04 August 2020

News Flash

यत्र तत्र सर्वत्र : करुणा

करुणेची भावना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते असं म्हणतात.

‘स्पॅनिश फ्लू’दरम्यान सेवाकार्य करणारी ‘अमेरिकन रेडक्रॉस’ची परिचारिका

प्रज्ञा शिदोरे – pradnya.shidore@gmail.com

करुणेची भावना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते असं म्हणतात. याचं उत्तर मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आहे.  शारीरिक फरकामुळे कु टुंबातील मुला-बाळांची काळजी घेण्याचं काम स्त्रीकडे आलं आणि पुरुष खाण्याची व्यवस्था आणि सुरक्षा बघू लागला. त्यामुळे स्त्रियांकडे करुणेची भावना अधिक आहे, असं काही मानववंश शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. दलाई लामा म्हणतात, की जगात झालेली सर्व युद्धं, संहार हा पुरुषाच्या अहंकारामुळे झाला. ही सर्व युद्धं झाल्यावर त्याचे परिणाम निस्तरले, रुग्णांची शुश्रूषा केली ती स्त्रियांनी, म्हणजेच परिचारिकांनी!

करोनाच्या  साथीनं सगळ्यांनाच एका विचित्र परिस्थितीत आणून सोडलं आहे. अशा वेळी कसं वागायचं याचा कोणालाही अनुभव नाही. कामाची शिस्त बिघडलेली, नोकरी राहील की नाही याची शाश्वती नाही. ही परिस्थिती कधी बदलेल याचा काहीही अंदाज नाही. या सगळ्यामुळे एक विचित्र ताण मनावर येतो आणि त्यातून असं होत असावं; पण सगळ्यांचंच असं होतं असं नाही. उलट आपत्तीच्या काळामध्ये अनेक लोकांची  दुसऱ्याच्या मदतीला धावून जायची भावना जागृत होते.  ही मदत फक्त पैसे देऊन करायची नसते त्यांना, तर स्वत: लोकांमध्ये मिसळून, त्यांचं दु:ख समजून घेत, त्यांच्याबरोबर काम करायचं असतं. अशांची करुणा किंवा ‘कम्पॅशन’ जागृत आहे, असं आपण म्हणतो. करुणा या शब्दाचा अर्थ खरं तर शब्दांमधून जेवढा सांगता येत नाही, तेवढा एखाद्या कृतीतून तो सहज लक्षात येतो.

काही अभ्यास असं सांगतात, की करुणेची ही भावना पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते. दलाई लामा २०१८ मध्ये एका गटासमोर बोलताना म्हणाले होते, ‘‘मानवप्राण्यामधला सगळ्यांत महत्त्वाचा गुण, त्याची मूळ भावना, त्यानं जपलंच पाहिजे, असं मूल्य म्हणजे करुणा! अशा मूल्याचं शिक्षण मुलांना शालेय स्तरावर असतानाच दिलं पाहिजे.  राग, क्रोध, मत्सर या भावनांचा आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो; पण करुणेच्या, दुसऱ्याबद्दलच्या प्रेमाच्या, सौहार्दाच्या भावनेनं वयस्क शरीरही ताजंतवानं राहतं. हे मूल्य रुजवण्याचं बळ स्त्रियांमध्येच अधिक असतं.’’ दलाई लामा सांगतात, की जगात झालेली सर्व युद्धं, संहार हा पुरुषांमुळे, पुरुषाच्या अहंकारामुळे झाला, मात्र ही सर्व युद्धं झाल्यावर त्याचे परिणाम निस्तरले, रुग्णांची शुश्रूषा केली ती सर्व परिचारिकांनी.

आपण सध्या जशा परिस्थितीतून जातो आहोत, तशा परिस्थितीमध्ये दलाई लामा म्हणतात त्याप्रमाणे, मानवप्राण्याच्या मूळ भावनेला स्पर्श करणारे अनेक उपक्रम जन्माला येतात. १८८१ मध्ये अमेरिकेतही तसंच झालं. एका सधन कुटुंबातून आलेल्या क्लारा बर्टन या त्या वेळेच्या अमेरिकेमधील सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होत होत्या. १८६१ मध्ये अमेरिकेत यादवी युद्ध (अमेरिकन सिव्हिल

वॉर) छेडलं गेलं. अमेरिकेतल्या उत्तर आणि दक्षिण राज्यांमधलं हे युद्ध होतं. त्यात प्रचंड संहार झाला. क्लारा बर्टन या त्या वेळी युद्धात सहभागी झालेल्या अनेकांना ओळखत होत्या. तेव्हा प्रथम, सैन्याबरोबर राहून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सैनिकांची  शुश्रूषा केली. १८६५ मध्ये हे युद्ध संपल्यावर त्यांनी राष्ट्राध्यक्ष लिंकन यांना विश्वासात घेऊन  सैनिकांसाठी काम सुरू केलं.  १८६९ मध्ये त्यांची ओळख जीनिव्हातील ‘रेडक्रॉस’ संस्थेशी झाली. ‘रेडक्रॉस’ ही जीनिव्हामध्ये स्थापन झालेली, युद्धकाळामध्ये कोण्या एकाची बाजू न घेता, युद्धात जखमी झालेल्यांची  शुश्रूषा करणारी स्वयंसेवी संस्था होती. अर्थात ‘रेडक्रॉस’चं काम केवळ युद्धकाळापुरतं मर्यादित नाही. ‘रेडक्रॉस’बरोबर त्यांनी जवळजवळ १० र्वष काम केलं. अशाच प्रकारची संस्था अमेरिकेत असावी, असं त्यांना वाटे. पुढे, १८८१ मध्ये त्यांनी या ‘रेडक्रॉस’च्या धर्तीवर ‘अमेरिकन रेडक्रॉस’ची स्थापना केली आणि त्याच्या पहिल्या अध्यक्ष बनल्या. ‘अमेरिकन रेडक्रॉस’ने तेव्हा फक्त युद्ध नाही, तर अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये लोकांना वाचवण्यापासून, त्यांना तात्पुरती मदत करणं आणि नंतर त्यांच्या पुनर्वसनाचंही काम केलं. महत्त्वाची गोष्ट अशी, की आज ‘अमेरिकन रेडक्रॉस’बरोबर काम करणाऱ्यांपैकी ९० टक्के लोक हे स्वयंसेवक आहेत. आज ‘अमेरिकन रेडक्रॉस’ त्यांच्या स्वयंसेवकांच्या मदतीनं प्रत्येक संकटात धावून जाते आहे. एवढंच नव्हे, तर एक उत्तम स्वयंसेवक कसं व्हावं, कशा प्रकारच्या आपत्तीला कसं सामोरं जावं, याचं प्रशिक्षणही देत आहे.

बर्टन यांचा १९१२ मध्ये मृत्यू झाला; पण १९१८ मध्ये अमेरिकेबरोबरच सर्व जगाला वेठीस धरणाऱ्या ‘स्पॅनिश फ्लू’दरम्यान, या संस्थेनं कित्येकांचे जीव वाचवले असतील. मास्क तयार करण्यापासून लोकशिक्षण, तसंच स्वत:च्या जिवाची पर्वा न करता लाखो अमेरिकी लोकांची  शुश्रूषा ‘अमेरिकन रेडक्रॉस’च्या परिचारिकांनी केली. त्यानंतरच्या दोन्ही महायुद्धांमध्ये जखमी सैनिकांची काळजीही याच संस्थेच्या परिचारिकांनी घेतली. नुकतंच झालेलं पहिलं महायुद्ध आणि त्यानंतर आलेली ही साथ, यामुळे अमेरिकेच्या अनेक शहरांमध्ये परिचारिकांचा तुटवडा भासायला लागला, तेव्हा अनेक नन्सदेखील शुश्रूषेच्या या कामात ‘ रेडक्रॉस’बरोबर सहभागी झाल्या होत्या. परिस्थिती इतकी वाईट होती, की कधी तरी कोणत्या तरी बंद खिडक्यांमधून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज यायचा, तिथे गेलं तर आई-वडिलांना फ्लूने काबीज केलेलं असायचं आणि ते भुकेलं मूल शेजारच्या खोलीत रडत असायचं. कुठे एखादा मरणासन्न रुग्ण,आपल्याला पट्कन मरण यावं म्हणून गयावया करत असायचा. अशा परिस्थितीत या आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व प्रकारे रुग्णसेवा करत असायच्या. परिचारिकांबद्दल बोलताना आपल्याला फ्लोरेन्स नायटिंगेल हे नाव विसरून चालणार नाही. नायटिंगेल यांना आधुनिक काळातल्या नर्सिगची  जनक मानलं जातं. त्यांच्या ‘नोटस् फॉर नर्सिग’ या पुस्तकामध्ये त्या म्हणतात, की परिचारिकेचं काम हे डॉक्टरपेक्षा वेगळं आहे. आपल्याला रुग्णाची व्याधी नव्हे, तर त्याचं दु:ख समजून घ्यायला हवं. वैद्यकीय उपचाराबरोबर रुग्णाच्या प्रकृतीची अशा प्रकारे काळजी घ्यायला हवी ज्यानं रोग शरीरात शिरूच शकणार नाही. दु:खद गोष्ट  म्हणजे, रुग्णालयात असताना आपल्यावर उपचार करणारा डॉक्टर आपल्या लक्षात राहतो; पण आपली शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकेला लक्षात ठेवण्याचे आपण कष्टही घेत नाही.

अशा कामांमध्ये जिथे दुसऱ्याचं दु:ख, त्याच्या गरजा समजून घेऊन काम करावं लागतं अशा कामांमध्ये पुरुष अभावाने दिसतात; पण त्याचा अर्थ करुणेची ही भावना स्त्रियांमध्येच असते आणि पुरुषांमध्ये नाही, असं आहे का? कोणताही शास्त्रज्ञ असं थेट विधान नक्कीच करणार नाही आणि हे खरं नसेलही; पण पुरुष आणि स्त्री आपली करुणेची भावना व्यक्त कशी करतात यामध्ये फरक असतो. खूप कमी पुरुष असे आहेत, की त्यांना करुणा आपल्या कृतीमधून दाखवता येते; पण यापुढे जाऊन पुरुष किंवा स्त्री असो, स्वार्थ बाजूला ठेवून, दुसऱ्याला मदत करावीशी वाटणं हा एक असा गुण आहे, ज्यामुळे आपण, म्हणजे मानवजात इथपर्यंत येऊ शकली, असं शास्त्रज्ञ म्हणतात.

चार्ल्स डार्विननं १८७१ मध्ये ‘द डिसेंट ऑफ मॅन’ हा शोधनिबंध लिहिला. याला थोडी पाश्र्वभूमी अशी, की डार्विनची १० वर्षांची मुलगी खूप आजारी पडली. डार्विननं स्वत: तिच्या उशाशी थांबून तिची काळजी घेतली, तिला हवं नको ते पाहिलं; पण तो तिला वाचवू शकला नाही. तेव्हापासून त्याच्या डोक्यात मानवाच्या उत्क्रांतीमध्ये करुणेची, सहानुभूतीची जागा हा विषय घोळत होता. या पुस्तकात डार्विन म्हणतो, की ज्या जमातींमध्ये करुणेची, सहानुभूतीची भावना असेल अशाच जमाती उत्क्रांत होतात आणि निसर्गातही टिकून राहतात. म्हणून करुणा हा केवळ गुण नसून ती एक अंत:प्रेरणा आहे. कदाचित वैयक्तिक स्वार्थापेक्षाही प्रबळ अशी प्रेरणा. ही प्रेरणा कशी आली आणि कदाचित स्त्रियांमध्ये ती अधिक का असेल, याचं उत्तरही मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत आहे. मानवप्राणी दोन पायांवर उभा राहायला लागला, अनेक कौशल्यं शिकू लागला, तसं माणसाच्या मेंदूचा आकारही मोठा व्हायला लागला. या जड मेंदूमुळे, इतर प्राण्यांच्या तुलनेत मनुष्यप्राण्याला आपल्या आईपासून स्वतंत्र व्हायला वेळ लागतो. प्राण्यांमध्ये जो काळ काही महिन्यांचा आहे, तो मानवप्राण्यामध्ये किमान ५ ते ७ वर्षांचा आहे.  एका व्यक्तीची एक गट म्हणून काळजी घेता यावी म्हणून किंवा काळजी घ्यायला लागत होती म्हणून, या एका कारणामुळे सगळंच बदललं. माणसाला एकत्र राहायचे फायदे कळायला लागले, वस्ती बनली, नाती आली, समाज बनला, मदतीची देवघेव सुरू झाली. शारीरिक फरकामुळे मुलाबाळांची काळजी घेणं हे काम स्त्रीकडे आलं आणि पुरुष खाण्याची व्यवस्था आणि सुरक्षा बघू लागला. त्यामुळे स्त्रियांकडे करुणेची भावना अधिक, असं काही मानववंशशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

आपण या करुणेचा, सहानुभूतीचा विचार सध्या फार करत नाही. अनेक वेळा वैयक्तिक स्वार्थ जपला गेला, की मगच दुसरी व्यक्ती दिसायला लागते किंवा आपली सध्याची भांडवलशाही व्यवस्था आपल्याला याबद्दल विचार करायचा अवकाशही देत नसेल. आपल्याला करुणेबद्दल थेट गौतम बुद्धांचे दाखले दिले जातात किंवा सध्याच्या जगातलं उदाहरण हवं असेल तर मदर तेरेसांचं किंवा आपल्याजवळचं म्हणजे आमटे कु टुंबीयांच्या ‘लोकबिरादरी’ प्रकल्पाचं उदाहरण दिलं जातं.

करुणा म्हणजे दुबळेपणा, असा काहीसा समज आपण करून घेतला आहे. अमेरिकेत आणि युरोपातल्या अनेक देशांमध्ये २०१५ मध्ये सीरियातील निर्वासित, तिकडच्या जाचक राज्यकर्त्यांपासून स्वत:ला वाचवण्यासाठी, आपल्या जिवाची पर्वा न करता, समुद्रमार्गानं किंवा मिळेल त्या मार्गानं येत होते आणि या देशांनी आपल्याला आश्रय द्यावा, अशी मागणी करत होते.  युरोपातील इतर देशांच्या तुलनेत जर्मन चॅन्सलर अँगेला मर्केल यांनी जर्मनीमध्ये या निर्वासितांचं स्वागत केलं. बाकीचे देश जेव्हा त्यांची विल्हेवाट लावू पाहात होते, आमच्याकडे निर्वासितांना सामावून घेण्याची क्षमताच नाही, असं म्हणत होते, तेव्हा मर्केल यांनी त्यांना जर्मनीत आश्रय तर दिलाच, पण त्यांच्या निवासासाठी, नोकऱ्यांसाठी सोयीही केल्या. मर्केल यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या नेतृत्वाला ‘बायकी, भोळं,’ म्हणून युरोपात हिणवलं गेलं; पण सध्या जर्मनीत राहणारे सीरियन निर्वासित त्यांना ‘मामा मर्केल’ म्हणून संबोधतात.

फ्लू असू दे, प्लेग किंवा आत्ताचा करोना विषाणू, अशा परिस्थितीत माणूस संशयी बनतो. स्वत: सोडून कोणावरही विश्वास ठेवत नाही तो. अशा साथींबरोबर त्याच वेगानं पसरतो तो आत्मकेंद्रीपणा, एकमेकांबद्दलचा तिरस्कार आणि घबराट. अशा वेळेला आपल्याला या आरोग्यसेविका, परिचारिका, डॉक्टर्स यांच्याकडून शिकायला हवं. आपल्याला शिकायला हवं, ते अतिशय कठीण परिस्थितीत खंबीर राहणं; आपल्यात, स्वत:मध्ये झालेले बदल समजून घेणं, तसंच लोकांच्याही वागण्यातले बदल स्वीकारणं, स्वत:ला लोकांपासून तोडण्याऐवजी लहान कृतींमधून समाजाशी जोडून घेणं. सध्याची परिस्थिती काही दिवसांत निवळेल; पण आपण समाज म्हणून स्वत:च्या गरजांपलीकडे जाऊन दुसऱ्याचा विचार करायला शिकू का? स्वार्थ किंवा स्वहितापेक्षा समाजाची गरज पुढे ठेवू का? सांगता येत नाही, पण तसं व्हायला हवं, कारण डार्विन म्हणतो त्याप्रमाणे, त्यावर आपलं अस्तित्वच अवलंबून आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2020 1:18 am

Web Title: coronavirus pandemic women have kind heart than men spanish virus nurse job dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 अपयशाला भिडताना : ओळख
2 निरामय घरटं : निर्मोही संयम
3 टाळेबंदीचा ‘हिंसाचारी’ चेहरा
Just Now!
X