26 November 2020

News Flash

शाळेत जाण्यापूर्वी..

राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत.. लवकरच त्या सुरळीत सुरू होतील, अशी आशा आहे.

जवळजवळ  आठ ते नऊ महिने घरी असणारा विद्यार्थी वर्ग प्रत्यक्ष शाळेत जाण्यासाठी आधी मानसिक आणि मग शारीरिकदृष्टय़ा सज्ज आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.

मेघना जोशी – joshimeghana.23@gmail.com

राज्यातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत.. लवकरच त्या सुरळीत सुरू होतील, अशी आशा आहे. मात्र जवळजवळ  आठ ते नऊ महिने घरी असणारा विद्यार्थी वर्ग प्रत्यक्ष शाळेत जाण्यासाठी आधी मानसिक आणि मग शारीरिकदृष्टय़ा सज्ज आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शाळा मुलांसाठी नवीन नसली तरी इतकी मोठ्ठी सुट्टी कधीच मिळालेली नसल्याने अनेकांची एका जागेवर किमान ३० मिनिटे बसण्याची सवयही मोडलेली असू शकते. पुन्हा शाळेत जाण्यासाठी अनेक नव्या गोष्टींची सवय मोडावी लागेल तर अनेक जुन्या सवयी पुन्हा नव्याने लावाव्या लागतील. मुख्य म्हणजे ऑनलाइन वा आभासी जगातून प्रत्यक्ष मानवी संबंध प्रस्थापित करणे ही एक मोठी कसरत असू शके ल. म्हणूनच प्रत्यक्ष शाळा सुरू होताना विद्यार्थ्यांबरोबरच पालक आणि शिक्षक म्हणून कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे  किंवा कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याविषयी..

n the marathon of life,
always be steady
And for the final lap
keep your mind ready
Start now cause,
late is always better than never!

आमच्या शेजारी राहाणाऱ्या तन्वीने लिहिलेल्या कवितेच्या या ओळी! तन्वीला शाळा सुरू व्हायला हवीच आहे,  हे तिचं मनोगत या ओळी सांगत असल्या तरी सर्वच मुलांच्या बाबतीत असे घडत असेल असे नाही. काही मुलांना शाळा नकोशी वाटत असेल, तर काहींना ती नकोशी वाटावी अशी परिस्थिती घरी निर्माण झालेली असेल. पालकांचे हरवलेले रोजगार, त्यांच्या रोजगारात झालेला बदल, ज्यांच्या घरी शेती आहे, त्यांची मुले सध्या घरी असल्याने शेतीकामात मुलांच्या सहभागाची झालेली सवय वा गरज आणि जो अनेक जणांकडून ऐकला, तो काळजाला हात घालणारा मुद्दा म्हणजे काही मुलींना या काळात अकाली बोहल्यावर चढवले गेले असणे..

हे सगळे असले तरी शाळा सुरू व्हायलाच हवी याबाबत अजिबात शंका नाही. कारण शिक्षणशास्त्रात जसे कायम म्हटले जाते, तसे शाळा हे समाजाचे एक छोटे रूप आहे आणि मुलांच्या सामाजिकीकरणासाठी शाळा हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचप्रमाणे शाळा ही एक प्रणाली आहे. जसे जीवशास्त्रात विविध प्रणाली असतात- पचनसंस्था, श्वसनसंस्था, वगैरे, ज्यामध्ये वेगवेगळी इंद्रिये आपापली कामे सचोटीने पार पाडत ‘इनपुट’पेक्षा अत्यंत भिन्न असे ‘आऊटपुट’ निर्माण करतात, तशीच शाळासुद्धा असते. शाळेतही इतर वेगवेगळ्या प्रणालींप्रमाणेच घटकांमधली आंतरक्रिया खूप महत्त्वाची असते. म्हणजे शिक्षक-विद्यार्थी, विद्यार्थी-विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षक अशी आंतरक्रिया. या सर्व घटकांमध्ये सुसंघटितपणा, एकात्मता, एकसंधता, पूर्णत्व दिसून येते आणि महत्त्वाचे म्हणजे पर्यावरणाचाही या प्रणालीवर परिणाम होतो. आपले मूल हे शाळेतले ‘इनपुट’ आहे आणि ते उत्तम ‘आऊटपुट’च्या स्वरूपात म्हणजे ‘परिपूर्ण विकसित व्यक्तिमत्त्व’ या रूपात  साकारले जावे ही प्रत्येकाचीच शाळेकडून अपेक्षा असते.  प्रत्येक शाळेला एक ब्रीदवाक्य असतेच- ‘एकी हेच बळ’, ‘स्वावलंबनातून शिक्षण आणि शिक्षणातून स्वावलंबन’, ‘ज्ञान, विज्ञान व सुसंस्कार म्हणजे शिक्षण’, ‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते’ इत्यादी. हेतूपूर्ण अध्ययन हे प्रत्येक शाळेचे ध्येय जरी असले तरी या व्यापक ध्येयाशी संबंधित असणारा मूलभूत हेतू आणि शाळेचे वेगळेपण हे या ब्रीदवाक्यांतून स्पष्ट होते. हे ब्रीदवाक्य शाळेच्या प्रवेशद्वारावरच्या फलकावर लिहिलेले असते, जे त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत असते.

हे सगळे आत्ताच सांगण्याचे कारण म्हणजे गेले अनेक महिने बंद असलेल्या शाळा!  मार्च महिन्यात अचानक बंद झालेल्या शाळा अद्याप सुरूझाल्या नसल्या तरी लवकरच सुरू होण्याचे संके त मिळू लागले आहेत. दरम्यान, शाळा बंद, तरी शिक्षण चालू, हा प्रयोग सुरू झाला. तो अद्यापही सुरूच आहे. यातून विद्यार्थ्यांपर्यंत फक्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न  होतो आहे. पण शाळा या प्रणालीची जी बाकीची सर्व कार्ये आहेत, ती ऑनलाइन माध्यमातून साध्य होणे शक्य नाही. कारण विज्ञान, गणित, कला, क्रीडा, कार्यानुभव वगैरेंमध्ये जे कृतीयुक्त शिक्षण गरजेचे आहे त्याचे काय? नुसते व्हिडीओ पाहून ते शिकणे किती मुलांना शक्य आहे? हे जवळजवळ सर्व पालक आणि शिक्षकांना जाणवतेय. त्यामुळे आज ना उद्या शाळा सुरू होतीलच, मात्र त्या दृष्टीने पालक आणि शिक्षक म्हणून आपण कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा कोणती खबरदारी घेतली पाहिजे, याबाबत मांडलेले हे काही मुद्दे..

माझ्याकडे कामाला येणाऱ्या मावशी परवा विचारत होत्या, ‘‘ताई, वर्षांतून शाळा किती दिवस भरते हो?’’ मी म्हटले, की साधारणपणे सव्वादोनशे ते अडीचशे दिवस. त्यावर त्या लगेच म्हणाल्या, ‘‘म्हणजे शाळा बंद होऊन वर्ष झालंच की. तरीच माझी पोरगी लिहायला, वाचायला सगळंच विसरली आणि पोरगा बसतो मोबाइल घेऊन, पण त्यात काय करतो ते समजतच नाही मला.’’ नेमका माझ्या एका मैत्रिणीचाही त्याच दिवशी फोन आला. म्हणाली, ‘‘माझी सातवीतली मुलगी मोबाइल घेऊन बसते अभ्यासाला आणि मी गेले की तिच्या बोटांच्या वेगळ्याच हालचाली होतात आणि चेहऱ्यावरचे भावही बदलतात.’’ माझे एक शिक्षक मित्र म्हणाले, ‘‘ऑनलाइन शिक्षण चालू असताना मी अधूनमधून समाज- माध्यमांच्या गल्लीत फेरी मारतो आणि गल्ली चुकलेली पोरं हुडकतो!’’ हे किंवा असं घडतं, म्हणून अनेक पालक, शिक्षक आता हळूहळू शाळा सुरू कराव्यात, या मतापर्यंत येऊ लागले आहेत. वर्गामध्ये असलेले शैक्षणिक वातावरण आणि त्यामुळे विद्यार्थ्यांची शिक्षणाशी असलेली बांधिलकी या ऑनलाइन शिक्षणात दिसत नाही, असे पालकांचे सार्वत्रिक मत दिसले. जशी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी स्पर्धारेषेजवळ नेऊन ‘ऑन युवर मार्कस’ असे म्हणत खेळाडूला मानसिकदृष्टय़ा तयार केले जाते, तसे आता मुलांनाही वेगवेगळ्या दृष्टीने सजग करण्याची गरज निर्माण झाली आहे असे वाटते.

पहिली म्हणजे मानसिक तयारी. गेले अनेक दिवस मुलांना घरांतून फारसे बाहेर पडण्याची सवयच उरलेली नाही. मला तरी वाटते, की हळूहळू त्यांच्याशी बोलून, विशेषत: लहान मुलांशी ती तयारी करावी लागेल. कारण मुलांना ऑनलाइन शिक्षण चांगले वाटू लागले आहे, असे काही पालकांशी झालेल्या बोलण्यातून लक्षात आले. याच्याच पुष्टय़र्थ मुंबईतील कु र्ला येथे असलेल्या ‘गांधी बालमंदिर हायस्कूल’ येथील शिक्षक-समुपदेशक जयवंत कुलकर्णी यांनी एक सर्वेक्षण के ले आहे. त्यानुसार या ऑनलाइन शिक्षणाबाबत ‘समाधानी’ आणि ‘अतिशय समाधानी’ अशा दोन्ही गटांत मिळून साधारणत: एकूण ६८ टक्के  मुले आहेत. पण ते शिक्षण पुरेसे नाही, हे पालकांच्या आता लक्षात येऊ लागले आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे वाढणारे ‘स्क्रीन’चे व्यसन हा पालकांच्या डोकेदुखीचा विषय होत आहे, असेही अनेकांशी बोलल्यावर सहज लक्षात येते. टाळेबंदीच्या आधीही मोबाइलच्या विळख्यात आजची तरुण पिढी सापडेल की काय, अशी शंका अनेकांना ग्रासत होती. त्यातच आता शिक्षणासाठी स्क्रीन सक्तीचा झालाय आणि हा विळखा आणखी घट्ट होत मुलांची त्यातली व्यसनाधीनता वाढण्याची भीतीआहे. याची अनेक उदाहरणे याबाबत बोलता बोलता लक्षात आली.

एक पौगंडावस्थेतला विद्यार्थी अनवधानाने बोलून गेला, ‘‘मी ऑनलाइन क्लासेसना नेमाने का हजर असतो माहीत आहे का मॅम.. त्यामुळे वर्गातल्या मुली दिसतात तरी.’’ एक आई, शिक्षिका आणि समुपदेशक म्हणून मला हे वाक्य अजिबात हसण्यावारी न्यावे किंवा विनोदाच्या अंगाने पाहावे असे वाटत नाही. मला ते मुलांच्या होणाऱ्या कोंडमाऱ्याचे निदर्शक वाटते. समवयीन मुलांशी असणारे, जोडले जाणारे भावबंध, हा शिक्षणाबरोबरच शाळेचा एक महत्त्वाचा फायदा असतो. आपल्यालाही आपल्या शाळेतले मित्रमैत्रिणी अजूनही आपलेसे आणि जवळचे वाटतात,

तर कुमारावस्थेत ती एक महत्त्वाची गरज

आहे. शाळा ही आजच्या छोटय़ा कु टुंबाच्या युगात ही गरज पुरवणारी अत्यंत प्रभावी संस्था आहे. शाळा हे सामाजिकीकरणाचे माध्यम आहे असे म्हटल्यावर ‘कशाला हवेय सामाजिकीकरण?’,           ‘टाळेबंदीच्या काळात ‘क्वारंटाईन’ (विलगीकरण) व्हावे लागलेच ना.. माणसांचा संसर्ग आणि संपर्क न येता?’,असाही एक सूर ऐकू आला. पण त्या सुराला उत्तरही परस्परच मिळाले. जरी विलगीकरण असले, तरी अनेक गरजा पुरवण्यासाठी अनेक व्यक्तींची, संस्थांची मदत घ्यावीच लागली. म्हणजे सामाजिकी-करणाशिवाय करोनापासून बचाव किंवा मुक्ती शक्यच नव्हती.

शाळा आज ना उद्या सुरू होणारच आहेत. मात्र त्या सुरू करतानाही काय आणि कशा सुरू कराव्यात, हे मोठे आव्हान असणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांशी अनेकदा संवाद साधावा लागेल. कारण शिक्षणशास्त्रानुसार प्रत्येक विद्यार्थी अद्वितीय आहे असे म्हटले जाते, पण आता त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. मुलांच्या कौटुंबिक गोष्टींचा परिणाम त्यांच्या मनावर होणे स्वाभाविक आहे आणि आज प्रत्येक कुटुंबाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. त्याबाबत मुलांशी चर्चा करून त्यांना परत एकदा शाळेशी जोडणे आवश्यक आहे.

आम्हा काही शिक्षकांना तर वाटते, की शाळा सुरू झाल्यावर पहिले काही दिवस औपचारिक शिक्षण सुरूच करू नये, तर मुलांना परत शाळेची सवय आणि आवड निर्माण होण्यासाठी, शाळेशी पुन्हा एकदा भावबंध निर्माण होण्यासाठी, तिथल्या दगडमातीच्या भिंतींशी नाते जुळण्यासाठी काही काळ द्यावा. त्यामुळे शाळा अंशत: सुरू कराव्यात. ‘अंशत:’ यात दोन गोष्टी येतात- पहिली म्हणजे काही ठरावीक वर्ग सुरू करणे आणि दुसरी, दिवसांतल्या काही तासांसाठी म्हणजे अंशकालीन शाळा सुरू करणे.

याचबरोबर मुलांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, वागण्याच्या सवयी, जसे की वेळ पाळणे, शिस्त पाळणे, घरगुती वातावरणापासून वेगळे राहाणे, परस्परांशी संवाद साधणे, यामध्ये खूप बदल झाले असतील. त्यांचाही विचार होणे गरजेचे आहे. मुले ही माणसे आहेत याचा विचार करून त्यांचा गेले आठ-नऊ महिने शाळेपासून निर्माण झालेला दुरावा लक्षात घेता पहिल्यांदा त्यांना शाळेत रुळवणे आणि रुजवणे,  हे शिक्षक आणि पालकांचे मुख्य काम ठरेल. त्यासाठी शिक्षक आणि पालकांमध्ये समन्वय असणे खूप गरजेचे आहे. यासाठी दोघांनीही जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे. पालकांनीही ‘शाळेत माझ्या मुलाच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल का?’ असा साशंकतेने विचार करण्यापेक्षा शाळा सुरू झाल्यावर माझ्या मुलांची काळजी घेण्यासाठी मी शाळेला कशी आणि काय मदत करू शकतो, याचा विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे. कारण जर तुम्हीच शाळेकडे संशयाने पाहायला लागलात, तर मूल तसेच पाहील आणि शाळा ही त्याच्या वाढ आणि विकासात महत्त्वाची असूनही त्याला तिच्याबाबत आपुलकी वाटणार नाही.

काही संस्थाचालकांशी याबाबत बोलल्यावर काही गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार शाळा सुरू झाल्यावर  शिक्षण सुरू करण्यासाठी आणि आरोग्यासाठी पूरक भौतिक सुविधा ते निर्माण करून देतीलही, परंतु त्या सुरळीत चालू ठेवण्याचे काम कोण करील किंवा कसे करावे या दुविधेत ते आहेत.  त्यामुळे शाळा पुन्हा सुरू करताना अनेक प्रश्नचिन्हे उभी राहिली आहेत. त्यावर कवी अजय कांडर यांनी मांडलेला एक विचार पर्यायात्मक उत्तर असू शकते. ते म्हणतात, की काही कालावधीसाठी मुख्याध्यापकांना मदत करणारा एक प्रशासकीय अधिकारी शासनाने किंवा संस्थेने नेमावा, जो या सगळ्यांवर लक्ष ठेवील आणि त्याला तसे अधिकारही द्यावेत, ज्यामुळे शाळा या प्रणालीशी संबंधित सर्व घटक निर्धास्त राहातील.

काही पालक म्हणतात, ‘‘अहो, कसली शाळा नि कसलं काय?  या वर्षांपुरतं सगळं विसरायचं. एक वर्षच आयुष्यात आलं नाही असं म्हणायचं. सिर सलामत तो पगडी पचास!’’ पण याला खोडून काढणारे अनेक जण भेटले. त्यांचे म्हणणे आहे, की आताची परिस्थिती प्रतिकूल आहे, तरी त्यावर मात कशी करावी हे शिकण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. अशा वेळीच आपण पाल्यांना समस्येच्या निराकरणाचे धडे प्रात्यक्षिकातून देऊ शकतो आणि आता शाळा परत चालू करण्याएवढे चांगले प्रात्यक्षिक नाही.

मुले मात्र गोंधळलेली आहेत. त्यांना शाळा हवीय, पण शाळेची शिस्त नकोय. वेळेच्या बंधनात अडकणे नकोय. भारतीय शिक्षण व्यवस्थेमधले परीक्षेचे असणारे महत्त्व लक्षात घेता परीक्षेबाबतच्या जाहीर होत असलेल्या वेगवेगळ्या निर्णयांमुळे, तर अनेकदा अफवांमुळे ती धास्तावलेली तर आहेतच, पण जी प्रामाणिकपणे परीक्षा देणारी मुले आहेत, ती ऑनलाइन परीक्षांमध्ये होणाऱ्या सामूहिक कॉपी वगैरे गोष्टींमुळे दुविधेत पडलेली दिसतात. मुलांचा विचार करता मला तरी असे जाणवते, की आता शाळेत आल्यावर पहिले काही दिवस विद्यार्थ्यांना फळ्यावरचे किंवा पुस्तकातले वाचणे, हेही अवघड होईल. कारण स्क्रीन वापरणे, तो ‘झूम’ करणे, हवा तेव्हा ‘म्यूट’ करणे, हवा तेव्हा व्हिडीओ ‘ऑफ-ऑन’ करणे, वगैरेंसारख्या त्यांना लागलेल्या सवयी बदलाव्या लागतील. बरोबरच शिक्षकांची आता फक्त आपल्या सहकाऱ्यांशी स्पर्धा उरलेली नाही, तर ‘व्हच्र्युअल’  शिक्षकांशीही तुलना होणार आहे. यातून मुलांना समजून घेत, त्यातून विद्यार्थ्यांना बाहेर काढत पुन्हा त्यांना प्रत्यक्ष मानवी संबंधांसाठी तयार करणे, ही आजची गरज आहे.

याबाबत माझे एक मित्र एक गोष्ट सांगतात, की मूळ धरण्याआधी नकोसे झाड उपटून टाकणे गरजेचे असते.  तर एक मैत्रीण तिची आवडती ‘हरलेल्या सशाची गोष्ट’ सांगते. म्हणजे ससा झाडाखाली झोपल्यामुळे, निसर्गाचा आस्वाद घेत राहिल्यामुळे, झऱ्याचे थंडगार पाणी पीत राहिल्यामुळे, पानांची सळसळ ऐकत राहिल्यामुळे हरला खरा, पण त्याला खरे जीवन समजले. तसेच या जागतिक साथीनंतर शाळा सुरू होताना शिक्षण क्षेत्रातील नकोशा गोष्टी नाहीशा करण्यासाठी आणि ‘रॅट रेस’ टाळत  निकोप स्पर्धा आणि योग्य मूल्यमापनाची सवय रुजवण्यासाठी हीच खरी वेळ आहे. करोना जाईल की परत लाट येईल?, शाळा कधी व्यवस्थित सुरू होतील?, हे सगळे प्रश्न आहेतच. पण जेव्हा शाळा सुरू होतील, त्यासाठी ‘ऑन युवर मार्क..  रेडी स्टेडी गो’ असं म्हणत आपण आजच्या क्षणापासून ही तयारीची सुरुवात करायला तर हवी..

(लेखिका माजी मुख्याध्यापिका आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 6:35 am

Web Title: coronavirus pandemic before going to school dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 जीवन विज्ञान : कृत्रिम गोडवा!
2 यत्र तत्र सर्वत्र : चवीचं शिकवणाऱ्या त्या!
3 व्वाऽऽ हेल्पलाइन : श्रीमंत पतीची राणी!
Just Now!
X