प्रभाकर बोकील – pbbokil@rediffmail.com

‘करोना’ साथीमुळे मार्चअखेरीस झालेल्या ‘टाळेबंदी’नंतर आयुष्याचं सगळं चक्रच थांबल्यासारखं झालं.जूनमध्ये सुरू होणारी शाळा-महाविद्यालयं बंदच राहिली. आई-वडिलांच्या ‘वर्क फ्रॉम होम’सारखे मुलांवर ‘ऑनलाइन’ शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले.आकाशात मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यांना घरटय़ात डांबून ठेवावं तसं झालं. ही तर सर्वसामान्य मुलांची गत. मग ‘विशेष’ शाळेत जाणाऱ्या गतिमंद-मतिमंद मुलांचं काय झालं असेल?

मनात आलं, वर्षभरापूर्वी भेट दिलेल्या विशेष मुलांच्या शाळेत गेलं पाहिजे. त्याप्रमाणे मी त्या शाळेत पोहोचलो. शाळेचा परिसर एकदम शांत. कुं पणाच्या बंद दारावर ‘मास्क’ लावलेला वॉचमन. ‘‘शाळा बंद आहे काका. सध्या फक्त ऑफिस चालू झालंय. कुणाला भेटायचं होतं का?’’‘‘सुधाताई आल्या आहेत का?’’ मी विचारलं. ‘‘येतीलच एवढय़ात. आत बसून घ्या.’’ हात ‘सॅनिटाइज’ करून इमारतीत शिरलो. वर्षभरापूर्वी प्रथमच ही शाळा पाहायला आलो होतो तेव्हा या प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर लागणारा हॉल किती गजबजलेला होता. मधल्या उघडय़ा चौकात मुलामुलींचे खेळ चालू होते.

‘‘ही आमची शाळेतली सर्वात ज्येष्ठ विद्यार्थिनी, सुमन. गाते फार छान. गाऊन दाखवतेस सुमन पाहुण्यांना?’’ सुधाताईंनी ‘त्या’ मुलीला विचारलं होतं. वर्गशिक्षिका वाटावी अशी, जाडसर चष्मा लावलेली, अर्धेअधिक के स पांढरे असणारी सुमन.. ही विद्यार्थिनी की शिक्षिका?

सुधाताईंच्या विनंतीवर चष्मा अन् पदर सावरत, सुमन हसत उभी राहिली. ‘‘काय गाऊ?’’

‘‘काहीही गा, तुझ्या आवडीचं कुठचंही गाणं म्हण.’’ त्या म्हणाल्या. क्षणभर विचार करून तिनं सुरुवात केली. ‘‘या चिमण्यांनो.. परत फिरा रे, घराकडे आपुल्या, जाहल्या तिन्हीसांजा..’’ अतिशय सुरेल आवाजात, गाण्यातला कातर भाव सांभाळत,  गाणं म्हणताना तिचे डोळे ओलावले. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. ‘‘सुमन, खूप छान म्हटलंस गाणं..’’ तिला शाबासकी देत माझ्याकडे वळून सुधाताई म्हणाल्या, ‘‘बरं का, हिचं वय आहे पन्नास आणि ही..’’ त्यांना मध्येच थांबवत अन् लाजत सुमन म्हणाली,‘‘उद्याच एक्कावन्नावं लागणार!’’‘‘अगं, म्हणजे उद्या तुझा वाढदिवस!’’ त्यावर इतर विद्यार्थ्यांसह सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या, तेव्हा तिचे डोळे पाणावले.

तेवढय़ात एका मुलानं बाक वाजवून सुधाताईंचं लक्ष वेधलं. ‘‘हां, हां, काय रे जॉर्ज? अरे हो.. हा जॉर्ज परेरा. याची चित्रकला, हस्तकला खूप छान आहे. समोरच्या भिंतीवर लावलेली वॉल हँगिंग्ज, कागदाची फु लं, यानं या बाकीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीनं बनवलीत.कटिंग करायला मदत लागते. त्यातला मजकूर नंतर आम्ही जोडतो. अशी कार्ड्स विक्रीला ठेवतो. बऱ्याच संस्था, कंपन्या दिवाळी आणि नाताळला मुद्दाम विकत घेतात. जॉर्ज चौदा वर्षांचा आहे. सातव्या वर्षी इथं आला तेव्हा फारसं बोलतादेखील येत नव्हतं. ‘स्पीच थेरपी’मुळे खूप सुधारणा झालीय याच्यात. ’’ वर्गातून बाहेर पडल्यावर शाळेच्या व्यवसाय प्रशिक्षण केंद्राकडे- वर्कशॉपकडे जाताना सुधाताई सांगू लागल्या, ‘‘या सुमनला आधीपासूनच तालासुरांचं खूप छान भान आहे. आमची ही ‘स्पेशल स्टुडंट-टीचर’ आहे! तिच्या पंधराव्या वर्षांपासून, ही संस्था सुरू झाल्यापासून इथं आहे. आली तेव्हा त्या आडनिडय़ा वयात अतिशय कोमेजलेली होती. आई नुकतीच गेलेली. सतत शून्यात बघायची. या मुलांच्यात रमल्यावर खूप सुधारणा झाली. इथल्या सगळ्या मुलांच्यावर तिची फार माया आहे. तिची ही ‘चिमण्यांची शाळा’ म्हणजे दुसरं घरच आहे.’’

वर्कशॉपमध्ये एका हातमागावर चादर विणली जात होती. बाजूलाच चादरीची वीण निरखून पाहात एक वृद्ध गृहस्थ उभे होते. त्यांच्याशी ओळख करून देत सुधाताई म्हणाल्या, ‘‘हे वर्कशॉप सुपरवायझर रहीमचाचा. संस्था सुरू झाल्यापासून आहेत. त्यांच्यामुळेच वर्कशॉप इतकं वाढू शकलं.’’  छातीपर्यंत रुळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र दाढीतून रहीमचाचा हसले. दोन्ही हात आकाशाकडे करत म्हणाले, ‘‘बस, ये सब उपरवालेकी मर्जी है. उसकीही सेवा है.’’ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उत्कृष्ट चादरी दाखवत ते म्हणाले, ‘‘ये सब इन्ही बच्चोंने बनाया! अलग अलग जात-धरमके हैं सब. पर चादर सबकी एक जैसी हैं!’’ रहीमचाचा बोलताबोलता सहजच एक सत्य सांगून गेले. हातमागावर बसलेल्या वीसेक वर्षांच्या तरुणाकडे हात दाखवीत म्हणाले, ‘‘ये हमारा रघू गाता भी अच्छा है. रघू, गाओ वो कबीर का गाना..’’ रघू काम करता करता हातमागाच्या ठेक्यावर गुणगुणू लागला, ‘‘कबीराचे विणतो शेले, कौसल्येचा राम बाई..’’ कडवं संपल्यावर थांबत रघू म्हणाला, ‘‘आईनं शिकवलं.. आवडलं?’’ चेहऱ्यावर भाबडय़ा मुलाचे भाव. ‘‘खूप छान म्हटलंस, रघू!’’ वर्कशॉपमधल्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. खरंच.. रहीमचाचा, सुमन, जॉर्ज .. चादर सबकी एक जैसी हैं!

ऑफिसकडे परतताना सुधाताई सांगत होत्या, ‘‘या मुलांचा स्पीड खूप कमी असतो, पण ही मुलं मन लावून अतिशय नेटानं काम करतात. बनवलेल्या सगळ्या वस्तू ऑफिसबाहेरच्या काऊंटरवर विक्रीला ठेवल्या आहेत. बाजारात विकायलाही जातात. या मुलांना हिशेब जमत नाहीत. प्रत्येक लहानमोठी कामं करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांची आमच्याकडे खाती असतात. त्यात त्यांची ‘खरी कमाई’ म्हणून हा मोबदला जमा केला जातो. तो दरमहा त्यांना, त्यांच्या पालकांना दिला जातो.’’

‘‘शारीरिक वयापेक्षा यांचं मानसिक वय खूप कमी असतं. सुरुवातीला त्यांना इतरांच्यात सामावणं कठीण जातं. नंतर इथले विद्यार्थी त्यांना त्यांच्यासारखेच, जवळचे वाटतात. मग रोज यांना इथं यावंसं वाटतं. यांच्यातला असणारा एखादा गुण हेरून त्यांना त्यात मार्गदर्शन करून, त्यांनी थोडं-फार प्रावीण्य मिळवावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं, असे आमचे प्रयत्न असतात. अशा मुलींचं भवितव्य तर अधिकच कठीण. म्हणून मुलींना गॅस पेटवणं, वॉशिंग मशीन, शिलाई मशीन चालवणं, काही सोप्या पाकक्रिया करणं, अशी घरगुती कामंदेखील इथं शिकवली जातात. त्यामुळे मुली घरकामात हातभार लावू शकतात. आमची वार्षिक स्नेहसंमेलनं, स्पर्धा होतात. विविध कलाकारीच्या प्रदर्शनांना भेटी दिल्या जातात. त्यातून अशा मुलांना असंच काही तरी आपणही करू शकू अशी उमेद मिळते, तेव्हा या मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारं कुतूहल, हास्य समाधान मिळवून देतं. या मुलामुलींना आयुष्यात उभं राहायला शिकवणं या अर्थानं  जीवनशिक्षण-शाळाच! ’’ ‘‘फार वेगळं जग आहे हे, सुधाताई.’’ पहिल्याच भेटीत ही चिमण्यांची शाळा मनात घर करून राहिली.

आज मात्र इथं सारं शांत. चौकातल्या झाडावरच्या चिमण्यांचा चिवचिवाट तेवढा जाणवतोय. त्यांना कसलीच बंदी नाही.. मनात विचार आला अन् समोरून सुधाताई येताना दिसल्या. ‘‘या, या. तुम्ही कधी आलात? काही विशेष?’’ त्यांनी विचारलं. ‘‘अगदी सहज. सध्याच्या परिस्थितीत सगळ्याच शाळा बंद आहेत, वाटलं चौकशी करावी इथल्या मुलांची.’’  ‘‘काय सांगू? परिस्थिती कठीण आहे. सतत घरीच बसून या विशेष मुलांची मानसिकता जपणं, यांना सांभाळणं घरच्यांनाही कठीण असतं. त्यांनाही यांच्या शाळेत असण्याची सवय झालेली असते. त्यामुळे ते निर्धास्त असायचे. कुणाची नोकरी गेल्यामुळे आर्थिक परिस्थितीही बिकट झाली आहे. त्यांच्या मुलांचं प्रश्नचिन्ह आहेच. या मुलांचं बाहेर जाणंयेणं बंद. सणवार-उत्सव बंद. मित्रमैत्रिणी नाहीत. स्नेहसंमेलन नाही, वार्षिक स्पर्धा नाहीत. हे सारं कुठवर चालणार आहे, कुणालाच माहीत नाही. हे सारं समजण्याची अशा मुलांची मानसिक कुवतदेखील नसते. काही शारीरिक, मानसिक मर्यादा घेऊन जन्माला आलेली ही पाखरं इथे आल्यावर थोडीफार मुक्त होऊन आकाशात भरारी घ्यायचा सराव करताना पुन्हा बेडय़ांत जखडली गेली. दोन पावलं पुढे जाऊन चार पावलं मागे, अशी अवस्था. त्यामुळे जेव्हा परत येतील तेव्हा परिस्थिती आणखी कठीण असेल. तेव्हा यांची मनं जपायला हवीत. तुम्हाला ती आमची स्पेशल स्टुडंट-टीचर आठवते?’’  ‘‘या चिमण्यांनो.. गाणारी सुमन?’’

‘‘हो तीच. सहा महिन्यांनी परवा आली होती. या चौकातल्या झाडाच्या कट्टय़ावर बराच वेळ मूकपणे बसून राहिली. पस्तीस वर्षांपूर्वीचा तिचा चेहरा आठवला. मला पाहून भानावर आली अन् विचारलं, ‘कधी परत येणार सगळी पाखरं?’ काय उत्तर देणार? म्हटलं, ‘‘करोना’चे ढग गेले, आकाश मोकळं झालं की नक्की येतील!’ त्यावर एकदम खुलली अन् सुरात म्हणाली.. “फिटो अंधाराचे जाळे, होवो मोकळे आकाश!”