News Flash

सप्तपदीतलं वचन

मनातलं कागदावर

चंद्रशेखर पाचपांडे cd5pande@gmail.com

सुरुवात दोघांपासून आणि आता शेवटाला परत दोघंच! मधे जे जे काही जीवनात आलं ते मृगजळ असावं तसं विरलंय. सुखी होण्यासाठी म्हणून कधी एक-एकटय़ाने, कधी सोबतीने ज्या ज्या गोष्टींच्या मागे धावलो त्यांचा काही उपयोग आणि महत्त्वच वाटेनासं झालंय आता. आज वाटतंय ‘आपण दोघं एकमेकांसाठी एकत्र आहोत हेच कारण जीवन आनंदात जगण्यासाठी पुरेसं आहे.’ आज आयुष्याच्या संध्याकाळी मिळालेली ही समज जर सहजीवनाच्या सुरुवातीला कळली असती तर नातं अधिक फुललं असतं, गहिरं झालं असतं.

सुरुवात कात्री शोधण्यापासून झाली होती, नेहमीच्या जागेवर मिळाली नाही, तिला विचारलं तर तिने आणून दिली. नेहमीची जागा बदलली होती तिने. नेलकटरचंही तेच झालं आणि मग लक्षात आलं खूप काही बदललंय..

लग्न समारंभाचे धावपळीचे दिवस संपले आणि हळूहळू घर तिच्या सुरात गाऊ लागलं. आधी फक्त माझी सवय असलेल्या घरात ‘ती’चा प्रवेश झाला होता. लग्नापूर्वी निदान वर्षभर तरी त्याच फ्लॅटमध्ये एकटा राहात होतो मी, त्यामुळे दैनंदिनी माझ्या मनाप्रमाणे चाले, मला हवं तेव्हा घरी पोहोचणं असो, हवी तेव्हा बाथरूम-टॉयलेट रिकामी असणं असो किंवा आणि काही, सब अपना राज. दुसऱ्या कोणासोबत आपली जागा, आपल्या वस्तू किंवा अगदी स्वत:ला सुद्धा शेअर करणं तसं माहीतच नव्हतं मला. कठीण गेलं काही दिवस हे ‘अ‍ॅडजेस्ट’ करणं. तिलाही एका नवीन व्यक्तीला आपल्या आयुष्यात स्थान देणं इतकंच नव्हे तर नवीन जागा, नवीन माणसं, नवीन जबाबदाऱ्या निभावणं सोपं गेलं नसेल हा विचारही तेव्हा आला नव्हता. काहीच माहीत नव्हतं एकमेकांबद्दल! आवडीनिवडी, स्वभाव, सवयी सगळंच अपरिचित. माझी माणसं-तुझी माणसं, तिच्याकडून माझ्या, माझ्याकडून तिच्या आणि आम्हा दोघांकडून इतर सगळ्यांच्या अपेक्षा, या गोंधळातून फारसं चांगलं काही निष्पन्न झालं नाही. म्हटलं तर खूप छोटा शब्द आहे ‘अपेक्षा’, पण आयुष्य व्यापून टाकतो. सगळ्या वादांच्या मुळाशी असते ती हीच, अपेक्षा..

‘अहो, ऐकलंत का?’ तिच्या हाकेने माझी विचारांची मालिका तुटली आणि मी वर्तमानात आलो.

‘काय गं?’

‘काही नाही, असंच’ हल्ली हे असच सुरू असतं आमचं, घरात दोघेच असतो आता, मुलं आपापल्या कुटुंबासोबत नोकरीच्या ठिकाणी स्थायिक. घरी येणार एकतर दिवाळीत नाहीतर आमच्या आजारपणात. नाही, तक्रार नाहीए काही त्यांच्याबद्दल, त्यांची इच्छा असूनही या शहरात नाही साध्य झाली त्यांची उद्दिष्टं, मीही असाच नव्हतो का आलो या शहरात. बघा भरकटलो पुन्हा, तर हल्ली हे असंच सुरू असतं आमचं. शरीरंही थकलीत आता, डोळे दमलेत, वाचनही होत नाही सलग. टी.व्ही. किती बघणार? अंथरुणात पडून असतो जास्त वेळ, मध्येच कधी डोळा लागला तर ही अशी हाक मारते, मी प्रतिसाद देतो जाग येऊन. तर कधी कधी मीही अशी हाक मारतो. खरं सांगू? आपल्या जोडीदाराला निपचित पहुडलेला पाहून शंका येते उगाच मनात आणि त्याला आवाज देऊन तो ‘असल्याची’ खात्री करून घेतली जाते आपसूकच. बरं वाटतं प्रतिसाद मिळाला की, जीव भांडय़ात पडतो. आपल्या जोडीदाराचं फक्त ‘असणं’देखील किती गरजेचं आहे ते आता या वयात कळलं. आता एकमेकांकडून इतर काहीच अपेक्षा नाहीयेत उरलेल्या, फक्त सोबत असावी हीच एक इच्छा आणि अपेक्षा.

मला आठवतंय अजून, लग्नानंतरचे सुरुवातीचे दिवस एकमेकांना जोखण्यात गेले. जोडीदार कसा आहे ते स्वीकारण्यापेक्षा तो कसा असायला हवा याचीच प्रतिमा मनात तयार होत राहिली, सत्याकडे प्रतिमेची झापड लावलेल्या डोळ्यांनी बघताना नकळत जोडीदारावर अन्यायच होत गेला आणि हे नातं फुलायला उशीर होत गेला. दोघांच्या आवडीनिवडी वेगळ्या, मला घरातच बसून वाचन करायला आवडे तर तिला भटकायला. नाटक-सिनेमे हा तर तिचा वीक पॉइंट त्यामुळे हा नेहमीच वादाचा विषय राहिला. दोघांपासून सुरू झालेल्या या नात्यात कितीतरी वळणं येत गेलीत, काही गोष्टी आपसूक चालून आल्यात, काहींचा हव्यास करून त्या मिळवल्यात. धावत राहिलो फक्त. फक्त दोघांसाठी अशी किती क्षण जगता आले? घर, मुलं, नातेवाईक, मित्रमत्रिणी सगळे काही जीवनात आलेत, प्रसंगी त्यांच्यावरून आपसात वादही झालेत, काही लगेच विरलेत, काहींनी आयुष्यभर पुरतील असे ओरखडे मागे ठेवलेत. झालेला प्रत्येक वार, अप्रत्यक्षरीत्या दोघांच्या नात्यावरच झाला, कधी त्याने नातं बळकट झालं आणि कधी भांबावूनसुद्धा गेलं. सुरुवात दोघांपासून आणि आता शेवटाला परत दोघंच! मध्ये जे जे काही जीवनात आलं ते मृगजळ असावं तसं विरलंय. सुखी होण्यासाठी म्हणून कधी एक-एकटय़ाने, कधी सोबतीने ज्या ज्या गोष्टींच्या मागे धावलो त्यांचा काही उपयोग आणि महत्त्वच वाटेनासं झालंय आता. आज वाटतंय ‘आपण दोघं एकमेकांसाठी एकत्र आहोत हेच कारण जीवन आनंदात जगण्यासाठी पुरेसं आहे’. आज आयुष्याच्या संध्याकाळी मिळालेली ही समज जर सहजीवनाच्या सुरुवातीला कळली असती तर नातं अधिक फुललं असतं, गहिरं झालं असतं.

कोणीतरी लिहिलंय,

‘तुम मसर्रत का कहो या इसे गम का रिश्ता,

कहते हैं प्यार का रिश्ता हैं जनम का रिश्ता’

माझ्या प्रत्येक ‘अगं, ऐकतेस ना’ला तिचा आणि तिच्याही ‘अहो, ऐकताय नं’ला माझा प्रतिसाद असतोच, पण केव्हातरी असा एक क्षण येईल की दोघांपैकी कोणी एक प्रतिसाद देणार नाही आणि तो हक्क मलाच मिळावा, आता हीच काय ती अपेक्षा. सहजीवन जगताना हा एक स्वार्थ जपलाय मी. आणि हो ती जर आधी गेली तर मात्र एक एक श्वास लवकर लवकर संपवून मीही जाईन तिच्याकडे, सप्तपदीमध्ये वचन दिलंय ना तसं मी तिला!

chaturang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:35 am

Web Title: couple live a happy life in a relationship
Next Stories
1 अ‍ॅनिमिया
2 सुजाण नागरिकांसाठी
3 जुगाराचं व्यसन
Just Now!
X