माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

‘कोविड- १९’च्या अभूतपूर्व संकटात सर्वत्र खिन्नतेचा काळोख दाटला असतानाही अनेक व्यक्तींनी, संस्थांनी आपल्या कार्यासह मानवतेची इवली ज्योत मनामनांत पेटवली. यात शासन आणि प्रशासनात काम करणाऱ्या व्यक्तींसह अगदी व्यक्तिगत पातळीवर मदत पुरवणाऱ्यांपर्यंत विविध जणांचा सहभाग होता. या मदतकार्यादरम्यान अनेक प्रकरणांमध्ये ‘हेल्पलाइन’चा जादूच्या कांडीसारखा उपयोग झाला. हेल्पलाइन हे संपर्काचं माध्यम वापरून टाळेबंदीच्या काळात वेगवेगळ्या पातळ्यांवर मदतकार्य कसं घडलं याची ही काही प्रातिनिधिक उदाहरणं.

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
hotel Solapur district
सोलापूर : हॉटेल व्यवस्थापनाच्या नावाखाली मित्राला ६८ लाखांचा गंडा, अक्कलकोटमध्ये दागिने लंपास
russian soldier
‘रशियात अडकलेल्या २० भारतीयांच्या सुटकेसाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न’, परराष्ट्र खात्याची माहिती
A case has been registered against the scribes in the city police station for embezzlement of examination fees by the scribes of Miraj High School
लेखनिकाने केला अपहार, ३५८ विद्यार्थी मात्र निकालापासून वंचित

‘कोविड योद्धय़ां’चा नामोल्लेख होतो तेव्हा डॉक्टरांबरोबरच अग्रक्रमानं नाव घेतलं जातं ते पोलीस दलाचं. महाराष्ट्र पोलीस दलानं बजावलेल्या अतुलनीय कार्यात ‘पोलीस हेल्पलाइन’चं श्रेय वादातीत आहे. ‘करोना’चं संकट हे अनिश्चितता घेऊन आलेलं आणि अनाकलनीय म्हणावं असं होतं; पण पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम् यांनी या संकटकाळात कोणत्या अडचणी येऊ शकतील आणि त्यासाठी कशा प्रकारे काम करायला हवं, याचं विचारपूर्वक आणि रीतसर नियोजन केलं.

पुणे जिल्ह्य़ात बऱ्याच ठिकाणी झोपडपट्टय़ा आणि चाळींच्या वस्त्या आहेत. त्या वस्त्यांमधील प्रमुख कार्यकर्ते, सोसायटय़ांचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे प्रमुख अशा लोकांची आताच्या परिस्थितीत ‘विशेष पोलीस अधिकारी’ म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांचे खासगी फोन नंबर लोकांना हेल्पलाइन नंबर म्हणून देण्यात आले. त्यावर फोन येताच हे विशेष पोलीस अधिकारी नागरिकांना किराणा सामान, दूध, भाजीपाला, औषधं घरपोच देण्याची व्यवस्था करत. याशिवाय नाकाबंदी करणाऱ्या पोलिसांना मदत करत. आरोग्य विभागासाठी नागरिकांच्या शरीराचं तापमान तपासणं, ‘ऑक्सोमीटर’चं रीडिंग घेणं, सॅनिटायझरची फवारणी करून घेणं अशीही कामं करत. असे एकूण साडेपाच हजार विशेष पोलीस अधिकारी पुण्यात कार्यरत आहेत.   पोलीस नियंत्रण कक्षातर्फे चालवल्या जाणाऱ्या हेल्पलाइनच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल’मार्फत करोना रुग्णांचा शोध घेण्यास खूप उपयोग झाला. अशा १५ हजार लोकांमधून ५०० करोनाबाधित रुग्ण सापडले. त्यांना वेळेवर उपचार मिळाल्यामुळे पुढील संक्रमणास आळा बसला. या हेल्पलाइनवर एकदा अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी टाळेबंदीमुळे पुण्यात अडकलेल्या ईशान्य भारतातील ९० विद्यार्थी आणि १५० नागरिकांची माहिती दिली. पोलीस सहआयुक्त  डॉ. रवींद्र शिसवे यांनी तत्परतेनं मदत पोहोचवल्याबद्दल खांडू त्यांनी ट्विटरवरून त्यांचे आभारही मानले.

या काळात अपर पोलीस आयुक्त  डॉ. संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ‘सोशल पोलिसिंग कक्ष’ स्थापन करण्यात आला. पोलिसांच्या क्रमांक १०० या हेल्पलाइनवरून माहिती मिळताच या कक्षाकडून गरीब आणि गरजू व्यक्ती, परगावचे अडकलेले कामगार, ज्येष्ठ नागरिक यांना मागणी आणि गरजेनुसार अन्नधान्य, पाण्याच्या बाटल्या, सॅनिटायझर्स, मुखपट्टय़ा यांचा पुरवठा केला गेला. तसंच पुन्हा फोन करून त्यांची चौकशीही करण्यात येत असे. एकदा पोलीस भावराव भाऊसाहेब डापसे यांना नाकाबंदी करत असताना सचिन चव्हाण हा मुलगा भेटला. तो वॉर्डबॉयची नोकरी करत होता; पण ती  नोकरी सुटली होती. त्याचे कुटुंबीय नाशिकमध्ये, तर तो पुण्यात एकटा होता. त्यात त्याला मूत्रपिंडाचा त्रास. खायला अन्न नाही. घरभाडं थकल्यामुळे बेघर झालेला. डापसे यांनी स्वत:च्या पगारातून त्याचं घरभाडं भरलं, त्याला किराणा सामान दिलं आणि वैद्यकीय मदतही मिळवून दिली. सचिन भारावून म्हणतो, ‘‘पोलीस आमचे मित्रच नव्हेत, तर वडीलबंधू आहेत.’’ अशाच प्रकारे वंचित गटातील देवदासींना, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना आणि तृतीयपंथीयांना १६३ स्वयंसेवी संस्थांच्या मदतीनं पुणे पोलिसांनी अन्नधान्य, औषधं पुरवून माणुसकीचं दर्शन घडवलं.

टाळेबंदीमुळे अनेक परदेशी नागरिकही पुण्यात अडकले होते. संबंधित दूतावासांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या देशात जाण्यासाठी पोलिसांनी सर्वतोपरी मदत केली. उपायुक्त बच्चनसिंग यांच्या आधिपत्याखाली ‘डिजिटल पास कक्ष’ सुरू करण्यात आला. त्याचा उपयोग गर्भवती, डायलिसिस घेणारे वा कर्करोगग्रस्त रुग्ण यांना झाला. शिवाय नागरिकांसाठी खास हेल्पलाइन नंबर देऊन साडेदहा हजार सॅनिटाइज्ड रिक्षांची सोय करण्यात आली. याच काळात श्रमिक रेल्वे सुरू झाल्या. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त सारंग आव्हाड यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीनं श्रमिकांची रेल्वे अणि बसमधून नियोजनबद्ध रीतीनं रवानगी केली. श्रमिकांना प्रवासासाठी दूध, पाणी, खाद्यपदार्थाच्या पिशव्या देण्यात आल्या.

पोलिसांच्या १०० नंबरच्या हेल्पलाइनवर आलेल्या फोननुसार पोलिसांनी अनेक कामं केली. एकदा पोलीस नियंत्रण कक्षात एका स्त्रीचा धास्तावल्या स्वरात फोन आला. तिच्या पतीचा घरातच करोनामुळे मृत्यू झाला होता आणि कोणीच तिला मदत करण्यास धजावत नव्हतं. चतु:शृंगी पोलीस ठाण्याला हे वृत्त कळवलं गेलं आणि लगेच तिथले पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे आपल्या सहकाऱ्यांसह हिमतीनं त्या घरात शिरले. ‘पी.पी.ई. किट’ परिधान केलेल्या पोलिसांनी अधिकृत प्लास्टिक बॅगेत मृतदेह व्यवस्थित गुंडाळून ससून रुग्णालयात नेला आणि पुढे त्याच्यावर अंत्यसंस्कारही केले. जगानं पाठ फिरवलेल्या त्या अनाम व्यक्तीसाठी या ‘कोविड योद्धय़ां’नी जे काही केलं ते अतुलनीयच आहे. पोलीस नाईक रामचंद्र गुरव यांच्याकडे अमन दौलत खान या बारा वर्षांच्या मुलानं खंत व्यक्त केली, की तो यंदा ईद साजरी करू शकणार नव्हता.  गुरव यांनी त्याला नवे कपडे, खाऊ नेऊन दिला. त्यावेळचा त्याचा आनंद शब्दातीत आहे.

एकदा हेल्पलाइनवर तातडीचा फोन आला. सलूनमध्ये काम करणाऱ्या एका तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या जखमी तरुणाला रुग्णवाहिका मिळत नव्हती. तेव्हा पोलिसांनी त्यांच्या गाडीतूनच त्याला औंधच्या रुग्णालयात नेलं  आणि त्या बेरोजगार तरुणाचे प्राण वाचले. पोलीस निरीक्षक विद्या राऊत पहाटेच्या वेळी गस्त घालत होत्या. तेव्हा त्यांना एका ठिकाणी एक रुग्णवाहिका दिसली. आत एक गर्भवती अतिशय घाबरलेल्या अवस्थेत पतीसोबत होती. रस्त्यावर मदतीसाठी कुणीच दिसत नव्हतं. राऊत आणि त्यांच्या चमूनं त्या स्त्रीला ‘भारती रुग्णालया’त भरती केलं. ती स्त्री आणि तिचं मूल पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचलं. आदित्य बिश्त आणि नेहा कुशवाह यांनी हेल्पलाइनवर फोन करून विवाहाची इच्छा व्यक्त केली. निरीक्षक मनोज पाटील आणि प्रसाद लोणारे  यांनी लग्नाची तयारी तर करून दिलीच आणि रीतसर कन्यादानसुद्धा केलं.

बिबवेवाडीतील एका कर्णबधिर जोडप्याचंही पोलिसांनी लग्न लावून दिलं. ज्या ज्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन जनतेला मदत केली त्यांच्या कामाच्या व्हिडीओ क्लिप्स तयार करून प्रसारित केल्या गेल्या. साहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील निगुडकर सांगतात, ‘‘पोलिसांनी स्वयंस्फूर्तीनं अशी कामं केली, कारण आयुक्त स्वत: सर्व कर्मचाऱ्यांची पूर्ण काळजी घेतात. त्यांनी आम्हाला होमिआपॅथीच्या गोळ्या, संजीवनी सॅनिटायझर व्हॅन, विश्रांतीसाठी राहुटय़ा, तंबू, मुखपट्टय़ा, फेस शील्ड, गॉगल अशा सर्व सुविधा पुरवल्या. प्रत्येक ठिकाणी वॉश बेसिन, सॅनिटायझिंग टनेल्सची सोय केली आहे. त्यातून एखाद्या कर्मचाऱ्याला करोनाची बाधा झाल्यास रुग्णालयात बेड आणि रुग्णवाहिकेची सोय, एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. शिवाय दहा हजारांचा पुरस्कारही देण्यात येतो.

विशेष म्हणजे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आमच्या मानसिक आरोग्यासाठी ‘भावनिक प्रज्ञावंत कोर्स’ सुरू केला. त्याद्वारे रोज वेगवेगळ्या विषयांवरील धडे आणि अद्ययावत माहिती मोबाइलवर पोलिसांना पाठवली जाते आणि आमचं मनोधैर्य उंचावण्याचे प्रयत्न केले जातात.’’

पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम् म्हणतात, ‘‘पोलीस दलात येऊन जनतेची सेवा करायची आहे, असं सर्व जण लोकसेवा आयोगाच्या मुलाखतीत सांगतात. त्या सेवेची खरी संधी आज मिळत आहे. त्या संधीचं सोनं केल्यामुळे पुणे पोलीस  दलाला राष्ट्रीय स्तरावर आजवर सहा पुरस्कार  लाभले आहेत. पोलिसांना संकटकाळात लढण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांची साथ आणि सहकार्य लाभत आहे.’’

पोलिसांच्या अजोड कार्याला नागरिकही मानवंदना देत आहेत. मेधा सहस्रबुद्धे या हॉटेल व्यावसायिक स्वत:च्या उपाहारगृहातून रोज पोलिसांसाठी चहा आणि नाश्ता पाठवत आहेत, तर उल्हास परब ओशिवरा पोलीस ठाण्याच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना रोज ४० प्लेट नाश्ता देत आहेत. कर्नल सिंग यांनी आजवर लाखो लोकांना अन्न पुरवलं आहे. पुण्याजवळील गोळेवाडीच्या जंगलात अहोरात्र नि:शुल्क सेवा देणाऱ्या ‘कौसल्या कराड ग्रामीण रुग्णालया’तील आरोग्यसेवकांनी एकही दिवस रजा न घेता आजूबाजूच्या १६ गावांना मोफत आरोग्य सेवा पुरवली आहे. विजय फळणीकर यांच्या ‘आपलं घर’ संस्थेनं दुर्गम खेडेगावांमधील एक हजार लोकांना शिधावाटप आणि अडीच हजार लोकांना रोज भोजनाचं वाटप केले आहे. या खेडेगावांत र्निजतुकीकरण सेवा देण्यापासून मोफत रुग्णवाहिका देण्यापर्यंत सर्व प्रकारची सेवा ते निरलसपणे करत आहेत. टाळेबंदीमुळे वृद्धाश्रमांमधील वृद्ध एकाकी अवस्थेत जगत आहेत हे जाणून ‘सिल्व्हर इनिंग्ज’ या संस्थेचे अध्यक्ष शैलेश मिश्र यांनी अशा वृद्धांसोबत तरुणांची नऊ वेबिनार्स आयोजित केली आणि तरुण आणि वृद्ध यांच्यात अनुबंध निर्माण केला.

‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’नं कातकरी समाज, आदिवासी पाडे, शेतमजूर, कर्णबधिर विद्यार्थ्यांचे कुटुंबीय, तृतीयपंथीय आणि निराधार गोरगरिबांसाठी अन्नधान्य पुरवलं आहे. आरोग्य विभागासाठी ६ रुग्णवाहिकांची मोफत सेवा दिली आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सांगतात, ‘‘या संकटकाळात पशूंची उपासपार होऊ नये यासाठीही ट्रस्टकडून जागोजागी मुबलक पशुखाद्य वाटण्यात आलं. तसंच ‘जलगंगा’ प्रकल्पाअंतर्गत पशूंसाठी पाणीसाठा उपलब्ध करून ऐन उन्हाळ्यात त्यांची तहान भागवण्यात आली. ससून रुग्णालयात ट्रस्टतर्फे बारा महिने रुग्ण आणि नातलगांसाठी अन्नदान केलं जातं. सध्या त्यांच्यासह वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर यांनाही सकस, पौष्टिक आहार पुरवण्यात येत आहे.’’ माहूर संस्थानसारख्या अनेक  देवस्थानांनी मुख्यमंत्री निधीस सढळ हस्ते मदत केली आहे. तसंच रक्तदानासारख्या लोकोपयोगी कार्यात सहभाग नोंदवला आहे.

या सेवाकार्यात अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या आहेत. ‘वुई आर फॉर यू’ अभियानाचे अध्यक्ष किरण नाकती सांगतात, ‘‘आम्ही सध्या खास ‘करोना हेल्पलाइन’ला सुरुवात केली आहे. करोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आला की लोकांना काय करावं कळेनासं होतं. रुग्ण विलगीकरणात गेला की आम्ही त्या कुटुंबाला भाजी, फळं, रेशन, औषधं घरपोच देतो. त्यांना धीर देतो. घाबरून न जाता संयम राखा, नकारात्मक बातम्या पाहू नका वगैरे सांगतो. त्यानंतर गरज भासल्यास रुग्णाला रुग्णालयात बेड मिळवून देणं, रुग्णवाहिकेची सोय करणं, वैद्यकीय सेवेवर देखरेख ठेवणं अशी सर्व प्रकारची मदत केली जाते. शिवाय ‘चला उद्योजक घडवू या’ प्रकल्पाअंतर्गत होतकरू तरुणांना भाजी, फळं, फुलं यांचे व्यवसाय उभारून देत आहोत.’’

करोनाकाळात मदतीचं स्वरूप व्यापक होत चाललं आहे. ‘मनी लाइफ फाऊंडेशन’च्या विश्वस्त सुचेता दलाल १५ ते १६ रुग्णालयांना औषधं, ऑक्सिजन मास्क, पी.पी.ई. किट, मृतदेहांसाठी ‘बॉडी बॅग्ज’ यांचं विनामूल्य वाटप करत आहेत,  तर ‘सूत्रधार सोशल व्हेंचर’ या सामाजिक संस्थेतर्फे महाराष्ट्र, आसाम, मेघालय आदी आठ राज्यांतील तृतीयपंथीयांच्या वस्त्यांपर्यंत विश्वस्त अर्चना तोमर पोहोचल्या आहेत. उपासमारीनं हतबल झालेल्यांना त्या अन्नधान्य, औषधं, कपडे, मदत देत आहेत.

गरीब, गरजूंना मदत देताना आपली नजर नेहमी खाली जमिनीकडे का असते, याचं उत्तर कबीरांना देताना रहीम म्हणतात,

‘देनहार कोई और है, भेजत जो दिन रैन

लोग भरम हम पर करे, तासो निचे नैन’

करोनाकाळात देवदूत बनलेल्यांची मनोभूमिका नेमकी अशीच आहे हे विशेष!

हेल्पलाइन क्रमांक-

‘सिल्व्हर इनिंग्ज’- ९०२९००००९१

‘सूत्रधार सोशल व्हेंचर’- ९८२०२२५९८६

archana@sutrdhaar.org

‘वुई आर फॉर यू’- ९००४७८२९१९,

८२९१०८७१९२

पुणे पोलीस हेल्पलाइन क्रमांक – १००

ज्येष्ठ नागरिकांसाठी – १०९०

महिला साहाय्य कक्ष –

०२०-२६२६५२५२