News Flash

श्वसनावर नियंत्रण

आपल्याला मिळालेले आयुष्य किती जगायचे हे आपल्या श्वासांवर अवलंबून असते असे योगशास्त्र मानते. म्हणजेच मिळालेली श्वासांची शिदोरी आपल्याला जपून वापरायची आहे.

| October 4, 2014 01:01 am

आपल्याला मिळालेले आयुष्य किती जगायचे हे आपल्या श्वासांवर अवलंबून असते असे योगशास्त्र मानते. म्हणजेच मिळालेली श्वासांची शिदोरी आपल्याला जपून वापरायची आहे. राग, संताप, असूया अनावर झाल्यावर श्वासाची गती वाढते. ही वाढलेली श्वासाची गती कमी करण्यासाठी आपल्याला श्वसन नियंत्रण करायचे आहे. आपल्या भावभावनांचे पडसाद श्वासावर उमटत असतात. प्राणशक्तीचा स्थूल आविष्कार श्वास आहे. शरीर व मन यांना जोडणारा प्राण हा दुवा आहे.  
प्राणशक्तीला नियंत्रित करणे तितके सोपे नक्कीच नाही. म्हणूनच श्वासाला नियंत्रित करता आले, की प्राणशक्तीचे नियमन आपोआप होऊ शकेल या दृढ श्रद्धेने व निश्चयानेच साधना करायची आहे, मात्र ही साधना करताना गडबड, गोंधळ, घाई अजिबात चालणार नाही. ‘हठप्रदीपिके’त एक सुरेख उपमा दिली आहे- ज्याप्रमाणे हत्ती, वाघ, सिंह यांसारख्या श्वापदांना ताब्यात आणायचे असेल तर धीरानेच काम करावे लागते, त्याप्रमाणे श्वसनावर नियंत्रण आणताना जर गडबड केली, तर साधनेचा नाश व साधकाचा सत्यानाश ठरलेलाच आहे!
पतंजलींनी तर कहर केला आहे. यम-नियमांचे (समाजात वावरताना पाळावयाची काही पथ्ये) पालन करून आसन जय प्राप्त झाला, आयुष्यातील द्वंद्वांवर ताबा मिळविता आला, तरच आपण प्राणायाम साधनेस लायक ठरतो!
आज प्राणायामाची पूर्वतयारी थोडी अधिक करू या. आज सम-आवर्तन व दीर्घ श्वसन यांचा सराव करूयात.
प्रथम सुखासनात बसा. खुर्चीत बसलात तरी चालेल. भिंतीला पाठ टेकली तरी चालेल. डोळे शांत मिटा. पाठकणा समस्थितीत ठेवा. आता ५ आकडे मनातल्या मनात मोजत जाणिवेसह श्वास घ्या. एक क्षणभर थांबा. पुन्हा ५ आकडे मोजत श्वास सोडून द्या. आता श्वास घेताना पोट, छाती रुंदावत खोलवर श्वास घ्या. श्वास घेताना खांदेही वर उचलले जातील. १ ते ७ आकडे मोजा. आता श्वास सोडताना सावकाश खांदे खाली येतील, छाती व पोट आत खेचले जाईल. सात आकडे पूर्ण होईपर्यंत श्वास सोडला जाईल. आपली क्षमता ओलांडू नका.खा आनंदाने!  विजयी भव..
वैदेही अमोघ नवाथे   आहारतज्ज्ञ vaidehiamogh@gmail.com
दसरा / दुर्गोत्सव / विजयादशमी – कालच आपण सर्वानी आश्विन महिन्यातला एक महत्त्वाचा सण साजरा केला. या सणाचं एका वाक्यात वर्णन करायचं म्हणजे- ‘वाईटावर मिळवलेला विजय!’ मग हा उत्सव काही जण रामलीला करून साजरा करतात किंवा चामुंडेश्वरीची रथयात्रा काढून आणि आपण घरातील ‘विद्येची’ पूजा करून. भाव एकच असतो- विजयाचा, समाधानाचा आणि उत्साहाचा- आनंदाचा.
गेल्या आठवडय़ात मधुमेहावरील माझा रिसर्च जेव्हा मी पूर्णत्वाला नेला तेव्हा भारतातील विविध शहरांमधून आलेल्या आणि अमेरिकेच्या आहारतज्ज्ञांसमोर मी निग्रहाने सांगू शकले- आजार आटोक्यात येऊ  शकतात, जर आपली दैनंदिनी आणि आहार सांभाळला तर! (अर्थात परिस्थिती हाताबाहेर असेल तर नाही!) मग आज आपण बोलू या शरीरातील शत्रूंवर योग्य आहाराद्वारे विजय कसा मिळवायचा ते -खाली  दिलेले पदार्थ सर्वाना सोसतील किंवा काही आजारांमुळे चालतील असे नाही; पण सोसत / चालत  असतील तर जरूर घ्यावे. संतुलित आहारासाठी उपयुक्त असे हे अन्नघटक आहेत.
आपले १० फायटर फुड्स –
व्हिटामिन ‘क’युक्त फळे – मोसंबी, संत्री, पपनस, लिंबू, आवळा वगैरे जे जिवाणू संक्रमणविरोधात शरीर संरक्षण राखण्यासाठी मदत करतात. त्यातील फायबरमुळेही खूप फायदा होतो.  
जीवनसत्त्व ‘अ’युक्त – गाजर / बीट / लाल भोपळा /  पालक – बीट कॅरोटीन या ‘अ’ जीवनसत्त्वयुक्त फळभाज्या.  डोळ्यांसाठी तर उत्तमच; पण अजून एक आहार सैनिक.
हळद- हळदीमध्ये असलेल्या करक्यूमीनमुळे पचनसंस्था सुरक्षित राहते, ऑक्सिडेशन प्रक्रिया मंदावते जे आरोग्याच्या फायद्याचे आहे, विषारी जिवाणूनाशक मँगनीज धातू, झिंक, ‘ब’ गट जीवनसत्त्वं आणि लोहसमृद्ध अशी पिवळी हळद!
पपई- ज्यामधील पाचक द्रव्य शरीरातून विष द्रव्य बाहेर टाकायला मदत करते आणि हे फळ व्हिटामिन ‘अ’युक्त असल्याने निरोगी डोळे, त्वचा आणि पेशींच्या ऊर्जेसाठीपण उपयुक्त आहे.  
आले –  ऑक्सिडेशनविरुद्ध लढायला नेहमी तत्पर, जिवाणूनाशक, पेशींचे काम सुलभ, मळमळ किंवा भूक न लागण्यावर उत्तम!  
लसूण – लसूणदेखील एक रोगप्रतिकार करणारा योद्धा आहे. संक्रमणापासून शरीर संरक्षण आणि अ‍ॅलीसीन नावाच्या द्रव्यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. रक्तदाब आटोक्यात राहतो  आणि निरोगी कोलेस्टेरॉलची पातळी राहू शकते.  
अननस – ऊर्जा चयापचय आणि मज्जातंतू कार्यासाठी महत्त्वाचे फळ. थायामिन – व्हिटामिन ब १ आणि ब ६ युक्त. अननस आपल्या शरीरातील रोगप्रतिकार चालना प्रभावीपणे होण्यासाठी अमिनो अ‍ॅसिड्सचा वापर करण्यास मदत करतो – ब्रोमेलैन नावाच्या द्रव्यामुळे!  
प्रथिने – एक अतिशय महत्त्वाचे न्यूट्रियन्ट. वयाप्रमाणे आलेला अशक्तपणा थोडा का होईना आटोक्यात येतो. म्हणून प्रत्येक जेवणामध्ये थोडे तरी प्रोटीन असणे आवश्यक आहे – डाळी – उसळी – ताक – दही – दूध – सोयाबीन वगैरे (काही आजारांसाठी वज्र्य!)
गड्डा भाज्या – आजकाल मिळणारी ब्रोकोली किंवा फुलकोबी आणि कोबी म्हणजे गड्डा भाज्या. यकृत क्षमता वाढवतात आणि विष-द्रव्ये बाहेर टाकतात.  
बेरिज् – व्हिटॅमिन सी आणि पोलीफिनोल्स समृद्ध – रानचा मेवा – करवंद / जांभूळ / रासबेरी आदी म्हणजे बेरी-  निरोगी पेशींसाठी.
चला तर मग, सज्ज होऊ या शरीरातील अनारोग्यावर विजय मिळवण्यासाठी!संगणकाशी मत्री : ई-ग्रीटिंग्जची अनोखी दुनिया
संकलन-गीतांजली राणे –    rane.geet@gmail.com
आजी-आजोबा- तुम्हाला तुमच्या नातवंडांना कधी तरी सरप्राइज द्यावं असं वाटत असेल, तुमची मुलं किंवा नातवंडं परदेशी असतील तर त्यांना एखाद्या प्रसंगाकरिता शुभेच्छा द्याव्या वाटत असतील, तर एक अतिशय सोप्पा आणि अगदी मोफत असा पर्याय तुमच्या समोर आहे तो म्हणजे ई-ग्रीटिंग्जचा. ही ग्रीटिंग्ज पाठविण्यासाठी फक्त आवश्यकता असते ती ज्याला शुभेच्छापत्र पाठवायचे आहे त्या व्यक्तीच्या ई-मेल पत्त्याची. बरं तुम्ही कोणत्याही भाषेतील, हव्या त्या प्रसंगाची शुभेच्छापत्रे तुम्हाला हवा असलेला संदेश लिहून आपल्या व्यक्तीला पाठवू शकता. समजा या शुभेच्छापत्रांसोबत तुम्हाला एखादं गाणं किंवा म्युझिक पाठवायचं असेल तर तशीही सोय या शुभेच्छापत्रांमध्ये आहे. आणखी एक गंमत म्हणजे तुम्हाला हव्या त्या दिवशी तुम्ही हे शुभेच्छापत्र पाठवू शकता. समजा तुम्ही  आज ४ ऑक्टोबर २०१४ ला सकाळी ९ वाजता संगणकावरून शुभेच्छापत्र पाठवीत आहात, तुम्हाला हे शुभेच्छापत्र अमेरिकेत असलेल्या नातलगाला ८ ऑक्टोबर २०१४ ला रात्री १२ ला पोहचण्याच्या बेताने पाठवायचे असेल, तर तशी सूचना तिथे येते. त्या जागांवर आपल्याला हवी तारीख भरता येते. समोरच्या व्यक्तीने आपले शुभेच्छापत्र पाहिले की तुमच्या ई-मेल पत्त्यावर संदेश येतो. त्यामुळे त्या व्यक्तीने शुभेच्छापत्र पाहिल्याचे आपल्याला समजते.
www.egreetings.india.gov.in, www.123greetings.com, www.marathiecards.com, www.santabanta.com  या काही प्रसिद्ध अशा संकेतस्थळांवरून तुम्ही ई- शुभेच्छापत्र पाठवू शकता. जर तुम्ही गुगलच्या सर्च इंजिनमध्ये जाऊन शोध घेतलात तर अजूनही काही संकेतस्थळांची माहिती आपल्याला मिळू शकते. काय मग आजी-आजोबा आता पाठविणार ना सरप्राइज शुभेच्छापत्र आपल्या जिवलगांना!

आनंदाची निवृत्ती : रिकामा वेळ आता काढावा लागतो
आसावरी फडणीस
सेवानिवृत्तीनंतर आम्ही डोंबिवलीसारखी सांस्कृतिक नगरी सोडून ठाण्यात राहायला आलो. मुले लांब असल्यामुळे दोघांनीच राहायची सवय झाली असली तरी दहा वर्षांपूर्वी सेवानिवृत्तीनंतरचा वेळ कसा घालवायचा हा विचारच केला नव्हता. सोसायटीतल्या मुलींच्या आग्रहावरून मी इंग्रजीची शिक्षिका असल्यामुळे इंग्लिश स्पीकिंग क्लास सुरू केला आणि माझे पती विष्णू फडणीस यांनी कीबोर्ड वाजवायला शिकून घेतले. वेळ चांगला जात होता तरी समाजाशी अजून फारसा संपर्क वाढला नव्हता. ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन करायचे मनात होते; पण जागेचा प्रश्न होता.
कर्मधर्मसंयोगाने चार वर्षांपूर्वी आमच्या परिसरात एक लहानसा नाना-नानी पार्क तयार झाला. नगरसेवकांनी एक गार्डन कमिटी तयार केली. त्यात आम्हा दोघांना घेतले व पार्कच्या देखभालीची जबाबदारी सोपवली. आम्ही या संधीचा फायदा घेतला. परिसरातील सोसायटय़ांमध्ये जाऊन ज्येष्ठ नागरिकांशी संपर्क साधला. सुरुवातीला ३५ सभासद घेऊन ‘ओमकार ज्येष्ठ नागरिक संघाची’ स्थापना केली. फडणीस अध्यक्ष आणि मी कार्यवाह म्हणून काम पाहते. आज आमच्या रजिस्टर्ड संघाची सभासद संख्या १५० आहे.
पार्क आमच्याच ताब्यात असल्यामुळे आम्ही जवळ जवळ रोजच एकत्र जमतो. मी योगासने, प्राणायाम, व्यायाम करवून घेते. कधी एखादा जिव्हाळय़ाचा विषय घेऊन त्यावर परिसंवाद रंगतो. कधी वाचनात आलेले चांगले लेख वाचून दाखवतो, तर कधी भावगीत, भक्तिगीत आणि सिनेसंगीत यांची आम्हाला आमचं वय विसरायला लावते. कोजागिरी, दिवाळी पहाट, गुढीपाडवा, नववर्षपूर्व संध्या यांसारखे सण आम्ही अत्यंत उत्साहाने साजरे करतो. सहली आणि वर्धापन दिनाचा धूमधडाका वेगळेच चैतन्य देऊन जातो. आमचा संघ म्हणजे आमचा एक ‘परिवार’ झाला आहे. खूप मोठय़ा संस्थेत मित्रपरिवार लाभल्याने फार मोठा आनंद सर्वानाच मिळाला आहे.
या आनंदाव्यतिरिक्त समाजाभिमुख उपक्रम हाती घेतल्याचे मोठे समाधान मिळते. भ्रष्टाचारविरोधी मोर्चा, शून्य कचरा प्रकल्प, पर्यावरण संतुलन, ध्वनिप्रदूषण नियंत्रण, टीएमटी डेपोचे नूतनीकरण यांसारख्या प्रकल्पांना वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी वेळोवेळी फोटोसह प्रसिद्धी दिली.
या प्रकल्पांच्या सफलतेमुळे मला ‘फेसकॉम’च्या कोकण विभागाची महिला अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आहे. ठाणे शहराच्या ज्येष्ठ नागरिक सुरक्षा समितीवरपण माझी नियुक्ती झाली आहे. या दोन पदांमुळे ज्येष्ठ महिलांच्या आणि सर्व ज्येष्ठांच्या समस्या सोडण्यात थोडाफार हातभार लावता येतो.
आमचे घरच संघाचे कार्यालय आहे. आम्ही दोघे दिवसभर याच कामात बुडालेलो असतो. दोघांनीही संगणकाशी मैत्री करून मराठी टायपिंगही शिकून घेतले आहे ज्याचा भरपूर उपयोग संघाच्या कामासाठी होतो. आम्ही इतके व्यस्त असतो की, रिकामा वेळ काढावा लागतो. सेवानिवृत्तीनंतरही इतके व्यस्त राहू असे कधी वाटलेच नव्हते. पण प्रत्येक दिवस कारणी लागतो आहे, याचे समाधान आहे.

पुस्तक लेखनाची नवी इनिंग  
प्रा. यशवंत भावे
१ जुलै १९९० ला मी भोपाळच्या मौलाना आझाद राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थानातील ‘ह्य़ुमन रिसोर्स’ विभागाच्या अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त झालो. लगेचच भोपाळमधील ‘एम. पी. क्रॉनिकल’ आताचा ‘सेंट्रल क्रॉनिकल’ या वर्तमानपत्राचा एडिटोरियल रायटर म्हणून काम पाहू लागलो. आपण लिहिलेला अग्रलेख रोज हजारो वाचक वाचतात ही कल्पनाच फार सुखदायक होती. नुसतीच कल्पनाच नाही तर याची खात्री देणारी रोज येणारी वाचकांची पत्रे हुरूप वाढवणारी होती.
मात्र, कॉलेजच्या नोकरीत असतानाच, ‘द फर्स्ट प्राइम मिनिस्टर ऑफ इंडिया’, ‘द महात्मा अँड द मुस्लीम’ आणि ‘फ्रॉम द डेथ ऑफ शिवाजी टू डेथ ऑफ औरंगजेब, द क्रिटिकल ईयर्स’ ही तीन पुस्तके लिहिण्याचा संकल्प सोडला होता. म्हणून सेवानिवृत्तीनंतरची वर्तमानपत्राची सुखासीन नोकरी सोडून पुस्तकाकरता सामग्री गोळा करावयास सुरुवात केली. यथावकाश तिन्ही पुस्तके  प्रकाशितही झाली. दरम्यान भोपाळच्या ‘नॅशनल मेल’मध्ये ‘आंबेडकर : हेडगेवार : गांधी : द मॉडर्न हिन्दू ट्रिनिटी’ हा माझा लेख प्रसिद्ध झाला होता. हा खरे तर पुस्तकाचा विषय आहे असे अनेक मित्रांनी व प्रशंसकांनी आग्रहपूर्वक सांगितले व म्हणून ते काम पूर्ण केले.
दिल्लीचे सुप्रसिद्ध पत्रकार व कम्युनिस्ट नेते दिवंगत निखिल चक्रवर्ती यांची गाठ पडली तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांवर मराठीबाहेर विशेष वाचनीय काही मिळत नाही, अशी खंत त्यानी व्यक्त केली, म्हणून मग विसावलेली लेखणी पुन्हा सरसावली व वयाच्या ८० व्या वर्षी ‘सावरकर : मच मॅलिगन्ड अँड मिसअंडरस्टुड रिव्हॉल्युशनरी अँड फ्रीडम फायटर’ हे पुस्तक लिहिले.
ही पाचही पुस्तके दिल्लीच्या ‘नॉदर्न बुक सेंटर’ने प्रकाशित केली आहेत. माझी पत्नी इंदुमती भावे माझी प्रेरणाशक्ती आहे. तिने व मी मिळून वरील पाचही पुस्तकांचे हिन्दी अनुवादही केले आहेत. हे अनुवाद भोपाळच्या ‘अर्चना प्रकाशन’ संस्थेने प्रकाशित केले आहेत. यापैकी पहिल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद मुंबईच्या ‘मनोरमा प्रकाशन’ने प्रसिद्ध केला असून बाकीचे दोन अनुवाद ‘पद्मगंधा प्रकाशन’ यांच्याकडे प्रकाशनार्थ दिले आहेत.
 या पाचही पुस्तकांचे सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवाद व्हावे अशी आत्यंतिक इच्छा आहे व उर्वरित आयुष्य त्या दिशेने प्रयत्न करण्यासाठी घालविण्याचे आम्ही ठरवले आहे. मात्र निवृत्तीनंतरची ही लेखनाची इनिंग निर्विवादपणे आयुष्याला नवचेतना देणारी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2014 1:01 am

Web Title: control of respiration
Next Stories
1 पंचकोश संकल्पना
2 प्राणायाम
3 अन्नब्रह्म
Just Now!
X