डॉ. अंजली जोशी – anjaleejoshi@gmail.com

करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रत्येकाच्याच मनात चिंतेचं वातावरण वाढू लागलं आहे. चिंता व्यक्तिसापेक्ष असली तरी बहुतांशी ती ‘अज्ञाताची’ असते. पुढं काय घडणार, हे माहीत नसल्यामुळे ‘माझं’ काय होणार ही चिंता अनेक कु तर्काना जन्म देते, त्यांचं भयंकरीकरण करते आणि त्यातून मन:स्वास्थ्य हरवतं. म्हणूनच जे अज्ञात आहे त्याविषयी नकारार्थी विचार न करता वर्तमानात जगलं तर अज्ञाताच्या चिंतेशी टक्कर देणं सहज शक्य आहे.

why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

‘गेली वीस र्वष मी प्लास्टिकच्या उत्पादनाचा लघुउद्योग चालवतोय. पण टाळेबंदी जाहीर झाल्यापासून तो बंद करावा लागलाय. कामगार त्यांच्या गावाला गेले आहेत. मी फार कष्टपूर्वक, पशांची जमवाजमव करत, स्वकष्टावर हा कारखाना उभारलाय. धंद्यातले चढउतार मी अनुभवले आहेत. पण आताएवढी अनिश्चितता कधीच नव्हती. झालेल्या नुकसानाचं स्वरूप आणि कालावधी याचा अंदाज असायचा. त्यामुळे तशी सोय करता यायची. पण सध्याच्या परिस्थितीत काहीच कळत नाही. करोनाचा प्रादुर्भाव किती पसरेल, टाळेबंदी किती दिवस चालेल, आíथक नुकसान किती होईल, कशाचाच अंदाज येत नाही. समजा टाळेबंदी उठली, तरी गावाला गेलेले माझे कामगार लवकर परत येतील का, नाही आले तर मग माझ्या कारखान्याचं काय, धंदाच डबघाईला येईल की काय, असे असंख्य प्रश्न आ वासून उभे आहेत. विचार करकरून माझी झोप उडाली आहे. प्रत्येक दिवस उजाडला की आज किती नुकसान झालं तेच डोळ्यांसमोर येतं. आत्मबळच नाहीसं झाल्यासारखं वाटतंय.’ संजीव सांगतो.

शालिनीबाईंची चिंता वेगळी आहे. त्या म्हणतात, ‘‘माझी पंचाहत्तरी उलटली आहे. पतीचं  निधन झाल्यापासून मी घरी एकटी असते. मुलं परदेशात असतात. मी माझी प्रकृती सांभाळून आहे. करोनाच्या बातम्या यायला लागल्यापासून, विशेषत: वृद्धांना करोनाची लागण होण्याचा धोका जास्त असल्याचं कळल्यापासून तर मी विशेष काळजी घेते. घरातली सर्व कामं जमेल तशी स्वत:च करते. मी चुकूनही घराबाहेर पडत नाही. तरीही भीतीची छाया सतत मनात असते. करोनाच्या बळींचा रोजचा वाढणारा आकडा पाहून मनात धस्स होतं. पुढला बळी मी असेन की काय अशी भीती वाटत राहते. बाहेरच्या वस्तू आणून देण्यात शेजारीपाजारी थोडीफार मदत करतात. पण करोनारुग्णांना वाळीत टाकल्याच्या बातम्या ऐकल्या की धास्ती वाटते. जर मला करोनाची लागण झाली, तर मदतीला कोण येणार याची चिंता वाटत राहते. सतत घरात राहून रस्त्यावर चालण्याचा आत्मविश्वास कमी झालाय. तसं झालं तर पुढं कसं निभावणार याची चिंताही भेडसावत राहते.’

करोनाचा प्रादुर्भाव जसजसा वाढत चालला आहे, तसतसं सगळ्यांच्याच मनावर कुठल्या ना कुठल्या चिंतेचं सावट आहे. काहींना संजीवप्रमाणे स्वत:च्या व्यवसायाच्या भविष्याची चिंता आहे, तर काहींना शालिनीबाईंप्रमाणे प्रकृतीची चिंता आहे. काहींना नोकरी मिळेल का अशी चिंता आहे, तर काहींना असलेली नोकरी टिकेल का याची चिंता आहे. काहींना कर्जाचे हप्ते फेडण्याची चिंता आहे, तर काहींना परदेशात शिक्षण घेण्याच्या योजनेवर पाणी फिरतंय का, याची चिंता आहे. काहींना अर्धवट राहिलेल्या परीक्षांची चिंता आहे, तर काहींना शिक्षण निर्वघ्निपणे पूर्ण होईल का, याची चिंता आहे.

आपल्या सर्वानाच कुठल्या ना कुठल्या प्रकारची चिंता एरवीच्या जीवनातही असते. पण सध्या  इतक्या आकस्मिकपणे बाह्य़ परिस्थितीत उलथापालथ झाली आहे, की चिंतेची तीव्रता जास्त वाढली आहे. आपण बाह्य़ परिस्थिती नियंत्रित करू शकू हा विश्वास जेव्हा कमी होतो तेव्हा चिंतेचं प्रमाण व तीव्रता वाढते. प्रसारमाध्यमांवरील चिंताजनक बातम्या, सततच्या सावधगिरीच्या, दक्षतेच्या सूचना, बळींचा वाढत जाणारा आकडा, वेगवेगळे अंदाज, इत्यादींमुळे इतरांशी होणारा संवाद हा ‘करोना’ या एकाच विषयाभोवती प्रामुख्याने फिरत राहतो. एका व्यक्तीला वाटत असलेली चिंता दुसऱ्या व्यक्तीकडे नकळतपणे संक्रमित होते. त्यामुळे ही चिंता वैयक्तिक न राहता तिला सामुदायिक चिंतेचं स्वरूप आलं आहे.

संपूर्ण समाजाला वेढून टाकणाऱ्या या चिंतेचं स्वरूप काय आहे, याचा शोध अनेक संशोधक घेत आहेत. या चिंतेला ते संबोधतात, ‘अज्ञाताची चिंता’. बाह्य़ परिस्थितीत अनिश्चितता व संदिग्धता जेवढी जास्त, तेवढी ही चिंता जास्त असते. ‘अज्ञात गोष्टींचं भय ’(‘फिअर ऑफ अननोन’) ही मनुष्याला जाणवणारी प्राथमिक भावना आहे. ती कमी करण्यासाठी आपण भविष्याचं नियोजन करतो, त्याबाबत योजना आखतो, आर्थिक तजवीज करतो. त्यामुळे भविष्यातील परिस्थिती आपण बऱ्यापकी नियंत्रित करू शकतो. दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक चिंता असल्या तरी त्यांना प्रवृत्त करणाऱ्या घटकांच्या परिणामांची, स्वरूपाची थोडीफार जाणीव आपल्याला असते. त्यामुळे हे घटक आपल्याला संपूर्णत: अज्ञात नसतात. पण करोनाच्या बाबतीत मात्र त्याच्या उपाययोजनेपासून ते परिणामांपर्यंत बहुतांशी घटक आपल्याला अज्ञात आहेत. आज टाळेबंदी तर उद्या भाजीबंदी अशा बदलत्या घटनांना रोज सामोरं जायला लागतंय. पुढं नेमकं काय घडणार आहे हे माहीत नसल्यामुळे त्याला तोंड देण्याची तयारीही एका मर्यादेपलीकडे करता येत नाही. तसंच तोंड देण्याचा एकच एक ठोस मार्गही ज्ञात नाही. अनेक परस्परविरोधी मार्ग, भाकितं, उपाययोजना सामोऱ्या येत असल्यामुळे गोंधळ वाढतो. त्यामुळे अज्ञाताची चिंता उफाळून वर आली आहे. संजीव व शालिनीबाई अज्ञाताच्या चिंतेमुळे अस्वस्थ आहेत. त्यांना ज्या घटकांची चिंता आहे, त्यांची निश्चित उत्तरं या घडीला कुणापाशीच नाहीत. पण ही उत्तरं नसली तरीही ते या चिंतेशी मुकाबला करू शकतात. त्यासाठी त्यांनी अनिश्चिततेला टक्कर देण्याचं सामथ्र्य वाढवलं पाहिजे. पुढील विचारांचा अवलंब केला तर हे सामथ्र्य वाढू शकेल.

अज्ञात वाटतं तेवढं भयावह नसतं –

जेव्हा आपण अज्ञाताच्या चिंतेनं घेरले जातो, तेव्हा आपण परिस्थिती आहे त्यापेक्षाही फुगवून ठेवतो व भविष्यात फारच वाईट घडेल असं गृहीत धरून त्याचं भयावह चित्र डोळ्यांसमोर उभं करतो. आपण कल्पनेत रंगवतो तेवढी वास्तवता भीषण नसते. आपण कल्पनेनं तिला महाभयंकर करून ठेवतो. मार्क ट्वेन यांचं एक सुप्रसिद्ध वचन आहे. ते म्हणतात, ‘मी अनेक संकटांशी सामना केला आहे. पण त्यातली बहुतेक संकटं प्रत्यक्षात उद्भवलीच नाहीत.’ याचा अर्थ असा की, ही संकटं त्यांनी मनातल्या मनात कल्पनेनं निर्माण केली होती. संजीव व शालिनीबाईंनी हे जर लक्षात घेतलं, तर अज्ञाताचं भयंकरीकरण ते करणार नाहीत. भविष्यात संजीवच्या व्यवसायातल्या किंवा शालिनीबाईंच्या प्रकृतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता असली तरी त्यातूनही मार्ग निघू शकतो व त्या सुसह्य़ होऊ शकतात यावर ते लक्ष केंद्रित करतील.

उद्दिष्टकेंद्रित व्हा, चिंताकेंद्रित नको –

एकदा आपल्या मनावर चिंतेचं सावट आलं, की ती कमी करण्याऐवजी आपण एका चिंतेतून दुसरी, दुसरीतून तिसरी असा चिंतेचा पसारा वाढवून ठेवतो. त्यामुळे मूळ समस्येवर उपाययोजना करणं बाजूला पडतं. व्यवसायाचं अधिकाधिक नुकसान होत गेलं तर काय, या चिंतेनं संजीव इतका वेढला गेला आहे की स्वत:च्या मूळ उद्दिष्टावर म्हणजे संभाव्य नुकसान कमी करण्याच्या प्रयत्नांवर तो लक्ष केंद्रित करू शकत नाही. किंवा टाळेबंदीनंतर कामगार आले नाहीत तर पर्यायी मार्गाचा विचार करू शकत नाही. शालिनीबाईही मला करोनाची लागण होईल की काय, लागण झाली तर मदत मिळेल का, मी रस्त्यावर पूर्वीसारखी चालू शकेन का, नाही चालू शकले तर काय, अशा चिंतेच्या अनेक फेऱ्यांत अडकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याला हानी पोचत आहे व स्वत:ची प्रकृती सुस्थितीत ठेवण्याच्या मूळ उद्दिष्टाला बाधा येत आहे. संजीव व शालिनीबाईंनी जर चिंतेवरचं लक्ष हटवून उद्दिष्टांवर केंद्रित केलं तर भविष्याला तोंड देण्याची पूर्वतयारी ते करू शकतील.

नवीन संधी शोधा –

जेव्हा परिस्थितीत आकस्मिकपणे बदल घडतात तेव्हा त्या बदलांत भविष्याच्या अनेक नवीन संधी दडलेल्या असतात. या संधी शोधण्यासाठी मानसिकता अनुकूल करणं गरजेचं आहे. संजीव व शालिनीबाईंनी जर मानसिकता अनुकूल ठेवली तर अनेक नवीन संधी त्यांच्या दृष्टोत्पत्तीस येतील. संजीव अशा संधीचा विचार करू शकेल, की सद्य परिस्थितीत मागणी असेल अशा आरोग्यक्षेत्राशी किंवा इतर क्षेत्राशी संबंधित प्लास्टिकचं वेगळं उत्पादन मी काढू शकेन का? तसं असलं तर त्याचा आराखडा करणं, आवश्यक ती यंत्रसामग्री जमवणं, डीलर्सशी बोलणं, ग्राहकांचा अंदाज घेणं अशा गोष्टींमध्ये तो हा वेळ सत्कारणी लावू शकेल. जर चिंतेत घालवला जाणारा वेळ त्यानं नवीन संधीच्या विचारात घालवला तर चिंतेची तीव्रताही कमी होऊ शकेल. शालिनीबाईही असा विचार करू शकतात, की मी बाहेर जात नसले तरी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्यात वेळ सत्कारणी लावू शकते. माझ्यासारखे अनेक वृद्ध आजूबाजूला असतील व माझ्यासारख्याच समस्यांना तेही तोंड देत असतील. त्यांचा समाज माध्यामांद्वारे परस्पर-आधार गट (‘सपोर्ट ग्रुप’) तयार करण्यात मी पुढाकार घेऊ शकेन व त्याचा उपयोग माझ्याबरोबर इतरांनाही होऊ शकेल.

वर्तमानकाळात जगा –

करोनानं आपल्याला वर्तमानकाळात जगण्याची शिकवण दिली आहे. आजघडीला भविष्य इतकं अज्ञात आहे, की त्याच्या चिंतेपेक्षा वर्तमानकाळ सार्थकी लावणं महत्त्वाचं आहे. नेहमीच्या धावपळीत आपल्या अनेक गोष्टी राहून गेल्या असतात किंवा नंतर करू म्हणून आपण पुढं ढकलल्या असतात. त्यापकी ज्या घरातल्या घरात करता येण्यासारख्या आहेत, उदाहरणार्थ, राहून गेलेले फोन करणं, सामान आवरणं, मोबाइलमधले नको ते मेसेज, फोटो, व्हिडीओ काढणं, फोटो एकत्र करणं, जुना छंद जोपासणं, संगीत ऐकणं. त्या करून आपण वर्तमानकाळाचा आनंद घेऊ शकतो. संजीव व शालिनीबाईंनीही फार पुढचा विचार न करता पुढील एक किंवा दोन दिवसांचाच विचार केला तर ते वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित करू शकतील व आपण शारीरिक- दृष्टय़ा तंदुरुस्त आहोत याचा आनंद घेऊ शकतील.

एका तत्त्ववेत्त्याने म्हटल्याप्रमाणे, आपण ज्या गोष्टींना घाबरत असतो, त्या गोष्टींपेक्षाही घाबरण्याचा विचारच अनेकदा जास्त मोठा असतो.  अज्ञाताला ज्ञात करण्याचं सामथ्र्य अजूनही आपल्याकडे नाही. पण त्याच्या विचारांना मोठं न करणं आपल्या हातात आहे. ते करून अज्ञाताच्या चिंतेला आपण समर्थपणे टक्कर देऊ शकतो.