प्रतिभा गोपुजकर – gopujkars@hotmail.com

आली माझ्या घरी (ही) दिवाळी.. म्हणताना यंदाची ही म्हणजे करोनाकाळातली दिवाळी अनेकांसाठी परीक्षा पाहाणारी आहे. तरीही काळोखभरल्या बोगद्यानंतर उजेडाकडे नेणारी वाट येतेच या आशेवरच तर आपण तो बोगदा पार करत असतो. करोनाचा कहर कमी होताना दिसतो आहे, बोगदा संपत आल्याची ही जाणीव अनेकांना दिवाळीची सुखद जाणीव देणारी आहे. शेवटी सण, उत्सव हे आपल्या उत्साहावरच तर टिकू न असतात. करोनाकाळात अनेकांचं अपरिमित नुकसान झालं आहे. काहींनी त्यातूनही वेगळे मार्ग शोधले. स्वत:बरोबर अनेकांच्या आयुष्यात पणतीची मिणमिणती का होईना ज्योत लावली. करोनायोद्धे तर जिवावर उदार होऊन लढले. त्यांनाही कृतज्ञतापूर्वक प्रणाम करत, काळजी घेत, इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवत आणि आशेचा दीप लावत ही वेगळी दिवाळी साजरी करू या..

‘‘गंगा, आताच गावाहून आलीस ना.. एवढय़ात नको येऊस कामाला. पुढच्या महिन्यापासून यायला लाग; पण थांब, माझ्या नातीचे हे दोन फ्रॉक आहेत; चांगले आहेत. तुझ्या मुलींना बरोबर होतील. आणि हे थोडे पसे जवळ ठेव हो. लागतील तुला कशाकशाला.’’ माझ्या शेजारणीनं तिच्या घरी कामाला येणाऱ्या गंगाला सांगितलं.  गंगा, थोडीफार शिकलेली, मुंबईत वावरलेली, दोन मुलांची आई. नवरा बांधकाम व्यवसायात नोकरी करणारा. नातेवाईकांच्या लग्नाला गावाला गेली ती टाळेबंदीत तिथेच अडकली. आता सहा महिन्यांनी परत आली. लगेच काम थोडंच मिळणार. आता आई, वडील, बहिणीच्या आधारावर कामं मिळण्याच्या आशेवर दिवस काढते आहे. जुन्या मालकिणींनी दिलेले वापरलेले कपडे मुलींसाठी, स्वत:साठी घेऊन दिवाळी साजरी करणार आहे. अशा लोकांना परत पहिल्यासारखं काम मिळेल याची खात्री नाही, मधल्या काळाचा पगार नाही.  दोन वेळा जेवायला मिळालं तरी पुरे. मग सण साजरा करण्याची गोष्टच सोडा!

सगळ्यात हाल झाले आहेत ते या आíथक निम्न स्तरावरील लोकांचे. मजुरी करणारे, परप्रांतांतून आलेले हे लोक पशांची आवक थांबल्यावर काहीच सोय नसल्यानं टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात त्यांच्या त्यांच्या गावांकडे परतू लागले. वाहनं नाहीत, भाडय़ासाठी पसे नाहीत म्हणून मुलाबाळांसकट चालत मलोन्मल तुडवू लागले. त्यात काहींनी प्राणही गमावले. अनेकांना त्यांच्या गावीही लगेच स्वीकारलं गेलं नाही. ‘करोना’विषयी तज्ज्ञांना पुरेशी माहिती नव्हती, या लोकांना कुठून असणार! तिथेही उपासमार सहन केल्यावर आता हेच लोक परत जमेल त्या मार्गानं शहरात परतू लागले आहेत.

मंदा एका खासगी कंपनीत टेलिफोन ऑपरेटर आहे. टाळेबंदीच्या काळात तिचं काम थांबलं. ती आणि तिचा नवरा कसाबसा संसाराचा गाडा ओढत होते. एकाच्या कमाईचं चाक आता तरी निखळलंय; पण मंदाची स्वयंपाकाची आवड मदतीला आली. जवळपासची थोडी लाडूचिवडय़ाची कामं मिळाली. पगाराइतके नाही, तरी थोडे पसे मिळाले. दिवाळीत म्हणून मुलांसाठी थोडीफार खरेदी करता आली. तिनं स्वत:साठी मात्र आधीचीच एक साडी दिवाळीत नेसायला काढून ठेवली. त्यावर ब्लाऊज नवं घातलं की छान वाटेल म्हणून ती तयार ब्लाऊज घ्यायला गेली, कलमकारी डिझाइनचे ब्लाऊज बघितले, तर दुकानदारानं जो गठ्ठा समोर टाकला तो बघून मंदा अवाक्च झाली. बोहारणीला द्यायला काढल्यासारखे दिसत होते ते. सगळा जुना माल. सगळ्या दुकानांत साधारण हीच परिस्थिती. नवं, बरं काही होतं, ते न परवडण्यासारखं. हे प्रश्न तसूतसूनं पशांचा विचार करून निम्नमध्यमवर्गीयांना आता या दिवाळीत सोडवायला लागतायत.

‘‘हॅलो, आज पेपरमध्ये ‘एकावर एक जेवणाचं पॅक फ्री’ ही जाहिरात तुम्हीच दिली आहे का?’’ एक काका फोनवर विचारत होते. पलीकडच्या माणसानं बुकिंगसाठी म्हणून त्यांना २५ रुपये ऑनलाइन भरायला सांगितले. काकांनी त्यांना आलेला ‘ओटीपी’ त्या माणसाला दिला आणि २५ रुपयांऐवजी त्यांचे पंचवीस हजार रुपये खात्यातून काढले गेले. कामासाठी बाहेर जाताना रिक्षा करावी लागली तरीसुद्धा दहा वेळा विचार करणारे काका एवढे पसे खात्यातून गेल्यावर हादरलेच. त्यांनी जिवाच्या आकांतानं धडपड केली. बँक मॅनेजरला गाठलं, पोलिसांकडे गेले, रीतसर तक्रार नोंदवली. पसे परत मिळण्याची सुतराम शक्यता वाटत नव्हती; पण अहो आश्चर्यम्! तीनेक महिन्यांनी काकांना त्यांची गेलेली सर्व रक्कम परत मिळाली. पोलीस खात्यानं त्यांचं काम प्रामाणिकपणे के लं होतं. आता या काकांनी, परत मिळालेल्या पशांतून जवळच्या सर्वाना छोटय़ा-मोठय़ा गोष्टी घ्यायला सुरुवात केली आहे. या ‘करोना’काळातील परिस्थितीचा गैरफायदा अनेक भामटय़ांनी उठवला. आंतरजालावरून होणाऱ्या पशांच्या देवघेवीतील चोऱ्यामाऱ्या या काळात वाढल्या. या सायबर गुन्ह्य़ांमधील वाढ वृत्तपत्रातील बातम्यांमधून नि:संशय दिसून येते. ज्या हजारो लोकांचे कमीअधिक पसे या काळात गेले त्यांच्यासाठी ही दिवाळी निराशेचीच असेल ना!

सुयश ‘करोना’ग्रस्त झाला. दीड लाख रुपये अनामत रक्कम भरा तरच रुग्णालयात दाखल करू, असं रुग्णालयातून सांगितलं गेलं. चार दिवसांच्या रुग्णालयामधील वास्तव्याचं बिल साडेचार लाख रुपये आलं. सुयशची बायको तर हबकूनच गेली; पण ती धीराची होती. तिनं हॉस्पिटल अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये जाऊन बिलाची रक्कम एवढी जास्त का, हे विचारून घेतलं. तिथे दाद मिळत नाही म्हटल्यावर ती महत्प्रयासानं नगरसेवकाला भेटली. त्यांच्या मदतीनं रुग्णालयावर दबाव आणून ते बिल दीड लाख रुपयांवर आणण्यात ती यशस्वी झाली. दिवाळीची खरेदी, त्यानंतर करायची कौटुंबिक सहल, यासाठी राखून ठेवलेले सगळे पसे सुयशच्या उपचारांवर खर्च झालेले.  या कठीण काळात डॉक्टरांनी जिवावर उदार होऊन केलेली मेहनत कृतज्ञता व्यक्त करण्याजोगीच, पण काही डॉक्टर्सनी ‘कोविड’ विभाग सुरू केले आणि ‘मुकी बिचारी, कुणी हाका’ या न्यायानं लाखो रुपयांची बिलं बनवून अनभिज्ञ, भांबावलेल्या रुग्णांना अक्षरश: लुटलं, या कथाही याच काळात ऐकल्या. यातील काहींची रुग्णालयं नंतर बंद झाली ती गोष्ट वेगळी.

‘‘सुमा, तू दादाला फोन करणार आहेस ना? तो वाट पाहात असेल. आता थोडा वेळ ‘व्हेंटिलेटर’ काढून पाहातायत ना डॉक्टर, थोडी सुधारणा वाटतेय; पण बाई गं, दादाला जराही कळू देऊ नको हं आईविषयी. परत तब्येत ढासळायची त्याची.’’ मी  सुमाला, माझ्या मैत्रिणीला सगळं पढवून फोन करायला लावला. दादा- म्हणजे सुमाचा भाऊ करोना संसर्गानं रुग्णालयात होता.

१५-२० दिवसांनंतर आता कुठे थोडी सुधारणा वाटत होती त्याच्या तब्येतीत. फोनवर घरातल्या सगळ्यांची चौकशी करायचा. घरी त्याचे पंचाहत्तरीच्या आसपासचे आईवडील, पत्नी, इंजिनीअिरगला असलेला मुलगा आणि कॉलेजला असलेली मुलगी. दादामुळेच हा संसर्ग त्यांच्या घरात शिरला. दादाला लगेच रुग्णालयात ठेवलं. घरातल्या सगळ्यांची चाचणी केली, तर त्याची पत्नी आणि त्यांची मुलगी ‘पॉझिटिव्ह’ आढळल्या, मुलगा, आजी-आजोबा ‘निगेटिव्ह’ होते. वहिनी आणि मुलगी घरातच एका खोलीत वेगळ्या राहिल्या. सुमा शक्य ती सारी मदत करत होती. एक दिवस अचानक आजोबा थोडे असंबद्ध चालू-बोलू लागले, त्यांना सावरायला गेलेल्या आजी तोल जाऊन पडल्या. डॉक्टरांनी दोघांची चाचणी केली, दोघांनाही लागण झाली होती. त्यांचीही रवानगी जवळच्या एका रुग्णालयात झाली. आठ दिवसांनी आजोबा बरे होऊन घरी आले, आजींची तब्येत मात्र बिघडतच गेली आणि तिसऱ्या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. आता ही बातमी दादाला कशी कळवणार! या घराला दिवाळीचा विचारही सुचणं अशक्य. ही करोना संसर्गानं ग्रासलेल्या एका कुटुंबाची गोष्ट. अशी हजारो, लाखो माणसं, कुटुंबं करोनाच्या भीतीखाली आजही जगताहेत. जवळच्यांच्या विरहाचं दु:ख सोसत आहेत. महाराष्ट्रात आजमितीस १७ लाखांच्या आसपास करोनाचे रुग्ण आहेत. करोनानं राज्यात आत्तापर्यंत ४५ हजार लोकांचा बळी घेतला आहे. एकटय़ा मुंबईत रुग्णांची संख्या अडीच लाखांहून अधिक आहे आणि साधारण १०,५०० जण मृत्युमुखी पडले आहेत. हे केवळ आकडे नाहीत, हाडामांसाची माणसे आहेत, होती. त्यांची कुटुंबं, त्यांचे जिवलग दु:खात, काळजीत बुडालेले आहेत. त्यांना दिवाळी साजरी करायला सुचणार आहे का! करोनाच्या या भयानक संसर्गानं अनेक हुशार, कर्तबगार, बुद्धिमान, हरहुन्नरी लोक आपण गमावले आहेत.  या अगणित मृत्यूंनी झालेल्या अपरिमित हानीची मोजदादही अशक्य.

या रुग्णांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या बरोबरीनं त्यांची काळजी घेणारे वैद्यकीय कर्मचारी आणि त्यांची कुटुंबंही संत्रस्त आहेत. लोकांना आरोग्य सेवा  देण्यासाठी घराबाहेर राहाणाऱ्या किंवा घरात विलग राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांची त्यांच्या घरातली लहानगी, म्हातारे, जिवलग यांच्याशी गाठभेटही होत नाही. ‘सुपाएवढं’ मन घेऊन काम करणाऱ्या या आरोग्य सेवेकऱ्यांना कधी क्वचित करोनाच्या ‘जात्यात’ भरडलंही जातं. काळजीचा दगड मनावर ठेवून त्यांना ही दिवाळी साजरी करावी लागणार आहे. असाच दुसरा गट आहे, पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांचा. लोकांनी नियम पाळावेत, त्यांचं संरक्षण व्हावं यासाठी खबरदारी घेणारे हे कर्मचारी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता त्यांचं काम करताहेत. त्यांपकी काहींनी करोनाच्या यज्ञात प्राणाहुती दिली आहे. या दोन्ही गटांतील कुटुंबांची दिवाळी थोडी तरी आनंदात जावी यासाठी आपण काय काय करू शकतो?

या करोनानं अनेकांचा आíथक कणाच मोडून टाकला आहे. अनेकांची जवळची कमावती माणसं मरण पावली. रुग्णांच्या घरात रुग्णालयाच्या बिलांनी आíथक पुंजीवर मोठा घाला घातला. कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या.  काहींचे पगार तुटपुंज्या प्रमाणात हाती येऊ लागले. स्वतंत्र व्यवसाय करणाऱ्या छोटय़ा-मोठय़ांचे उद्योग संपुष्टात आले; पण कष्टकरी, कल्पक आणि कलावंत माणसांनी हार मानली नाही. एक उद्योग थांबला, तर दुसऱ्या वाटा शोधल्या. नाटकांचे प्रयोग बंद, चित्रपट सिनेगृहात दाखवले जाणार नाहीत, गाण्याचे कार्यक्रम होणं अशक्य. मग प्रमुख कलाकारांनी आंतरजालावर तिकीट लावून कार्यक्रम करायला सुरुवात केली. वेबिनार सुरूके ले. पडद्यापाठीमागच्या कलाकारांनी, परिस्थिती थोडी निवळल्यावर खाद्यपदार्थाच्या गाडय़ा टाकल्या, गावाहून नवलाईच्या वस्तू आणून त्यांची विक्री सुरू केली. नवलाईच्या वस्तू बनवल्या, त्यांची विक्री सुरू केली.  मध्यम परिस्थितीतील लोकांना कच्च्याबच्च्यांचं पोट तर भरलंच पाहिजे. आता उसनं अवसान आणून काटकसरीनं दिवाळी साजरी करण्याशिवाय पर्याय नाही.

करोनाच्या काळातल्या दिवाळीचा विचार करताना केवळ या महामारीच्या साथीचा विचार करून भागणार नाही. या काळातच आणखीही नसíगक आपत्ती कोसळल्या आहेत. अतिवृष्टीनं कहर केला. महाराष्ट्रातले कित्येक जिल्हे काही काळ पाण्याखाली गेले. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा धुऊन निघाले. जातो जातो म्हणणारा पाऊस लोचट पाहुण्यासारखा रेंगाळतच राहिला. घरं, वाहनं, क्वचित माणसं तर गेलीच. सर्वाधिक नुकसान शेतकऱ्यांचं झालं. पिकं घेणं अशक्य झालं, काही पिकं हाती येता येता पाण्यानं त्यांची नासाडी केली. त्याचा भार त्या शेतकऱ्यांनाच नव्हे, तर त्यांची पिकं पुढचं वर्षभर हवी असणाऱ्या आपल्या सर्वाना सोसायचा आहे. या शेतकऱ्यांची दिवाळी कशी असेल याचा विचारच करायला नको.

शासनानं शक्य तेवढं व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. नियम केले. गर्दी हटवली. उद्योगधंदे नुकसान सोसून बंद ठेवायला लावले. कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचं व्याज दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात जमा करण्याचं जाहीर केलं. सरकारी कर्मचाऱ्यांना ‘एलटीसी कॅश व्हाऊचर’ (लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन) योजना आणि ‘स्पेशल फेस्टिव्हल अ‍ॅडव्हान्स योजना’ अशा घोषणा केल्या. सामान्यांच्या वेदनांवर थोडी का होईना फुंकर एवढंच.

सणवार म्हटलं की मराठी मन उल्हसित होतंच, मग परिस्थिती कशी का असेना. शिवाय आता रुग्णवाढीचं प्रमाण थोडं मंदावलेलं जाणवल्यावर हा उत्साह द्विगुणित झालाच. अर्धीमुर्धी भरलेली पाकिटं घेऊन लोक स्वस्त आणि मस्त काय मिळेल ते पाहायला बाजारात उतरले. करोनाचं संकट अजून संपलेलं नाही याचा त्यांना जणू विसर पडला. बाजारपेठा माणसांनी फुलल्या. हा धोका वेळीच ओळखायला हवा. संसर्ग टाळायला हवा. खबरदारी घ्यायलाच हवी. फटाक्यांचा सोस करून प्रदूषण वाढवण्यात काहीच हशील नाही. मुलांची समजूत काढायलाच हवी.

आजची ही कुटुंबवत्सल माणसे कळ सोसून घरच्यांसाठी चार नाही, तर दोन पदार्थ दिवाळीत कसे करता येतील यासाठी धडपडत आहेत. एक साधासुधा कंदील, छोटीशी रांगोळी, दोन साधे दिवाळीच्या फराळाचे जिन्नस, कच्च्याबच्च्यांना साधे, पण नवे कपडे एवढय़ावर त्यांच्या दिवाळीचा आनंद ते मनमुराद लुटणार आहेत. दिवाळी पहाट प्रत्यक्ष अनुभवता येणार नाही, घरगुती सहली काढता येणार नाहीत; पण नात्यातली, स्नेहातली, जवळ राहाणारी थोडीफार माणसं एकत्र जमतील, प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद अनुभवतील. बाकी सारं ऑनलाइन चालू ठेवायची सवय सगळ्यांनी लावून घेतलीच आहे.

शेवटी प्रेमाची नाती, जिव्हाळा हेच तर चिरकाल टिकणारे आहे. या भावना करोनावरही मात करणाऱ्या आहेत. तेव्हा यंदाची नेहमीपेक्षा वेगळी असणारी ही दिवाळी  इतरांच्या दु:खाची जाणीव ठेवून आशेचा दीप लावत, उत्साहानं, आनंदानं साजरी करू या!