डॉ. सुवर्णा दिवेकर – drsuvarnadivekar@gmail.com

‘करोना’ आपत्ती उद्भवली आणि उदार कर्णाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशात अनेक धनिकांनी अर्थसाहाय्य केलं; पण ‘रामाच्या सेतू’साठी खारुताईंचीही मदत लागते. टाळेबंदीच्या या काळात एका बाजूस शेजारधर्म, माणुसकी, ओलावा या शब्दांवरची कोळिष्टकं झटकली गेली, तर  दुसऱ्या बाजूस प्रेमाचा उमाळा आटल्यावर खरा आणि व्यवहारी चेहरा समोर दिसू लागला. जगताना असे  छाप-काटे दिसायचेच..

Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Loksatta samorchya bakavarun Congress bjp Declaration Important to the people Purpose of the issues
समोरच्या बाकावरून: माझे मत त्याच उमेदवाराला, जो…
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!

छापा

आमचे एक नातेवाईक वाशीला एकटेच राहतात. वय ऐंशीच्या पुढे. पत्नी हयात नाही. मुलगी सिंगापूरला. टाळेबंदी  जाहीर झाली. तशी, हाती पैसा असूनही, सगळीकडून ‘कोंडी’ झाली. हॉटेल्स बंद, मदतनीस, स्वयंपाकी, सगळेच टाळेबंदीत. सुरुवातीच्या टप्प्यात टाळेबंदी  रुळली नसल्यानं, सेवाभावी संस्था, मदत पोहोचवणारी पथकं, सगळी रांगती पावलं टाकत होती. दिशाहीन अवस्था!

त्यांच्याच छोटय़ा वसाहतीतली, एक गृहिणी पुढे आली. खरं तर, तशी वरवरची, जुजबी ओळख होती. ती एका शाळेत उपमुख्याध्यापिका होती. शाळा बंद, म्हणून घरी होती. मुलगा, सासू, पती आणि ती. नोकरी उत्तम होती. घर सधन होतं. साहजिकच शारीरिक कष्टांची सवय नव्हती. तरीही तिनं या वृद्ध गृहस्थांना दोन्ही वेळा स्वत:च्या घरी जेवायला बोलावलं. ‘‘डबा पाठवून देत नाही. आमच्यासोबतच जेवत जा काका. सगळ्यांनाच एकमेकांची सोबत होईल.’’ सुरुवातीला नाइलाजानं, मग संकोचानं आणि पुढे आनंदानं जेवायला जाता-जाता स्वत:च्या ताट-वाटीसह त्यांच्या सिंकमधली बाकीची ताटंही ते आपणहून लिक्विड सोपनं धुवायला लागले. ‘चौघांचा स्वयंपाक, त्यात आणखी एक.’ हे वाक्य म्हणायला सोपं; पण अनिश्चित काळासाठी निभावणं अवघड. तरीही किती तरी गृहिणी हे ‘अवघड’ काम ‘सोपं’ करताना आणि तेही आनंदानं करताना दिसत आहेत. आसपासच्या एकटं राहणाऱ्याला (किंवा राहणारीला) डबा देणं, किमान पोळ्या नेऊन देणं, घरपोच होणाऱ्या काही सेवा मिळवून देणं, अशा प्रकारे आपला वाटा उचलणाऱ्या ‘खारुताई’ मनाला आश्वस्त करतात.

आमच्या काही मैत्रिणींनी सलवार-कुर्त्यांच्या एकटय़ा पडलेल्या ओढण्या आणि ब्लाऊज घट्ट किंवा ढगळ झाल्यामुळे निर्वासित झालेल्या सुती साडय़ा कपाटाबाहेर काढल्या. एकीकडे कोपऱ्यात विश्रांती घेणारं शिवणयंत्र होतंच. एके दिवशी एक निर्मिती घडली. उत्तमपैकी ५०० ‘मास्क’ तयार झाले. वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांकडे सुपूर्दही झाले. ‘जागृती’ संस्थेच्या जयश्री काळे आमच्या वसाहतीत राहतात. दातृत्व हे त्यांच्या संदर्भात विशेषण नसून नाम आहे- एवढं वाक्य त्यांची ओळख करून देण्यास पुरेसं आहे. आमच्या वसाहतीत काम करणाऱ्या मदतनीस स्त्रियांना त्यांनी किमान पंधरा दिवस पुरेसं होईल एवढं धान्य आणि तेलाच्या पिशव्या अशी मदत केली. गवगवा नाही की वाच्यता नाही. माझ्याकडे येणाऱ्या बाईनं सांगितलं म्हणून कळलं.

आमच्या वसाहतीत गेले काही महिने भाजीचा टेम्पो येतो. ‘सुरेश भाजीवाले’ असा मोबाइल नंबर सर्व घरांतल्या मोबाइलवर दिसेल. टाळेबंदीच्या काळात त्यांना आदल्या रात्री फोन करून भाजी-फळांची ऑर्डर दिली, की दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलेल्या वस्तू दाराशी हजर. कुठलीही जादा रक्कम  नाही, की विशेष काही करत असल्याची भावना नाही. ‘गूगल-पे’ केलं तरी चालतं त्यांना. सोय होणं अगत्याचं. माझ्याकडे काम करणाऱ्या दोघींना मी पूर्ण पगाराव्यतिरिक्त ५०० रुपये मुलांच्या खाऊला म्हणून दिले. अर्थात हे उपकार म्हणून नाही; पण असं छोटुकलं औदार्य आसपासच्या अनेक घरी दिसलं. शिवाय लहान घरात राहणाऱ्या, शाळेविना कंटाळलेल्या लहानग्यांना पत्ते, सापशिडी, पुस्तकंही घेऊन दिली गेली.

उदार कर्णाचा वारसा सांगणाऱ्या आपल्या देशात अनेक धनिकांनी अर्थसाहाय्य केलं; पण ‘रामाच्या सेतू’साठी खारुताईचीही मदत लागते. ‘करोना’च्या कारणानं जणू शेजारधर्म, माणुसकी, ओलावा या शब्दांवरची कोळिष्टकं झटकली गेली. तूर्तास तरी मास्क लावून बाहेर पडणारा तो किंवा ती, ‘‘काही आणायचं आहे का?’’ असं इतरांना विचारू लागली. घरातल्या ‘भीमसेनी कापरा’ची वाटावाटी होऊ लागली. ‘झूम’वरून संयुक्त पठण होऊ लागलं. अवघं जग विरुद्ध विषाणू! या लढय़ाला सामोरं जायला माणूस ‘एक’ झाला. ही स्थिती ‘तात्पुरती’ असायची शक्यता अधिक. असं जरी असेल तरी उद्याच्या ‘करोनोत्तर’ जगतात माणुसकीला पडलेलं हे सुंदर स्वप्न मनात वस्तीला असेल. डय़ुटीवर जाणाऱ्या मैत्रिणीचं बाळ कोणी तरी सांभाळतं आहे, इन्स्पेक्टरकाकांच्या घरी कुणी तरी ‘च्यवनप्राश’ पोहोचवतं आहे, स्कूल व्हॅनच्या ड्रायव्हरकाकांकडे शिधा पोहोचतो आहे.. रामाच्या सेतूसाठी एक-एक ‘वीट’ चढते आहे.

काटा –

तीच,  पुण्यातली उच्चभ्रू वसाहत! ‘या टाळेबंदीच्या कठीण काळात हा जोरजोरात बोलण्याचा आवाज कुठून येतो आहे? मास्कमधून गाळून इतका जोरात येतोय, मग प्रत्यक्षात केवढा असेल?’

‘‘आज १ तारीख. न चुकता पगार घ्यायला आलात दोघी. नशीब मास्क बांधलेत. खालच्या नळावर हातपाय धुऊन आलात ना गं? झोपडपट्टीतून येता. नका येऊ ही बंदी उठेपर्यंत. काय.. समजलं ना?’’

दाराबाहेरून एक आवाज, ‘‘एरवीही तिथूनच येतो. तेव्हा बरं चालतंया? आम्ही कामाला आलोच ना.. पोलीस सोडत नाहीत, म्हणून खाडे केले..’’

‘‘जा आता.. पगार पुढच्या महिन्यात रेग्युलर आलात तर. आता फक्त झाल्या दिवसांचेच. आमचे पैसे का झाडाला लागतात?’’  ‘‘आणि आमचे कष्ट काय वेलीला  लागतात?..’’चुटपुटतं प्रत्युत्तर.

चढय़ा आवाजाच्या मध्ये आणखी चढा आवाज आला, गोड आवाजात बोलणाऱ्या, ‘टिपटॉप’ राहणाऱ्या, प्राप्तिकर अधिकारी असलेल्या रागिणीचा. सुरेश भाजीवाल्यांचा पिवळा टेम्पो बाहेर उभा होता. ‘‘एवढीशी  भाजी.. गाजर, बीट, काकडी, भेंडी, वांगी.. आणि एवढय़ाचे अडीचशे रुपये? भाजी विकतोस की सोनं?’’ एरवी भाजी घ्यायला गाडीवर आल्यानंतर आठवणीनं ‘गुड इव्हिनिंग’ म्हणणाऱ्या याच का त्या मॅडम?

‘‘मॅडम, मोठं मार्केट बंद आहे. शेतकऱ्यांकडून मिळेल तशा आणि मिळेल त्या भावात उचलल्या भाज्या.’’

‘‘परवा टोमॅटो दिलेस, त्यातले चार पचपचीत होते. कोथिंबिरीवर फुलं होती. आजच्या अडीचशेतले पन्नास कमी करून दोनशे रुपयेच देणार मी..’’

‘‘तुमची मर्जी; पण हे शेवटचं. परत नका सांगू भाजी आणायला मला.’’

‘‘नाहीच सांगणार.. ढीगभर भाजीवाले घरपोच देणारे भेटतील. असल्या परिस्थितीचा जो-तो फायदा उठवतो आहे.’’

शेअर बाजार ‘डाऊन’ झाल्यानं ‘रंगीत’ पैसा गुंतवण्यासाठी आपणही परिस्थितीचा फायदा घेतला, हे रागिणी विसरली बहुतेक.

रोज शेजारी जेवायला जाणारे काका, त्या घरात थोडे रुळले. परतफेड म्हणून नाही, पण जिव्हाळा साजरा करायला म्हणून टाळेबंदी  उठल्यावर सगळ्यांना घेऊन स्टार हॉटेलमध्ये जेवायला जाण्याचा बेत मनात आखत होते. विचारानंही त्यांचं मन प्रसन्न झालं. ‘सिक्युरिटी’चा माणूस दुसऱ्या सिक्युरिटीवाल्याला सांगत होता, ‘‘फार भाव खात होते हे.. मिलिटरीत मोठे साहेब असतील; पण आता शेजारच्या घरात तुकडे मोडतोय सांज-सकाळ..’’ एरवी बक्षिसीच्या आशेनं ‘सॅल्यूट’ करणारा ‘तो’, आता ‘करोना’च्या निमित्तानं मनातलं ‘कडू’ जहर ओकत होता.

एव्हाना टाळेबंदीसुद्धा रुळली. प्रेमाचे उमाळे कमी होऊ लागले. व्यवहार दिसू लागला. अतिशय श्रीमंत, सुरेख, कोणाशी न बोलणाऱ्या, आढय़ताखोर सहानी बाई आणि त्यांची अमेरिकेहून सुटीला आलेली आणि आता पुण्यात अडकल्यानं वैतागलेली मुलगी हक्कानं शेजाऱ्यांना कामं सांगू लागल्या. सौजन्य आणि वयाचा मान राखून कोणी काम करे, कोणी टाळत असे. ‘‘डॉक्टरकडे ‘व्हिजिट’ असल्याचं सांगून कोणा एकीकडे चौघींनी जमून, ‘मास्क लावतो’, अशी बढाई मारत, पैसे लावून पत्त्याचे डावही इथे रंगत आहेत आणि ‘वाइन शॉप’च्या मागच्या दारातून आलेल्या मदिरेच्या पार्टीज्ही होत आहेत. एकीकडे रामरक्षेच्या सुरात संध्याकाळ साजरी होते, तर दुसरीकडे आनंददायी व्हिडीओज् डोळ्यांना सुखावतात.

असे हे छाप-काटे! आता असे का?.. घटना एकच असते. एकाच प्रसंगात प्रतिक्रिया वेगळ्या घडतात. अशा प्रश्नांना गणिती उत्तरं नाहीत. तशी मानसशास्त्रातही नेमकी विश्लेषणं नाहीत. खानदेशी बहिणाबाई चौधरींनी मात्र अचूक ओळखलं आहे मन! कधी भुईवर, तर कधी आकाशी जाणारं अगम्य मन. ही माझी निरीक्षणं एका मर्यादित जगातली आहेत. ही खिडकी छोटीच आहे. या सगळ्याच्या पलीकडे,  आणि अलीकडे त्याहून वेगळं वास्तव आहे याची मला जाणीव आहे; पण प्रत्येक नाण्याला छापा-काटा असतो, हे मात्र सत्य आहे.

( जयश्री काळे यांचं नाव वगळता लेखातील इतर नावे बदलली आहेत.)