डॉ. स्मिता लेले

dr.smita.lele@gmail.com

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

पूर्वी कुटुंबातील लोक एकत्र बसून जेवायचे. सुरुवातीला ‘वदनी कवळ घेता’ श्लोक म्हणायचे. भोजन म्हणजे एक प्रकारे यज्ञ करतो आहे, असा त्या वेळी विचार होता. केवळ बकाबक, गोड लागतंय म्हणून खात सुटत नव्हतो. तसेच जेवताना काही बोलायचं नाही अशी पद्धत होती. कारण प्रत्येकाने जे खातोय त्याचा आनंद जिभेसह सर्वागांनी घ्यावा, नीट चर्वण करावे आणि भोजनरस पूर्णपणे उपभोगावा. अशा प्रकारे जेवल्यास उत्तम जैविक प्रक्रिया करणाऱ्या शरीररूपी संयंत्रामध्ये अन्न हळूहळू जाते व व्यवस्थित पचून अंगी लागते.

आपल्या आयुष्यातील चटकदार खाणे काढून टाकले आणि समजा अशी जादूची गोळी तयार केली, जी घेतली की दिवसभरासाठी आपल्याला लागणारी ऊर्जा, जीवनसत्त्वं आणि उष्मांक मिळणार आहेत, तर काय होईल?  सगळं मिळूनही जीवन नीरसच होईल..  मग काय आणि कसं आणि किती खावं?  खाण्याचे दोन प्रकार पाडता येतील. श्रेयस आणि प्रेयस. श्रेयस म्हणजे योग्य ते खाणं आणि प्रेयस म्हणजे जे आपल्याला प्रिय आहे, ते खाणं. सध्याची जी विचारसरणी आहे ती म्हणजे ‘अन्न हेच औषध’!  आहार आणि विहार जर योग्य असतील तर आजारी पडण्याची वेळच येणार नाही, कसं ते जाणून घेऊ  ‘जीवन विज्ञान’ या सदरातून दर पंधरवडय़ाने.

शरीराची पूर्ण वाढ झाल्यानंतर दररोज आपल्याला अन्नाची गरज का व किती असते, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. एक ग्रॅम पाण्याचे तापमान १ डिग्री सेल्सिअस वाढविण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला १ कॅलरी म्हणतात. १००० कॅलरी म्हणजे १ फूड कॅलरी. निरोगी राहायचे असेल तर दररोज अशा किती कॅलरीज आपल्या शरीराला लागतात याचा नीट अभ्यास असायला हवा.

प्रौढ व्यक्तीने शरीराची रोजच्या रोज होणारी झीज भरून काढण्यासाठी खाल्ले पाहिजे. त्याव्यतिरिक्त अन्नाची गरज असते ती शरीराचे तापमान ३७ डिग्री सेल्सिअस ठेवण्यासाठी. आपण साधे गणित मांडू शकतो, की बाहेरच्या वातावरणाचे तापमान दिवसभरात व वेगवेगळ्या जागी जरी बदलले तरी आपल्या शरीराचे तापमान हे कायम विशिष्ट पातळीवर असते. ते तसेच असावे लागते. बाहेर जेव्हा गारठा असतो (काही वेळा शून्यपेक्षा कमी डिग्री सेल्सिअस) तेव्हा बाहेरच्या व शरीराच्या तापमानातील फरक जास्त असल्यामुळे शरीराला त्या प्रमाणात अधिक ऊर्जा लागते. अशा वेळी शरीराला आहारातून अधिक कॅलरीज मिळणे गरजेचे असते. आपल्याकडे, विशेषत: मुंबईसारख्या ठिकाणी बरेचदा बाहेरचे आणि शरीराचे तापमान याच्यात फक्त ५ ते १० डिग्री सेल्सिअस फरक असतो. परदेशात हा फरक १० डिग्री, २० डिग्री, ४० सुद्धा असू शकतो. त्यामुळे थंड प्रदेशात बऱ्याचशा कॅलरीज शरीराचे तापमान राखण्यासाठी लागतात. त्याची आपल्याला गरज नाही. त्यामुळे सरसकट जे २००० कॅलरीज् खा, ३००० कॅलरीज खा, असे स्त्री-पुरुषांना सांगण्यात येते, ते आकडे खूप फुगवलेले आहेत. म्हणूनच आपल्याकडे स्थूलतेचे प्रमाण वाढत चालले आहे.

दुसरा वैज्ञानिक मुद्दा असा की, अन्नग्रहणासाठी शरीराचे क्षेत्रफळदेखील लक्षात घेतले पाहिजे. ताटामध्ये वाढलेला गरम वाफेचा भात पसरला की पटकन गार होतो. त्याप्रमाणे अधिक क्षेत्रफळाच्या शरीरातून वातावरणामध्ये फेकली जाणारी उष्णता जास्त असते. शिवाय ज्या भागात जास्तीचे क्षेत्रफळ मुद्दाम निर्माण केले जाते त्या ठिकाणी उष्णतेचे वहन अधिक होते. मोटारसायकलच्या इंजिनाचे उदाहरण घेऊ- इंजिन लवकर थंड व्हावे म्हणून त्याच्या बाहेरच्या बाजूला पट्टय़ा दिलेल्या असतात. वाढीव पृष्ठभागामधून उष्णता लवकर फेकली जाते. आपल्या तळपायांना, तळहाताला किंवा काही जणांना नाकाच्या शेंडय़ाला अथवा कानाला जास्त थंडी वाजते. पृष्ठफळ जेवढे जास्त तेवढे उष्णतेचे वहन/संक्रमण जास्त. अमेरिकी पुरुषांची उंची सरासरी  ६ फूट असते आणि आपले सरासरी आकारमान आहे ५.५० फूट. विशेषत: महाराष्ट्रात मध्यम बांधा असल्यामुळे शरीराचे क्षेत्रफळसुद्धा कमी असते. जास्तीचे सरासरी आकारमान आपले नाही. म्हणजेच आपल्याला शरीराचे तापमान राखण्यासाठी जेवढे खाल्ले जाते तेवढी गरज आपल्याकडे नाही.

आतापर्यंत आपण कॅलरी म्हणजे काय हे पाहिले. कॅलरीची आवश्यकता बघताना ‘पदार्थ विज्ञान’ दृष्टिकोन ठेवला; पण आपण किती खाल्ले पाहिजे आणि आपल्या शरीराला त्याची गरज आहे का हे बघताना पचनाचा रासायनिक आणि जैविक भागसुद्धा लक्षात घेतला पाहिजे. प्रत्येकाचे शारीरिक, मानसिक आणि अतिसूक्ष्म गुणधर्म वेगळे असू शकतात, त्याचाही विचार करायला पाहिजे. रासायनिक भाग असा की, काही जणांचा गॅस्ट्रिक ज्युस – पोटात जे अ‍ॅसिड तयार होते – ते अतिशय तीव्र असू शकते. त्यामुळे खाद्यपदार्थाचे विघटन जठरामध्ये लवकर होते. काही जणांचे यकृत मंद काम करते. अशा वेळेला विशेषत: स्निग्ध पदार्थाच्या पचनाला जास्त वेळ लागतो. थोडक्यात, चयापचय क्रिया होण्याचा वेग वेगवेगळा असल्यामुळे तेवढाच आहार असला तरी दोन माणसांचे वजन वेगळे असू शकते व ज्याला ‘बॉडी मास इंडेक्स’ म्हणतात तो बदलतो. समजा, ४०-५० वयोगटातील, सर्वसाधारण तेवढीच उंची व जीवनपद्धती असलेले १० पुरुष असा गट तयार केला तरीसुद्धा त्यांच्या वजनामध्ये खूप फरक दिसतो. अशा वेळी आपण म्हणतो ठेवण किंवा वांशिक गुणधर्म वेगळे आहेत. आपण स्थूल असू तर एक प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे- ‘जाडा भिकारी पाहिला आहे का?’

एखादा एवढं खातो तरी तो बारीक आहे, मी तेवढंच किंवा कमी खातो तरी मी जाड कसा काय? विशेषत: स्त्रियांना असे नेहमीच वाटते. अशी तुलना योग्य ठरत नाही. आपण आपल्याशीच तुलना केली पाहिजे. कमी खाऊनसुद्धा आपण गुटगुटीत राहात असू तर खरं म्हणजे आपण त्याच्याकडे सकारात्मक पाहू शकतो. ते म्हणजे आपले शरीर अधिक उत्तम जैविक प्रक्रिया करणारे सयंत्र आहे. ‘हसा आणि लठ्ठ व्हा’ या म्हणीप्रमाणे आनंदी वृत्तीची व्यक्ती जे खाते ते अंगी लागते. आयुर्वेदामध्ये जसे ऋतुमानाप्रमाणे वेगळा आहार सांगितला आहे तसा प्रत्येकाच्या प्रकृतिमानाप्रमाणे वेगळे अन्न सेवन केले पाहिजे. कफ प्रवृत्तीचा रासायनिक अर्थ पचनाची मंदज्वलन क्रिया अधिक मंद आहे. पित्तप्रकृती असल्यास ती क्रिया जलद आहे. पित्त भरपूर आहे, त्यामुळे त्याला एक वेग आहे. वातप्रकृतीमध्ये आणखी वेगळ्या प्रकारे स्पष्टीकरण देता येईल. स्वभाव व मानसिक ताण यांचा दुष्परिणाम पचनावर होतो. काही जण खाताना मानसिकदृष्टय़ा चंचल असतात, त्यांचे खाण्यात लक्ष नसते. पूर्वी कुटुंबातील लोक एकत्र बसून जेवायचे, सुरुवातीला ‘वदनी कवळ घेता’ श्लोक म्हणायचे. भोजन म्हणजे एक प्रकारे यज्ञ करतो आहे, असा त्या वेळी विचार होता. केवळ बकाबक, गोड लागतंय म्हणून खात सुटत नव्हते. तसेच जेवताना काही बोलायचं नाही अशी पद्धत होती. कारण प्रत्येकाने जे खातोय त्याचा आनंद जिभेसह सर्वागांनी घ्यावा, नीट चर्वण करावे आणि भोजनरस पूर्णपणे उपभोगावा. अशा प्रकारे जेवल्यास उत्तम जैविक प्रक्रिया करणाऱ्या शरीररूपी सयंत्रामध्ये अन्न हळूहळू जाते व व्यवस्थित पचून अंगी लागते.

आणखी एक वैज्ञानिक माहिती तुम्हाला द्यायला आवडेल. मानवाची पचनसंस्था एखाद्या बायोरियाक्टरसारखी असते. त्याच्यामध्ये सबस्ट्रेट – लागणाऱ्या वस्तू (आपल्यासाठी अन्न म्हणू या) घालायच्या तीन पद्धती असतात. पहिली पद्धत म्हणजे बॅच प्रोसेस. एकदा सर्व माल घाला आणि जैवरासायनिक क्रिया पूर्ण झाल्यावर (८ तासांनी किंवा कदाचित एक आठवडय़ानंतर) सगळा मालमसाला बाहेर काढून वेगवेगळे पदार्थ उदा. प्रतिजैविक पेनिसिलीनसारखे औषध मिळवा. दुसरा प्रकार म्हणजे कन्टिन्युअस् रिअ‍ॅक्टर – हळूहळू सतत थोडे पदार्थ घालत राहा आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूंनी थोडे थोडे उत्पादन बाहेर काढत राहा. म्हणजे सलाइनवर ठेवलेल्या रुग्णाला तसे म्हणायला हरकत नाही. निसर्गाने मानवाला या पद्धतीचा बायोरिअ‍ॅक्टर  म्हणून तयार केलेले नाही ज्यात सतत टपटप अन्न तोंडात पडत आहे. तिसरा प्रकार असतो या दोन पद्धतीचे संयोजन. त्याला ‘फेड बॅच रिअ‍ॅक्टर’ असे म्हणतात. थोडा कच्चा माल सुरुवातीला घेऊन काही वेळ प्रक्रिया होऊन द्यायची व नंतर परत थोडा कच्चा माल आत घालायचा. असे दोन-तीन वेळा करत राहायचे व ठरावीक वेळ संपल्यानंतर सगळा मालमसाला बाहेर काढून पुढील प्रक्रिया करायची. मानवी शरीराला ‘फेड बॅच रिअ‍ॅक्टर’ म्हणायला हरकत नाही. एक दिवस हा पूर्ण बॅचचा कालावधी आहे, असे मानलं तर तीन वेळा, चार वेळा किंवा पाच वेळा कमी जास्त प्रमाणात दिवसभरात आपण अन्न खातो. जर ठरावीक वेळेची शिस्त लावली तर आरोग्य चांगले राहते. आता वेगवेगळे डाएटचे प्रकार सांगितले जातात. पोटभर खा, पण १२ तास खाऊ नका किंवा दिवसभरात चार वेळा थोडे थोडे खा. बायोरिअ‍ॅक्टरला योग्य प्रकारे चालविले तर इच्छित परिणाम (खाल्लेली गोष्ट अंगी लागणे आणि दूषित पदार्थ तयार न होणे) असे परिणाम दिसू शकतात.

कॅलरी कमी करण्यासाठी जर तुम्ही अन्न कमी खाणार असाल तर त्या पदार्थाचा सकसपणा तेवढाच असला तरी पोटात जाणारे अन्नाचे प्रमाण कमी झाल्यामुळे मिळणारी जीवनसत्त्वे, क्षार, सूक्ष्म पोषणद्रव्ये कमी होतात. समजा, गाजराची कोशिंबीर खाल्ली, गाजरे तीच आहेत, एक चमचा खाल्ली, तर ‘क्ष’ भाग जीवनसत्त्वे मिळाली आणि दोन चमचे खाल्ली तर ‘२क्ष’ मिळणार आहे. म्हणून जेव्हा मिताहार असतो तेव्हा अधिक सकस असणे आणि योग्य प्रकारे खाणे फार महत्त्वाचे. समतोल साधण्यासाठी जंक फूड कमी खाणे आणि आरोग्यकारी अन्न जास्त खाणे आवश्यक आहे. बऱ्याचदा, असा समज असतो की, आरोग्यदायी (श्रेयस) खाणे बेचव असते. जे सगळ्यांना आवडते (प्रेयस) असे पदार्थ नेहमी चमचमीत, मसालेदार, तेलातुपाने भरपूर असल्यामुळे चविष्ट असतात, हे अर्धसत्य आहे. चविष्ट आणि आरोग्यकारक खाद्यपदार्थ बनवता येतात.

आणखी एक मुद्दा म्हणजे खाल्लेल्या जीवनसत्त्वांचे शरीरामध्ये शोषण झाले आहे की तसेच बाहेर टाकले गेले? जीवनसत्त्व हे कृत्रिम रसायन (गोळ्यांच्या स्वरूपात) आहे की सजीवात्मक रसायन आहे हासुद्धा भाग महत्त्वाचा. विरुद्ध आहार आणि पदार्थाचे एकमेकांबरोबरच होणारे संयुग हा एक भाग बघायला पाहिजे. उदाहरणार्थ, गाजरात जीवनसत्त्व ‘अ’ आहे हे शाळेच्या मुलांनादेखील माहिती आहे; परंतु जीवनसत्त्व ‘अ’ पाण्यात विद्राव्य नाही, फक्त स्निग्ध पदार्थामध्ये विद्राव्य आहे हे सर्वाना माहीत नाही. कोशिंबिरीत फोडणी, शेंगदाण्याचं कूट किंवा ओले खोबरे घालण्याची मराठी पद्धत आणि परदेशात ‘सॅलड ड्रेसिंग’ची पद्धत म्हणूनच पडली आहे. यालाच म्हणता येईल पारंपरिक शहाणपण. पूर्णपणे स्निग्ध पदार्थविरहित गाजराची कोशिंबीर वाटीभर खाल्ली तरी त्यातील जीवनसत्त्व ‘अ’ शरीराला अजिबात मिळणार नाही. तेव्हा पुढच्या लेखात बघूयात ‘श्रेयस आणि प्रेयस आहार’ म्हणजे काय आणि त्याचा समतोल कसा साधायचा.