हिरव्यागार कोथिंबिरीच्या पानांनी सजलेला कोणताही पदार्थ आपलं मन वेधून घेतो. जगभर वापरली जाणारी ही कोथिंबीर केवळ सजावटीसाठीच नव्हे तर अनेक व्याधींसाठीही उपयुक्त आहे. शरीरातल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी, वाईट कोलेस्टोरॉल कमी करण्यासाठी, शरीरावरील सूज कमी करण्यासाठी कोथिंबिरीचा उपयोग होतो. कोथिंबिरीच्या स्वादाने भूक चाळवते, तसेच मळमळ, उलटी आणि पोटाच्या अनेक तक्रारींवर आणि तोंडातल्या अल्सरसाठी कोथिंबीर गुणकारी आहे. कोथिंबिरीत लोह, कॅल्शियम, मँगेनीज असून ‘अ’, ‘क’ आणि ‘के ’ जीवनसत्त्वांनी ती समृद्ध आहे. डोळ्यांच्या अनेक व्याधींवर, विशेषत: डोळे आले की कोथिंबिरीच्या रसाचा उपयोग करतात. कोथिंबिरीची केवळ पानं न वापरता कोवळी देठंही उपयोगात आणावी. मसाल्याच्या पदार्थातला एक अग्रगण्य पदार्थ म्हणून धणे ओळखले जाते शिवाय ते औषधीही आहे.
कोथिंबीर-केळं भाजी-
साहित्य : तीन वाटय़ा चिरलेली कोथिंबीर, एक मध्यम पिकलेलं केळं, दोन हिरव्या मिरच्या, १ चमचा तीळ, १ चमचा लिंबाचा रस, एक मोठा चमचा बेसन, १ चमचा कसुरी मेथी, चवीला मीठ, फोडणीसाठी एक मोठा चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद.
कृती : कोथिंबीर, बेसन, मीठ एकत्र करावं. तेलाची फोडणी करून त्यात उभ्या कापलेल्या मिरच्या आणि तीळ परतावे, लिंबाचा रस घालावा आणि कोथिंबीर घालून, ढवळून एक वाफ द्यावी, कसुरी मेथी घालावी, केळ्याचे काप मिसळावे आणि भाजी खाली उतरवावी.
वसुंधरा पर्वते – vgparvate@yahoo.com