29 February 2020

News Flash

मी शाळा बोलतेय! : चिंतन बैठक

शाळेच्या लक्षात आलं, प्रत्येक व्यक्ती ही एक विलक्षण ताकद असलेलं ऊर्जाकेंद्र आहे. दर शनिवारी शिक्षकांचा गट जसा एकत्र जमतो. नेहमीच्या विषयांपलीकडे जाऊन मांडणी करतो तसेच

| October 4, 2014 01:01 am

शाळेच्या लक्षात आलं, प्रत्येक व्यक्ती ही एक विलक्षण ताकद असलेलं ऊर्जाकेंद्र आहे. दर शनिवारी शिक्षकांचा गट जसा एकत्र जमतो. नेहमीच्या विषयांपलीकडे जाऊन मांडणी करतो तसेच गट मुलांचे तयार झाले. विचारांतली समृद्धता हीही मानव संसाधन विकासाची एक बाजू शाळेने चांगलीच संपन्न केली. नव्याचा शोध नि जुन्यातलं चांगलं पकडून ठेवता येऊ लागलं.
शाळा म्हणाली, ‘दचकलात का.. चिंतन बैठक म्हटल्यावर?  हे गंभीर आहेही नि नाहीही. पण दचकण्यासारखं काहीही नाही. इतके दिवस आपण मुलांबद्दल बोलत होतो नि अजूनही खूप बोलता येईल. आपण बोलणार आहोत शिक्षकांबद्दल. आता थोडं दचकायला हरकत नाही..’’  
शाळेच्या अनेक मैत्रिणींनी तिच्याकडे आपलं मन मोकळं केलं होतं.  ‘‘अगं, काय सांगू तुला? बघ माझे सगळे कोपरे कसे रंगून गेलेत पिचकाऱ्यांनी. मुलं बघतात नि मुलांचा शब्दांवरचा विश्वास उडतो. मुलं अशा अनेक गोष्टी बघतात घरातही! नि घरातल्या माणसांवरचा विश्वास उडतो मुलांचा! अवतीभवतीचं तर सोडूनच द्यावं मग! अस्वच्छता कशी करायची हेच मग सोप्या पद्धतीनं मुलं शिकतात.. खरं तर हे शिकावंच लागत नाही. खूप वाईट वाटतं आम्हाला.. सगळेच असे कसे? शब्द जगण्यात नसतील तर मुलांनी विश्वास, श्रद्धा का ठेवायची?..’’
ही शाळा म्हणाली, ‘‘समजतंय आणि दिसतंयही.. गंमत सांगू,  श्रद्धा, विश्वास ठेवा, काळ बदलला आहे. पूर्वी शिक्षक असणं याला एक वेगळं मूल्य होतं. आता अनेकजणांसाठी ही फक्त नोकरी आहे. त्याबद्दलही वेगळं बोलता येईल. निर्माण झालेले प्रश्न आपण तसेच ठेवतो की उत्तरे शोधतो? माझ्यातल्या माणसांनी काही प्रश्नांना उत्तरं शोधली आहेत. ती उत्तरं आपण समजून घेऊ.’’
बाकीच्या शाळा शांत झाल्या. प्रश्नांचा कलकलाट होतो नि निर्माण काहीच होत नाही. उगाचच वेळ जातो. असंच घडतं. सगळय़ा अपेक्षा मुलांकडून. सगळय़ा टीकाटिप्पणी मुलांवर. सगळे शेरे मुलांवर. याला जबाबदार फक्त मुलंच असतात? अजिबात नाही. उलट मुलांचं वागणं मोठय़ांच्या वागण्याचा आरसा असतो. शाळा- प्रत्येक शाळा ही एचआरडीचं केंद्र आहे. मानव संसाधन विकास केंद्र. तिच्याशी निगडित सर्व माणसांचं विकास केंद्र आहे आणि विकास ही थांबणारी प्रक्रिया आहे.
सगळय़ाच शाळा गंभीर झाल्या. शाळा म्हणजे इयत्ता नि शाळा म्हणजे पुस्तकं, परीक्षा, याच चक्रात सगळय़ा शाळा कमी जास्त प्रमाणात अडकलेल्या असतात. काय करायचं? नि एचआरडी म्हणजे नक्की करायचं काय? या प्रश्नाची  उत्तरं या शाळेनं दिली.
 गोष्टी सोप्या असतात, पण त्या शिकायच्या असतात हेच कळलं नाही तर आजूबाजूला कच्चा माल असूनही वाया जातो. या शाळेनं नेमकं हेच ओळखलं. मुलांना काय काय येतं हे कुठं माहीत असतं? इथून सुरुवात झाली या शाळेत. जे शिकवतात ते शिकणारे झाले नि शिकणारे शिकवू लागले. एखादा पक्षी ओळखायचा असो, वनस्पती ओळखायची असो, पावसाची दिशा ओळखणं असते, प्राण्यांचा स्वभाव असो.. अशा किती तरी गोष्टी मुलांना खूप माहीत होत्या. पानांची नक्षी, पानांच्या वस्तू, पानांचे पंखे, पानांचे बाऊल.. आणि हे सर्व काही मुलं सहज करत होती. गावातले रिवाज, रूढी, परंपरा, लोककला.. एवढा साठा जमा झाला की काही विचारू नका! शाळेला हे सर्व काही बघताना फारच आनंद होता. विविध कारणांनी शाळा हे सर्व जाणून घेत होती. हे सारं जसं समजून घेतलं गेलं तसं या सगळय़ांना व्यासपीठही शाळेनं मिळवून दिलं. आपल्यात खूप काही शक्ती आहे हे मुलांच्या लक्षात आलं.
एक दिवस शाळेत ‘पुस्तकबाग’ करायची ठरली. पुस्तकबाग म्हणजे अशी जागा की जिथं मुलं मनसोक्त वाचू शकतील. पडून, कट्टय़ावर बसून, गवतात लोळत पाया तयार झाला. खर्चाचं काय करायचे? कमरे एवढय़ा भिंती घालू नि मग वर कुडून घ्यायचं ठरलं. एक मुलगा म्हणाला, ‘‘आपण माडाचे झाप विणू. मला येतात विणता.’’ झाप मिळाले. मग हिरवे झाप, सुकलेले झाप, यांच्या खूप नक्ष्या तयार झाल्या. छोटय़ा-छोटय़ा भोकातून प्रकाशाचे ठिपके बागभर चमकू झाले. इतर मुलंही यात सहभागी झाली. यालाच तर म्हणायचं प्रश्नाचं उत्तर, मुलांचं मुलांनी शोधणं. सातवीच्या मुलांनी याचा पाठ तयार केला. पानांची गुंफण कशी करायची हे मुलं मुलांची शिकली.
 एकदा का कौशल्याचा विकास झाला की मग मुलं झेप घेतात. या शाळेतली मुलं ‘ऊर्जा’ शिकताना त्यांनी त्यांच्या मनाने वेगवेगळय़ा वस्तू बनवायला सुरुवात केली. एलईडीचा वापर कसा करतात हे मुले शिकत होती. मुलांनी स्टडी टेबल बनवलं, टेबललॅम्प बनवला, बॅटरीज बनवल्या. मुलांना वाटलं बॅटरी हातात धरावी लागते. एक हात अडकतो. डोक्याला लावायचा दिवा (Head-lamp) तयार करू या. इतकी कल्पकता मुलांनी वापरली की सुंदर असा हेडलॅम्प झाला. तयार आहे ते पुन्हा वाचण्यापेक्षा नि अभ्यासण्यापेक्षा आपणच नवनिर्माण करू या, ही प्रेरणा सगळय़ांनाच खूप काही देऊन गेली. ‘आम्ही ठरवू आम्हाला काय शिकायचं ते!’ हेच जणू मुलांचं भावविश्व बनलं.
मुलांमध्ये असलेल्या स्रोतांना प्रवाहित करणं, म्हणजेच त्यांच्यातली कौशल्ये समजून त्यांना आकार देणं हे या शाळेत घडू लागलं. यात मजा होती. ‘मी विचार करतोय’, ‘मी विचार करून सांगेन’, ‘मला विचार करायला हवा’ अशी वाक्ये मुलांच्या तोंडून येण्यासाठी खूप काम केलं शाळेनं. यासाठी बाहेरून कुणाला का बोलवायचं? असा विचार सुरू झाला. खरं तर इतकी माणसं, इतके शिक्षक इथं असताना दुसऱ्यांना बोलवायची गरज काय? या शिक्षकांनाच चाकोरीतून बाहेर काढायला हवं. मुलांसमोर असणारी माणसं जर ‘यांत्रिक’, ‘चाकोरी’ असली तर ती मुलांना कशी समजून घेणार? इथूनच सुरुवात होते, ‘मला काय वाटतं ते तुम्ही ऐकायची.’ आणि त्यामुळे ‘मुलांना काय वाटतं’ हे थांबतच.
शाळेनं विचार केला. खूप विचार केला. शाळेच्या लक्षात आलं इथल्या माणसांत खूप काही आहे. फक्त त्याचा वापर होत नाही, उपयोग होत नाही, त्यावरचा तजेला गेलाय. यावरच काम करू या. इथली माणसं, शिक्षक, पुस्तकं, इयत्ता, वर्ग, परीक्षा यातच अडकण्याआधी काम सुरू करायला हवं होतं. त्या कामाची सुरुवात मजेशीर झाली. सामान्यत: शिक्षक म्हणजे अमुक विषय शिकवणारी ही शैक्षणिक पात्रता असणारी व्यक्ती. मुलं आपल्या शिक्षकांची ओळख देताना एवढंच सांगू लागली, ‘‘हे आमचे गणिताचे सर. ते गणित छान शिकवतात. ते कडक आहेत. ते मला खूप आवडतात’’ तर कधी ‘हा विषय या बाई शिकवतात. त्या अमुक ठिकाणी राहतात.’ असं सांगू लागली. इथेच ओळख संपवायची नव्हती या शाळेला! आंतरवर्गीय मुलाखती सुरू झाल्या. विषय शिकवणं या व्यतिरिक्त मुलांनी प्रश्न विचारावे नि वेगळी ओळख व्हावी हा हेतू होता. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी, जगणं, अनुभव, गाव, छंद, विचार, मतं मुलांना जाणून घेता आली नि समोरचा माणूस वा शिक्षक समजून घ्यायची प्रक्रिया सुरू झाली. कोणाकडून कोणती समस्या सुटण्यासाठी मदत होईल हे मुलांना जाणता आलं. त्यामुळे त्या त्या वर्गाला शिकवणारी ती नुसती एक व्यक्ती उरली नाही  शिक्षक ही व्यक्ती त्या विषयापुरती मर्यादित न राहता त्यापलीकडचं मानवी नातं निर्माण झालं.
शाळेतील अशी माणसं काही वेगळय़ा विचार प्रक्रियेसाठी एकत्र आली पाहिजेत असं वाटू लागलं. सगळी शाळाच एक विचार प्रवाह व्हायला हवा. यासाठी आधी मोठय़ा माणसांनी त्यांचं विचारक्षेत्र समृद्ध करायला हवं. एरवी शाळेतली सगळी माणसं रोबोटिक होतात. इकडून तिकडे, या वर्गातून त्या वर्गात, हा विषय कार्यक्रम, परीक्षा, वह्य़ा-पेपर तपासणे.. संपलं.
   नाही नाही! असं काय उपयोगाचं? शाळेच्या मनात आलं नि वेगळं काही घडू लागलं. दर शनिवारी शाळेच्या वेळापूर्वी सगळे शिक्षक एकत्र जमू लागलो. मुलांविषयीच्या नोंदी, निरीक्षणं, वैशिष्टय़े, गरजा नि अपेक्षा याविषयी समूहात जाहीर चर्चा सुरू झाली. नि दर शनिवारी एक विषय घेऊन प्रत्येक जण शाळेच्या संदर्भात त्याची विचारपूर्वक नि अभ्यासपूर्ण मांडणी करू लागला. त्याच त्याच पणातून सर्वजण हळूहळू बाहेर पडले. अनेक विषयांचा अभ्यास होऊ लागला. लिखाण होऊ लागलं, त्याची मांडणी होऊ लागली. विचाराचा टँक नाही तर प्रवाह निर्माण झाला. यालाच शाळा ‘चिंतन बैठक’ म्हणू लागली. वेगवेगळय़ा स्वरूपात हीच प्रक्रिया मुलांच्या बाबतीतही घडू लागली.
शाळेच्या लक्षात आलं प्रत्येक व्यक्ती ही एक विलक्षण ताकद असलेलं ऊर्जाकेंद्र आहे. दर शनिवारी शिक्षकांचा गट जसा एकत्र जमतो. नेहमीच्या विषयांपलीकडे जाऊन मांडणी करतो तसेच गट मुलांचे तयार झाले. विचारांतली समृद्धता हीही मानव संसाधन विकासाची एक बाजू शाळेने चांगलीच संपन्न केली. नव्याचा शोध नि जुन्यातलं चांगलं पकडून ठेवता येऊ लागलं. यासाठी आपली आपली एक दिशा या शाळेनं नक्की केली.

First Published on October 4, 2014 1:01 am

Web Title: contemplation meeting
Next Stories
1 ‘लक्ष्मणरेषा’
2 त्या दोघी..
3 शक्तिरूपिणी दुर्गा
X
Just Now!
X