उमा बापट – umaajitbapat@gmail.com

‘कर्तव्य’ आणि ‘गरज नसताना मदत’ यात एक धूसर रेषा आहे. प्रत्येक भूमिका जगतानाचं कर्तव्य तर पार पाडायलाच पाहिजे, पण त्यात गरज नसताना रेंगाळणं कुठे सुरू  होतं ते ज्याचं त्याला उमगायला हवं.  आपण पालक असू, शिक्षक असू किंवा समाजातील कुणीही व्यक्ती असू, आपली ती भूमिका निभावताना समोरच्याशी आपण कसं वागतो, यावर आपली मदत ही त्या व्यक्तीचा आधार होईल, की तो आपलाच मदतीचा अनावश्यक मोह ठरेल, हे बघायला हवं. जसं एक जण रुग्णाला भेटायला दवाखान्यात जातो, म्हणून  सामाजिक प्रतिमा सांभाळायला दुसरा जातो. ती खरोखरच मदत असते का? त्यापेक्षा वेगळं काय करता येईल याचा निर्मोही संयम ठेवून विचार करायला हवा.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
decision to create an independent family is right or wrong
स्वतंत्र संसार थाटण्याचा निर्णय : समंजस की असमंजस?
chaturgrahi yoga
५० वर्षांनंतर निर्माण होतोय ‘चतुर्ग्रही योग’! या राशींचे नशीब चमकणार, शुक्र अन्, बुधच्या कृपेने मिळेल पैसा, प्रगती अन् यश

लहानपणी ऐकलेली विक्रम आणि वेताळाची गोष्ट आठवते? दर वेळी वेताळ विक्रमाला म्हणत असे, ‘‘आता जर तू बोललास तर..’’, आणि ठरवूनसुद्धा शेवटी विक्रम काही तरी बोलल्याशिवाय राहात नसे. ‘तू बोललास तर अमुक घडेल’, असं सांगूनदेखील विक्रम संयम टिकवून ठेवू शकत नसे. बोलण्याचा मोह न सुटल्यानं परत वेताळाच्या चक्रात अडकत असे. कशा ना कशाचा कधी ना कधी मोह हा सामान्य माणसासाठी स्वाभाविक असतो. त्याच बरोबरीनं  मोह झाला तरी संयम ठेवणं ही कुवतही प्रत्येक माणसामध्ये कमी अधिक प्रमाणात असते. वयाबरोबर, एखाद्या भूमिकेतून जबाबदारी घेतल्यानं आणि विशिष्ट परिस्थितीमुळे ही कुवत वाढूही शकते. सध्याच्या टाळेबंदीच्या परिस्थितीत संयमाची आणि मोह टाळण्याची कुवत वाढवण्याची संधी काही जण घेत आहेत.  प्रत्येकासाठी हा संयम वेगळ्या पातळीवरचा आहे. एखाद्या परिचारिकेसाठी तो कित्येक दिवस कुटुंबीयांना न भेटता निरलस श्रमून करोनाच्या रुग्णांची सेवा करणं हा असेल, तर कोणा गृहिणीसाठी भाजीपाला न आणता आहेत त्या जिन्नसातून स्वयंपाक करणं हा असेल.

पालकत्व निभावण्यापलीकडे पूर्णार्थानं ‘जगणं’ म्हणजे काही मोह टाळून संयम वाढवणं अशी जिकिरीची वाटचाल असते. अनेकदा अनावश्यक मदतीत गुरफटणं आणि स्वांत सुखाला कुरवाळणं अशा दोन प्रकारच्या मोहांची आपल्याला भुरळ पडली आहे, असं कदाचित जाणवतही नसतं. त्याविषयी या लेखात विचार करूयात.

पालक आणि मुलांनी एकत्र खेळण्याच्या आमच्या शिबिरांमध्ये हे उदाहरण वारंवार बघायला मिळतं.  एखादं चित्रकोडं मूल सोडवत असेल तर पालकांना एखादा तुकडा सुलट करून मुलाच्या हातात द्यायचा मोह  होतो. मुलाला स्वत:चं स्वत: चित्राचा तुकडा शोधायला जी संधी द्यावी लागते त्यासाठी पालकांना थांबावं लागतं. चित्र पूर्ण नाही झालं तर ती काही मोठी हार नाही हे पटावं लागतं.  सगळं चित्रकोडं बरोबर पूर्ण करण्याचा आणि लवकर संपवण्याचा पालकांचा अट्टहास डोकावतो. ‘ निस्पृह देणं’ या लेखात (१४ मार्च)  यासारखीच काही उदाहरणं आपण बघितली होती. मुलांनी पहिल्या फटक्यात चित्रकोडं जुळवणं महत्त्वाचं, की त्यांनी स्वत:च्या प्रयत्नांनी शिकणं महत्त्वाचं? मेहनत घेण्यावर मुलांचा विश्वास बसायला हवा असेल तर पालक, शिक्षक, समाज यांनी काय आणि कशी मदत करायची याबद्दल संयम बाळगायला लागतो. इतिहास शिकवताना धडय़ात प्रश्न उत्तरांच्या खुणा करून देणारे शिक्षक दिसतात. विज्ञानाच्या प्रयोग परीक्षेसाठी प्रयोग वही लिहून देणारे ताई, दादा घरात असतात. मित्रांनी एखाद्या मुलाला त्यांच्या गटात सामावून घेतलं नाही, तर त्या मुलाची आई शाळेत जाऊन गटातल्या मुलांची तक्रार करताना दिसते. घराबाहेर उच्चशिक्षणासाठी गेलेल्या मुलांना जीवनावश्यक गोष्टीत स्वावलंबनाचा अनुभव घेणं हे पण औपचारिक शिक्षणाइतकंच महत्त्वाचं अनौपचारिक शिक्षण असतं. पण तो अनुभव घेऊ देण्याऐवजी तरुण मुलांचे मध्यमवयीन आई-वडील ती आपलीच जबाबदारी आहे, असं मानून कामं चालू ठेवताना दिसतात. निवृत्तीनंतर  पुन्हा लेकरूवाळे वाटावेत इतकं मुला-मुलीच्या संसाराचं ओझं खांद्यावरून उतरवू न शकणारे आजी-आजोबा भेटतात. एक जण रुग्णाला भेटायला दवाखान्यात जातो, म्हणून  सामाजिक प्रतिमा सांभाळायला दुसरा जातो, तिसरा जातो. जे काही करतो आहोत ते दुसऱ्याच्या भल्यासाठी, असं वाटून गोष्टी अनावधानानेही केल्या जात असतील कदाचित. थोडा दूरवर आणि खोलात जाऊन विचार केला, तर जाणवू शकेल की दरवेळी इतकी किंवा अशी मदत गरजेची असते असं नाही. अनावश्यक मदत करण्याचा हा ‘मोह’ आहे असं वाटतं का?.. जरा थांबून, विचार करून बघू या.

‘कर्तव्य’ आणि ‘गरज नसताना मदत’ यात धूसर रेषा आहे. प्रत्येक भूमिकेचं कर्तव्य तर पार पाडायलाच पाहिजे, पण त्यात गरज नसताना रेंगाळणं कुठे सुरू होतं ते ज्याचं त्याला उमगायलाही हवं. वरच्या सर्व उदाहरणांमध्ये पालकांची, शिक्षकांची किंवा समाजातील इतर लोकांची भूमिका महत्त्वाची. ती भूमिका कशी असावी यावर ती मदत, सोबत, आधार होईल, की मोहाची छटा घेईल ते ठरेल.  जसं आपल्या मुलाकडूनही इतरांशी जुळवून घेताना काही कमी पडलं  का, यावर काम करणं, ही पण एक बाजू असू शकते. इतिहास का शिकायचा आणि इतिहासाचा अभ्यास कसा करायचा हे मुलांपर्यंत पोहोचवणं ही शिक्षकांची मुख्य भूमिका. रुग्णाला भेटायला जाण्याचा मोह टाळून नुसती बघणाऱ्यांची गर्दी करण्यापेक्षा मदतीचं अजून काय स्वरूप असू शकतं?  जसं एका आजींनी त्यांच्या शेजारचे दवाखान्यात होते तेव्हा स्वत: दवाखान्यात बघायला जाण्याऐवजी, जे नातेवाईक दवाखान्यातून रुग्णाची काळजी घेऊन ताणातून थकून घरी यायचे त्यांना गरम चहा द्यायचा, अशी मदत केली.

अनावश्यक मदतीचे काही मोह आपण पाहिले. आता स्वांत सुखाय मोहांकडे वळू या. काही सुगरण मैत्रिणी आठवतात. त्यांना त्यांच्या पाककृती चालू असताना कशाचीही लुडबुड आवडत नाही. ती तल्लीनता गरजेची असते हे मान्य. पण जेव्हा आपण सुगरण आणि आई, मैत्रीण, बायको अशा विविध भूमिका एकाच वेळी जगत असतो तेव्हा काही मोह आवरते घेता येणं हा समंजसपणा असतो.  मैत्रिणीनं केलेला पदार्थ तर उत्तम झाला होता. इतका किचकट आणि वेळखाऊ पदार्थ करताना तिचा छोटा मुलगा काय करत होता, असं विचारल्याशिवाय मला राहावलं नाही. तिच्या मते, तो मित्रांबरोबर आजूबाजूला खेळत होता. त्याच्याकडून कळलं, की त्यानं एका मित्राच्या घरी मोठय़ांचा चित्रपट पहिला होता. तो चित्रपट त्यानं त्याच्या वयाला बघायला हवा की नको यावर माझ्या मैत्रिणीनं सजग आई म्हणून विचार तरी केला होता का, कल्पना नाही. पण निदान आपण आपली हौस म्हणून जे करतो आहोत तेव्हा आपलं मूल नेमकं काय करत आहे याची कल्पना तरी असावी की नाही.. जसं एखाद्या विषयात झोकून देता येणं गरजेचं, तसं आपल्या इतर भूमिका, नातेसंबंध याचं भान ठेवणंही महत्त्वाचं.

एक मुलगी सतत अस्वस्थ असायची.  बाबाचे खूप मित्र आहेत.  कुटुंबातल्या अनेकांना तो मदत करायला जातो. दर सुट्टीच्या दिवशी त्याचे काही तरी सामाजिक कार्यक्रम असतात. हे सगळं तिला आवडायचं पण तिला गणितातल्या शंका पुरेसा  वेळ देऊनही समजावायला तो उपलब्ध नसायचाच. प्रत्यक्ष नसायचा असंही नाही. घरी असला तरी तो मनानं त्याच्या विश्वातच गुंतलेला असायचा. ती बाबाकडून शिकण्यासाठी उत्सुक असायची. बाबापर्यंत हे पोहोचत नाही, याची खंत तिला वाटत राहायची.

अनेकदा पालक फक्त पालकत्वातल्या शंका घेऊन भेटायला येतात असं नाही.  एक व्यक्ती म्हणून जगताना करिअर, कौटुंबिक  नातेसंबंध, पालकत्व हे सगळं एकमेकांत ओवलेलं असतं. त्यात नेमका कुठे आणि कसा ताण येतो आहे, हे कधी स्वत:चं  स्वत:ला उलगडेनासं होतं. अलीकडे अशा तरुण मुली भेटायला येतात. बऱ्याचदा  घरातले चौघंही जण- म्हणजे आजी, आजोबा आणि आई-बाबा आपापल्या कार्यक्षेत्रात  मग्न असतात.  घरासाठी कोणी आपल्या कामाशी तडजोड करायची, असा नवीन प्रश्न समोर येताना दिसतो. निवृत्तीच्या  वयानंतरही आपलं व्यावसायिक, शैक्षणिक  कार्यक्षेत्र चालू ठेवणारे बरेच ज्येष्ठ नागरिक आज पाहायला मिळतात. वाढलेलं आयुर्मान,  वृद्धत्वाकडे जातानाही असलेलं  आर्थिक स्वातंत्र्य या सगळ्यामुळे झुकतं माप घ्यायचं कोणी? एक तरुण आई म्हणाली, ‘‘मीच अर्धवेळ काम करते. सासूबाई त्यांचा व्यवसाय कमी करू शकत नाहीत.’’ तिच्या सासूबाईंची तब्येत चांगली आहे, त्यांना त्यांचं काम आवडतं. पण मुख्य म्हणजे आपलं काम थोडं कमी करून आता सुनेला तिचं क्षेत्र विस्तारू द्यावं, असा संयम ठेवायला हवा, असं त्यांना जाणवत नाही बहुतेक. आणखी एका मैत्रिणीची गोष्ट समजली. ती म्हणाली, ‘‘आमचे आबा नोकरीला जात नाहीत आता. ते त्यांची वेळ झाली, की फिरायला, कोणा-कोणाला भेटायला जातात. त्यांचे जे कार्यक्रम असतात ते करत राहातात. त्यांना तो मोह आवरत नाही असंच वाटतं. कधी आपणहून विचारत नाहीत, आज मी घरी थांबलो तर नातवाला सोबत होईल का? एखादी भाजी निवडली तर घरच्यांना बरं वाटेल का?’’

रोज घरी थांबा असं म्हणणं नसतं, पण जाणीव ठेवून आपला संयम कधी ठेवावा आणि मोह कसा थांबवावा हे ज्येष्ठ  नागरिकांनीही अवलोकन करायची वेळ आली आहे, असं काही प्रमाणात तरी दृश्य आहे. घरात आपण दूरचित्रवाणीवर काय पाहावं, आपल्या दैनंदिन गरजा वयाप्रमाणे, काळाप्रमाणे कशा बदलाव्या या सगळ्यात वेगवेगळे मोह दडलेले आहेत. ते ज्याचं त्यानं आधी ओळखायला शिकणं आणि मग त्यावर काबू ठेवता येणं या दोन्हींबाबत जागरूकता वाढवणं ही काळाची गरज आहे.

करिअरच्या ऐन उमेदीत, मध्य वयात आणि ज्येष्ठ नागरिक म्हणवून घेतानाही सर्व टप्प्यांवर अनावश्यक मदतीला आवरतं घेणं आणि स्व-हौशीच्या पलीकडं आधी पाहता येणं, मग त्या पलीकडं जाता येणं,  हे निरामय घरटय़ासाठी निरलस श्रमणं आहे.  न विसरता जगू या रोज एक तरी निर्मोही संयमाचा क्षण आपल्या निरामय घरटय़ात विसावण्याआधी.