News Flash

चिंतेचं मळभ हटवताना..

‘करोना’ आणि त्यातून उद्भवलेल्या टाळेबंदीला सुरुवात झाली आणि या बाह्य़ परिस्थितीचं मळभ आपल्या सगळ्यांच्या मनावरही हळूहळू गडद होऊ लागलं.

अस्वस्थता घालवून मन स्थिर करण्याचेही काही मार्ग आहेत.

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी – urjita.kulkarni@gmail.com

‘करोना’ आणि त्यातून उद्भवलेल्या टाळेबंदीला सुरुवात झाली आणि या बाह्य़ परिस्थितीचं मळभ आपल्या सगळ्यांच्या मनावरही हळूहळू गडद होऊ लागलं. हे सगळं काय चाललंय, हे कधी संपणार, सगळं कधी पूर्वीसारखं होईल का, असे अगणित प्रश्न रोज आपल्या मनात येत असतात. या प्रश्नांची मालिका चिंता बनून मनाला सारखी सतावते, भिववते. पण ही अस्वस्थता घालवून मन स्थिर करण्याचेही काही मार्ग आहेत. या दिव्यातून तरून जाण्याचा निश्चय करून या मार्गावर चालण्याचा प्रयत्न सुरू केला, तर आपल्याला हा प्रवास अशक्य नक्कीच नाही..

आपल्या सर्वाना अतिपरिचयाच्या झालेल्या ‘करोना’च्या वैश्विक साथीच्या पाश्र्वभूमीवर ‘डिप्रेशन’ अर्थात नैराश्य, ‘पॅनिक’, भीती, आणि ‘अँक्झायटी’ म्हणजे सतत मनाला लागून राहिलेला घोर किंवा एक प्रकारची चिंता, हे शब्द आपल्या रोजच्या जगण्यात, बोलण्यात कधी मिसळून गेले ते आपल्यालाही कळलं नाही. अर्थातच त्यांच्या वेटोळ्यांनी घट्ट आवळण्याची सुरुवात झाल्यानंतर आपल्याला त्यातलं गांभीर्य समजू लागलं. सहज जाता जाता वापरायचे हे शब्द नसून त्या भयंकर अवस्था आहेत हे घराघरात जाणवायला लागलं आणि अनेकांच्या मनात एकच विचार सुरू झाला, हे नेमकं काय आहे? आणि कधीपर्यंत चालणार?

काल-परवापर्यंत आनंदी दिसणाऱ्या वरच्या मजल्यावरच्या आजोबांना ‘अँक्झायटी’ आहे म्हणे. सतत त्यांचा चेहरा कसल्याशा काळजीतच दिसतो. बारा-तेरा वर्षांच्या लहानग्या मिहीरला घरातून चालणाऱ्या ‘ऑनलाइन’ शाळेचं दडपण येऊन श्वास घ्यायला त्रास झाला होता. कायम एकलकोंडय़ा राहणाऱ्या पाटीलबाईंना याचसाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. त्या सतत ‘पॅनिक’ होत आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलेलं ऐकलं. नोकरीमध्ये चढउतार हे असणारच, तरीही आता चाळीस वर्षांच्या सुहासला अचानक नोकरीवरून कमी केलं. त्यानं घेऊन ठेवलेले दोन फ्लॅट, आणखी काही बाबतीतला पैशांचा तगादा, आता याचं काय आणि कसं होणार, या विचारानं सुहासनं अंथरूण  धरल्याचं ऐकलं. त्याला ‘नव्‍‌र्हसनेस’ की काही तरी झालंय..  ही सगळी उदाहरणं आपल्या जवळची, घरातलीच वाटतात ना?  एकाएकी ‘करोना’सह ‘अँक्झायटी’ची अर्थात चिंतेचीही  साथ पसरलीय की काय असं वाटावं, इतक्या प्रमाणात त्याची ठळक प्रकरणं दिसताहेत.

चिंतेची लक्षणं काय? त्यातली विविधता कशी? हे पाहण्याआधी ही चिंता नेमकी कुठून चालू होते, कुठे फैलावते, हे पाहू.  ‘चिंता’ हा विकार मानसशास्त्रात जसा स्वतंत्र आजार म्हणून येतो, तसाच इतर अनेक आजारांचा सोबती म्हणूनही. त्यातही तो नैराश्य, ‘स्किझोफ्रेनिया’ (छिन्नमनस्कता) इत्यादी आजारांमध्ये काही प्रमुख लक्षणांपैकी एक असाही असतो. ही चिंता  नेमकी कशाची, कशासंदर्भात, कशामुळे आहे हे सांगणं अवघड असतं. जसं अमुक एका गोष्टीची भीती किंवा भय वाटतं हे आपण स्पष्टपणे सांगू शकतो. उदा. गर्दीची, सापाची, अंधाराची भीती वाटणं; पण तसं चिंतेबाबत असेलच असं नाही. त्यामुळे नेमकं काय होतंय असं विचारलं, की याचा त्रास असणारी व्यक्ती वा रुग्ण केवळ ‘कसलीशी भीती, अस्थिरता वाटतेय, रडू येतंय, एकटं वाटतंय, काय होतंय ते कळत नाही,’ असं सांगतात. त्याचबरोबर अस्वस्थ वाटतंय, प्रचंड ताण आल्यासारखा वाटतोय, छातीवर दगड ठेवल्यासारखं होतंय, श्वास घायला त्रास होतोय, घाम येतोय, त्यानं हातापायाचे तळवे गार पडतायत, अंगाला कंप  सुटतोय, असंही बरेच जण सांगतात. सतत काही तरी विचित्र विचार येतायत, त्यांच्यावर नियंत्रण राहात नाही, ते ठेवायचं म्हटलं तरीही जमत नाही, एकंदरीत आता माझ्याबाबत, माझ्या कुटुंबाबाबत, माझ्या कामाबाबत, इतरांबाबत, काही तरी भयानक घडेल,  पुढे कसं होईल असं वाटत राहातंय, अशी यांपैकी अनेक व्यक्तींची भावना असते. त्यातून आपण यावर काहीच करू शकत नाही, हे लक्षात आल्यानं खूपच हताश व्हायला होतंय, हरल्याची भावना येते, सतत उदास वाटतंय, असं बऱ्याच जणांना वाटत असतं. इतर कशातच लक्ष लागत नाही, रात्रीची झोप शांतपणे येत नाही, छातीत धडधड होते, हृदयाजवळच दुखल्यासारखं वाटतं, हे इतकं वाढतं की आपण स्वत: किंवा आपल्या आजूबाजूची सगळी दुनिया गरगर फिरतेय असं वाटून चक्कर येते, यापैकी काहीही या व्यक्ती सांगू शकतात. मागच्या आठवडय़ात हाच त्रास असणारे एक्क्यांऐंशी वर्षांचे आजोबा म्हणाले, ‘‘डॉक्टर, जगबुडी येणार वाटतं आता! कसं होईल हो..?’’ यातून हा किती भयानक त्रासदायक प्रकार आहे हे लक्षात येईल.

आपण अनेकदा आजूबाजूच्या व्यक्तींच्या स्वभावाविषयी व्याख्या करतो. त्यांना नावंच देऊन टाकतो. जसं की, एखादा चिडखोर आहे, आनंदी आहे, मस्तमौला आहे, तसंच काही व्यक्तींना चिंता करण्याची ‘सवय’ असते किंवा तो लहानपणापासूनच वाढीस लागलेला ‘स्वभाव’ असू शकतो. म्हणजे कुणाला घरी यायला नियोजित वेळेपेक्षा उशीर झाला, की यांना काळजी वाटते, त्यातून ते अस्वस्थ होतील, अनेक वेळा दरवाजात जाऊन पाहातील, असं. पण स्वभाव (‘टेम्परामेंटल ट्रेट’) आणि याचा विकार किंवा इतर आजारांत दिसणारी याची लक्षणं यात खूपच तफावत असते. मात्र स्वभावत:च अती काळजी करणाऱ्या व्यक्ती याच्या गर्तेत हरवू शकतात.

आजमितीला आपण कोणत्याही वयोगटाच्या किंवा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विविध स्तरांतील कोणत्याही व्यक्तीचा विचार केला, तर साधारणपणे एरवी ३० टक्के  इतकं प्रमाण असणाऱ्या या विकाराची व्याप्ती आता मात्र वाढलेली दिसते. असं का? तर सध्याची  ‘करोना’ची परिस्थिती. हे अगदी वरवरचं सहज उत्तर वाटेल. पण या वैश्विक साथीच्या जागी इतर काहीही ठेवून त्याचा जागतिक पातळीवर सर्व स्तरांवर असाच परिणाम आहे, असं गृहीत धरलं तरीही हेच दिसेल. म्हणजेच काय, की या चिंतेचं खरं मूळ आपल्या स्वत:मध्ये दडलेलं आहे.

कसं ते पाहायला हवं. एकतर जन्माला येताना ज्या प्रकारचे स्वभाव-विभाव आपण घेऊन येतो, त्यानंतर आपली जडणघडण कशी होते हे फार महत्त्वाचं असतं. त्यातून आपण स्वत:विषयी, स्वत:सोबत किती आणि कशा प्रकारची मानसिक स्वस्थता बाळगून निश्चिंत आहोत हे ठरतं. जितकी जास्त स्वस्थता, तितके विचारांचे, भावनांचे छळवाद कमी! त्यानंतर आपापलं वैयक्तिक शिक्षण, सर्व प्रकारचं आरोग्य, आर्थिक स्थिती, सामाजिक स्थान, समाजाशी असणारा  संबंध, त्यात आपण स्वत:ला कुठे, कशा प्रकारे पाहतो, हे सर्वच हळूहळू व्यक्ती म्हणून आपल्याशी निगडित होऊ लागतं. यात एक अविभाज्य भाग म्हणजे आपली कुटुंबव्यवस्था, त्यातल्या व्यक्ती आणि त्यांच्याशी असणारे आपले नातेसंबंध. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर त्या-त्या वयाला अनुसरून यातल्या अनेक व्याख्या तयार करत, स्वत:सोबत चिकटवत आपण पुढे जात असतोच. प्रौढ वयात हे सगळंच अधिक रुजलेलं, मुरलेलं होऊन जातं. ही सगळीच परिस्थिती संपूर्णत: अबाधित राहावी, यात नकोसा बदल होऊ नये, यासाठी कळत-नकळत आपली प्रचंड धडपड असते. आणि इथेच येते आत्यंतिक निर्णायक बाब, ती म्हणजे या सर्वावर स्वामित्व गाजवत, आपल्या क्षमतेनुसार यावर ताबा मिळवत ते बदलू न देता जगण्याची वृत्ती! याचं साधं कारण म्हणजे, या निर्माण केलेल्या आपल्याच जगामुळे आपण आनंदात आहोत, सुखात आहोत, सहज आयुष्य जगत आहोत, हा तयार झालेला भ्रम किंवा पोकळ विश्वास! ते कोणत्याही प्रकारे कष्टप्रद होऊ द्यायचं नसेल तर हेच आणि असंच जगत राहणं गरजेचं. म्हणून ते प्राणपणानं टिकवण्याकडे आपला कल असतो. इथे कुठेही ते आपल्या सांभाळण्याच्या क्षमतेपलीकडे जात आहे असं लक्षात आलं, की स्वत:चा स्वत:शीच झगडा चालू होतो. त्यामधून मनात अराजक माजत जातं. तेही स्वत:च्या, इतरांच्या थेट अस्तित्वाविषयी किंवा असं म्हणू- हव्या तशा, योजलेल्या अस्तित्वाविषयी. तिथे अस्वस्थता येते आणि मग ती लक्षणांच्या द्वारे पुढे येते. जसं हातपाय गार  पडणं, घामेजणं, थरकाप, धडधड आणि वर सांगितलेली लक्षणं, इत्यादी. चिंता अनेकदा काही विशिष्ट कारणांमुळेही अचानक वाढू शकते वा सुरू होऊ शकते. म्हणूनच ‘करोना’ची वैश्विक साथ किंवा असं कोणतंही कारण हे केवळ तात्कालिक कारण असू शकतं.

अशा आपल्या प्रत्येकाच्याच मनाच्या तळाशी लपलेल्या चिंतेचं करायचं तरी काय?  की हा त्रास सहन करत राहायचं?  याचं पहिलं उत्तर म्हणजे ती आहे, असणारच आहे, असं तिला पूर्णत: स्वीकारायचं. एकदा का हे स्वीकारलं, की ती का आहे, मलाच का हा त्रास, किती असह्य़ त्रास आहे, तो कधी संपणार, इत्यादी प्रश्नांतून आपली आपसूक सुटका होते. जसं राग, प्रेम या भावना योग्य पातळीवर आवश्यक असणाऱ्या भावना आहेत. तसंच ही चिंता काही बाबतीत आपल्या स्वत:च्या रक्षणासाठी, योग्य निर्णय घेण्यासाठी, सकारात्मकरीत्या उपयोगी पडतेच. म्हणूनच तिला स्वीकारायचं.

पुढची पायरी, इथे जसं याचा कायमचा त्रास किंवा यासोबत इतर विकार असणाऱ्या, त्यातही ‘अचानक पॅनिक होणाऱ्या’ रुग्णांसाठी जे उपयोगी पडतं तेच – माझं, आयुष्याचं, जगाचं, इतरांचं कसं होईल, अशा खूप व्यापक विचारांच्या जागी जाणीवपूर्वक अगदीच एकाच दिवसापुरत्या किंवा असं म्हणू या- की रोज उगवणाऱ्या त्या-त्या दिवसाबद्दलच्या विचारांची पेरणी करायची. म्हणजे आज शनिवार आहे, मी सहा वाजता उठले, आता दहा वाजता माझं काम सुरू होईल.. इत्यादी. ज्यांना हेही शक्य नाही, त्यांच्यासाठी केवळ दिवसातला एकेक तास आणि तेवढय़ापुरता विचार, असं केलं की झालं! हे अजिबातच अवघड नाही. याची सवय लावून घ्यायची. असं केलं, की फार पुढचे विचार मुळात येतच नाहीत. त्यामुळे त्यांच्या सतावण्याचाही प्रश्न नाही.

अनेकदा नको असलेले विचार चालू झाले, ते तसेच मनात, मेंदूत वाढायला सुरुवात झाली, की त्यांनी ताबडतोब निघून जावं म्हणून आपण अट्टहास करतो. त्यासाठी मन वळवण्याचा आटोकाट प्रयत्न करतो, कित्येक उपाययोजना ठरवून करतो. त्याऐवजी, असे विचार, भीती चालू झाली, की तिला उपटून काढण्याच्या मागे लागण्यापेक्षा आपण जे काम त्यावेळी करतोय ते चालूच ठेवायचं. त्यातून या विचारांकडे, भीतीकडे आपोआप दुर्लक्ष करता येतं. तेही नकळत, सहज. कारण मन फार विचित्र आहे. ज्याचा आपल्याला  विचार करायचा नाही असं आपण घोकतो, मन त्याचाच विचार करत राहतं. त्यामुळे त्यावर हल्ला चढवण्यापेक्षा शांत राहाणं हा उपाय. याशिवाय त्याच-त्याच विषयासंदर्भात सातत्यानं बोलणं किंवा त्याचीच माहिती मिळवत राहाणं, त्या संदर्भातल्याच बातम्या वाचणं, बघणं, यानं तर तोटाच होतो. त्यामुळे कटाक्षानं ठरवून यापासून दूर राहिलेलंच बरं.

आता एक महत्त्वाचं करु या- पण त्याआधी किती जण सहजतेनं आपल्या कुटुंबात स्वत:ला असणाऱ्या समस्यांविषयी मोकळेपणानं बोलू शकतात, त्यांच्याबद्दल चर्चा करू शकतात, हा प्रश्न स्वत:ला विचारू. अनेकांचं उत्तर नाही असंच येईल. आपल्या स्वत:च्याच कुटुंबातल्या व्यक्ती आपल्याला नावं ठेवतील किंवा आपल्या आजाराची चेष्टा मांडली जाईल, कुणीही विश्वासच ठेवणार नाही किंवा आपला तसा स्वभाव आहे म्हणून त्यात आपलीच चूक कशी हेच आपल्याला सांगतील किंवा आपण मुद्दामच करतोय असंही म्हणतील, अशीच धारणा अनेकांची असते.

आपल्याच कुटुंबाविषयी असलेल्या या आणि अशा धारणा ही खेदाची बाब! त्यामुळेच आपल्या मानसिक आजारांना दडवण्याची वृत्ती वाढते. यांपैकी काही व्यक्ती आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांपासून लपवून काही ‘आधार समूहांत’(‘सपोर्ट ग्रुप’) सहभागी होतात. विशिष्ट स्थिती, आजार, व्यसनाधीनता, यांच्यासाठी असे समूह असतात. याचा नक्कीच उपयोग होतो. परंतु आपण सर्वानीच आपापल्या कुटुंबांनाच ‘आधार समूह’ बनवलं तर? आता इथे कुटुंब म्हणजे केवळ रक्ताची, बांधिलकीची नाती असणाऱ्या व्यक्ती, या अर्थापेक्षाही आपले स्नेही आणि आपल्याला  जवळची वाटणारी सारी मंडळी. जसं आधार समूहांमधल्या बैठकांचे काही नियम असतात, तसंच आपल्या घरात, कुटुंबात अशा चर्चा घडताना आपण नियमच घालून घेतले, तर तेही सयुक्तिक. म्हणजे सर्वानी एकमेकांचा संपूर्ण आदर राखत, त्यांचं म्हणणं ऐकायचं. त्यावर कोणतीही टीका-टिप्पणी, निर्भर्त्सना न करता. प्रत्येकाला बोलण्याची, विचार मांडण्याची संधी असलीच पाहिजे. प्रत्येकानं या उपक्रमात शंभर टक्के  सहभागी झालंच पाहिजे. आपापली मतं मांडलीच पाहिजेत. हे कौटुंबिक आधार समूह आपापल्या व्यथा, मानसिक त्रास, भीती, शंका, आजार , व्यसनाधीनता, याविषयी बोलण्याची जागा म्हणून परिणामकारक ठरतील. त्यातून आपल्याच कुटुंबातल्या व्यक्ती अधिकाधिक जवळून समजतील किंवा एखाद्या व्यक्तीला समजा चिंतेचा त्रास आहे, तर त्याच्याशी कसं वागायचं, त्याची कशी काळजी घायची, हेही सहज लक्षात येईल. त्याचबरोबर एखाद्या वेळेस एखादी व्यक्ती अचानक चिडचिड करत असेल किंवा अबोल झाली असेल, तर ते चटकन समजू शकेल. तिथे हळुवारपणे विचार करणं शक्य होईल.

हे कौटुंबिक आधार समूह कशासाठी?  तर अनेकदा मानसोपचार घेतानादेखील कुटुंबाच्या भक्कम आधाराची गरज असतेच. शिवाय आपण जिथे आपला सर्वाधिक वेळ घालवतो, त्या जागी राहात असताना, जगत असताना आपल्या मनावर कोणत्याही प्रकारचा ताण नसेल, कोण काय म्हणेल याचं दडपण, भीती नसेल, अपेक्षा पूर्ण करण्याचं ओझं नसेल, तर कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक मानसिक कलानं प्रगल्भ वाढ होईल. कित्येक मानसिक आजारांची कारणं नष्ट होण्याची शक्यताही यातून नाकारता येत नाही. शिवाय दुसऱ्या अशाच कुटुंबाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सहानुभूतीचा असेलच!

मित्रमैत्रिणी म्हणून आपल्या आजूबाजूला असलेल्या व्यक्ती आपल्या खास आवडीच्या असतात. त्यांचाही समावेश या आधार समूहात करता येईलच. जर असं वातावरण एखाद्या चिंतेनं ग्रासलेल्या व्यक्तीला मिळालं, तर तिला तिच्या मनाशी असणारी अस्वस्थता खुलेपणानं मांडता येईल. त्यातून उपायही सुचू शकतील.

चिंता किंवा इतर कोणत्याही मनोविकारातून बाहेर येण्यासाठी औषधांचा मोठा वाटा असतो. ते डावलून चालणारच नाही. परंतु या चिंतेच्या आजाराला असं जवळून समजून, ओळखून घेतलं, तर त्याच्या मोठय़ा दिसणाऱ्या, पाठी लागलेल्या राक्षसी सावलीचं भय वाटणार नाही हे नक्की! आत्ताची परिस्थिती जी आहे, जशी आहे, ती आपल्या एकटय़ासाठी नसून सर्वासाठी आहे. त्यामुळे आपल्यासारखेच विचार किंवा भावना इतरांच्याही असणं स्वाभाविक आहे. इथे हे कधी बदलेल किंवा नेमकं काय होईल, याचा विचार करत कुढत, घाबरत अस्वस्थ राहण्यापेक्षा, आपल्या प्रत्येक दिवसागणिक आपण अधिकाधिक जगू या. इतरांनाही समजून घेऊ या. ते सहजसाध्य आहे.

(लेखिका होमिओपॅथिक तज्ज्ञ व मानसोपचारतज्ज्ञ आहेत.)

 

 

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2020 2:21 am

Web Title: coronavirus pandemic physiological effect on human mind dd70
Next Stories
1 मानवी आक्रमकतेमागची कारणं!
2 गर्जा मराठीचा जयजयकार : ‘‘मराठी पक्की, तर इंग्रजी कठीण नाही!’’
3 हेल्पलाइनच्या अंतरंगात : विद्यार्थ्यांचा सक्षम आधार
Just Now!
X