण्यासाठी पालक आणि मुलं या दोहोंनीही सुरक्षिततेसाठीच्या गोष्टी समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सायबर जगतात प्रत्येक जणच कुठं ना कुठं बळी पडण्याची शक्यता असते. प्रत्येक स्मार्ट उपकरण हॅक होऊ शकतं. जेव्हा आपण मुलांना त्यांच्या मित्रांचं आणि पालकांचंही ऑनलाइन जगतात संरक्षण करण्यासाठी सक्षम बनवतो, तेव्हा तीसुद्धा अगदी निष्ठेनं काम करतात आणि अनेकदा आपल्या अपेक्षेपेक्षाही जास्त चांगली कामगिरी बजावतात. मात्र त्यांचं हे शिक्षण लवकर सुरू झालं पाहिजे.

ऑनलाइन सुरक्षिततेबाबत पालक स्वत: जितक्या लवकर जागरूक बनतील, तितक्या लवकर ते आपल्या मुलांनाही तंत्रज्ञानाच्या जगताची ओळख करून देताना बिचकणार नाहीत. आपल्या मुलांना या अद्भुत दुनियेमध्ये आत्मविश्वास व अभिमानानं वावरता येईल. होय ना?

अनुवाद – सुश्रुत कुलकर्णी