|| सारिका कुलकर्णी

‘करोना’मध्ये ‘वर्क  फ्रॉम होम’ करणाऱ्यांना तासंतास लॅपटॉप आणि मोबाइलवर काम करताना शिणवटा येतो आहे. घरातल्या घरातच जास्तीत जास्त वेळ काढावा लागत असल्यानं अनेकांच्या जगण्यात कं टाळा, आळसाचं प्रमाण वाढू लागलं आहे. तो घालवण्यासाठी, आयुष्यात बदल, उत्साह आणण्यासाठी अनेकांनी अनेक प्रयोग के ले आहेतच, पण तरीही दिवस सरता सरत नाही, अशी अनेकांची अवस्था होत आहे.  कामात बदल, तोच-तोचपणातून बदल हा माणसाचा स्थायीभाव आहे. मनाचा शिणवटा, विचारांचं साचलेपण काढून टाकण्यासाठी प्रत्येकानं आपापल्या  ‘कॉफी बीन्स’ शोधायला हव्यात.  कोणत्या आहेत या मनाला ‘तरोताजा’ करणाऱ्या ‘कॉफी बीन्स’ ज्या तुमच्याकडे असायलाच हव्यात?…

 

‘कधी एकदा करोना जातोय असं झालंय. कंटाळा आलाय तेच तेच करून. घरात बसून काम करायचं, दोन दोन तास न हलता नुसतं लॅपटॉपसमोर बसून राहायचं…’ ही तक्रार हल्ली सर्रास ऐकायला मिळते.    कल्पना करा, आपण मस्त सहलीला- समजा, ऑस्ट्रेलियाला निघालो आहोत. विमानाचं उड्डाण झालं, दोन-तीन तास झाले आणि वैमानिक म्हणाला, ‘‘कंटाळा आला मला चालवायचा. सारखं काय नुसतं बसून राहायचं… काही हालचालच नाहीये.’’मार्च महिन्यानंतर कंपनीचं ऑडिट चालू आहे, अर्धं ऑडिट झाल्यावर लेखापाल म्हणाला, ‘‘मेंदू शिणला आकडे बघून. आता नाही करणार मी.’ सातत्यानं काम करत राहिल्यानं अकाउंटस्मध्ये होणाऱ्या चुका हा प्रकार आपल्यासाठी नवीन नाही. बऱ्याच आस्थापनांमध्ये नफा-तोट्याची गणितं त्यामुळे बदलल्याची उदाहरणंदेखील इतिहासात आहेत. संशोधनाच्या कामात मेंदूला आलेल्या शिथिलतेनंतरही आराम न मिळाल्यानं घडलेल्या दुर्घटना आपल्याला माहिती आहेत. उत्पादन क्षेत्रात तर असे अपघात बऱ्याच वेळा घडत असतात.

‘परफ्युम’च्या दुकानात बऱ्याच प्रकारचे परफ्युम्स, अत्तरं हुंगली की त्यानंतर सुवास ओळखू येत नाहीत. नाकातील रंधं्र उघडण्यासाठी आणि नंतर घेतलेला परफ्युमचा सुवास कळावा, म्हणून आपल्याला मध्येच कॉफीच्या बियांचा वास घ्यायला देतात. त्यामुळे आपण पुढच्या सुगंधाकडे नव्या उत्साहानं वळू शकतो. तेच तेच काम करून कंटाळा येणंही तसंच आहे. सारखं एकच काम केल्यानं मेंदूला थकल्यासारखं होतं, शिथिलता येते. पुढील कामावर लक्ष केंद्रित करणं अवघड जातं. बरीच क्षेत्रं अशी आहेत, की जिथे तासंतास एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावंच लागतं, महिनोन्महिने एकाच गोष्टीवर संशोधन करावं लागतं. अशा वेळी त्यातून लक्ष विचलित होणं परवडणारं नसतं. मग,अशा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती हे लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी किंवा विचलित झालेलं लक्ष पुन्हा कामावर वळवण्यासाठी काय करतात? कामातून सुट्टी घेऊन विरंगुळा शोधतात का? त्यांच्यासाठी अशा ‘कॉफी बीन्स’ कोणत्या असतात?

आपल्याकडेही आता जवळपास एक वर्षाहून अधिक काळ अनेक ऑफिसेसचं काम घरातून चाललेलं असताना आणि पुढेही बराच काळ ते तसं चालेल, अशी चिन्हं असताना प्रत्येकानं त्यांच्यासाठीच्या कॉफी बियांचा विचार करायला हवा.

वेगवेगळ्या व्यवसायात कामात बदल म्हणून अनेकविध उपाय केलेले असतात. माहिती आणि तंत्रज्ञान आस्थापनांमध्ये तर आराम करण्याच्या, खेळण्याच्या, करमणुकीच्या जागादेखील तयार के लेल्या असतात. मानसिक श्रमांबरोबर शारीरिक मेहनतही व्हावी म्हणून बऱ्याच ठिकाणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी सायकली ठेवण्यात आल्या आहेत. मनाला ताजंतवानं करण्यासाठी आस्थापनांकडूनच वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणं आयोजित केले जातात. कामातील कंटाळलेपणा जाऊन कामात एकाग्र होता यावं यासाठीचे हे प्रयत्न असतात.

बऱ्याच वेळा असंही होतं, की वर्षोनुवर्षं तेच तेच काम करून त्यातील एकाग्रता कमी होते. कामात कौशल्य प्राप्त होतं, पण काम नीरस होत जातं. यासाठी कामाचा विभाग बदलणं, क्षमतेनुसार कामाचा आवाका वाढवणं, कामाचं क्षेत्र बदलणं, दुसऱ्या शाखेत किंवा ऑफिसमध्ये बदली करणं असे उपाय केले जातात. जेणेकरून जागा बदलल्यानं, आजूबाजूचे सहकारी बदलल्यानं नाविन्याचा अनुभव घेता येईल.

वैयक्तिक पातळीवर देखील प्रत्येक माणूस स्वत:ला ओळखून क्षमतेनुसार हे बदल करतच असतो. हा बदल काय असू शकतो, हे जाणून घेण्यासाठी काही क्षेत्रातील लोकांशी गप्पा मारल्या. अशी क्षेत्रं – जिथे एकतान होऊन काम करणं ही त्या कामाची गरज असते. अशा ठिकाणी या लोकांसाठी ‘कॉफी बीन्स’ कुठल्या असतात?

‘एमएबी एव्हिएशन’चे चीफ पायलट

प्रदीप देशपांडे हे आधी भारतीय लष्करात पायलट होते आणि नंतर व्यावसायिक हवाई उड्डाण क्षेत्रात पायलट म्हणून आले. ते सांगतात, की विमान चालवताना अत्युच्च सावधगिरी, तल्लीनता लागते. सैन्यात जर मेंदूला शिथिलता आली किंवा लक्ष एखाद्या ठिकाणी केंद्रित करणं अवघड झालं तर ती परिस्थिती कशी हाताळायची याचं व्यवस्थित शिक्षण दिलेलं असतं. एखादं मिशन किंवा युद्ध चालू असताना दिलेल्या कामात कुठलाही बदल करणं अपेक्षित नसतं. अशा वेळी दिलेल्या सूचनांप्रमाणे तंतोतंत वागावं लागतं. या परिस्थितीत स्वत:ला ताजंतवानं ठेवण्यासाठी वैमानिकांना बरंच शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीचं शिक्षण दिलेलं असतं. दोन मिशन्सच्या मध्ये त्यांना खेळ, व्यवस्थापन अभ्यासक्रम, बाहेरच्या देशातील सहली असा बदल घडवला जातो. आत्मसंतुष्टता टाळण्यासाठी त्यांची विमानं बदलली जातात, वैमानिकाची भूमिका बदलून आळीपाळीनं वेगवेगळी कामं दिली जातात. काही वेळा कामाचा आवाका वाढवला जातो. वेगवेगळी आव्हानं त्यांना दिली जातात. याशिवाय प्रत्येक वैमानिकानं आपली स्वत:चीसुद्धा कामातील बदलाची वेगळी पद्धत शोधून काढलेलीच असते.

व्यावसायिक विमानामध्ये मात्र गोष्टी थोड्या बदलतात. विमानाच्या उड्डाणानंतर पहिल्या दोन तासांत खूप हालचाली असतात. ‘चेकलिस्ट’प्रमाणे सगळं तपासून झालं आणि उड्डाण केलं की मग मात्र वैमानिकाला खूप एकसुरीपणा वाटू शकतो, काम निरस होऊ शकतं. अगदी झोपसुद्धा येऊ शकते. त्यामुळे वैमानिक चार तासांनी आराम करण्याच्या ठिकाणी जाऊन विश्रांती घेऊ शकतात, करमणुकीसाठी साधनं असतील तर त्याचाही वापर करू शकतात. सगळ्या प्रवाशांचा जीव वैमानिकाच्या हातात असतो. त्यामुळे वैमानिकाला स्वत:ला मानसिकरीत्या, शारीरिकरीत्या खूप स्थिर ठेवावं लागतं. त्यासाठी त्यांना झोपेचं व्यवस्थापन कसं करावं, वेगवेगळ्या वेळेच्या विभागात कोणता आहार घ्यावा, आहाराबाबत काळजी कशी घ्यावी, या सगळ्याचं प्रशिक्षण दिलं जातं. पहाटे २ ते ६ ही वेळ झोपेसाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे जर कुठल्या           वैमानिकाच्या ड्युटीची वेळ या काळातील असेल, तर त्याच्या त्या दिवशीच्या एकू ण ड्युटीच्या वेळेत दोन तासांची कपात केली जाते. वैमानिकाला दर चौथ्या-पाचव्या मिनिटाला विमानात काहीतरी क्रिया दाखवावी लागते. ही क्रिया वैमानिक सतर्क, सावध असल्याचं दर्शवते. ती क्रिया दिसली नाही, तर ‘एअर ट्रॅफिक कं ट्रोल’कडून ‘अलर्ट’ म्हणून एक दिवा चालू केला जातो. त्या दिव्यालादेखील   (पान ४ वर) (पान १ वरून)    उत्तर मिळालं नाही, तर मात्र सतर्कतेचा अलार्म दिला जातो. असे जाणिवपूर्वक के लेले प्रयत्न म्हणजे त्या व्यक्तीसाठी कॉफीच्या बियाच!

प्रसिद्ध संगीतकार राहुल रानडे यांच्या मते, एखादी धून बनवताना किंवा एखाद्या संगीत कार्यक्रमाचं परीक्षण करताना कधीही कंटाळा येत नाही. पण गाण्याचं ‘मिक्सिंग’ करताना मात्र थोडं शिणल्यासारखं होऊ शकतं. ते सांगतात, ‘‘अशा वेळी मी सरळ स्टुडिओमधून बाहेर पडतो आणि एकच महत्त्वाची गोष्ट करतो, ती म्हणजे काहीच करत नाही! गाण्याशी संबंधित तर काहीच करत नाही. आवडीचं काही तरी करत बसतो- उदाहरणार्थ मित्राशी फोनवर गप्पा मारणं, शब्दकोडी सोडवणं. अशी कुठलीही गोष्ट, ज्याचा माझ्या चालू असलेल्या कामाशी संबंध नसेल.’’ वेगळं काम म्हणजे सगळ्यात मोठा बदल.

करोना साथीच्या काळात जिल्ह्यांचं व्यवस्थापन हे एक जिकिरीचं काम होतं. महाराष्ट्रातील ‘कमी पॉझिटिव्हिटी रेट’मुळे नावाजल्या गेलेल्या काही जिल्ह्यांतील धुळे हा एक जिल्हा. धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव यांनाही हेच विचारलं, की अशा ताणाच्या काळात स्वत:ला स्थिर ठेवणं हे खूप मोठं आव्हान असतं, ते कसं पेललं? आतापर्यंतच्या करिअरमध्ये असे क्षण आल्यावर तुम्ही बदल हवा म्हणून काय केलंत? त्यावर त्यांनी सांगितलं,  ‘‘या प्रकारची नोकरी पूर्णत: विचाराअंती निवडलेली असते. यात कुठल्या प्रकारची आव्हानं असू शकतात, याची आपल्याला कल्पना असते आणि नोकरी सुरू करताना ही कल्पना दिली जाते. शिवाय प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षणांतून मनावर संयम कसा ठेवायचा, ताणविरहित कसं जगायचं, ताण असलेली परिस्थिती शांततेनं कशी हाताळायची, यावर खूप भर दिला जातो. प्रेरणा देणारे खूपसे अभ्यासक्रम करून घेतले जातात. ‘ग्रूमिंग’ केलं जातं. शिवाय काही विशिष्ट कालावधीनंतर ही परिस्थिती हाताळण्याची आमची क्षमता वेगवेगळ्या चाचण्यांतून तपासली जाते. मानसिक, भावनिक स्थिरता चाचणी, आरोग्य तपासणी,अशा चाचण्यांना सामोरं जावं लागतं. कामाच्या आवश्यकतेनुसार भारतातील आणि बाहेरच्या देशातील काही ठिकाणी अभ्यासासाठी पाठवण्याची व्यवस्थाही केली जाते. मी स्वत: बदल म्हणून माझ्या कॉलेजच्या किंवा शाळेतल्या मित्रांशी भरपूर गप्पा मारतो, कुटुंबातील कोणाशी तरी बोलतो. ध्यान, प्राणायाम नियमितपणे करतो. मोबाईलवर काही विनोदी कार्यक्रम बघतो.’’

चार्टर्ड अकाउंटंट असलेल्या माझ्या एका मैत्रिणीनं सांगितलं, ‘‘मार्च महिन्यांनंतर आम्हाला आकडे बघावेसेच वाटत नाहीत. अशा वेळी मी २-४ दिवस आकड्यांमधून सुट्टी घेते. म्हणजे आकडे समोर येतील असं कुठलंही काम करत नाही. अगदी मुलांशी खेळलं तरी त्यात आकडे असलेला खेळ खेळत नाही. ट्रेकिंग, बाइकिंग असे बाहेर जाण्याचे छंद पुरे करून घेते.’’

विविध व्यवसायांतील, कामातील अडचणी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे त्यांच्यासाठी कामातील बदलाचे प्रकार वेगवेगळे असतात.

करोना साथीच्या परिस्थितीत बऱ्याच लोकांना घरून काम करावं लागत आहे. सतत स्क्रीनसमोर काम करून कंटाळलेपणा येतो आहे. काम करण्याच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो आहे. अशा वेळी आपल्या कामातील ‘कॉफी बीन्स’ आपल्यालाच शोधून विकसित कराव्या लागणार आहेत. आपण स्वत:ला, स्वत:च्या काम करण्याच्या क्षमतेला जेवढं जाणतो, तेवढं इतर कोणीही समजू शकत नाही. कुठे थांबायचं हे आपल्याला समजायला हवं. एवढंच नव्हे, तर महासाथ नसतानाही वयाच्या एका टप्प्यावर कितीही आवडीचं काम असलं तरी त्यातील साचलेपणा अस्वस्थ करायला लागतो. ‘मिड करियर क्रायसिस’ अनुभवणारे जगभरात अनेक लोक आहेत. करिअरच्या एखाद्या पायरीवर आपल्यातील सगळं संपलं आहे, आता यानंतर माझ्याकडून काम होणं अवघड, प्रवाहीपणा संपत चालल्याची जाणीव, कुठल्यातरी न झालेल्या कामाचा पश्चाताप किंवा दु:ख, असं वाटणं ही सगळी ‘मिड करिअर क्रायसिस’ची लक्षणं. वयाच्या चाळीशीपासून पन्नाशीपर्यंत बऱ्याचदा हे वाटत राहातं. उदासीनता दाटून येते. कमी होत गेलेले बढतीचे पर्याय, वयाचा वेगळा टप्पा, वाढलेल्या जबाबदाऱ्या, अशी बरीच कारणं त्यासाठी आहेत. पण कामातील तोचतोपणा हे त्यातील महत्त्वाचं कारण. त्यामुळे मध्यमवयीन ताण चांगल्या पद्धतीनं हाताळता आला पाहिजे. हा ताण हाताळता न आल्यामुळे  मानसिक अस्थिरता, काम सोडून देण्याची तीव्र इच्छा, चिडचिडेपणा, अनावर राग अशा बऱ्याच गोष्टींचा सामना करावा लागतो.

काही जणांच्या बाबतीत त्यामुळे गंभीर मानसिक समस्याही उद्भवतात. त्यामुळे आपल्या मनोरंजनासाठी, बदलासाठी काय हवं, याचा अभ्यास करणं, ते सक्षमपणे हाताळणं खूप गरजेचं. आयुष्याचा सुगंध सदोदित ठेवायचा असेल तर त्यासाठीच्या ‘कॉफी बीन्स’ आपल्यालाच शोधून काढायला हव्यात.

मागच्या वर्षभराचा धांडोळा घेतल्यावर ‘कॉफी बीन्स’चे हे काही पर्याय समोर आले

मी आता ज्या व्यवसायात/ नोकरीत आहे त्यात समजा मी नसतो तर मी काय केलं असतं, हा विचार बऱ्याच जणांनी केला. काही जणांना तो परिस्थितीमुळे, नोकरी जाण्याच्या भीतीनंही करावा लागला. एक मैत्रीण आता फावल्या वेळेत ऑनलाइन संस्कारवर्ग घेत आहे. तिच्या  नोकरीपेक्षाही हे काम तिला खूप आवडतंय.  पर्यायी करियर निवडण्याची ही संधी असू शकते.

मुलांबरोबर वेळ घालवत त्यांचं विश्व समजावून घेणं- एक मित्र मागच्या एका वर्षापासून रोज मुलाची अभ्यासाची पुस्तकं वाचतो. जे समजलं नाही ते मुद्दाम मुलाकडून समजावून घेतो. वडिलांना समजावून सांगायचं, म्हणून मुलाला नीट अभ्यास करावा लागतो. पण त्यामुळे त्याची अभ्यासातील प्रगती लक्षणीय आहे. यानिमित्तानं बाप-लेकदेखील जवळ आले.

आपण फक्त समोरच्याला सांगत असतो, पण आता समोरच्याचं ऐकण्यासाठी आपला कान तयार झालाय का, हे आजमावून बघण्यासाठी हा वेळ उपयोगात आणू शकतो. तुम्ही कदाचित समाजमाध्यमांवर वाचलं असेल- नेदरलँडस्मध्ये एक माणसांची ‘लायब्ररी’ आहे. तिथे पुस्तकांच्या ऐवजी माणसं वाचायची असतात. तिथे जायचं, ज्या क्षेत्रातील माणूस हवा असेल त्याची वेळ घेतली की तो येऊन आपले अनुभव आपल्याला सांगून जातो. अशा पद्धतीनं कोणी आपलं आणि आपण कोणाचं पुस्तक झालो तर?

कुटुंबातील करोनानं गेलेल्या माणसांच्या स्मृतीमुळे किंवा करोनामुळे स्वत:च्या झालेल्या अपरिमित शारीरिक दौर्बल्यानं हताश झालेल्या लोकांना समुपदेशन करायचं काम मधल्या वेळात एका मित्रानं हाती घेतलं. अशा लोकांशी तो फक्त फोन करून गप्पा मारतो.

कामाच्या ठिकाणाचं ‘गेमिफिके शन’ हा एक नवीन पर्याय ‘कॉफी बीन्स’ म्हणून बराच अवलंबला जातो आहे. कामाच्याच आजूबाजूला ‘गेमिंग एलिमेंटस्’ तयार करणं, वाढवणं अनेकदा सोईचं असतं. नवीन कोडी, ब्रेन गेम्स, ताण कमी करणारे छोटे खेळ आजूबाजूला ठेवून काम करायचं. कामाचा ताण आला, की मधल्या वेळेत  त्यातील एक खेळ खेळून घ्यायचा. कामातील उत्साह टिकून राहाण्यासाठी याची खूप मदत होते.

काम सुरू करायच्या आणि संपवायच्या वेळा अधेमध्ये बदलत राहिल्या तर मोठा बदल झाल्याचा आनंद मनाला मिळतो. घरातील रचना बदलल्यावर जसं घर नवीन वाटतं तसंच कामाच्या पद्धतीत आणि वेळेत थोडासा बदल केला, तर त्यातील तोचतोपणा काही अंशी कमी होण्याची शक्यता असते.

(लेखिका ‘एक्स्पोनेन्शिया लर्निंग सोल्युशन्स प्रा. लि.’या मनुष्यबळ विकास कंपनीच्या संचालिका आहेत.)

sarikachatuphale.kulkarni@gmail.com