‘करोना’नं केलेली दीर्घकाळची टाळेबंदी आणि संचारबंदी ही बहुतेकांच्या आयुष्यातली पहिलीच घटना असली तरी वेगळ्या प्रकारच्या संकटांना, भीतीला किंवा वेगळ्या प्रकारच्या टाळेबंदीला आधीच्या पिढीने तोंड दिलेलं आहे. स्वातंत्र्योत्तर काळातील भारत-पाक आणि भारत-चीन युद्धाच्या प्रसंगी अनेकांनी संचारबंदी, ब्लॅकआउट अनुभवले आहेत. तर पूर, भूकंप इतकं च नव्हे तर प्लेगसारख्या साथीनं अनेक गोष्टी दाखवल्या आणि शिकवल्यादेखील. ते सांगणारे मान्यवरांचे भूतकाळात नेणारे हे काही अनुभव..

‘योद्धय़ां’च्या समर्पणाचं भान
डॉ. वीणा देव

आताची ‘करोना’काळातली परिस्थिती एका अर्थी अभूतपूर्व म्हणावी अशीच. अशी टाळेबंदी यापूर्वी कधी झाल्याचं आठवत नाही. तसं भारत-चीन युद्धाच्या वेळी कर्फ्यू, गर्दीवर नियंत्रण हे चित्र पाहिलं होतं. पण त्यातलं गांभीर्य नीट कळण्यासाठी ते वय लहान होतं. संचारबंदी काय असते, हे मी खऱ्या अर्थानं अनुभवलं ते १९६५ मध्ये. तेव्हा मी असेन १५-१६ वर्षांची. नेहमीसारखा दिवस होता. थोडी मौज म्हणून आम्ही ३-४ मैत्रिणी लक्ष्मी रस्त्यावरच्या ‘विजय’ टॉकिजमध्ये चित्रपट बघायला गेलो. चित्रपट संपला, आम्ही बाहेर पडलो तर काय.. शहरात संचारबंदी लागू झाली होती. सगळीकडे प्रचंड शांतता. समोर पोलीस. सगळं बघून आम्ही घाबरूनच गेलो. त्या वेळी मोबाइल फोन वगैरे प्रकार नव्हते. मग पोलिसांकडूनच कळलं, की मंडईच्या गणपतीवर कुणा माथेफिरूनं घाण टाकल्यामुळे दंगल झाली आणि त्यामुळेशहर बंद!

आम्ही लगबगीनं वसतिगृहावर पोहोचलो खऱ्या, पण नेहमीचं, सुरक्षित, सुखरूप वातावरण एकदम असुरक्षिततेत बदलू शकतं, या कल्पनेनं मनाला धक्का बसला होता. तो एक प्रकारचा धडाच- संचारबंदीनं शिकवलेला! त्याच दरम्यान भारत-पाकिस्तान युद्ध सुरू झालं. युद्धात रात्री ‘ब्लॅकआउट’ला महत्त्व. त्यासाठी विशिष्ट वेळी सायरन वाजत. हात पुरत नसे तरी स्टुलांवर चढून-चढून आम्ही खिडक्या बंद करत असू, खिडक्यांना कागद लावत असू. तो सायरन वाजला आणि नंतर वरून विमानं जाण्याचे आवाज यायला लागले, की खूप धास्ती वाटायची.  एखाद्या बॉम्ब विमानातून पडेल की काय, असा वेडा विचारही यायचा. त्या वेळच्या छोटय़ाशा पुण्यावर, त्यातही आम्ही राहात असलेल्या पर्वती या आणखीनच छोटय़ाशा भागावर बॉम्ब कशाला टाकतील, हे सर्व कळत असे. पण असुरक्षिततेची मनात बसलेली धास्ती त्याला पुरून उरे. त्यानंतर बांगलादेशच्या युद्धाच्या वेळीही हेच अनुभवलं.

आता विचार करते तेव्हा असं वाटतं, की या सगळ्या अनुभवांनी आपल्याला फक्त भीतीच दिली का? तर नक्कीच नाही. आपण आपल्या घरात ‘ब्लॅकआउट ’ करून बसलो आहोत तेव्हा कुणीतरी आपल्यासाठी शत्रूशी लढत आहे, ही जाणीवही त्या वेळी आयुष्यात प्रथम झाली होती. सैनिक देशाचं रक्षण करतात हे सर्वानाच माहीत असतं. पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती असे प्रसंग प्रभावीपणे देतात. आता ज्याप्रमाणे ‘करोना’ संकटात लोकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि आपण सगळे यात ‘एक’ आहोत हे सांगण्यासाठी टीव्हीवर, रेडिओवर वेगवेगळे कार्यक्रम लागतात, तशी युद्धाच्या वेळी खास तयार केलेली समरगीतं प्रसारित व्हायची. त्यातली अनेक अजूनही आठवतात. ग. दि. माडगूळकरांच्या ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या गीतातल्या ‘वावरतो, फिरतो आम्ही, नित्य कर्म अवघे करतो, राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची पोटे भरतो.. परि आठव येता तुमचा आतडे तुटतसे पोटी’, या ओळी ऐकताना आपल्यासाठी लढणाऱ्यांचं महत्त्व भिडायचं. आज संकट वेगळं आहे, परिस्थिती वेगळी आहे, पण भावना तशीच आहे. ‘करोना’पासून आपलं रक्षण करण्यासाठी वेगळे ‘योद्धे’  लढताहेत. ‘‘फार झाले दिवस आता पाहू पाहू वाटते, नीर डोळा दाटते,’’ असं आज कुणा त्यांच्या आप्तांनाही वाटत असेलच की.

युद्धाच्या वेळी सैनिकांना मदत पोहोचवणारे ट्रक फिरत असत. त्या वेळी आम्ही अगदी सामान्य परिस्थितीत असतानाही माझ्या आईनं गळ्यातली सोन्याची साखळी सैनिकांसाठी काढून दिली होती. आपल्याकडे असलेला अमूल्य जिन्नस आपण देऊन टाकतो आहोत, याची जराही खंत तिला वाटली नव्हती. वेगवेगळ्या प्रकारे अडलेल्याला मदत करण्यासाठी आजही हात पुढे येत आहेत. इतर वेळी सगळं काही सुरळीत सुरू असताना फक्त क्रिकेट सामन्यांच्या वेळी ‘देश’ म्हणून एकत्र येणाऱ्या सामान्य माणसाला ही अशी संकटं जवळ आणतात. तेच देश म्हणून जास्त महत्त्वाचे आहे.

भविष्यकाळाचा वेध भूतकाळामधून
माधव वझे 

महात्मा गांधी यांची १९४८ मध्ये हत्या झाली आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून दंगलीला सुरुवात झाली. तेव्हा मी मराठी चौथीमध्ये होतो. पाहता पाहता सगळं पुणं पेटलं आणि पोलिसांच्याही हाताबाहेर परिस्थिती गेल्यावर सैन्य आणलं गेलं. आणि शहरात ‘कर्फ्यू’ सुरू झाला. कर्फ्यू म्हणजे काय हेही तेव्हा कळत नव्हतं. तोच माझा संचारबंदीचा पहिला अनुभव होता. घरी वडिलधाऱ्यांनी बजावून सांगितलं होतं,‘‘आता दिवसभर घराबाहेर पाऊल टाकायचं नाही. घराच्या सज्जामध्येही जायचं नाही, खिडकीतून बाहेर डोकवायचंही नाही. कोणी नियम मोडला तर गोळी घालू, असं सैन्यानं जाहीर केलं आहे.’’ शाळेलाही काही दिवस सुट्टी असणार होती. तीन-चार दिवसांनंतर सूट मिळाल्यावर दुकानं थोडा वेळ उघडी राहायला लागली. लोकही तेवढय़ा वेळात जाऊन खरेदी करायला लागले. एक आठवतं, की वस्तूंचा पुरेसा पुरवठा नसल्याची तक्रार त्या दिवसांत तरी कोणी केल्याचं दिसलं नव्हतं.  मागे वळून पाहताना लक्षात येतं, की तेव्हा पुणं लहान होतं. एकत्र कुटुंबपद्धती रुजली होती. गावातली अनेक कुटुंबं एकमेकांना ओळखत होती. वाडा संस्कृतीमुळे माणसं एकमेकांना धरून होती. आणि मुख्य म्हणजे ज्यांना शक्य असे अशा बहुतेक घरांमध्ये वर्षभराचं, नाही तर  महिना-दोन महिन्यांचं तरी धान्य भरून ठेवण्याची पद्धत होती. कदाचित त्यामुळेच संचारबंदीच्या स्थितीत अनेकांना अन्नधान्याची चणचण भासली नव्हती.

गावाचं महानगर होत असताना उद्भवणाऱ्या प्रश्नांचा वेळीच विचार करून आम्ही आवश्यक ते नियोजन केलं नाही आणि जे काही केलं ते प्रत्यक्षात आणलं गेलं नाही. जसं वाढेल तसं आपण शहरांना वाढू दिलं. ‘करोना’च्या निमित्तानं पुन्हा एकदा तीव्रपणानं जाणवलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय  समस्यांची सुरुवात स्वातंत्र्यानंतरच्या काही दिवसांतच झाली होती, आणि त्या समस्यांची उत्तरं आपल्या नैतिकतेमध्ये होती. सध्या ‘करोना’चा सामना करता करता खूप वेळ मिळाला आहे. त्या वेळात भूतकाळामधून भविष्याचा वेध घेत राहणं वाईट नक्कीच नाही!

‘प्लेग’च्या धास्तीपासून संचारबंदीपर्यंत
श्रीराम रानडे 

माझा जन्म १९३९ मधला. माझे वडील शंकर वामन रानडे हे काही काळ फलटण संस्थानात रेशनिंग अधिकारी म्हणून नोकरीस होते. मी ‘बाहुली’च्या शाळेत मराठी दुसऱ्या यत्तेत शिकत होतो, त्या वेळी- म्हणजे १९४५-४६ मध्ये फलटणला ‘प्लेग’ची साथ आल्याचं चांगलंच स्मरणात आहे. प्लेगचा संसर्ग टाळण्यासाठी आम्ही, आमचे घरमालक समुद्र यांच्या शेतावर जाऊन झोपडय़ा बांधून राहिलो होतो. कामानिमित्तानं शेतावरून गावाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या माणसांकडून कुठे उंदीर सापडले, कुठे लागण झाली, कोण गेलं, अशी ओझरती माहिती कानावर येत असे. खरं तर आताच्या संचारबंदीशी अगदी दुरान्वयानं का होईना, पण मिळताजुळता असा तो पहिला अनुभव होता. तरी आम्ही मुलं त्याचं गांभीर्य कळण्याएवढे मोठे नव्हतो. गावाबाहेर घातलेल्या झोपडय़ांमध्ये गुराढोरांमध्ये रमलो होतो. काही दिवसांनी प्लेगची साथ ओसरली आणि आम्ही घरी परतलो.

३० जानेवारी १९४८ मध्ये महात्मा गांधींची हत्या झाली तेव्हा आम्ही मिरजेला ब्राह्मणपुरीत महाबळ वाडय़ात राहात असू. त्या घटनेनंतर निर्माण झालेला विचित्र सामाजिक तणाव आणि भीती अशा परिस्थितीत शिकवणीहून मित्राबरोबर घरी येताना मी रस्त्यावर अघोषित संचारबंदीसारखी भयाण शांतता अनुभवली. ती अजूनही आठवते. सांगली, मिरज, बुधगाव, कुरुंदवाड, औंध, कोल्हापूर, इचलकरंजी या संस्थानी गावांमध्ये पुढे २९ फेब्रुवारी १९४८ पर्यंत ‘कर्फ्यू’चा आदेश निघाला होता. आताही संचारबंदी म्हटलं की मला तोच ‘कर्फ्यू’ आठवतो. मिरज-सांगली परिसर सोडून मी १९५८ मध्ये पुण्यात आलो.  ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘संयुक्त महाराष्ट्र’ची चळवळ या काळात सांगली-मिरजमध्ये संचारबंदी होती, पण ती तेवढय़ापुरतीच. भारत-पाक युद्घाच्या वेळची (१९६५) प्रकाशबंदी (‘ब्लॅकआउट’) मात्र चांगली आठवते. (आणि तशा परिस्थितीतही सज्जात येऊन आकाशात पाकिस्तानची विमानं कशी घिरटय़ा घालत आहेत हे पाहणारी अतिउत्साही मंडळीही आठवतात.)

राज्यात १९९४ मध्येही काही भागांत प्लेगची साथ आली होती. मी नाशिकमध्ये ‘जावई माझा भला’ या नाटकाचा प्रयोग करून पुण्याला परतण्यासाठी एसटीमध्ये बसलो. प्लेगची भयानकता ओसरल्यानंतरची ती एसटीची पहिलीच फेरी होती. बसमध्ये आम्ही मोजून तीन प्रवासी आणि वाहक आणि चालक. बसमध्ये हवं तिथे झोपायला जागा असली तरी रात्रभर प्लेगच्या धास्तीमुळे डोळ्याला डोळा नव्हता. सारखा काखेत गोळा आलाय की काय, असा भास व्हायचा. घरी आलो आणि तासभर खसखसून अंघोळ केली. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ याचा जो अनुभव आज आपण घेतोय, तीच भावना तेव्हा प्लेगबद्दल होती.

युद्घासारख्या गोष्टी असोत किंवा भूकंप वा पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती असोत. त्या दृश्य स्वरूपाच्या असल्यामुळे त्यांचा सामना करणं वेगळं आणि ‘करोना’सारख्या अदृश्य शत्रूचा सामना करणं वेगळं. पूर्वी तर प्लेगसारख्या आजारांना सामोरं जाताना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची माहिती मिळवण्यासाठी आतासारखी आधुनिक साधनंही नव्हती. आता माहितीचा महापूर आहे. पण अति माहितीही आपल्याला मानसिकदृष्टय़ा कमजोर बनवते असं वाटतं कधी कधी. त्यामुळे सध्याची वेळ तारतम्य राखून मनाचं स्वास्थ्यही टिकवायचे आहे. बाकी संकटं आणि आपत्तींना आपण पूर्वीही यशस्वीपणे तोंड दिलं आहे, आणि आताही देऊच.

एकवटण्याची भावना हीच शिदोरी 
माधवी वैद्य 

भारत-चीन युद्धाच्या वेळची एक आठवण आजही ताजी आहे, मी शाळेत होते तेव्हा.  माझी आई ‘जागृती महिला मंडळ’ चालवत असे.  सरकारकडून तेव्हा हिरव्या रंगाची लोकर मिळत असे आणि त्यापासून सैनिकांसाठी हातमोजे आणि पायमोजे विणले जात. आई आम्हालाही विणकाम शिकवे आणि ती सांगेल तसतसं आम्ही विणत असू. युद्ध वगैरे गोष्टी फारशा समजत नव्हत्या, आपण जे विणतो ते सैनिकांपर्यंत कसं पोहोचवतात तेही कळत नसे. पण तरी एक प्रकारचं समाधान वाटे. आता विचार करताना वाटतं, की संकट, त्यासाठी लढणारे लोक आणि जे प्रत्यक्ष सीमेवर जाऊन लढत नाहीत त्यांच्याकडून लागत असलेला हातभार याचं किती चांगलं उदाहरण होतं ते!

आपण सगळे एकमेकांच्या बरोबर आहोत, ही सकारात्मकता त्या छोटय़ाशा गोष्टीनं मनात निर्माण केली होती. नंतर आणीबाणीच्या वेळी तुरुंगात डांबल्या गेलेल्या लोकांसाठीही सामान्य नागरिक एकवटलेले आठवतात. अनेक जण अगदी घरटी

४-५ पोळ्या जमवत आणि तुरुंगात नेऊन पोहोचवत. चीन युद्धाच्या वेळी आपलं स्त्रीधन काढून सैनिकांसाठी देऊन टाकताना स्त्रिया मागे-पुढे बघत नसत. आजच्या ‘करोना’ संकटाची आणि त्या वेळच्या परिस्थितीची तुलना होऊ शकत नाही. पण आज आपण ज्या ‘एक’ असण्याच्या भावनेबद्दल बोलतो ती भावना निराळी नाही. ज्यांच्यासाठी सर्व व्यवस्था राबताहेत, असे आपण सगळे नागरिक. पण एक लहानशी कृतीही आपल्याला मदत करण्याचं समाधान देऊन जाते. त्याची प्रचीती हीच पूर्वीच्या संकटांमधून मिळालेली शिदोरी!

स्वयंशिस्त आणि सहभागाचा अभाव
उल्हास पवार 

रोजचं आयुष्य नेहमीसारखं सुरू असताना जेव्हा अचानक कुठला तरी व्यापक बदल घडतो तेव्हा केवळ वैयक्तिक पातळीवरच नव्हे, तर सामाजिक पातळीवर व्यक्त होणारी आपली प्रतिक्रिया मला महत्त्वाची वाटते. ‘करोना’च्या संकटामुळे जग हादरलं आणि हा हा म्हणता ते संकट आपल्या दाराशी पोहोचून त्यानं आपल्या भोवतालचं वातावरणही भेदरलं. या प्रकारची स्थिती यापूर्वी कधी पाहिली नव्हती, पण त्या त्या काळानुसार घडलेल्या लहान-मोठय़ा बदलांना किंवा अगदी धक्का देणाऱ्या घटनांना मात्र आपण समाज म्हणून यापूर्वीही सामोरे गेलो आहोत. व्यक्तींचा समूह म्हणून आपल्या असणाऱ्या सार्वत्रिक प्रतिक्रियेत मात्र पूर्वीच्या काळी आणि आता प्रचंड फरक जाणवतो, हे आताची आपली प्रतिक्रिया पाहता आवर्जून नमूद करावंसं वाटतं. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय समाज म्हणून आपण चीन आणि पाकिस्तानबरोबरची युद्धं, बांगलादेशची निर्मिती, या घटना पाहिल्या. काही काळापुरता ‘कर्फ्यू’, ‘ब्लॅकआउट’ अनुभवला. पुण्यात पानशेतच्या पुरानंतर झालेलं घरांचं आणि शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान आणि पुढचे काही दिवस अनेक भागांत झालेली ‘बंद’ची स्थितीही पाहिली. पण अशा प्रत्येक वेळी देशाप्रती आणि समाजाप्रती आपलं एक नागरिक म्हणून लहान का होईना, पण महत्त्वाचं कर्तव्य आहे, आणि ते आपल्याला प्रामाणिकपणे पार पाडायचं आहे, ही भावना मी फार विस्तृत स्वरूपात पाहिली आहे. अडलेल्याला मदत करणारे आणि संकटाची जाणीव ठेवून जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन मदतीला धावून जाणारे हात पाहिले आहेत. मनात आणलं तर समाज आपलं कर्तव्य अगदी चोख पार पाडू शकतो, याची एक अगदी साधी आठवण मनात अजून ताजी आहे. १९६५ (भारत-पाकिस्तान युद्ध) आणि १९७१ (बांगलादेशची निर्मिती) या दोन्ही वेळेस ब्लॅकआउटचं भान ठेवून पुण्यात गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक एकाच दिवसात, सूर्यास्ताच्या आत संपवण्यात आली होती. हीच मिरवणूक इतर वेळी दुसऱ्या दिवसापर्यंत चालत असे (अजूनही चालते).

पं. जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी या मोठय़ा नेत्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर झालेला शुकशुकाट आणि शोकमग्न अवस्थेत अगदी उत्स्फूर्तपणे लोकांकडून पाळला गेलेला बंद हेही बघितलं आहे. हे प्रसंग निराळे असले तरी त्या प्रत्येक वेळी जनमानसाच्या एकवटलेपणाची शक्ती दिसली होती. नेमका त्याचाच आज मला अभाव जाणवतो.

महात्मा गांधी म्हणत, की लोकशाही प्रबळ व्हायची असेल, तर त्यात लोकांची स्वयंशिस्त आणि नागरिक म्हणून लोकशाहीत असलेला त्यांचा  सहभाग या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. पिढय़ा पिढय़ांमध्ये असलेल्या अंतरामुळे असेल, किंवा पूर्वीच्या काळची राजकीय, सामाजिक मूल्यं आणि आता पाळली जाणारी मूल्यं यातल्या फरकामुळे असेल, पण लोकशाहीतल्या सहभागाची मानसिकता हळूहळू कमी होताना मी पाहिली आहे.

‘करोना’च्या साथीबरोबर आलेल्या टाळेबंदीनं इतरही अनेक चिंता सतावत असल्या, तरी आता गर्दी न करणं खरोखरच आवश्यक होतं. एकीकडे संकटाचं भान ठेवून अनेक सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि अगदी व्यक्तिगत स्तरावरही नागरिक मदतीसाठी पुढे आले. त्याच वेळी दुसरीकडे १० ते १५ टक्के नागरिक कशाचीही पर्वा न ठेवता बेदरकारपणे वागताना दिसले. डॉक्टर, परिचारिका आणि पोलीस हे प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण काही ठिकाणी त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना घडल्या. धर्म, जाती आणि परंपरांच्या नावाखाली नागरिकशास्त्राचे नियम धुडकावले गेले. राजकीय पक्षांनी आणि सामाजिक, राजकीय व धार्मिक नेत्यांनी अशा वेळी मोठय़ा प्रमाणावर लोकप्रबोधन करणं गरजेचं असतं. तेही त्या प्रमाणात दिसून आलं नाही.प्रत्येक नैसर्गिक आपत्ती आपल्याला काहीतरी धडा शिकवत असते. मानसिकतेत काळानुरूप आणि त्या त्या वेळच्या वातावरणानुरूप बदल होत जाणार हे निश्चित आहे. पण समाज म्हणून लोकशाहीत असलेल्या आपल्या सहभागाचा एक चिरंतन मूल्य म्हणून विचार व्हायला हवा. ‘करोना’च्या आपत्तीनं आपल्याला एवढं शिकवलं तरी पुष्कळ आहे.