डॉ . वसुधा सरदेसाई – drvasudhasardesai@gmail.com

‘करोना’च्या टाळेबंदीतून आता आपण  बाहेर येऊ पाहतो आहोत. असं असतानाच दुसरीकडे पावसाळ्याची चाहूल लागली आहे. शहरांमधला पावसाळा साथीच्या आजारांना आमंत्रण देऊनच येतो. त्यातच करोनाची टांगती तलवार डोक्यावर आहे. अशा परिस्थितीत स्वत:चं आणि आपल्या कुटुंबाचं आरोग्य राखण्यासाठी तयार व्हायला हवं..

‘नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा,’ या कवितेतलं पावसाळ्याचं दृश्य आपणा शहरवासीयांच्या काही मनात येत नाही. उत्साह, आनंद वाटण्याऐवजी पावसाळा म्हटलं, की आपल्या नजरेसमोर सृष्टीसौंदर्यापेक्षा पावसामुळे शहरवस्तीत उडालेला हाहाकारच येतो. साठलेलं पाणी, तुंबलेली गटारं, ठिकठिकाणी पूर परिस्थिती, गाडय़ांचं कोलमडलेलं वेळापत्रक आणि त्याच्या जोडीला अनेक प्रकारचे साथीचे आजार आणि रोगराई.. आम्हा डॉक्टर मंडळींच्या नजरेसमोर तर रुग्णांनी भरलेली रुग्णालयं आणि दवाखानेच येतात.

या वर्षी नववर्षांचं स्वागत आपण झगमगाटानं केलं खरं, पण त्यानंतर या ‘करोना’ विषाणूच्या संकटाशी सामना करताना आपल्याच डोळ्यांपुढे काजवे चमकले. मार्च, एप्रिल आणि मे हे महिने तर सर्वासाठीच अभूतपूर्व ठरले. कधीही कल्पना केली नव्हती अशी सक्तीची स्थानबद्धता आपल्या वाटय़ाला आली आणि आपल्या दैनंदिन जीवनाचे आयामच बदलले.  लॉकडाऊन १-२-३-४ अशा विविध स्थिती अनुभवल्यानंतर आता यातून बाहेर पडणार कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. चक्रव्यूहात शिरलेल्या अभिमन्यूसारखी आपली परिस्थिती आणि मन:स्थिती आहे. टाळेबंदी उठण्याच्या पहिल्या पायरीवर आपण आहोत, आणि आता हा पावसाळा सुरू होतोय..

पावसाळा आला की ताप, सर्दी, खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ होते. दूषित पाण्यामुळे अतिसार, उलटय़ा होण्याचं प्रमाण वाढतं. याच्याच जोडीला विविध ठिकाणी पाणी साचून डासांची उत्पत्ती जास्त झाल्यामुळे हिवताप , डेंग्यू, चिकुनगुनियासारखे आजारही वाढतात. पुराच्या साठलेल्या पाण्यातून ‘लेप्टोस्पायरोसिस’सारख्या रोगांची लागणदेखील अनेकांना होते. हे सगळं तर नेहमीचं आहेच, पण यंदा येणारा पावसाळा यापेक्षाही विशेष म्हणावा लागेल, त्याला कारण म्हणजे ही करोना महामारी.  करोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेली टाळेबंदी नेमकी याच काळात टप्प्याटप्प्यानं उठवली जाणार आहे. आर्थिक घडी सुस्थितीत येण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडून कामाला सुरुवात करण्याची नितांत गरज आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर आगामी दोन-तीन महिने आपल्यापुढे कोणती नवी आव्हानं घेऊन येतील हाच मोठा प्रश्न आहे. वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या मतानुसार करोना विषाणूमुळे आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या पुढील दोन महिने वाढण्याची शक्यता आहे. यासाठी शासकीय आणि निमशासकीय संस्थांनी पुरेशी तयारी केली आहे. रुग्णसंख्या वाढेल या अपेक्षेनं रुग्णालयातल्या खाटा वाढवल्या आहेत. वैद्यकीय उपकरणांची व साधनसामुग्रीची जमवाजमव झाली आहे. रिक्त पदं भरून किंवा नवीन नियुक्त्या करून डॉक्टर, परिचारिका इत्यादी आरोग्य सेवकांची संख्या वाढवली गेली आहे. टाळेबंदीचा उपयोग या उपाययोजना करण्यासाठी झाला आहे मात्र आता  खरी कसोटी ही पावसामुळे वाढणाऱ्या आजारपणाची आहे.

बहुसंख्य विषाणूजन्य आजारांची सुरुवातीची लक्षणं एकसारखीच असतात. थंडीतापानंच या आजारांची सुरुवात होते. करोनामध्ये खोकला, घसादुखी अशा किरकोळ लक्षणांचं पर्यवसान काही रुग्णांमध्ये छाती भरणं, दम लागणं अशा गंभीर लक्षणांमध्ये होऊ   शकतं. इतर अनेक तापांच्या मांदियाळीत करोनाचे रुग्ण वेगळे शोधणं शक्य आहे का, हा एक गंभीर प्रश्न आहे. अनेकदा ‘सर्दी, खोकला, ताप’ या लक्षणांमध्ये अडकलेल्या आजारांचं निश्चित निदान होण्यासाठी विविध चाचण्यांची गरज असते. ताप, खोकल्यातून सुरुवात होऊन तीव्र स्वरूपाचा त्रास होणाऱ्यांसाठी ‘सारी’ (‘सिव्हियर अक्यूट रेस्पिरेटरी इलनेस’) ही एकच संज्ञा वापरली जाते. यात स्वाईन फ्लू, करोना अशा आजारांचा अंतर्भाव होतो. त्यामुळे काही चाचण्या केल्यानंतरच योग्य निदान होऊ  शकतं. अशा चाचण्यांसाठी आवश्यक ती साधनसामुग्री आता देशात सर्वदूर उपलब्ध आहे. याचाच अर्थ यंदाच्या पावसाळ्यात तापाच्या निदानासाठी करण्यात येणाऱ्या विविध चाचण्यांत करोनाच्या चाचणीची भर पडणार आहे. लहान मुलं आणि मध्यम वयोगटासाठी करोनाचा आजार फारसा धोकादायक नाही, पण रोगाचा प्रसार होण्यासाठी या वयोगटातलेच लोक प्रामुख्यानं कारणीभूत ठरतात. ज्येष्ठ व्यक्ती किंवा ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा यांसारखे अगोदरचेच काही आजार असतील, त्या रुग्णांमध्ये करोनाचा विळखा तीव्रतेनं दिसतो.

अशा कठीण परिस्थितीत सर्वसामान्य लोकांनी काय काळजी घ्यावी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी वारंवार सांगितली जाणारी त्रिसूत्री सर्वानी आत्मसात करणं गरजेचं आहे.  दोन व्यक्तींमध्ये कमीतकमी तीन फुटांचं अंतर राखणं, कोणाच्याही संपर्कात येण्यापूर्वी नाक व तोंड यावर मुखपट्टी वापरणं, डोळ्यांसाठी चष्मा किंवा गॉगल वापरणं आणि वारंवार हात साबणानं स्वच्छ धुणं, या तीन गोष्टी अपेक्षित आहेत. संशोधनातून असं सिद्ध झालं आहे, की नियमित व्यायाम करणाऱ्या, वजन आटोक्यात असणाऱ्या व्यक्तींना करोनाचा संसर्ग कमी प्रमाणात होतो. संतुलित व चौरस आहार, जीवनसत्त्वं आणि अँटीऑक्सिडंट्सचा पुरेसा वापर प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे. तुळस, सुंठ किंवा हळदीचाही घशाचं आरोग्य राखण्यासाठी आपण चांगला उपयोग करू शकतो. तंबाखू किंवा धूम्रपान निश्चितच टाळावं. याचबरोबर आपलं मानसिक आरोग्यही राखायला हवं. आनंदी, उत्साही मन नेहमीच सकारात्मक विचार करतं. त्याचा आपल्या आरोग्यावर निश्चितच चांगला परिणाम होतो. यासाठी ध्यानधारणा, वैचारिक देवाणघेवाण याचा फायदा होईल. जरूर भासेल तिथं समुपदेशकांची मदत घ्यावी.

पावसाळ्यात आपल्या आजूबाजूच्या परिसरात पाणी साठणार नाही याची सतत काळजी घ्यायला हवी. डासांची पैदास रोखण्यासाठी सतर्क राहिलं पाहिजे. त्यातून डासांमुळे पसरणारे आजार आपण रोखू शकू. घराच्या खिडक्यांना जाळी बसवणं, झोपताना मच्छरदाणी वापरणं हेही उपाय करता येतात.

आजार किरकोळ असताना त्याकडे दुर्लक्ष होऊ  नये. बऱ्याचदा असं आढळतं, की अगदी टोकाची लक्षणं दिसल्याशिवाय वैद्यकीय सल्ला घेतला जात नाही. जेव्हा एखाद्याची प्रकृती हाताबाहेर गेल्यावर त्याला डॉक्टरांकडे नेलं जातं, तेव्हा अनेकदा तेही काही करू शकत नाहीत. याचा राग हकनाक डॉक्टरांना मारहाण करून किंवा रुग्णालयाची मोडतोड करून काढला जातो. या अपप्रवृत्तींना वेळीच आळा घातला पाहिजे. साथीचे आजार पसरू नयेत म्हणून आपण व्यक्तिगत स्तरावर खूप काही करू शकतो. दर वेळी शासनानंच उपाययोजना करावी ही अपेक्षादेखील अवाजवी आहे. लहान मुलं आजारी असतील तर त्यांना शाळेत किंवा खेळायला पाठवू नये. वयोवृद्ध लोकांनी शक्यतो पुढील दोन महिने बाहेर जाण्याचं टाळावं. सर्वानीच गर्दीची ठिकाणं, सण-समारंभ टाळावेत हे चांगलं. घरी ताप बघण्यासाठी तापमापक (‘थर्मामीटर’) असल्यास उत्तम. परदेशात तर रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण मोजण्याचं यंत्रही घरी वापरण्यासाठी देतात. ते प्रमाण कमी झालं, तर प्रकृती ठीक नाही हे समजतं, आणि ताबडतोब रुग्णालयात जाता येतं. अशा ‘पल्स ऑक्सीमीटर’चा आपल्याकडेही वापर करता येईल. या काळात परस्पर सहकार्यानं आणि सामंजस्यानं राहायला हवं. त्यातूनच पावसाळा आणि करोनाचं दुहेरी संकट आपण परतवून लावू शकू आणि फिनिक्स पक्ष्यासारखे आकाशात पुन:श्च भरारी घेऊ  शकू.

लक्षात ठेवण्याजोगं काही-

शक्यतो ताजं आणि सकस अन्न खा. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यानं जुलाब, उलटी, विषमज्वर होऊ  शकतात. त्यातून प्रतिकारशक्ती खालावते.

स्वच्छता पाळा; स्वत:ची आणि घराचीही.

चातुर्मास येतो आहे. सणसमारंभ, घरातले मोठे कार्यक्रम टाळा.

बाहेर पडताना पर्स, मोबाइल, गॉगल, रुमालाइतकीच मुखपट्टीही अनिवार्य आहे. स्वत: बरोबर दुसऱ्यांनाही वापरण्यास भाग पाडा.

व्यक्तीव्यक्तींनी एकमेकांपासून दूर राहा- शरीरानं! मनानं नव्हे.

सर्दी, ताप अशी लक्षणं वाटल्यास काळजी करण्याऐवजी ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या.

प्रत्येक ताप ‘करोना’मुळेच असेल असं नाही. परंतु म्हणून दुर्लक्ष नको.

पावसाळ्यात पाणी उकळून प्यायला हवं.

लहान मुलांचं लसीकरण वेळेवर करा.

आरोग्यासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांना समजून घ्या, सहकार्य करा.

सावध राहा आणि सुरक्षित राहा.