28 September 2020

News Flash

वाणीवर संयम

जसं पाण्याला आपण जपून वापरतो तसंच वाणीदेखील जपून वापरली पाहिजे. पाणी व वाणी यांचा अपव्यय कधीच करू नये. आठवडय़ातून एक दिवस जिभेद्वारा दुप्पट उपवास करावा.

| September 20, 2014 01:01 am

जसं पाण्याला आपण जपून वापरतो तसंच वाणीदेखील जपून वापरली पाहिजे. पाणी व वाणी यांचा अपव्यय कधीच करू नये. आठवडय़ातून एक दिवस जिभेद्वारा दुप्पट उपवास करावा. बोल कसे असावेत?  युक्तियुक्त, शांतियुक्त, आदरयुक्त, स्नेहयुक्त.  जेव्हा वाणीत सत्यतेसोबत सभ्यताही असेल तेव्हाच तुमचे बोल हिरे व मोती यापेक्षा अधिक मूल्यवान मानले जातील.
आपल्याला कुणी दुखवू नये असं जेव्हा आपल्याला वाटत असतं तेव्हा आपल्या बोलण्यामुळे कुणी दुखावलं जाऊ नये, हे सांभाळण्याची जबाबदारीही आपल्यावर येते. त्यासाठी आवश्यकता असते ती एकाच गोष्टीची. बोलण्यावर.. जिभेवर संयम! चिकित्सक म्हणतात, ‘जिभेवर झालेली जखम लवकर भरून येते, पण अध्यात्म म्हणतं, जिभेद्वारा झालेली जखम लवकर भरून येत नाही. कुठल्याही गोष्टीत ‘अति करणं’ हानीकारक ठरतं. ही गोष्ट जिभेच्या बाबतीतही लागू होते. आपणास जीभ एकच दिली आहे, पण कान व डोळे मात्र दोन, याचा अर्थ असा की जेवढे बोलावे त्यापेक्षा अधिक ऐकावे व बघावे. जसं एखाद्या धावत्या ट्रेनकडे बघणं कठीण होतं, तसंच जास्त चालणाऱ्या जिभेकडून ऐकणंही त्रासदायक होतं.
जिभेला ‘जिव्हा’ का म्हणत असावेत बरं? कदाचित तिच्यात जिव्हाळय़ाचा अंश राहावा म्हणून का? एखाद्याच्या अंत:करणापर्यंत पोहचण्याचा किंवा तेथून कायमचे हद्दपार होण्याचा रस्ता या जिव्हेमार्फतच जातो. जीभ ही संवादही घडवते व विवादही. ५०-६० वर्षांपूर्वीची एक गोष्ट आठवते. पाटणा रेल्वे स्टेशनवर एक माणूस ट्रेनमध्ये चढला. त्या डब्यात काही महाविद्यालयीन मुलेही बसली होती. या मिशीधारी व्यक्तीला पाहताच ती मुलं हसू लागली. त्या व्यक्तीच्या पेहरावाबद्दल, त्यांच्या दिसण्याबद्दल आपापसात चर्चा, छे टवाळी करू लागली. तो माणूस शांतपणे त्यांचं बोलणं ऐकत गप्प बसला होता. थोडय़ा वेळाने तेथे टीसी आला. त्या मुलांकडे त्याने तिकीट मागितले. पण त्या मुलांकडे तिकीट नव्हते. साहजिकच टीसीचा पारा चढला आणि तो त्यांना नाही नाही ते बोलू लागला. इतकंच नव्हे तर त्याने त्या मुलांना डब्यातून खाली उतरायला सांगितले. सर्वासमोर आपला अपमान होताना पाहून त्या मुलांना खूपच वाईट वाटलं. ते पाहून तो माणूस उभा राहिला व टीसीला म्हणाला, ‘या मुलांना असं अपमानित करणं तुम्हाला शोभा देत नाही. ही मुले आपल्या देशाची भावी पिढी आहे. तुम्ही तिकीट बनवा मी या मुलांचे पैसे देतो. पण भाषा मात्र योग्य वापरा. तिकीट बनवलं गेलं आणि त्याचे पैसे अर्थातच त्या माणसाने दिले. गाडी जेव्हा मुगलसराय स्टेशनवर थांबली तेव्हा ‘राजेंद्रबाबू झिंदाबाद’ म्हणून फ्लॅटफॉर्मवर असलेल्या जमावाने घोषणा देण्यास आरंभ केला. ती व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद होते. ते पाहताक्षणीच त्या महाविद्यालयीन मुलांना आपण केलेल्या कृत्याबद्दल लाज वाटू लागली. आपण त्यांची टवाळी केली तरीही त्यांनी दुर्लक्ष केलं. आपण चुकीचं बोलून सगळं घालवलं पण त्यांनी योग्य ते बोलून सगळं मिळवलं, हे मुलांच्या लक्षात आलं. आपल्या जिभेवर का नियंत्रण ठेवू शकलो नाही, याचा पश्चात्ताप त्या मुलांना होऊ लागला. म्हणूनच म्हटलं जातं-
बोलो हमेशा तोलके।
हंसो दिल खोलके।
बाजारात कच्च्या व पक्क्या अशा दोन्ही रंगाचे कपडे मिळतात. रंगांची पारख करण्यासाठी त्यांना पाण्यात भिजवून, थोडंसं घासून बघितलं जातं. जो कच्च्या रंगाचा कपडा असतो, तो लागलीच त्याचा रंग सोडतो. पण पक्क्या रंगाच्या कपडय़ावर मात्र कशाचाच परिणाम होत नाही. अशाच प्रकारे अनेक चांगल्या गुणांची धारणा माणसाचं व्यक्तित्व आकर्षक बनवते. पण कधी तरी असं होतं की परिस्थिती येते व हे गुण आपल्यापासून आपल्या नकळत दूर होतात, कच्च्या रंगाच्या कपडय़ांसारखे. रामायणातील एक प्रसंग येथे नमूद करावासा वाटतो. जेव्हा लक्ष्मणाला कळतं की कैकेयीने मागितलेल्या वरदानामुळे श्रीरामाला वनवासात जावे लागणार आहे. तेव्हा ते धावतच श्रीरामांकडे येतात व चिडून म्हणतात, ‘दादा, आपणास माहीत आहे का की कैकेयीने तातांकडून आपल्या वनवास गमनासाठी वर मागितला आहे?’  हे एकून श्रीराम हसतात व लक्ष्मणास म्हणतात, ‘आधी मला हे सांग, तू माता कैकेयीला केवळ कैकेयी म्हणणं कधीपासून सुरू केलं?’ या वाक्यामुळे क्रोधाच्या अधीन झालेला लक्ष्मण लागलीच भानावर आला. याचा अर्थ काय, तर अचानक उद्भवलेल्या परिस्थितीमुळे देखील मनुष्याचा जिभेवर ताबा राहत नाही.
समग्र मानवजातीचे कल्याण कशात आहे हे स्पष्ट करताना विदूराने धृतराष्ट्राला सांगितले होते की, संपूर्ण जंगलाची, त्यातील झाडांची छाटणी केली किंवा त्याला बाणांनी मोडून टाकले, तरीही त्याला नवीन पालवी ही फुटतेच. पण या वैखरीद्वारा जो बाण चालवला जातो, त्याने जो घाव होतो तो काही केल्या लवकर भरत नाही. काठी व दगडांनी फक्त हाडं तुटतात, पण शब्दांनी मात्र मन व संबंध तुटतात. म्हणून कबीरजी म्हणतात,
मधुर वचन हे औषधि। कटू वचन हे तीर।
नदीला जेव्हा पूर येतो व ती सर्व सीमा पार करून वाहू लागते तेव्हा तिची कोणी पूजा करीत नाही. तर तिच्यापासून आपण कसं वाचू याचा विचार करतात. तसेच कोणी व्यक्ती कितीही आदरणीय का असेना, पण जर का काही बाबतीत आपली दृष्टी, वाणी, कर्म सांभाळू शकली नाही तर ती आदरास पात्र राहात नाहीत. शेक्सपियरचे शब्द आठवतात,  brevity is the soul of wit . अर्थात संक्षिप्तपणे मांडण्यात खरं शहाणपण आहे. जो जेवढं कमी बोलतो तेवढे गोड व क्षारयुक्त बोलतो व ते ऐकलेही जास्त जाते. आमच्या विद्यालयातही शिकवलं जातं, कम बोलो, धीरे बोलो, मिठा बोलो.
 अडीच इंचाची जिव्हा साडेपाच फूट माणसाला आपला दास बनवते. या जिभेला अन्न मात्र चांगलंच हवं असतं. थोडंसंही बेचव, सत्त्वहीन अन्न तिला अजिबात आवडत नाही. आजारी पडल्यावर कडू औषधांचा माराही तिला सहन होत नाही. स्थूल दृष्टीने चांगलं घेणं जसं जिभेला आवडतं तसंच चांगलं देणंही (गोड बोलणं) या जिभेला जमायला हवं. नेहमीच वकील बनणाऱ्या जिभेने आता न्यायाधीशही बनायला हवं.
   या जगात शब्दांचा प्रयोग करण्याचा खराखुरा हक्क त्याचाच आहे जो मौनाची भाषा वा मौनाचं महत्त्व जाणतो. महर्षी अरविंद घोष यांच्या आश्रमातील श्रीमाँ नेहमी म्हणायच्या, जेव्हा कोणी व्यक्ती सात दिवस गंभीर मौनव्रत पाळेल, तेव्हाच ती व्यक्ती एक तास बोलण्यासाठी समर्थ आहे असं मानलं जाईल. इतिहासात डोकावलं तर लक्षात येईल ज्यांनी वाणीवर संयम ठेवला, त्यांच्या चरित्राचं गायन आजही केलं जातंय. ते बोलल्याशिवाय अजिबात काम होणार नाही एवढंच खरं तर माणसाने बोलले पाहिजे.
कौरव-पांडवांतील समेटाचे सगळे प्रयत्न जेव्हा निष्फळ ठरले तेव्हा श्रीकृष्ण स्वत: शांतीचा प्रस्ताव घेऊन हस्तिनापूरला गेले. श्रीकृष्णाने पांडवांच्या बाजूने पाच गावे मागितली. त्यावेळी दुर्योधन श्रीकृष्णाला खूप अपशब्द बोलला. त्यावर कळस म्हणजे त्याने श्रीकृष्णाला अटक करण्याचा आदेश आपल्या सैन्याला दिला. परंतु श्रीकृष्णाने आपलं प्रकाशमान रूप दाखवलं तेव्हा सगळे बाजूला झाले. श्रीकृष्ण जेव्हा पांडवांकडे परत आले तेव्हा सगळे जण तेथे काय घडले हे जाणण्यासाठी उत्सुक होते. पण श्रीकृष्णाला माहीत होतं की जे घडलं ते तसंच्या तसं सांगितलं तर कटुता वाढेल. म्हणून श्रीकृष्णाने समेटाबद्दल फक्त ‘नाही’ म्हणून मान डोलावली, पण बोलले मात्र काही नाही.
जसं पाण्याला आपण जपून वापरतो तसंच वाणीदेखील जपून वापरली पाहिजे. जसं पाण्याला आपण जपून वापरतो तसंच वाणीदेखील जपून वापरली पाहिजे. पाणी व वाणी यांचा अपव्यय कधीच करू नये. आठवडय़ातून एक दिवस जिभेद्वारा दुप्पट उपवास करावा. बोल कसे असावेत?  युक्तियुक्त, शांतियुक्त, आदरयुक्त, स्नेहयुक्त . जेव्हा वाणीत सत्यतेसोबत सभ्यताही असेल तेव्हाच तुमचे बोल हिरे व मोती यापेक्षा अधिक मूल्यवान मानले जातील. तोडणं खूपच सोपं असतं, पण जोडणं मात्र कठीण. म्हणून जोडायचं प्रत्येक मनाला, ठेवून जिभेवर संयमाला.    
(ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकशित होणाऱ्या भाषणाचा हा अनुवादित भाग.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2014 1:01 am

Web Title: control of tongue movement with respect
टॅग Chaturang
Next Stories
1 ‘इबोला’ चे संकट
2 एकलव्य
3 परतीचं तिकीट
Just Now!
X