दिवाळी संपताच काही कारणानं वाईला जाणं झालं. त्या दिवशी – शुक्रवारी – उन्हं उतरताना सहज वाईच्या आसपास-कृष्णेच्या परिसरात फिरण्यासाठी, तिथल्या शाळेतल्या शिर्के सरांबरोबर बाहेर पडलो.
‘‘आधी धोम धरणावर जाऊ. तिथून पुढे बलकवडी धरण आहे, तिथे नंतर जाऊ. आवडेल तुम्हाला, नीरव, शांत परिसर,’’ शिर्के म्हणाले.
धोम धरणाचा परिसर तसा निसर्गरम्य, शांत होता. निदान त्या दिवशी तरी. पर्यटकांसाठी बोटिंगची सोय, हे आकर्षण. शहरी पर्यटकांचे दोन-तीन घोळके. बाजूला सावलीत त्यांच्या गाडय़ांच्या आसपास गप्पा छाटणारे. त्यात सिगरेट फुंकणारे – मद्यपान करणारे स्त्री-पुरुष.
‘‘इतकी मंडळी येतात इथं शहरातून?’’
‘‘तर काय.. शूटिंग होतं ना हल्ली वाईच्या आसपास. येतात ‘लोकेशन्स’ बघायला!’’
‘‘इतकं शूटिंग होतं इकडे?’’
‘भरपूर. ‘स्वदेस’ पासून ‘ओंकारा’, ‘इश्कियाँ’, ‘दबंग’,.. विचारू नका. वाई म्हणजे चित्रनगरीच होत आहे. रोजगार वाढताहेत.. प्रगती होत आहे.’’ शिर्के हसले.
‘‘प्रगती म्हणजे शहरीकरण, हेच नवं समीकरण झालंय, शिर्के. अशी प्रगती दुधारी असते. शहरीकरणाचे तोटे सावलीसारखे सोबत येतात.. कुठवर बांध घालणार?’’
‘‘आता सगळंच अर्निबध.. जाऊ द्या. वर बलकवडीवर जाऊ, चला..’’
तो परिसर खरंच नीरव शांततेचा. विस्तृत शांत जलाशयापलीकडे अस्तास जाणारा सूर्य. पाण्यात चमकणारं त्याचं सुवर्णकेशरी प्रतिबिंब.. अन् त्या पाण्यातच विद्रूप दिसणारे झाडांचे थोटके बुंधे.
‘‘पूर्वीच्या गावांतली झाडं. गाव गेलं पाण्याखाली.. बोडके बुंधे उरले!’’
‘‘गाव गेलं पाण्याखाली, म्हणजे किती घरं गेली?’’
‘‘शे-शंभर तरी गेलीच असतील..’’
‘‘मग ती माणसं, शेतजमिनी, गुरंढोरं?’’
‘‘कुठं गेली कुणाला माहीत.’’
समोरनं एक काटकुळा म्हातारबाबा गुरं-शेळ्या चारायला घेऊन चालला होता. अंगावर फाटकं लज्जावस्त्र. डोकीवर पटकुरवजा मुंडासं. हातात काठी.
शिर्केसरांनी त्याचं लक्ष वेधलं. ‘‘बाबा, या गावातले दिसताय.. पलीकडच्या गावातली किती घरं गेली हो पाण्याखाली?’’
‘‘काय की.. तरी शे-सव्वाशे गेली असतील.’’
‘‘घरं गेलेली माणसं कुठं हलवली?’’
‘‘ती लांब तिकडं फलटणच्या बाजूला गेली.’’
‘‘एवढय़ा लांब? जमीन तरी बरी आहे का तिकडं?’’
म्हातारबाबा कसंनुसं हसला.
‘‘गुरांचा चारादेखील उगवना तिथं..’’ असं म्हणून तो गुरा-शेळ्यांमागनं चालू लागला. काही क्षण शांततेत गेले..
‘‘सगळीकडे तेच. विस्थापित माणसं, विस्थापित खेडी. जाऊ द्या.’’
एका खडकावर बसल्यावर शिर्के उत्साहानं म्हणाले, ‘‘जिवा महाला माहीत असेलच तुम्हाला?’’
‘‘शिवाजी महाराजांचा शिलेदार जिवा?’’
‘‘तोच. पलीकडच्या तीरावर त्याचं गाव. तो देवळाचा ठिपका दिसतोय ना.. त्याच्या उजव्या बाजूला. एका वरातीत दांडपट्टा फिरवताना महाराजांनी त्याला पाहिला, अन् आपल्या सैन्यात सामील करून घेतला. काय एकेक माणसं जमवली होती महाराजांनी! जात नाही की पात नाही पाहिली. पाहिलं फक्त कौशल्य अन् निष्ठा! १६५९.. साडेतीनशे र्वष झाली प्रतापगडच्या लढाईला. अफझलखान एके काळी वाईचा सुभेदार होता. त्याला या परिसराची खडान्खडा माहिती. खानाला सामोरं जायचं म्हणजे केवढं धाडस. पण महाराजांचा विश्वासच दांडगा. भेटीत खानाने दगाबाजी केल्यावर, महाराजांनी वाघनखांनी खानाचा कोथळाच बाहेर काढला, तेव्हा खानाचा संरक्षक सय्यदबंडा महाराजांवर वार करायला धावून गेला. पण प्रसंगावधान राखून, विजेच्या चपळाईनं जिवा महालानं सय्यदबंडाचा हातच तलवारीनं कलम केला! तेव्हापासून सगळे म्हणू लागले, होता जिवा म्हणून वाचला शिवा..!’’
बोलता बोलता शिर्के सर स्वत:च्या नकळत उभं राहून आविर्भाव करताना त्यांच्या नजरेत वेगळीच चमक होती!
‘‘तुमच्या इतिहास शिकवण्यावर विद्यार्थी जाम खूश असणार, शिर्के सर!’’ शिर्के भानावर आले. ओशाळून म्हणाले,
‘‘आता नुसता इतिहासच उगाळायचा. वर्तमानात तर सगळीकडेच असंतोष, लोभ-लाचारी.. भविष्यकाळाची तर कल्पनादेखील करवत नाही.’’
‘‘लोभ-लाचारी तर सदासर्वकाळ असतेच. महाराजांनादेखील त्याविरुद्ध लढावं लागलं स्वकीयांशीच. कठोर कायदे करावे लागले.. रयतेवर अन्याय न होईल याची खबरदारी घेतली.. प्रगती म्हणजे वेगळं काय असतं, शिर्के?’’
‘‘जाऊ द्या.. तो काळ गेला, ती माणसं गेली. आता फक्त मुखवटे उरलेत!’’ शिर्के विषादानं म्हणाले. चालता चालता क्षणभर थांबले. अन् वर पाहत म्हणाले,
‘‘तो शिखरावर महाबळेश्वरचा केट्स पॉइंट दिसतोय? पाषाणातला झरोका.. नीड्ल पॉइंटदेखील म्हणतात त्याला. त्या झरोक्यातून तिथले पर्यटक हा खालचा नदीचा, धरणाचा भाग बघतात. धरणाखाली काय गेलं याची कल्पना कशी येणार कुणाला? तिकडचे गाइड्सदेखील कुठच्या सिनेमाचं शूटिंग कुठं झालं, ते वरून दाखवतात. शहरी पर्यटकांना काय तेवढंच हवं असतं.. विस्थापितांच्या कहाणीत कुणाला इंटरेस्ट असणार..!’’
०००
दुसऱ्या दिवशी – शनिवारी दुपारी, पुण्यात पोचलो. मुंबईला जाण्यासाठी. स्वारगेटला तुडुंब गर्दी. दुपारनंतर मुंबईकडनं बऱ्याच गाडय़ा आल्या नव्हत्या, तर मुंबईकडे सुटणार कशा? साडेपाच-सहाच्या सुमारास एक्स्ट्रा सोडलेल्या स्वारगेट-बोरिवली ‘एशियाड’मध्ये जागा मिळाली कशीबशी. बसमध्ये कुजबुज.
‘‘खरंच का साहेब गेले?’’
‘‘काही कल्पना नाही. बातम्या नाही बघितल्या.’’
‘‘पण या भागात दुकानं बंद होत आहेत.. टेन्शन आहे सगळीकडे.’’
‘‘बातमी खरी आहे. बातम्यांत जाहीर केलं मघाशीच.’’
‘‘मग मुंबईत परिस्थिती कठीणच असेल आता. ‘मातोश्री’वर तोबा गर्दी असणार.’’
‘‘मास्तर, धारावी-बांद्रा-माहीमला तुडुंब गर्दी असेल हायवेवर. बस पोचणार का बोरिवलीला?’’
‘‘जाईल हो. नका काळजी करू.’’ तिकिटं फाडताना कंडक्टरचं आश्वासन. हसमुख-आशावादी कंडक्टर, एरवी दुर्मीळ.
घाट उतरल्यावर बाजूचा प्रवासी खालापूर टोल नाक्याला उतरला. तेव्हा केबिनमधनं बाहेर येऊन कंडक्टर तिथं बसला. कुणाशी तरी मोबाइलवर बोलणं चालू. केबिनमध्ये इंजिनच्या आवाजात ऐकू येत नसणार.
‘‘..अहो भाऊ, पनवेल यायचं आहे अजून. अंधेरीला पोहोचेपर्यंत दहा-साडेदहा होतील. कुठं उतरवूं त्यांना? अंधेरी-कुर्ला रोड जंक्शनला?.. ठिकाय.’’ तेवढय़ात मागच्या एका सीटवरून एका खेडवळ वयस्क बाईंचा आवाज..
‘‘मास्तर, मुंबै आली का? कवा येनार? जिवाची भेट घालून द्या हो..’’ असं म्हणून ती हमसू लागली. तिला सोबतच्या म्हातारबाबांनी शांत केलं. ‘‘गप गप, उगी रहा. भेटंल जिवा.’’ पुन्हा पंधरा मिनिटांनी तोच प्रकार. कंडक्टर त्या मागच्या सीटकडे वळून म्हणाला,
‘‘मी बोललो तुमच्या भाच्याशी. नका काळजी करू. होईल भेट.’’
‘‘मास्तर, हा काय प्रकार आहे?’’ मी न राहवून विचारलंच.
‘‘काय सांगावं.. दोघं जणं उस्मानाबादहून पुण्यात आली, मुंबईला जाण्यासाठी. पूर्वी मुंबई कधी पाहिली नाही. खेडेगावात आयुष्य गेलं, हलाखीची परिस्थिती. त्यांचा मुलगा मुंबईत पोटापाण्यासाठी आला, हमाली करायला लागला.. तो रेल्वे अॅक्सिडेंटमध्ये गेल्याचं त्यांना पहाटे कळलं. दोघं तातडीनं उस्मानाबादहून निघाले. आठ तास प्रवास करून पुण्यापर्यंत पोचले, मुंबईला पोचणं तसंही कठीण. तरी गाडीत त्यांना बसवलं. जवळ पुरेसे पैसे नाहीत तिकिटाचे.. त्यांनी त्यांच्या मुंबईच्या भाच्याचा मोबाइल नंबर चिठोऱ्यावर आणला होता, त्यावरून मला फोन करायला सांगितलं. गाडी सुरू होताच मी केला फोन. मघाशी त्या भाच्याचाच फोन होता.. कधी पोचणार मामा-मामी? आता काय उत्तर देणार? ती मंडळी तरी कुठवर थांबणार? आई-बापाची भेट झाल्याशिवाय पुढचं क्रियाकर्म कसं होणार.. सगळीच पंचाईत, आई तर सतत मुसमुसतेय गाडीत बसल्यापास्नं.. जिवाची भेट घालून द्याहो! काय करावं?’’
‘‘ट्रॅफिक जॅम असेल तर अंधेरीला पोहोचणं कठीण.’’
‘‘तर काय.. सगळंच कठीण.’’
‘‘त्यांच्याजवळ पुरेसे पैसे नव्हते.. मग तिकिटाचं कसं..’’
‘‘त्यांचा गेलेला ‘जिवा’ कदाचित माझ्या एवढाच असेल ना..?’’
कंडक्टर उदासवाणं हसला. मान वळवून खिडकीबाहेर अंधारात पाहू लागला. युनिफॉर्मच्या पट्टीवर नाव दिसलं, ‘शिवाजी धोमकर.’
‘‘तुम्ही वाईचे का?’’
‘‘तसं मूळ वाईचंच. धोम धरणाजवळ आमचं गाव होतं.. गेलं धरणाच्या पाण्याखाली. विस्थापितांना जागा मिळाली – पर्यायी जागा – फलटणजवळ. आता फलटण हेच आमचं गाव.’’
‘‘त्यांची जिवाशी भेट होईपर्यंत तुमच्या जिवाला घोर.’’
‘‘इथवर आलेत तर भेट नक्की होईल. बोरिवलीला पोचल्यावर त्या भाच्याला फोन करीनच की.. कोण कुठला हा भाचा, त्याचे हे मामा-मामी, त्यांचा जग सोडून गेलेला मुलगा जिवा, अन् कुठला मी.. कुठला हा संबंध?’’
‘‘हा संबंध माणुसकीचा. भेट होईल तेव्हा जिवाच्या आईबापांसाठी तरी तो असेलच. होता शिवा म्हणून भेटला जिवा, असंच होईल!’’
‘‘छे: छे:, काही तरीच काय दादा, शिवाजी महाराज काय, जिवा महाला काय, मोठी-माणसं, इतिहास घडविणारी, आम्ही साधी माणसं!’’
‘‘.. वर्तमान सुसह्य़ करणारी. स्वार्थ-लोभ-लाचारीच्या लोंढय़ापुढे हद्दपार-विस्थापित झालीय, साधी माणुसकी.. ‘जिवा-शिवाची’ भेट होण्याइतकी दुर्मीळ झालीय!’’
कंडक्टर-शिवाजी धोमकर-पुसटसा हसला. पटल्यासारखं. अन् भानावर येत, उठून मागं वळून ‘टाळी’ दिली-
‘‘मावशी, नेरूळला उतरायचंय ना.. मग पुढं या, सावकाश..’’
०००
तिसऱ्या दिवशी रविवार.
छोटय़ा पडद्यावर महाअंत्ययात्रा.
डोक्यात दोन दिवसांचं घटनाचक्र.
गाव-खेडय़ाचं विद्रूप शहरीकरण म्हणजे प्रगती. विकासासाठी धरणग्रस्त विस्थापित माणसं, हक्काचं घर, जमिनीचा तुकडा, सर्वस्व गमावून बसलेली. शिवाच्या आईबापांसारखी.
कानाकोपऱ्यातल्या खेडेगावातून मुंबईकडे पोटासाठी धावणारीदेखील विस्थापित माणसंच.. जिवासारखी. त्याच्या ‘अखेरच्या भेटी’साठी जिवाच्या आकांतानं मुंबईकडे धाव घेणारे जिवाचे आई-बाप.. झाली असेल भेट?