12 July 2020

News Flash

संवादातून संवाद

‘संवाद’ हे त्या काळातील लोकप्रिय सदर होते. आई व मुलगी, दोन मैत्रिणी, दोन शेजारणी अशा जोडीचा ‘संवादा’साठी उपयोग करून घेतला होता.

| February 7, 2015 01:39 am

‘संवाद’ हे त्या काळातील लोकप्रिय सदर होते. आई व मुलगी, दोन मैत्रिणी, दोन शेजारणी अशा जोडीचा ‘संवादा’साठी उपयोग करून घेतला होता. या पात्रांच्या संवादातून शैक्षणिक विषयांबरोबर सामाजिक, आरोग्य, बालसंगोपन आदी विषय संपादकांनी हाताळले.
‘टू इन्फॉर्म, टू इंटरप्रिट अ‍ॅण्ड टू एंटरटेन’ या पत्रकारितेच्या त्रिसूत्रीतील ‘टू इन्फॉर्म’ला एकोणिसाव्या शतकात अतिशय महत्त्व होते. ‘ज्ञान म्हणजे जाणून घेणे’ अशी ‘ज्ञानाची’ व्यापक व्याख्या करून ‘दिग्दर्शन’च्या रूपाने बाळशास्त्री जांभेकर यांनी ‘मराठी भाषेत सर्व विषयांचा संग्रह’ या सूत्राने नियतकालिकाचे एक प्रारूप साकार केले होते. याच सूत्राचा स्त्रियांच्या संदर्भात स्वतंत्र आविष्कार ‘सुमित्र’च्या रूपाने झाला. स्त्रियांचे शिक्षण समाजात सुरू होत होते, त्यामुळे त्याला पूरक भूमिका घेत ‘सुमित्र’ने माहिती, ज्ञान, शिक्षण स्त्रियांपर्यंत विविध रूपांत पोचविण्यास सुरुवात केली. अल्पकाळात या सूत्रात व्यापकता येत माहितीचे क्षेत्र विकसित झाले.
स्त्रियांच्या शिक्षणाला सुरुवात झाल्याविषयी संपादक पहिल्या अंकात समाधान व्यक्त करतात. होता विद्येचा प्रसार। झाले अज्ञान तें दूर।
विद्या स्त्रियांशी आवश्यक। झाले सर्वा हे दृश्य।
शाळा छापुनी (स्थापुनी) बहुत। त्यांशी आनंदे शिकवीत।
वृद्धी कराया त्यांची। योजना या ‘सुमित्र’ची।
   स्त्रियांनी स्वभाषेबरोबर इंग्रजी भाषासुद्धा शिकावी, असेही संपादक म्हणतात. तेसुद्धा १८५५ मध्ये, हे विशेषच म्हणावे लागेल. ‘याकरिता सर्व स्त्रियांनी चांगले शिकून आपल्या मुलास शिकविण्याकरिता श्रम करावेत. लहानपणीच स्वभाषा चांगली यावी, असे येथील लोकांस फार जरूर आहे. कारण आपण आपल्या भाषेचा अभ्यास करून इंग्रजी भाषेचाही अभ्यास केला पाहिजे.’
विविध विषयांची माहिती देतानासुद्धा स्त्रिया नुकत्याच शिक्षण घेऊ लागल्या आहेत. त्यासाठी सोप्या भाषेबरोबर अप्रत्यक्षरीत्या, रंजक पद्धतीने माहिती देणे आवश्यक आहे, याविषयी संपादक जागरूक होते. यासाठी माहिती या सदरात विविध विषयांची माहिती दिली. मांजर, कुत्रा, गाय, बैल इत्यादी प्राणी. कॉफी, कापूर, दालचिनी यांसारखे पदार्थ. लोखंड, सोने, कापूर, पारा, आरसा यांचे उपयोग, असे अनेक विषय हाताळले. आज हे विषय सामान्य वाटतील परंतु १८५५ मध्ये स्त्रियांच्या दृष्टीने या विषयाला महत्त्व होते.
‘संवाद’वा स्फुटलेखनाचा प्रकार अप्रत्यक्ष माहिती देण्यासाठी होता. सगुणा व पार्वतीबाई यांच्या संवादातून सामान्य ज्ञान, चंद्रग्रहण, समुद्राची भरती-ओहोटी, पृथ्वीवरील विविध खंड, पृथ्वीचा आस, दिशा इत्यादी विषयांची भौगोलिक माहिती दिली आहे. विषयानुसार चित्र आकृत्या यांची जोड आहे. पृथ्वीचा आस स्पष्ट करताना किनाऱ्यापासून दूर जाणारे जहाज हळूहळू लहान कसे दिसू लागते. किनाऱ्याकडे येणारे जहाज हळूहळू मोठे कसे दिसू लागते. हे चित्राच्या मदतीने स्पष्ट केले आहे. सदराची सुरुवातसुद्धा सूचकतेने केली आहे. समजा, ही शाळा शिकणारी मुलगी, पार्वतीबाई तिची अशिक्षित आई असते. एक दिवस शाळेतून आल्यावर सगुणा आईकडे सुई-दोऱ्यासाठी पैसे मागते. आई पार्वती म्हणते, ‘‘आता तू चाकरी करून नवऱ्याचे पोट भर. म्हणजे तुझ्या शिकण्याचा उपयोग होईल.’’ त्यावर सगुणा म्हणते, ‘‘चाकरी करण्यासाठीच शिकतात असे नाही. विद्येचा जसा व्यवहारात उपयोग होता, तसा तीजपासून मनास आनंद होतो व देवाने आपल्यावर किती उपकार केले आहेत. याची माहिती होते.’’ या आरंभीच्या बोलण्यातून ‘संवादा’ची सुरुवात केली आहे. ‘संवाद’ हे त्या काळातील लोकप्रिय सदर होते. आई व मुलगी याप्रमाणेच दोन स्त्रिया, दोन मैत्रिणी, दोन शेजारणी इत्यादी नावांच्या जोडीचा ‘संवादा’साठी उपयोग करून घेतला होता. सगुणी व गंगू, गुलाबबाई व शेवंताबाई, रमाबाई, सत्यभागाबाई, चिंगू-मंगू इत्यादी पात्रांच्या संवादातून पुढे शैक्षणिक विषयांबरोबर सामाजिक, आरोग्य, बालसंगोपन इत्यादी विषय संपादकांनी हाताळले गेले. ‘आर्यभगिनी’मध्ये गुलाबबाई व शेवंताबाई यांच्या संवादातून सामाजिक विषय हाताळून स्त्रियांनीच जागरूक होणे कसे आवश्यक आहे. याविषयी उपदेशही केला आहे. ‘बालविवाह’ या विषयावरील संवादात शेवंताबाई म्हणतात, ‘‘काय सांगू बाई, माझ्या मुलीचे मोठेपणी लग्न करण्यास मी तयार आहे. परंतु सासूबाई माझे काही एक आपणापुढे चालायला देत नाहीत. आतापासूनच ती लग्नाची बोलाचाली करू लागली आहेत. तुम्ही सांगता ते सर्व खरे, परंतु नाइलाज आहे बाई.’’
गुलाब- ‘‘परंतु तुमच्याकडून होईल तितकी खबरदारी ठेवावी. तुम्ही त्यात मन घातल्याशिवाय काहीच होणार नाही. त्या मुलीचे लहानपणी लग्न घेण्यास जेवढे अडथळे आणवतील तेवढे तुम्ही आणावयास तिळभर आळस करू नये.’’
स्त्री-शिक्षण, सती, पुनर्विवाह, बालविवाह इत्यादी स्त्री जीवनातील तत्कालीन प्रश्न ‘आर्यभगिनी’ मासिकाने संवादातून स्त्रियांपर्यंत पोचवले. प्रसंगी स्त्रियांचे मतही व्यक्त केले. ‘सतीबंदी’ कायदा सरकारने केला त्याबद्दल गुलाब म्हणते, ‘‘जिवंतपणी आपल्या मृत नवऱ्याबरोबर विस्तवात भाजून मरणे हे किती भयंकर आहे सरे! ही चाल सरकारने बंद केली म्हणून आपण आज दयाळू सरकारचे ऋणी असले पाहिजे!
शेवंती- ‘‘अशी दुष्ट चाल सरकारने बंद केली. म्हणून खरोखर पदोपदी आम्हांस त्याचे उपकार मानले पाहिजेत.’’
‘स्त्रीशिक्षण चंद्रिका ’ मासिकांत सगुणी आणि मंगू यांच्या संवादातून आरोग्यशास्त्राचे ज्ञान स्त्रियांना दिले. व्रत, वैकल्ये, चातुर्मासाचे नेम, उपाय इत्यादींना तेव्हा स्त्री जीवनात फार महत्त्व होते. स्त्रियांच्या मनावर धार्मिक व्रतांचा प्रभावही खूप होता, परंतु त्याविषयीची नेमकी माहिती, सामाजिक विचार ठाऊक नव्हता. परंपरेनेच स्त्रिया व्रताचे पालन करीत. ‘अबला मित्र’ मासिकाने स्त्रियांना ‘व्रतांची माहिती’ करून दिली. कथा श्रवण करणाऱ्या स्त्रिया व पूजा सांगणारे पुराणिक यांच्या जोडीला चित्र असे. हरितालिका, वटपौर्णिमा, ऋषीपंचमी इत्यादी व्रतांची माहिती असे.
स्त्रिया नुकत्याच शिकू लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन संपादक ओव्या, अभंग, दासबोधातला उतारा प्रसिद्ध करताना बरोबर अवघड शब्दांचे अर्थ देत. तसेच स्त्रियांची भाषिक तयारीसुद्धा संपादक कुशलतेने विविध प्रकारांनी करून घेत. भाषिक कोडी, उखाणे यांची स्पर्धा ठेवली जाई. कधी शैक्षणिक उखाणे देऊन अर्थ विचारला जाई. स्त्रियांनी उत्तरे पाठवावीत म्हणून संपादक आवाहन करीत. ‘स्त्री’सौंदर्य ‘लतिका’ मासिकात भाषिक उखाणा असे.
उदा.
‘बाजा नहीं, गाजा नहीं, नाचता हैं क्यू?’
घी नाही, शक्कर नही, चाटतां है क्यू?
सामाजिक प्रश्नांविषयी स्त्रियांना मनोरंजनातून माहिती व्हावी या हेतूने ‘अबला मित्र’ मासिकांत दोन महत्त्वाच्या विषयांवर क्रमश: नाटक प्रसिद्ध केले होते. ‘बालाजरठ विवाह’ म्हणजे लहान मुलीचे तिच्यापेक्षा वयाने खूप मोठय़ा असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह करून दिला जाई. तसेच ‘बालविवाह’ लहानपणीच होत असत. या दोन विषयांवर नाटकच प्रसिद्ध केले होते. ‘बालवृद्ध विवाह विडंबन’- नाटक आणि ‘बालविवाह दु:खदर्शक नाहक!’
स्त्रियांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या स्फुट कवितासुद्धा प्रसिद्ध होत.
‘सखे ज्ञानसुधा चल सेवू’ कवितेमध्ये एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला म्हणते,
संसृति नदितें सु तरि सुविधा।
पैलतीराला जाऊ।
व्यर्थ भूषणे जाणुनि दुसरी।
विद्यासंस्कृति लेवू।
स्त्रियांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून आपला वेळ रांगोळीसारख्या कामात जास्त न घालवता अभ्यासात घालवावा. ही सूचना संपादक संधी मिळताच करीत होते. ‘मुलींसाठी कणा’ या रांगोळीच्या पुस्तकाच्या परीक्षणात शेवटी संपादक लिहितात. ‘हे माझे आवडते मुली, मी तुला इतके दिवसांपर्यंत कण्याविषयी जे काही या पुस्तकात सांगितले ते तू समजलीस म्हणून मला संतोष वाटतो. आता या विषयावरून मी तुला दोन गोष्टी सांगतो. त्या तू लक्ष देऊन ऐक, सारा दिवस कण्यात (रांगोळीत) चित्र ठेवून दुसऱ्या मोठय़ा कामाची अनास्था करू नये आणि हे तुझ्यासारख्या मुलीस व मोठय़ा बायकांस फार सांभाळून केले पाहिजेस. आपला काळ अमौलिक आहे. आपले आयुष्य कण्यासारख्या हलक्या क्षणभंगुर कामात घालवावे, असे ईश्वर सांगत नाही.’’
संपादकांची कळकळीची स्त्री-शिक्षणाविषयीची भूमिका केवळ ज्ञानाशी संबंधित विषयाशी मर्यादित नव्हती. त्यामुळेच ‘शिक्षण’ विषयाच्या कक्षाही विकसित होत होत्या. स्त्रियांपुढे नवे नवे विषय येत होते. आणि ज्ञानाच्या कक्षा विस्तारत होत्या.       
 डॉ. स्वाती कर्वे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2015 1:39 am

Web Title: communication
Next Stories
1 रिक्षावाल्या मॅडम
2 याद बेहिसाब आए..
3 मन:स्थिती, स्मरणशक्ती आणि टक्केवारी
Just Now!
X