प्रसाद शिरगांवकर – prasad@aadii.net

‘करोना’च्या साथीत ठिकठिकाणच्या रुग्णांच्या स्थानिक माहितीपासून जगभरातील विविध देशांच्या एकत्रित माहितीपर्यंतचा ‘बिग डेटा’ फार उपयोगी ठरला. या माहितीचं विश्लेषण करून त्याची जागतिक पातळीवर देवाणघेवाण झाली, त्यावर आधारित अनेक निर्णय घेतले गेले आणि अजूनही घेतले जात आहेत. बिग डेटाच्या अशा वापरालाही काही मर्यादा आहेत हे खरं; पण तंत्रज्ञानातील आधुनिकतेचा माणसांचं जीवन सुधारण्यासाठी के लेला हा उपयोग एक प्रकारे पहिलाच होता. एका अनपेक्षित संकटाशी लढताना आपण जग म्हणून टाकलेली ही पावलं आपल्याला भविष्यातल्या संकटांसाठी तयार करणारीच.

‘करोना’च्या सध्याच्या जागतिक संकटाच्या काळात अनेक जणांना रोज सकाळी करोनाग्रस्त रुग्णांची आकडेवारी बघण्याची सवय लागली आहे.  टीव्ही किंवा वर्तमानपत्रांमध्ये येणाऱ्या आकडेवारीबरोबरच अनेक जणांना ‘वल्डोमीटर’सारख्या माहिती पुरवणाऱ्या संकेतस्थळांवर जाऊन जगभरातली आकडेवारी अन् त्याचे आलेख बघायची सवय लागली. अजूनही अनेक जण नियमितपणे अशी आकडेवारी आणि आलेख बघत आहेत.

जगातील कोणत्या देशात ‘करोना’बाधितांची एकूण संख्या किती आहे, त्यात कालच्या दिवसांत किती जणांची भर पडली, एकूण किती जण बरे झाले, किती मृत्यू झाले, असे चार-पाचच ‘डेटा पॉइंट्स’ आहेत खरंतर हे. पण  जागतिक, देशनिहाय, राज्यनिहाय आणि स्थानिक पातळीवर रोजच्या रोज डेटा-पॉइंट्स तपासत राहून जागतिक संकटाची नेमकी काय परिस्थिती आहे, आपल्या देशात काय परिस्थिती आहे, राज्यात, शहरात हे संकट काय रूप धारण करत आहे अन् कोणत्या दिशेला जात आहे याचा अंदाज हा डेटा तपासणारी आणि आलेख वाचणारी कोणतीही व्यक्ती करू शकते.

वरकरणी अत्यंत सोप्या आणि सहजसाध्य दिसणाऱ्या या आकडेवारी आणि आलेखांना ‘बिग-डेटा’ क्षेत्रामध्ये झालेली कमालीची प्रगती कारणीभूत आहे. जगभरातली हजारो शहरं आणि शेकडो देशांत होत असलेल्या ‘करोना’ चाचण्यांचा डेटा एकत्र करून ‘वल्डोमीटर’सारखी संकेतस्थळं आपली आकडेवारी प्रकाशित करतात. बहुसंख्य देशांनी आपापल्या देशातला डेटा शहर, राज्य, देशपातळीवर जमा करून तो मुक्तपणे प्रकाशित करणं आणि तो बिग-डेटा संकेतस्थळांनी एकत्र करून जागतिक पातळीवर सर्वाना उपलब्ध करून देणं, हे सगळं डिजिटल तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे घडलं आहे. जगभरातल्या कोटय़वधी लोकांचा एका विशिष्ट बाबतीतला डेटा गोळा करून, संकलित करून त्याचं विश्लेषण होऊन तो प्रकाशित व्हायला या तंत्रज्ञानाअभावी काही महिने वा र्वषही लागू शकली असती. आता तर डेटा अक्षरश: ‘जसा घडतो तसा’ (म्हणजे ‘रिअल टाइम’मध्ये) जगभरातल्या सर्व व्यक्तींना उपलब्ध होतो आहे.

करोना साथीविरुद्धच्या माणसाच्या लढाईमध्ये डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातल्या ‘बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स’ आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या ज्ञानशाखांचा खूप मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. जगातील रुग्णसंख्येचा डेटा सगळ्यांना त्वरेनं उपलब्ध होणं हा एक मूलभूत वापर आपण बघितलाच, पण तो तेवढय़ापुरता मर्यादित नाही. या डेटाचा आणि त्यातील आकृतिबंध (पॅटर्न्‍स) आणि गुणवैशिष्टय़ांचा अभ्यास करून हे संकट कोणत्या दिशेनं जात आहे, त्यावर कोणत्या उपाययोजना प्रभावी ठरत आहेत, कोणत्या उपाययोजनांचा काही उपयोग होत नाही, याचं विश्लेषण करून भाकीतं करणं हेदेखील या क्षेत्रांमधल्या तज्ज्ञांना शक्य झालं. एखाद्या व्यक्तीला करोनाची बाधा झाल्यापासून किती दिवसांत काय काय लक्षणं दिसू शकतात, इथपासून ते एखाद्या शहरात काही कारणानं मोठी गर्दी झाली तर पुढे किती दिवसांत रुग्णांची संख्या किती वाढू शकते, इथपर्यंतचे आपल्या सगळ्यांना आता माहीत असलेले ठोकताळे गेले नऊ-दहा महिने मिळत असलेल्या बिग-डेटामुळे शक्य झाले आहेत.

करोनाबाधितांची लक्षणं अभ्यासण्यासाठी, करोनारुग्णांसाठीचे उपचार आणि त्यावर प्रतिबंधात्मक लस शोधण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रामध्ये बिग-डेटाचा प्रचंड मोठय़ा प्रमाणात वापर केला जात आहे. याचं अगदी साधं, आपल्याला सगळ्यांना माहीत असलेलं उदाहरण म्हणजे गंध येईनासा होणं वा चव न समजणं ही करोनाबधित झाल्याची लक्षणं असू शकतात, याची सुरुवातीच्या काळात आपल्याला माहिती नव्हती. मात्र साथीच्या पहिल्या काही दिवसांतल्या जगभरातल्या रुग्णांच्या लक्षणांच्या अभ्यासावरून ही माहिती झाली आणि ही लक्षणं महत्त्वाची मानली जायला लागली. करोनाविरुद्धचे उपचार शोधण्यासाठी जगातील अनेक वैद्यकीय संशोधन संस्थांनी करोनाविषयीचा जैवशास्त्रीय डेटा एकत्र करून त्याची संगणकीय प्रारूपं तयार केली आणि त्यावर कोणती उपलब्ध असलेली औषधं चालू शकतील का, या प्रश्नावर संगणकीय प्रारूपांद्वारे अभ्यास केला. थेट मानवी चाचण्या करण्याआधी संगणकीय प्रारूपांवर काम करणं हे वैद्यकीय संशोधन क्षेत्रात गेली काही र्वष घडत आहेच, त्यात तसं नवीन काही नाही. मात्र यंदा नव्यानं घडलेली एक गोष्ट म्हणजे, विविध देशांतल्या संशोधन संस्थांनी याबाबतीत एकमेकांना केलेलं सहकार्य. आपापल्या प्रारूपांचा, आपण करत असलेल्या प्रयोगांचा आणि त्याच्या निष्कर्षांचा डेटा अनेक संस्थांनी इतरांसाठी मुक्तपणे उपलब्ध करून दिला. या मुक्त डेटामुळे करोनाविरुद्ध कोणते उपाय प्रभावी ठरू शकतील, कोणते नाहीत, याचं जगभरातल्या बहुसंख्य वैद्यकीय आस्थापनांमधलं ज्ञान एकाच वेळी अद्ययावत होत गेलं.

वैद्यकीय क्षेत्रातल्या संशोधनासाठी वापरला जाणारा जैवशास्त्रीय डेटा अत्यंत क्लिष्ट आणि अनेक वेगवेगळ्या स्वरूपांतला असतो. अशा डेटाचा अभ्यास आणि विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेली काही र्वष केला जात आहे. करोनाविरुद्धच्या संग्रामातही याचा मोठय़ा प्रमाणावर वापर केला जातो आहे. याचं एक उदाहरण म्हणजे, एखाद्या चित्रातली माहिती वाचून, त्याच्या पॅटर्न्‍सचा अभ्यास करून, निष्कर्ष काढू शकणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली गेली काही र्वष विकसित होत आहेत. या प्रणालींचा वापर करून जगभरातील हजारो करोना- बाधितांच्या फुप्फुसांच्या क्ष-किरण चाचणी अहवालांचा अभ्यास कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीद्वारे केला गेला. करोनामुळे फुप्फुसांवर नेमका काय आणि कसा परिणाम होतो, याचं विश्लेषण करून त्याची भाकितं वर्तवणारी प्रारूपं या कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालींनी तयार केली. या प्रारूपांचा उपयोग अनेक ठिकाणी करोनाविरुद्धच्या उपचारांसाठी केला गेला. तसंच करोनाच्या विषाणूची रासायनिक रचना, त्याच्या आपल्या शरीरातील पेशींमधल्या नेमक्या कोणत्या रासायनिक संयुगांशी संपर्क येतो, त्यानं आपल्या पेशींमध्ये काय बदल घडतो, त्यावर मात करण्यासाठी शरीरात कोणत्या प्रकारचा रासायनिक प्रतिसाद निर्माण व्हायला हवा, असा सर्व अत्यंत क्लिष्ट डेटा या क्षेत्रातल्या संशोधकांनी प्रकाशित करायला आणि सतत अद्ययावत ठेवायला सुरुवात केली. या डेटावर आधारित कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रारूपांमुळे करोनासाठीची लस कशी असावी याची दिशा ठरवणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लशींवर मूलभूत काम होऊ शकणं, हे अत्यंत कमी वेळात शक्य झालं.

करोनाविरुद्धच्या युद्धात होत असलेला डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर हा अचंबित करणारा आहेच, पण त्याहून जास्त अचंबित करणारं आहे ते या काळात तंत्रज्ञान आणि डेटाच्या बाबतीत जगभर होत असलेलं परस्पर सहकार्य. काही अपवाद वगळता जगातील बहुसंख्य प्रशासकीय यंत्रणा, वैद्यकीय संशोधन संस्था, सामाजिक संघटना, विद्यापीठं आणि खासगी कंपन्यांनीही आपल्याकडे असलेला डेटा, ज्ञान आणि तंत्रज्ञानही मुक्तपणे प्रकाशित करणं आणि एकमेकांना, जगभरातल्या सगळ्यांना मुक्तपणे उपलब्ध करून देणं हा अत्यंत सकारात्मक बदल करोना साथीच्या निमित्तानं घडतो आहे.

अर्थातच बाकी सर्व बदलांसारखंच या बदलाच्या बाबतीतही सर्व काही आलबेल नाही. काही देशांतल्या किंवा शहरांतल्या प्रशासकीय यंत्रणा आपला डेटा लपवून ठेवणं, चुकीचा, दिशाभूल करणारा अथवा सोईचा डेटा प्रकाशित करणं, असं करत असल्याचा आरोप अनेकांकडून केला जात आहे. अशा आरोपांची शहानिशा करणं शक्य नाही. मात्र हे आरोप खरे असतील, तर चुकीच्या डेटावर आधारित असलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. जगात मुक्तपणे उपलब्ध असलेल्या डेटाचा वापर करून त्यावर आधारित संशोधनाचा फायदा काही खासगी कंपन्या स्वत:च्या नफेखोरीसाठी करतील अशी दुसरी एक चिंता या बाबतीत व्यक्त केली जाते. यावर खरं तर थेट उपाय काही नाही. मुक्त ज्ञान आणि मुक्त बाजारपेठ यांनीच फक्त काही जणांनी नफेखोरी करणं लांबच्या पल्लय़ात थांबू शकेल. याशिवाय कोणत्याही व्यक्तीच्या खासगीपणावर होत असलेलं अतिक्रमण वा खासगी बाबतींमध्ये होत असलेला अधिक्षेप हा बिग-डेटा क्षेत्राच्या बाबतीत नेहमीच घेतला जात असलेला आक्षेप आहे. करोनाविरुद्धच्या लढाईतही या संबंधातल्या अनेक समस्या निर्माण झाल्या. उदाहरणार्थ, करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांचा डेटा प्रकाशित करताना काही ठिकाणी त्यांच्या नाव आणि पत्त्यांसह प्रकाशित केला जात होता. करोना साथीसंबंधी प्रचंड भीती निर्माण झालेल्या त्या काळात अशा रुग्णांना वाळीत टाकण्यासारखे प्रकार काही ठिकाणी घडले. कोणतीही व्यक्ती आणि तिच्या आरोग्यासंबंधी सर्व डेटा गरजेचा आहे, मात्र त्यांची ओळख लपवून ठेवून आणि त्यांच्या खासगीपणावर आक्रमण होणार नाही अशा पद्धतीनं तो गोळा आणि प्रकाशित करायला हवा, हे भान येईपर्यंत अनेक ठिकाणी अशा समस्या आल्या.

एखाद्या रोगाची जागतिक महासाथ येणं अनेक वर्षांमध्ये एखाद्या वेळी घडणारी घटना आहे. ती घडलीच तर काय करावं यासाठीची तयारी जगभरात कोणीही केलेली नसते. मात्र अगदी गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये आलेल्या ‘इबोला’ किंवा ‘स्वाइन फ्लू’च्या जागतिक साथींचा त्या वेळी संपूर्ण जगानं ज्या पद्धतीनं प्रतिकार केला होता, त्याहून खूप जास्त सक्षमपणे प्रतिकार मानवजातीने यंदा केला आणि हे करण्यासाठी बिग डेटा विश्लेषण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानांचा आपण पुरेपूर वापर केला. तंत्रज्ञानाचा वापर मानवी आयुष्य अधिकाधिक सुरक्षित, सुंदर होण्यासाठी करण्याचा हा एक अत्यंत लक्षणीय अनुभव आहे. बहुसंख्य मानवजातीनं ठरवलं आणि एकमेकांना सहकार्य केलं तर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आपल्यासाठी वरदान ठरू शकतं.

(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)